रेखा देशपांडे

पुरुषसत्ताक संस्कारातली आई उर्मिलादेवी आणि तिच्या कौतुकासाठी तहानलेली तिची भेदरलेली मुलगी क़ला यांच्यातल्या नात्याची प्रतिमांच्या माध्यमांतून उलगडणारी कथा म्हणजे ‘क़ला’ (Qula) हा चित्रपट. जन्मल्याक्षणीच ‘मुलाला खाणारी मुलगी’ असा आईचा द्वेष सहन करणाऱ्या या मुलीला, ‘नावामागे ‘बाई’ चिकटून चालणार नाही, ‘पंडित’ लागलं पाहिजे,’ या आईच्या कठोर अपेक्षेत कायम जगावं लागतं. स्त्रीला सन्मानच नाकारणाऱ्या भारतीय सामाजिक-मानसिक वास्तवाची कथा म्हणून अन्विता दत्त लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट पाहायला हवा.

Savitri Khanolkar Swiss born woman who designed the Param Vir Chakra award Eve Yvonne Maday de Maros
स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र
Artistes of the film Gharat Ganapati visit to Loksatta office
गणपतीच्या निमित्ताने घरातल्यांची गोष्ट ; ‘घरत गणपती’ या चित्रपटातील कलावंतांची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट
Loksatta kutuhal The maker of the artificial intelligence chip in the brain
कुतूहल: मेंदूतील कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचा निर्माता
laxmi narayan yoga influence of Mercury-Venus four zodiac sign are happy
पैसाच पैसा! पुढचे सहा दिवस बुध-शुक्राच्या प्रभावाने ‘या’ चार राशीधारकांच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : महिलांचे वर्तमानकालीन प्रश्न
The team of the film amhi Jarange garajvant marathyacha Ladha at the office of Loksatta
आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Kalidas artful clown marathi news
कालिदासाचे कलामर्मज्ञ विदूषक
Transit of Venus
शुक्र गोचर निर्माण करणार ‘मालव्य राजयोग, ‘या’ तीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, मिळेल अपार पैसा अन् सन्मान

संगीत क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्यानंतरची लोकप्रिय गायिका क़ला हिची पत्रकार परिषद. प्रेस फोटोग्राफर्सची एक फळीच कॅमेरे सरसावून उभी. क़ला त्या फळीच्या दिशेनं अंगुलिनिर्देश करते. एक फोटोग्राफर पुढे होतो. ती म्हणते, ‘‘नॉट यू!’’ तो बाजूला होतो आणि फळीच्या अगदी मागे उभी एकमेव स्त्री फोटोग्राफर दिसते. ती पुढे येते..

आणखी वाचा-ग्रासरूट फेमिनिझम: भगिनीभावाचं देणं

कथेचा ‘सा’ इथेच लागतो. पुरस्कार मिळाल्यावर काय वाटतं, या नेहमीच्या गुळगुळीत प्रश्नावरचं तिचं उत्तर मात्र ठसका लागावा आणि ठेचही लागावी असं आहे, ‘‘ऐसा लगता हैं, जैसे थक के घर पहुँची हूँ और माँ ने दरवाज़ा खोला है। आज तो वो बहुतही खुश होंगी।’’ आईची खुशी हेच होतं क़लाच्या अवघ्या जीवनाचं ईप्सित. जगाच्या लेखी यशाच्या शिखरावर आरूढ क़ला मात्र अजूनही त्या शिखराकडची वाट तुडवतेच आहे. थकलेली, तहानलेली. त्यामागचा इतिहास उलगडतो- उर्मिलादेवीच्या (अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी) मांडीवर तिच्या नवजात मुलीला आणून ठेवलं जातं. जुळी मुलं झाली आहेत तिला, पण दुसरं बाळ कुठे आहे? डॉक्टरांचा आवाज सांगतो, ‘तो’ जगू शकला नाही. ‘तो’? म्हणजे जगू शकला नाही तो ‘मुलगा’ होता. डॉक्टरांचा आवाज पुढे सांगतो, ‘‘जुळय़ा मुलांच्या बाबतीत होतं असं कधी कधी. सशक्त गर्भ पोषण शोषून घेतो. कमकुवत गर्भाची जगण्याची शक्यता मावळू शकते.’’ बस्स. या मुलीनं आपल्या मुलाचा जीवनरस शोषून घेतला, ही चीड आईच्या उर्वरित आयुष्याचा ताबाच घेते. तिचं नाव ती ठेवते ‘क़ला’ (Qula) (अभिनेत्री त्रिप्ती दिमरी). ‘क़’च्या खाली नुक्ता आहे. या ‘क़’चा उच्चार घशातून होतो. संस्कृत आणि संस्कृतोद्भव हिंदी-मराठी वगैरे भाषांतला ‘कला’ हा शब्द रूप बदलून उर्दूत ‘क़ला’ झाला आहे. त्याबरोबर त्यानं अर्थाची छटासुद्धा जरा बदलली आहे. कलेतलं अभिजातपण बाजूला सारून जादूगार-डोंबारी वगैरे ज्या सवंग क्लृप्तींनी गर्दीचं मनोरंजन करतात, ती ही नुक्तावाली ‘क़ला’. तान्ह्या मुलीच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून आई मुलाचा रिकामा पाळणा हलवते. मग त्यातलीच बाळउशी उचलते. आता ती बाळउशी तिच्या हातात मुलीचा गळा घोटू पाहण्याची इच्छा बनते.

