अपर्णा महाजन

दीडशे वर्षांहून अधिक जुन्या कादंबरीवर बेतलेला एखादा चित्रपट आजच्या काळात निर्माण केला जावा आणि तो तितकाच ताजातवाना वाटावा, हे ‘लिटिल विमेन’ या  चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे. चार बहिणींचं किशोरवयीन विश्व आणि हळूहळू बालसुलभ विचारांमधून त्यांनी वास्तवात- तारुण्यात केलेला प्रवेश असं याचं कथानक. ‘मुलींनी जरूर स्वप्नं बघावीत. ती पूर्ण करायला कष्ट घ्यावेत. इतर त्याविषयी काय विचार करतात, यावरून आपल्या स्वप्नांची किंमत ठरत नाही,’ हा महत्त्वाचा विचार या कथेत अधोरेखित होतो. अशा साध्या, आपल्याशा वाटणाऱ्या लोभसपणासाठी ‘लिटिल विमेन’ पाहायलाच हवा!

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

अमेरिकी स्त्री-कादंबरीकार लुईसा मे अल्कॉट हिनं १८६८ मध्ये ‘लिटिल विमेन’ ही आत्मचरित्रपर कादंबरी लिहिली. (मराठी अनुवाद- शांता शेळके- ‘चौघीजणी’.) त्यातले विचार आज एकविसाव्या शतकातही ‘आधुनिक’ वाटावेत आणि आपल्याला विचारप्रवृत्त करणारे ठरावेत, अशीच ही कथा आहे. २०१९ मध्ये ग्रेटा गार्विक या अमेरिकी दिग्दर्शिकेला या कादंबरीवर आधारित चित्रपट काढावा असं वाटतं आणि आजचा प्रेक्षक आणि युवा वर्ग त्याकडे वैचारिकदृष्टय़ा आकर्षित होतो, यावरून आपण या कथानकाच्या प्रगल्भतेची कल्पना करू शकतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच लुईसा मे अल्कॉट यांच्या, ‘मी आयुष्यात खूप संकटं पाहते, म्हणून मी आनंदी गोष्टी लिहिते!’ या वाक्यानं प्रेक्षकांच्या मनाचं सुकाणू वेगळय़ा दिशेला वळतं. चित्रपट सुरू होतो, तो न्यूयॉर्क शहरात. एक तरुण लेखिका- ज्यो- तिची एक कथा घेऊन प्रकाशक- मि. डॅशवुड यांच्याकडे जाते. त्यांना ती कथा तिच्या मैत्रिणीची असल्याचं सांगतं. हे सांगताना आपल्या हाताला लागलेली शाई प्रकाशकाला दिसणार नाही, याची काळजी घेते. डॅशवुड हा साचेबंद काम करणारा प्रकाशक. तो तिला ठरावीक साच्यातले प्रश्न विचारतो, कथा डोळय़ांखालून घालताना त्यावर बेलाशक रेघोटय़ा मारतो. ‘कथेत स्त्री पाहिजे आणि शेवटी तिचं लग्न व्हायला पाहिजे किंवा ती मेली आहे, असं पाहिजे,’ हे अत्यंत कोडग्या भाषेत आणि शारीर-बोलीतून तिला सांगतो, पण कथा मात्र स्वीकारतो. आताच्या काळात मुबलक वापरला जाणारा ‘स्त्रीकेंद्री’ हा चटकदार वाक्प्रचार त्या काळीही अस्तित्वात होता, हे जाणवून सखेद हसू येतं.

