कोणत्याही गोष्टीत शारीरिक श्रम असतात तसे मानसिक श्रमही असतातच. त्यांना योग्य वळण लावायचे काम करीत असतात ते त्यांचे मार्गदर्शक. विशेषत: यश-अपयश, संघर्ष-समतोल, एकाग्रता-अनेकाग्रता याची गुंतागुंत समजून सांगत मनाला शांतीच्या डोहापर्यंत आणण्याचे काम सतरा खेळप्रकारांच्या दीडशेहून अधिक तरुण खेळाडूंना गेली अठरा वर्षे शिकवल्यानंतर कसे साध्य होते त्याविषयी…
राष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी! धावायच्या आठशे मीटर्स शर्यतींमध्ये निमा आत्मविश्वासाने उभी. मोठ्या दिमाखात धावायला सुरुवात करते. चारशे मीटर्सचे पहिले आवर्तन पूर्ण होते तेव्हा ती चौथ्या क्रमांकावर असते. पुढच्या प्रत्येक शंभर मीटरच्या टप्प्यावर मनाला काय सांगायचे याचे संकेत शिकवलेले असतात. एकाग्रता साधण्यासाठीच्या प्रतिमांचा सराव केलेला असतो. आता ट्रॅकवरचे शेवटचे वळण येते. तिथपर्यंत निमा प्रथम स्थानावर पोचलेली. ती जबरदस्त तालामध्ये धावतेय. एवढ्यात…

कट…कट…

निमा, मी आणि तिचे मार्गदर्शक रेकॉर्डिंग थांबवतो. शेवटच्या वळणावर पाठी वळून पाहणे टाळायचे असे आम्ही ठरवलेले असते. कारण त्या क्षणानंतर बाह्य स्पर्धाच नसते. फक्त नैपुण्याची पराकाष्ठा. ‘‘निमा, तू पाठी वळून पाहिलेस. तुला दिसले की तुझी आघाडी तीस मीटर्सहून जास्त आहे…जरा आठव कोणता विचार चमकून गेला… त्या फ्रेमकडे पाहा.’’ आम्ही तिचा चेहरा स्क्रीनवर ठळक करतो. क्षणभर शांतता… ‘‘जिंकले मी…’’ निमाचा अस्फुट स्वर. ‘‘अगदी बरोबर त्या क्षणाला शरीराने मनाचे तंतोतंत ऐकले. जिथे स्नायूंचा ताल आणि तोल गतिमान हवा तिथे आता विजयानंतरची शिथिलता आली. आणि त्यामुळे तुझे शरीर भरकटले. ट्रॅकच्या बाहेर फेकले गेले.’’ आम्ही पुढचे दृश्य पाहिले. निमाचे डोळे पाणावलेले होते. ‘‘खूप शिकण्यासारखे आहे यातून. मनाची शिस्त शरीराला शिस्तीत ठेवते. त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याचा आलेख बनवला आहे. तो आपण वापरला, पण अजून तो मुरलेला नाही… शेवटच्या वळणावर कोणी वळून पहिले?’’ मी विचारले. ‘‘कोणी म्हणजे… मीच’’ ती उत्तरली. ‘‘या टप्प्यावर ‘मी’ विरघळायला हवा की नाही?’’

‘‘खरेच की!…’’ ती उद्गारली.

शारीरिक तंदुरुस्ती, उत्तम प्रशिक्षण, चौरस आहार, नियमित योग आणि प्राणायाम असूनही मनाच्या गफलतीने, मौल्यवान नैपुण्यक्षण वाळूसारखे निसटून जातात… क्रीडा मानसशास्त्राच्या पुस्तकात सांगितलेले डावपेच त्या खेळाडूला समजतील असे सोपे करून सांगायचे असतात. एकूण १७ खेळप्रकारांचे दीडशेहून अधिक तरुण खेळाडू मला गेलीअठरा वर्षे शिकवत आहेत. त्या त्या खेळातल्या खाचाखोचा मी त्यांच्याकडून शिकतो. त्या त्या खेळाप्रमाणे भावनिक नियोजनाची तत्त्वे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो.