दिवंगत शास्त्रीय गायक पं. दीवान मंजुश्री यांची पत्नी उर्मिलादेवी. एके काळची प्रसिद्ध ठुमरी गायिका; पण पत्नीपदाची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी गाणं सोडून दिलेली. दीवान मंजुश्रींची रेकॉर्ड ऐकताना ती रंगून जाते, पण सहा-सात वर्षांच्या क़लाला आईच्या मांडीवर बसून ते गाणं ऐकण्याचं धाडस होत नाही. ती दूर, आईला कळणार नाही अशी जिन्यात बसून आईकडे बघत तिच्यासारखाच गाण्यावर ताल धरते. अशी उर्मिलादेवी मुलीला गाण्याची संथा द्यायला तयारच कशी होते? क़लाशिवाय पर्याय उरला नाही म्हणून? उर्मिलादेवी मुलीला शास्त्रीय गाणं शिकवू पाहते, तेही दूरस्थपणे आणि गायचं तर नावापुढे ‘पंडित’ लागलं पाहिजे, नावामागे ‘बाई’ चिकटून चालणार नाही, ही कठोर अपेक्षा तिच्यापुढे ठेवतच. आईच्या निष्प्रेम, कठोर वागण्यानं कायम भेदरलेली लहानगी क़ला या अपेक्षांच्या भारानं आणखीनच भेदरून जाते, गोंधळते. चिडलेली आई हिसडा देऊन तिचा उद्धार करते, ऐन बर्फवृष्टीत घराबाहेर राहण्याची शिक्षा देते आणि दर वेळी तिच्या तोंडावर दार बंद करत राहते. कधी प्रत्यक्षात, तर कधी अप्रत्यक्षपणे. तिच्या स्वत:च्या भूतकाळाचा उल्लेखही कुणी केला, तरी तिच्या चेहऱ्यावर नाराजी उमटते. पुरुषसत्ताक संस्काराच्या परिणामी स्त्रीदेखील स्त्रीद्वेष्टी होते.

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन: क्षण असे जगण्याचे

उस्ताद मन्सूर खान यांची पावती मुलीला मिळावी, ही तिची अपेक्षा. तिथेही मन्सूर खान तिच्या ठुमरी गायनाची आठवण देतात, ‘तुझाच सूर तुझ्या मुलीच्या गळय़ात आहे,’ म्हणून तारीफ करतात, तिला ते आवडत नाही. मुलीनं आईचा नव्हे, वडिलांचा वारसा चालवायला हवा, हा तिचा हट्ट आहे. उस्तादांनी केलेली प्रशंसा क़ला विनम्रपणे स्वीकारते, पण तिची नजर आईच्या मुद्रेकडे आहे. तिथे अपेक्षित प्रसन्नता दिसलेली नाही. मन्सूर खानांनी याच मैफलीत आणखी एका तरुण गायकाचं गाणं ठेवलं आहे. हा अपरिचित तरुण- जगन (बाबिल खान) आपल्या खडय़ा आवाजात कबिराची रचना गातो. अर्धअंधाऱ्या मैफलीत दारा-दारातून, खिडकी-खिडकीतून प्रकाशाचे झोत आत येतात. गुरुद्वारातल्या गायनपरंपरेत वाढलेल्या त्याचा मोकळा, मर्त्य जगाच्या पलीकडे पोहोचणारा सूर मैफलीचा ठाव घेतो. आणि उर्मिलादेवीचाही. पहिली दाद तिचीच मिळते. क़ला आईचा फुललेला चेहरा बघत राहते. आईला हवं होतं ते काही तरी गवसलंय. क़ला ज्यासाठी धडपडते आहे, ते हरवून जातंय. काचेच्या तबकडीतल्या कोडय़ातली- मेझमधली- पाऱ्याची गोळी आहे क़ला. काही केल्या केंद्रस्थानी पोहोचताच येत नाहीये तिला. तिच्या आयुष्यातलं ते केंद्र म्हणजे आईचं प्रेम, आईकडून हवी असलेली पावती. मेझ हे या प्रतिमाप्रधान चित्रपटातलं एक महत्त्वाचं मोटिफ! होय, हा चित्रपट प्रामुख्यानं प्रतिमांतून उलगडतो. यातल्या प्रतिमांचा पोत, त्यांचे रंग बोलतात.

उर्मिलादेवी जगनला मुलगा मानून घरी घेऊन येते आणि त्याला दूध नेऊन देण्याचं, त्याचं हवं नको बघण्याचं काम क़लाला सोपवून क़लाचं दुय्यमत्व जाहीरच करते. दूध देण्याचे प्रसंग कथेत क़लाचं दुय्यमत्व, त्यातून तिचं उत्तरोत्तर दुखावत जाणं गडद करत जातात आणि त्याच वेळी ते कथेतले महत्त्वाचे प्रसंगदेखील बनतात, कथेला महत्त्वाच्या वळणावर आणून सोडतात. आईकडून सतत दुखावल्या जाणाऱ्या क़लाचं सांत्वन (?) करायला वेळोवेळी जगन येतो तो तटस्थपणे. क़ला ‘आईला खूश करण्यासाठी गाते आहे, स्वत:साठी नाही’ हे समजणाऱ्या जगनला क़लाशी आईची वर्तणूक कधी समजत नाही. किंवा ती समजून घेणं, मुलीचा आईच्या प्रेमावर जैविक, जन्मसिद्ध अधिकार आहे हे समजून घेणं त्याला गरजेचं वाटत नाही. ‘‘तू तानपुऱ्यावर माझी साथ करावी एवढंच आई तुझ्याबद्दल म्हणाली,’’ असं तो तिला सांगतो. आपल्याला जी विशेष वागणूक मिळते, तशी आपल्या बहिणीला मिळत नाही, हे वास्तव भारतीय कुटुंबातल्या पुरुष अपत्याला साधारणपणे जाणवतही नसतं, तेच वास्तव इथेही प्रतिबिंबित होतं. जगन हा तर मानलेला मुलगा! त्याला महान बनवण्याची जबाबदारी दुसरं कुणी घेत असेल तर त्याला फक्त आपलं गाणं गात राहण्यापलीकडे काही करण्याची गरज वाटत नाही.

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: वहिवाटेच्या पलीकडचा प्रवास

चित्रपटसंगीताला ‘फ्लॅशी’- ‘सवंग चमकोगिरी करण्याचा प्रकार’ संबोधणारी उर्मिलादेवी जगनला चित्रपट संगीतकार सुमंतकुमारकडे गाण्याची संधी मिळावी म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गायक चंदनलाल सान्यालला खूश करण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या मोहपाशात अडकवू पाहाते. (ही व्यक्तिरेखा कुंदनलाल सहगल यांच्यावरून बेतली असल्याचं सहज कळावं.)(पुढे क़ला चित्रपट संगीताच्या क्षेत्रात प्रवेश मिळावा म्हणून सुमंतकुमारवर हाच प्रयोग करते.) ‘हे आई का करते आहे’, या क़लाच्या प्रश्नाचं उत्तर जगन तटस्थपणे देतो, ‘‘मेरे लिए.’’ उर्मिलादेवीच्या व्यक्तिरेखेतला हा विरोधाभास कथेत एक ‘बेतलेलं’ वळण घेऊन येतो. ‘‘फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांसमोर चांगल्या घरातल्या मुली गात नाहीत, पण जगन मुलगा आहे’’ हे मुलीला सांगतानाच ती तिच्या गळय़ात नेकलेसची काळी पट्टी बांधते आहे!

आतल्या आत धुमसणारी क़ला, जगनला दूध नेऊन देण्याचं तिचं कर्तव्य आणि पारा या तीन गोष्टी जिगसॉ पझलमधल्या तुकडय़ांसारख्या एकमेकांत फिट्ट बसतात. क़ला ही कुणी थंड डोक्यानं कारस्थान करणारी मुलगी नाही. जगनच्या दुधात पारा मिसळण्याचं कृत्य क़ला भानावर राहून जाणीवपूर्वक करते असं नाही. मनानं उद्ध्वस्त होत चाललेल्या क़लाकडून ते घडून जातं. जगनचा आवाज जातो आणि जगनसाठी आलेला सुमंतकुमार क़लाला ब्रेक देतो. ‘‘या घरात गाणारीला स्थान नाही,’’ म्हणून सुनावणाऱ्या आईला क़ला रडवेल्या आवाजात पण प्रथमच धीर करून जाब विचारते, ‘‘मग तू कशी इथे राहते आहेस? मी काहीही केलं तरी पुरेसं ठरत नाही तुझं प्रेम जिंकायला.’’ पण आई बधत नाही. मग क़लाच तिच्यामागे ‘‘सॉरी ममा, मला तसं म्हणायचं नव्हतं,’’ म्हणत धावते. मनानं कमकुवत होत गेली आहे क़ला. आवाज गेलेला जगन फास लावून घेतो. वेळोवेळी दुखावलं जाण्याच्या जोडीला जगनला पारा घालण्याची टोचणी लागली होती आणि आता जगनची आत्महत्या क़लाला खोलवर अपराध भावनेत लोटून देते..

चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून तिच्या कारकीर्दीचं वर्तमान आणि तिच्या या दुखऱ्या आठवणी यांचा पटकथेत सतत पाठशिवणीचा खेळ चालतो. वर्तमानावर तिच्या दुखऱ्या भूतकाळाचं सावट सतत राहतं आणि गडद होत जातं. यशाच्या शिखरावरही मृत जगनच्या भासाच्या रूपात त्या आठवणी तिला टोमणे मारत राहतात. ‘‘हा पुरस्कार माझा आहे. तू माझं यश चोरलंस.’’ आई क़लाचं ना कधी अभिनंदन करते, ना तिच्या हाकेला ओ देते. या ताणाची परिणती म्हणजे चित्रपटाचा ‘प्रेडिक्टेबल’ शेवट.

तो प्रेडिक्टेबल असला तरी त्याकडे होणारा आणि प्रतिमांतून उलगडणारा क़लाचा मानसिक प्रवास प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो. मानवी मनोघटितं एकरेषीय कधीच नसतात आणि ही कथा आहे मनोघटितांची. त्यामुळे ती एकरेषीय असूच शकत नाही. तसंच ती स्त्रीप्रधान असली, तरी प्रतिकूल परिस्थितीशी लढून विजयी होणाऱ्या स्त्रीची कथा नाही. तशा कथा प्रेरक म्हणून सांगता येतात. कारण त्या पुरुषप्रधान समाजरचनेत संघर्ष करण्याचं बळ स्त्रीला देतात. अनेकदा त्या स्त्री-सबलीकरणाचं टोकन म्हणूनही येतात. इंग्रजीच्या वर्चस्वाच्या वातावरणात वर्षांतला एखादाच दिवस ‘मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो, तसं काहीसं! इथे मात्र समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेपायी आणि पुरुषप्रधान मानसिकता बाळगणाऱ्या स्त्रियांपायी उत्तरोत्तर हरत जाणाऱ्या असंख्य स्त्रियांच्या वस्तुस्थितीचं सूचन आहे. हरत चाललेल्या या स्त्रीच्या बाह्य संघर्षांइतकाच मोठा आणि गुंतागुंतीचा संघर्ष तिच्या मनात चाललेला आहे. लिखित कथा-कादंबरीत मनोविश्लेषण करणारे शब्द असतात. अमूर्त मनाचं चित्र काढून समोर ठेवण्याचं आव्हान चित्रपट या दृश्य माध्यमापुढे असतं. अमूर्ताला मूर्त करण्यासाठी वापरलेली शैली हे या चित्रपटाचं मोठं वैशिष्टय़ आहे.

आणखी वाचा-एक चकवा! समलिंगी विवाहाचा निकाल

सिनेमा या माध्यमाचा मनोविश्लेषणासाठी केलेला वापर ‘पाहणं’ हा ‘प्रेक्षका’ला समृद्ध करणारा अनुभव आहे. ४० च्या दशकात घडणाऱ्या या कथेत हिमालयाच्या कुशीतल्या गोठलेल्या कुंद निसर्गाचं, तेलाच्या चिमण्यांनी जेमतेमच प्रकाशमान असणाऱ्या घरातल्या अंधारलेपणाचं, काळपट करडय़ा रंगांचं प्राबल्य हे मनाचा आरसा बनून येतं. कलकत्त्यातल्या (आता कोलकाता) घटना या मुख्यत: घरात, स्टुडिओत, तत्कालीन विजेच्या मंद प्रकाशात घडतात. पुरता उजेड दिसतो तो कलकत्त्यातल्या बाहेरच्या मोजक्या दृश्यांमध्ये- पत्रकारांच्या गराडय़ातल्या क़लाच्या दृश्यात आणि घरापुढे येऊन थांबलेल्या अँब्युलन्सच्या दृश्यात. बर्फवृष्टीत घराबाहेर उभं राहण्याची आईनं दिलेली शिक्षा, बर्फाळ अंगणातल्या मेझमधली पर्णहीन झुडपं मानसिक ताणाचं सातत्य टिकवून धरतात. रेकॉर्डिगसाठी क़ला उभी राहते तेव्हाच्या तिच्या अवस्थेतही बर्फातल्या अनुभवाचं डिव्हाइस वापरलं जातं. पोशाखामध्ये करडे, काळपट करडे, पांढरट करडे रंग परिणाम साधतात. क़लाविषयी सहानुभूती असणारे मन्सूर खान, सेक्रेटरी सुधा, गीतकार मजरूह आणि स्त्री संगीतकार नसीबन यांच्या पोशाखातला उजळपणा रंगाचा तोल सांभाळू पाहतो.

संगीत हा अर्थातच या चित्रपटाचा अविभाज्य भाग बनतो. शास्त्रीय, उपशास्त्रीय चिजा, ४० च्या दशकातलं चित्रपटातलं गाणं, वाजिद अली शाह आणि त्याला छेद देणाऱ्या कबिराच्या पदाच्या रूपानं प्रतीत होणाऱ्या दोन वृत्ती, दोन दृश्यांना जोडणाऱ्या सेतू- ‘ट्रान्झिशन’साठी वापरलेल्या गाण्यांच्या, धुनांच्या वापरातून कथेचा मूड वाहात जातो. जीवनव्यापी मनोभंगाची ही कहाणी शब्दांहूनही दृश्यांचा पोत आणि सुरांमधल्या श्रुती सांगत राहतात.

आई-मुलीच्या नात्यातल्या ताणानं घडवलेली ही केवळ एका गायिकेची शोकांतिका राहात नाही. मुलाच्या जन्माचा उत्सव आणि मुलीच्या जन्माचा शोक करणाऱ्या, मुलीला पालकांच्या प्रेमाचा हक्क नाकारणाऱ्या, स्त्रीला सन्मानच नाकारणाऱ्या भारतीय सामाजिक-मानसिक वास्तवाची कथा म्हणून अन्विता दत्त लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.
deshrekha@yahoo.com