‘स्त्रीकेंद्री असणं’ म्हणजे तरी काय? स्त्रीच्या दृष्टिकोनातून जग कसं आहे, त्यावर तिची प्रतिक्रिया काय आहे, त्यासंबंधी तिचा वैचारिक संघर्ष आणि वास्तव यातून उमटलेल्या सूक्ष्म जाणिवा आणि प्रतिक्रिया समजून घेणं. यासाठी प्रत्यक्ष ‘स्त्री’ ही केंद्रबिंदू असण्याची गरज नाही हे इथेच जाणवतं. तर, एका स्त्रीनं लिहिलेल्या आणि सहा स्त्रियांची वेगवेगळी मानसिकता, व्यक्तिमत्त्वं आणि भूमिका असलेल्या कथेवरचा हा स्त्रीनं दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. या कथानकात पुरुषप्रधान संस्कृतीत रुळलेल्या आणि घट्ट झालेल्या विचारांपेक्षा वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. ग्रेटा गार्विकनं दिग्दर्शिका म्हणून समानानुभूतीनं लेखिका लुईसा यांचे विचार आत्मसात केले आणि संवेदनशील अभिनेत्रींनी आपल्या अभिनयातून ते त्यांच्यातही झिरपलेत, हे या चित्रपटात दाखवून दिलं आहे. 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे कथानक. अशा काळात वर उल्लेखलेल्या प्रकाशकाला आपल्या वाचकांना स्त्रीविषयक मनोरंजनात गुंतवून ठेवायचं आहे. ‘नीतिमूल्यांना हल्ली मागणी नाही, लोकांना चटकदार पाहिजे असतं,’ हे त्याचं म्हणणं ऐकताना प्रेक्षक आपल्या भवतालाशी हे विचार नकळतपणे ताडून बघतो. ज्यो (जोसेफाईन- अभिनेत्री  Saoirse Ronan), मेग (मार्गारेट- एमा वॉटसन), बेथ (एलिझाबेथ-  Eliza Scanlen) आणि एमी (Florence Pugh) या चार बहिणी, त्यांचे आई-वडील आणि वडिलांची बहीण- आँट मार्च (मेरिल स्ट्रीप), असं हे मार्च कुटुंब. वडील युनियन आर्मीमधून युद्धावर गेले आहेत. किशोरवयीन मुलींच्या मनात वडील कधी येतील? परत येतील का? असे प्रश्न मनात निर्माण होत आहेत.. पण त्याच वेळी नाताळ कसा घालवायचा? यावरही त्यांची बालसुलभ चर्चा सुरू आहे. बाहेरच्या तीव्र परिस्थितीची जाणीव त्यांना नाही. त्यांची आई- ‘मॉमी’, ही कणखर, निडर व्यक्तिमत्त्वाची स्त्री. मुलींबरोबरचं तिचं साधं-सरळ, मैत्रीचं, प्रेमाचं आणि विश्वासू नातं त्यांच्या संभाषणांतून जाणवतं. या कथेत महत्त्वाचं असं आणखी एक पात्र आहे. ‘मुलींनी श्रीमंत माणसाशी लग्न केलं पाहिजे. श्रीमंत असणं हे महत्त्वाचं.. लिहिणं, कला वगैरे गोष्टींना अर्थ नाही,’ अशा विचारांचं समर्थन करणाऱ्या समाजाची एक प्रतिनिधी- मुलींची श्रीमंत, अविवाहित आत्या. ‘श्रीमंत माणसाशी लग्न’ हा बहुधा त्याही काळी मुली सुखी होण्याचा मार्ग समजत असावेत. देश वेगळा, रीतीभाती वेगळय़ा; पण स्त्री सर्वत्र तिच आहे, त्या वैश्विकतेतून निर्माण होणाऱ्या खटक्यांची प्रचीती पदोपदी येत राहते. Bildungsroman अशी एक संज्ञा आहे. म्हणजे मोठं होतानाचा प्रवास. वाढीच्या वयात शारीरिक, मानसिक आणि वैचारिक बदल कसा होत जातो आणि मोठं होताना आपले विचार ठाम बनतात, हे आपल्या सगळय़ांच्या आयुष्यातलं वास्तव.        

मॅसेच्युसेट्सच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या ‘लिटिल विमेन’ या चित्रपटात चार बहिणींच्या संदर्भातले बहुपेडी अनुभव आहेत. त्यांचं वाढीचं वय, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करताना त्यांना आलेले अनुभव, वाटेत आलेलं प्रेम, प्रेमाचे वेगवेगळे पदर आणि छटा, यातून त्यांचं त्यांनी जगात कसं स्थान निर्माण केलं आहे, या मुद्दय़ांभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. चित्रपट संभाषणातून उलगडत जातो. एकेका पात्राची आणि लुईसांच्या काळात दिसणाऱ्या सांस्कृतिक समाजजीवनाची ओळख होऊ लागते. ज्योला कथा लिहिण्यात आणि पुस्तकांत रमण्यात, मेगला अभिनयात, बेथला संगीतात, तर एमीला चित्रकार होण्यात रस आहे. प्रत्येकीची आकांक्षा वेगळी. प्राप्त परिस्थितीतून, येणाऱ्या अनुभवांतून परिपक्व होणाऱ्या या ‘लिटिल विमेन’. त्यांच्या बालपणाच्या धाग्यानं त्यांना घट्ट बांधून ठेवलं आहे. त्यांची लहानपणाची स्वप्नं आणि वास्तव यातला फरक बघताना आपणच आपल्याला सापडत राहतो.