एका पिस्तूल शूटरबरोबर सत्र घेत होतो. आम्ही एक छोटा व्हिडीओ तयार केला. पहिल्यांदा दिसतो काचेचा रिकामा ग्लास. पार्श्वभूमीवर सुरू होतो त्याच खेळाडूचा आवाज. त्याप्रमाणे दृश्ये बदलत जातात. ‘‘रिकामा ग्लास आहे आपले शरीर. परिश्रमाने त्याला बनवले गेले आहे डौलदार आणि निरोगी. त्यात पडणारे पाणी म्हणजे मन. शरीर आहे हार्डवेअर तर मन आहे सॉफ्टवेअर. आता एक चमचा येतो ज्यात आहे साखर. साखरेचे दाणे म्हणजे आपली वैशिष्ट्ये. आजवर यशाचे टप्पे, अखंड सरावातील चिकाटी, अनुभवी मार्गदर्शकांकडून शिकलेली तंत्रे… आता साखर तळाशी स्थिरावली आहे. या टप्प्यावर म्हणायचे, ‘‘मी आता नेमबाजी करत आहे (I am shooting). तो चमचा म्हणजे आत्ताचे नैपुण्य. तो आता पाणी ढवळतो आहे. पाण्याला गती येत आहे. चमच्याची गती वाढते आहे. एका क्षणी चमचा ढवळण्याची क्रिया थांबवतो. आणि तरीही…’’

‘‘लयबद्ध गती सुरूच राहते…त्यात साखर विरघळून जाते.’’ ती नेमबाज म्हणाली. ‘‘या वेळी तू झाली आहेस नेमबाजीची प्रक्रिया (I am shooting).’’ त्यानंतर आम्ही या प्रतिमा कशा पद्धतीने वापरायच्या त्याची संहिता तयार केली. सांगायला समाधान वाटते की, ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे.

त्या त्या खेळाचे मार्गदर्शक खेळाडूंकडून तंत्र घोटवून घेतात. पण बॅडमिंटन किंवा टेबलटेनिसच्या रॅकेटबरोबर ‘दोस्ती’ कशी करायची ते शिकवत नाहीत. जलतरणपटूला पाण्याबरोबर असणारे त्याचे नाते कळले नाही तर उत्कट भावना ऐनवेळी घात करू शकतात. शरीरामध्ये पन्नास टक्के पाणी, जगामध्ये पन्नास टक्के पाणी. पाण्याचा गुणधर्म वाहणे. जे वाहणे आपल्याला दिसते त्याला म्हणायचे लाटा. लाटा दोन प्रकारच्या भरतीच्या आणि ओहोटीच्या. तसेच शांत समुद्राच्या आणि वादळातल्या. पोहते आहे शरीर. मन म्हणजे पाणी. त्यातल्या लाटा समजून घेऊ. असे म्हणून यश-अपयश, संघर्ष आणि समतोल या गोष्टी शिकवता येतात. विख्यात जलतरणपटू मार्क स्पिट्झ म्हणाले होते, ‘‘पोहायला सुरुवात केल्यानंतर काही काळाने जाणवते की फक्त ‘मी’ पोहत नाहीए…पाणी मला पुढे नेते आहे.’’

ओवी ही बारा वर्षांची बॉक्सर आहे. मेरी कोम हे तिचे श्रद्धास्थान. तीन मिनिटांच्या फेरीमध्ये एकाग्रता आणि अनेकाग्रता कशी साधायची याची एक रंगावली (Colour Code) आहे. तो शिकवल्यानंतर बॉक्सिंगच्या आखाड्यात आम्ही हे तंत्र प्रत्यक्ष सरावात घोटून घेतले. सगळेजण एकाग्रतेबद्दल बोलतात. पण खेळाडूची अनेकाग्रताही महत्त्वाची. समजा एक फलंदाज आहे. तो चेंडू खेळण्यास सज्ज आहे. त्याला क्षेत्ररक्षणाची रचना टिपावी लागते, खेळपट्टीचा अभ्यास चेंडूगणिक करावा लागतो. पुढचा चेंडू कोणता असेल त्या पर्यायांचा विचार करावा लागतो. आणि हे सगळे करून चेंडू ज्या वेळी गोलंदाजाच्या हातून सुटेल त्या ‘सोडक्षणाला’ (Release Point) जरी चित्त एकाग्र असले तरीही, गोलंदाजाच्या बोटाची पकड, चेंडूची वीण अशा गोष्टी निमिषार्धात ‘पाहाव्या’ लागतात. चेंडू ‘पाहण्यासाठी’ वेगवेगळी तंत्रे आहेत. दोन्ही हातांचा समतोल साधण्यासाठी खास अशी प्रतिमादृश्ये (Visualization) आहेत. प्रत्यक्ष बॅट आणि बॉल हातात घेऊन ती घोटायची असतात. क्रिकेटसारख्या खेळात विविध स्पर्धांच्या चित्रफिती उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून हे प्रशिक्षण देता येते.

एकाग्रता आणि अनेकाग्रता यामध्ये समरसता मिसळली की समग्रता येते, असे विनोबा म्हणतात. खेळाडूसाठी हे तत्त्व ‘व्यावहारिक’ करून सांगायचे असते. अपयशाची भीती, अपेक्षांचे दडपण, भविष्यामधल्या क्रीडा कारकीर्दीबद्दलच्या शंकाकुशंका यासोबतच खेळाडूचे पालकांबरोबरचे आणि मार्गदर्शकाबरोबरचे नाते खूप महत्त्वाचे असते.

खेळासाठी आणि खेळाडूंसाठी तनमनधन वेचणारे काही ‘सर’ आणि ‘मॅडम’ स्वत:च्या भावनांचे नियमन करू शकत नाहीत. अपयशी ठरलेल्या खेळाडूला डिवचणे म्हणजे प्रोत्साहित करणे आहे, असा समाज अजूनही काही क्रीडा शिक्षकांमध्ये रुजलेला आहे. त्यात भर पालकांची. कोणत्याही खेळात थोडे प्रावीण्य यायला सुरुवात होते आणि पालक स्पर्धेतील यशाची स्वप्ने पाहायला लागतात. त्यामुळे मुलेमुली खेळातला आनंद लुटू शकत नाहीत. पालक उत्साहाने स्पर्धेसाठी, सरावासाठी वेळ देतात. परंतु राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर जातानाच काही जण कोमेजून (Burn out) जातात. ‘‘डॉक्टर, आईला सांगाल का, माझ्या मॅचच्या वेळी स्टेडियमच्या बाहेर बसायला.’’ एक टेबलटेनिसपटू कळवळून म्हणाला होता. त्याला आईची भावनिक अतिगुंतवणूक कळत होती. पण आपल्यासाठी श्रमणाऱ्या आईला सांगायचे कसे ते कळत नव्हते.

स्पर्धात्मक खेळापर्यंत पोहोचलेले बहुतेक तरुण खेळाडू कष्टाळू असतात. अलीकडच्या पिढीच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी त्यांचे रोजचे प्रवास ऐकले तरी धाप लागायची. एवढे करून मिळेल त्या वेळी अभ्यास करून गुण मिळवणारी मुलेमुली खूप आहेत. ज्यांच्यात उच्च गुणवत्ता आहे त्यांना अलीकडे अनेक शाळा-महाविद्यालये सवलती देताहेत. काही पालक तर आता ‘घरूनच शिक्षण’ ही पद्धती अवलंबतात. खेळाडूचे क्रीडाक्षेत्रातले भविष्य ठरवण्याची वेळ इयत्ता आठवी-नववीत येते. ‘खूप झाला खेळ, आता अभ्यासाला लागा.’ नावाची कुटुंबवृत्ती काही गुणवान मुलांचे पंख छाटते. निमशहरी, ग्रामीण आणि आदिवासी मुलांवर हे खास ‘उच्चमध्यमवर्गीय’ ओझे नसते. असे खेळाडू जगणे पणाला लावून खेळतात. त्यांनाही गरज असते भावनिक ऊर्जेचे नियमन शिकवण्याची. स्वत:चे विचार ओळखण्याची तंत्रे शिकवायची असतात. विचार म्हणजे सतत सुरू राहणारे स्वगत. या स्वगताचे भान (Awareness) आणि जाण (Analysis) आले तर खेळाडू ‘विचारपूर्वक खेळतात. काही मुले जात्याच वैचारिक असतात तर काही भावनिक. काहींचा भर असतो कठोर सरावावर तर काही जणांकडे असते अखंड ऊर्जेचे देणे. (आठवा, २८३ षटके टाकणारा इंग्लंडमधला मोहम्मद सिराज) खेळाडूप्रमाणे क्रीडा मानसतज्ज्ञाला शैली बदलावी लागते. आणि खेळाप्रमाणे उदाहरणेही बदलतात. दहा वर्षांचा बुद्धिबळपटू चैतन्य माझ्याकडे यायचा. या खेळाच्या स्पर्धेत अनेक फेऱ्या असतात. पहिल्या दोन फेऱ्या जिंकला, एक बरोबरीत सोडवली आणि त्यानंतरच्या फेरीत तो हरला की पुढेपुढे हरतच जायचा. आम्हाला हे दुष्टचक्र थांबवायचे होते. आमच्या प्रयोगाचे नाव होते ‘आठ फेऱ्यांचे भोजन’… सूप, सॅलड्स, स्टार्टर्स, मेन कोर्स, साइड डिश, डेझर्ट्स, आइस्क्रीम आणि कॉफी असा बेत आम्ही तयार केला. समजा, आपण जेवायला गेलो आहोत. सूप उत्तम होते, पण आइस्क्रीम बेचव होते तर काय म्हणायचे? संपूर्ण जेवण रद्दी होते हे म्हणणे बरोबर नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण जेवण उत्कृष्ट होते असेही म्हणता येणार नाही. काही पदार्थ अतिरुचकर असतील तर काही सामान्य. एका फेरीवरून संपूर्ण जेवणाची परीक्षा करता येईल का? नंतरच्या काळात चैतन्य स्पर्धेदरम्यान मला फोन करून सांगायला लागला,