या चित्रपटाचं एक वैशिष्टय़ म्हणजे, भूतकाळातल्या आणि वर्तमानकाळातल्या प्रसंगांच्या साहचर्यामुळे आलेली वेगळी मिती चित्रपटाला अधिक अर्थपूर्ण करते. डोळय़ांतली निरागसता, मानेचे कललेले कोन, शारीरिक हालचाली, यातून दिसणारं बाल्य, त्यात होत जाणारा बदल आणि आलेली प्रगल्भता, हे सारं कसदार अभिनयातून व्यक्त होतं.  ‘नैतिक मूल्यांना महत्त्व नाही’ असं सांगणाऱ्या प्रकाशकाच्या पार्श्वभूमीवर, ‘अनेक लोक युद्धावर गेलेले असतील, किती तरी जणांसाठी हा हिवाळा भयावह असेल, तर आपल्या मजेसाठी आपण पैसे खर्च करणं योग्य नाही. अडचणीत असलेल्यांना आपण मदत केली पाहिजे,’ असं आपल्या लहान मुलींना सांगणारी आई आपल्यातल्या निगरगट्ट विचारांना विरविरीत करते. तिच्या साध्या, पण त्यातही बाणेदार असलेल्या विचारांनी उठून दिसते. बहिणींमध्ये होणारी कुरबुर, भांडणं, तरीदेखील असणारं प्रेम, कधी तिरस्कार, अपराधीपणा आणि काळजी हे दाखवणारे सगळे प्रसंग बघताना आपण त्यांच्या भावविश्वाचा एक भाग होतो.

एका प्रसंगात एमी ज्योला विचारते, ‘‘तू रागावली नाहीस ना माझ्यावर?’’ त्यावर ज्यो म्हणते, ‘‘आयुष्य फार छोटं आहे. एकमेकींवर रागावणं परवडणारं नाही!’’ मृत्यूनं शिकवलेलं हे शहाणपण! एका प्रसंगात पार्टीला येऊ न दिल्यानं संतापलेली एमी ज्योनं लिहिलेली कादंबरी जाळते. त्या कृतीतली तीव्रता छोटय़ा एमीला जाणवली नसली, तरी आपली चूक निश्चित जाणवली आहे. तिला निरागसपणे प्रश्न पडलेला आहे, ‘‘आता हे सगळं सुधारायचं कसं?’’ हा विलक्षण ताण निर्माण करणारा प्रसंग आहे.

ज्यो स्वत:ला सतत पारखून घेत असते. न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ती स्पष्ट बोलते, त्यामुळे तिच्या आयुष्यातून लोक लांब जातात की काय, अशा द्विधा मन:स्थितीत ती सापडते. शेजारचा मुलगा लॉरी (Timothé e Chalamet) आणि तिची मैत्री आहे. त्याच्यावर तिचं प्रेमही आहे, पण त्याच्याशी लग्न करण्यात तिला रस नाही.  त्याची श्रीमंती तिला मोहवत नाही आणि तिच्या लिखाणाच्या छंदाचा त्याला कंटाळा येईल, याचीही तिला जाणीव आहे. प्रोफेसर फ्रेडरिक आणि लॉरी यांच्याबरोबर असलेल्या ज्योच्या भावनिक नात्यांचं सूत वेगळं आहे. फ्रेडरिकचं प्रेम तिच्यातल्या सर्जनशील लेखिकेवर आहे. ज्योमध्ये चांगलं लिहिण्याची क्षमता असल्याचं त्यानं जाणलं आहे. ‘प्रेम’ या भावनेबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन या पात्रांच्या प्रतिक्रियेवरून जाणवतात.

 लहानपणी एका प्रसंगात मेग म्हणते, ‘‘मोठी झाल्यावर माझ्याकडे खूप मदतनीस असतील.. माझं मोठ्ठं घर असेल.’’ तिला संसार, नवरा, मुलं यांत रमण्याची आवड आणि क्षमता आहे. नंतर ती जॉन ब्रूकबरोबर लग्न करते, तिला जुळी मुलं होतात. पैशांची चणचणही जाणवते आहे; पण ‘आपण एकमेकांबरोबर आहोत’ या प्रेमभावनेनं ते आनंदात आहेत. मोठी झालेली एमी  म्हणते, ‘‘आदराची भावना असेल, तरच प्रेम जाणवतं.’’ तर, ‘‘श्रीमंत असणं म्हणजे सुखी असणं नाही. स्वत:च्या आयुष्यावर प्रेम करायला पैसे लागत नाहीत,’’ असं ठामपणे श्रीमंत आत्याला सांगणारी ज्यो आपलाही विचारांचा कणा ताठ करते. ती म्हणते, ‘‘मला वाटतं, स्त्रियांकडे मन, आत्मा आणि हृदय तर असतंच; पण त्याचबरोबर त्यांच्याकडे बुद्धी आहे, आकांक्षा आहेत आणि सौंदर्यही आहे. त्यामुळे बायकांना फक्त प्रेम पाहिजे असतं, हे ऐकणं मला फारच त्रासदायक वाटतं.’’ किंवा ‘‘दुसऱ्यापेक्षा आपली स्वप्नं वेगळी आहेत, याचा अर्थ ती कमी महत्त्वाची आहेत, असा होत नाही,’’ अशी गोळीबंद वाक्यं आपल्या आयुष्यात आपण बंद करून ठेवलेले मनातले कप्पे उघडायला मदत करतात.