समुपदेशकाकडे असते शब्दांचेच धन आणि शब्दांचेच दागिने. त्याला भावनेची चमक आली तरच शब्द प्रभावी होतात. आजवरचा अनुभव असा की जे खेळाडू सातत्याने अनेक वर्षे संपर्कात राहिले त्यांना जास्त टिकाऊ यश मिळाले. कधी कधी खेळाचे मार्गदर्शक खेळाडूला आमच्याकडे पाठवतात ते ‘टेन्शन येते’ म्हणून किंवा ‘ऐन स्पर्धेच्या वेळी कच खातो’ म्हणून. त्या खेळाडूलाही या प्रक्रियेत तेवढाच रस असतो. वर्षानुवर्षे सलग काम करून खेळाडूंबरोबरच्या नात्याचा बंध घट्ट करणे या प्रक्रियेला पुरेसे प्राधान्य दिले जातेच असे नाही. टेड लास्सो या प्रशिक्षकाची कहाणी सांगणारी त्याच नावाची ‘अॅपल टीव्ही’ वर एक मालिका आहे. अमेरिकी फुटबॉल शिकवणारा टेड चक्क इंग्रजी पद्धतीच्या सॉकर क्लबचा कोच बनतो. त्याला खेळातले बारकावे कळत नसतात. तो लक्ष केंद्रित करतो खेळाडूंच्या भावभावनांवर आणि नात्यांवर. हे करताना तो वैयक्तिक जीवनातही नात्यांबरोबर झगडत असतो. भिन्न प्रकृतीच्या खेळाडूंचा संघ बनवणे हे आव्हान तो पेलतो. त्या खेळाडूंचे वयोगटही वेगवेगळे असतात. काही ज्येष्ठ तर काही कमी अनुभवी. प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या. पण तो ते आव्हान पेलतो.

मला आठ ते बारा वर्षे वयोगटातल्या खेळाडूंबरोबर काम करताना वेगळी मजा येते. सोळा ते एकवीस वर्षे वयोगटामध्ये तारुण्याचे बदलते रंग, खेळावर परिणाम करतात तर कधी कधी बाधक ठरतात. माझ्यासमोर बसलेला प्रत्येक खेळाडू हा भविष्यामध्ये तिरंग्याला नवा सन्मान देणार असा माझा घट्ट विश्वास असतो. आणि समजा असे तंतोतंत घडले नाही तरीही खिलाडूवृत्ती असलेल्या एका व्यक्तीला विकासात मदत करता आली याचे समाधान असतेच असते.

anandiph@gmail. com