ज्यो चांगला माणूस बनण्याची, स्वत:चा शोध घेण्याची धडपड करते आहे. ती लिहिते आहे, तेदेखील स्वत:ला अजमावण्यासाठी. बुद्धीच्या पातळीवर सगळय़ा घटना आणि नातेसंबंध तोलून बघणारी ज्यो आपल्या रागावर नियंत्रण नसल्याची खंत आईकडे व्यक्त करते. ज्योला समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तिची आई. त्यांच्या गप्पा, बोलण्याची आवाजाची पट्टी, प्रामाणिकपणा, हे पैलू त्या त्या प्रसंगांत मन गलबलून टाकतात. चित्रपटात आई-मुलींच्या नात्यातले हळवे पदर वारंवार दिसतात. बेथचा ‘स्कार्लेट फीवर’ हा आजार  आणि त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी चाललेली ज्योची धडपड आपल्या हृदयाचा ठाव घेते. ज्यो शांत आवाजात आणि तळमळीनं तिला सांगते, ‘‘बेथ, लढ, प्लीज लढ.. शांतपणे जाऊ नकोस..’’ आयुष्यातून भावंडाचं जाणं, आईसाठी अपत्याचं जाणं, विरह, करुणा, माया, प्रेम, अशा सगळय़ा भावनांचं, भावनिक तरंगांचं जाळं सखोलपणे आपल्याला जाणवतं. यामध्ये काल्पनिक रंजकता नाही. आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या संघर्षांमधून आपल्याला नेमकं काय पाहिजे, याचा ध्यास दाखवणारा हा चित्रपट आहे. याचबरोबर ‘आपलं बालपण संपलं’ ही त्यांची जाणीव.. या साऱ्यांतून वास्तव समोर येतं आणि त्यामुळेच हा चित्रपट ‘आपला’ वाटतो. ज्यो स्वत:चं लिखाण जाळून टाकते आणि हाताला लागलेलं, बेथसाठी लिहिलेलं लिखाण फक्त ठेवते. ते लिखाण म्हणजे त्यांचं आयुष्य आहे. ते ती नव्यानं लिहू लागते. आयुष्यातल्या घटितांची कादंबरी होते. त्या कादंबरीचं नाव आहे- ‘लिटिल विमेन’! या सगळय़ा घटनांचे आपण जणू साक्षीदार होतो.

एकत्र बालपण घालवलेल्या या चार मुलींचं आयुष्य मोठेपणी वेगवेगळय़ा वाटा स्वीकारतं. ‘मोठी चित्रकार होणार’ असं म्हणणारी एमी श्रीमंत लॉरीशी लग्न करते आणि त्यांना मूल होतं. नोकर-चाकर असलेल्या मोठय़ा घरात राहण्याचं स्वप्न बघणारी मेग गरिबीत संसार करण्यात आनंद मानते. बेथ या सगळय़ांच्या आयुष्यातून निघून जाते. तर ज्योचा स्वत:चा शोध सुरू आहे. ती मार्च आत्यानं दिलेल्या घरात मुलांची शाळा सुरू करते, स्वत:चं पुस्तक प्रकाशित करते. अशा अनेकपदरी आणि असंख्य सुंदर बारकाव्यांनी जणू विणलेला हा ‘लिटिल विमेन.’ चित्रपटात कलाकारांनी प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. प्रमुख भूमिकेतल्या कलाकारांबरोबर लॉरा डर्न, लुई गरेल आणि जेम्स नॉर्टन या अभिनेत्यांचाही विशेष उल्लेख करायलाच हवा. साहित्य वाचताना किंवा चित्रपट बघताना आपलं भावविश्व, अनुभवविश्व, विचार करण्याची पद्धत, आतापर्यंत पाहिलेलं आयुष्य यावरून ते पात्र आपण मनात उभं करतो. जितके वाचक आणि प्रेक्षक, तितकी त्याची रूपं. मग ते साहित्य कोणत्याही काळात वाचलं जात असो, ते साहित्याचं वैशिष्टय़ ठरतं. तेच वैशिष्टय़ या चित्रपटात उतरलं आहे. म्हणूनच हा चित्रपट पाहायलाच हवा.

(हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे)