डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ‘फ्री माइंड स्पेस’ अर्थात मनातल्या मोकळ्या जागांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती राखता येणं सहज शक्य आहे का? तर अजिबातच नाही. मनातल्या मोकळ्या जागा भरल्या जातात त्या अनावश्यक विचार, भावना यांनी. त्या जागा रिकाम्या करता येतील का? आपल्या मनाच्या, मेंदूच्या बाबत हे करायला हवं.  पण कसं?

घरा-घरातलं एक नेहमीचं दृश्य. घरी पाहुणे, मित्र-मंडळी, आपले सहकारी असं कोणीही येणार असतील, तर पहिलं काम म्हणजे घर आवरणं. तसं राहतं घर काही अगदीच पसरलेलं नसतंच कधी. तरीही, एक विशेष स्वच्छता मोहीम घडतेच. म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून. बारीकसारीक गोष्टी जमतील तितक्या त्यांच्या जागी ठेवणं, त्याआधी त्यांच्यावरची धूळ पुसण्यासाठी एखादा जास्त हात फिरतोच. त्यानंतर, घराला लहान बाळासारखं छान नीटसं, सुशोभित करणं हेही घडतंच.

ही आवरा-आवरी करताना, एक नक्की घडतं, ते म्हणजे, वर्षांनुवर्षजमवलेल्या कित्येक वस्तू, कपडे, चपला, भांडी, इलेक्ट्रिकचं सामान इत्यादी आ वासून समोर उभं राहतं. तिथे कित्येक वेळेला आता हे आपल्यासाठी उपयोगी आहे किंवा नाही हे विचार येऊनच जातात. काही क्षणात मनात, आणि घरच्या मंडळींसोबतही एक द्वंद्व घडतंच, याचं काय करायचंय? ठेवायचंय की टाकून द्यायचंय, की कोणाला उपयोगी असेल तर देऊन टाकायचंय?

पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. त्यात सगळ्या अशाच न लागणाऱ्या वस्तू कोंबून ठेवलेल्या असायच्या. आताही काही प्रशस्त घरांमध्ये अशी जागा असतेच. त्या वस्तू एकदाही हात न लगता तिथेच खितपत पाडलेल्या असतात, असायच्या. ही अडगळ तयार कुठून होते? माणूस म्हणून विविध, वैचित्र्यपूर्ण बाबींचा संग्रह करणं हा आपला स्थायिभाव. एकदा संग्रहात ती विशिष्ट वस्तू स्थानापन्न झाली, की आपला मालकी हक्क तयार झालाच. त्यानंतर त्यांचा उपयोग किती नित्यनेमाने केला जातो, किंवा खरंच होतो का हा भाग अलाहिदा. काही काळ उपयोग करून त्या वस्तूची रवानगी नंतर नकोशा असणाऱ्या, उपयुक्त नसणाऱ्या आधीच्याच मोठय़ा संग्रहात होते. आणि संग्रहालयाची एक सुंदर अडगळ तयार होते. इतकंच नाही, तर आपल्याकडे जिथे म्हणून मोकळी जागा असते ती आपण सगळेच आपसूकपणे अशा अडगळीने व्यापून टाकतो. मग ती आपल्या घरातली जागा असेल किंवा ऑफिस, हॉटेल, कॅफे, महाविद्यालय, वेगवेगळे आश्रम किंवा अगदी छोटीशी बाग, किंवा आपला मेंदू, मन अशी कुठलीही मोकळी जागा. दैनंदिन वापराच्या, व्यवहाराच्या कित्येक बाबी, घडामोडीतून नको असलेला माल, कचरा, किंवा नको असलेले विचार हे सगळंच त्या ‘मोकळ्या’ जागेत नेऊन टाकणं सवयीचं होऊन बसतं. त्यात जशी रिकामी खोकी, कधीकाळी मिळालेल्या भेटवस्तू, तुटक्या-फुटक्या गोष्टी, वह्य़ा-पुस्तकांची रद्दी, इत्यादी गोष्टी असतात. तशाच मनात मात्र अशा मोकळ्या जागा भरल्या जातात त्या अनावश्यक, विचार, भावना यांनी. त्या गर्दीकडे आपण रोज पाहतो, परंतु तरीही संपूर्ण दुर्लक्ष करून. क्वचित प्रसंगी जागा अपुरी पडतेय हे लक्षात आलं, की मग घरात कुठे-कुठे असलेली जागा रिकामी करता येईल याचा विचार करून, नाइलाजाने का असेना, परंतु थोडी तरी अडगळ कमी केलीच जाते. पण हेच आणि असंच मनाच्या, मेंदूच्या बाबत घडतं का? बहुतांश वेळा नाही.

आपला मेंदू प्रचंड कार्यक्षम आहे. आपण काही अंश प्रमाणातच त्याच्या क्षमतांचा वापर करतो, हे सत्य आपल्याला अगदीच माहीत आहे. त्याच्या उरलेल्या क्षमतांचं काय? किंवा अचानक काही प्रसंगी आपल्याला, मानसिकदृष्टय़ा स्वत:च्याच अधिक सबलीकरणाची गरज जाणवली तर काय? मेंदूचं किंवा मनाचं घरासारखं, किंवा त्यातल्या एका खोली, कोपऱ्यासारखं तर नाही, की पटापट जागा रिकामी होईल आणि हवी त्या वेळेस वापरता येईल, नाही का? मग काय करता येईल?

ही अडगळ मनात कशी मुरत राहते ते पाहू-

‘‘माझ्या सगळ्या भावंडांत मीच लहानपणापासूनच फार सहन केलं. माझ्या वाटय़ाला कायम माझ्या भावंडांचा दुस्वासच आला. आजतागायत त्या आठवणी तशाच ताज्या आहेत,’’ वयाची साठी ओलांडलेल्या आजोबांचं म्हणणं.

तशाच काही वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींच्या बोलक्या प्रतिक्रिया आणि त्यांची उदाहरणे –

‘‘मला वाटतं या स्पर्धेच्या जगात माझा निभाव लागणं फारच अवघड आहे. गेली पंधरा वर्षहाच एक न्यूनगंड माझ्या मनात घर करून बसलाय.’’

‘‘माझ्या कुटुंबात माझ्याइतकं कोणी शिकलेलं, किंवा समजूतदार अजिबातच नाही. त्यामुळे अर्थातच मलाच सगळ्यांना समजावून घ्यावं लागणार ना!’’

‘‘माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये मी म्हणजे एक चेष्टेचा विषय.’’

‘‘आता आपली जगबुडी जवळ आलीच म्हणायची. माणूस म्हणून कसं काय वागावं हेच आपण विसरत चाललोय.’’

‘‘माझा कोणी अपमान केला की मला प्रचंड राग येतो. मग मी ते विसरूच शकत नाही.’’ ही  वाक्यं व्यवस्थित वाचली की मग आपण एकदा आपल्या मनात येणाऱ्या दिवसभरातल्या विचारांची, भावनांची उजळणी करू या. यातले ९० टक्क्यांपेक्षा जास्त विचार भावना, या अशाच सदरात जातील. तेही अगदी रोज, व्यावहारिक आयुष्य जगत असताना यांचीच आपल्या स्वत:त असणारी देवाण-घेवाण यांनी आपला मेंदू, मन व्यापून गेलंय हेही समजायला लागेल. हे तर अपरिहार्य आहे, अगदीच. पण जितकं त्यांचं नियमित तयार होणं, साठून राहणं अपरिहार्य तितकाच त्याचा निचरा होणं, होत नसेल, तर करता येणं हेदेखील तितकंच गरजेचं नाही का? नाही तर दिवसेंदिवस केवळ अशा विचार, भावनांचा नकोसा ढीग साठत राहणार. आपण जसं, आयुष्य जगतोय, तिथे सारखाच समोर येऊन उभा राहणार. त्यातल्या त्यात जे लोक ‘ओव्हर-थिंकर’ किंवा सतत विचार करणारे या गटात येतात, त्यांनी तर याचे अडथळे सर्रास अनुभवले असतील. जे यांचं तेच एकंदरीत आयुष्याकडे, उदासीनतेने बघणाऱ्यांच्या बाबत, किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांच्या बाबतही!

आपण कित्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांविषयी सतत ऐकतो, पाहतो, वाचतो. सर्वार्थाने अतिशय यशस्वी असणाऱ्या लोकांनाही पाहतो. वेगवेगळ्या वयातील, समाज व्यवस्थेतील, देशातील, या व्यक्ती इतक्या यशस्वी होतात, किंवा आपल्यासाठी प्रेरणादायी होतात त्यामागे त्यांचे कष्ट, सातत्य, कुशाग्र बुद्धी, इत्यादी अत्यंत आवश्यक घटकांसोबत एक महत्त्वाची गोष्ट असते. ती म्हणजे, आपल्या मेंदूतील, मनातील जागा जाणीवपूर्वक ‘मोकळी’ ठेवत राहणं. त्यायोगे आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगणं. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ‘फ्री माइंड स्पेस’चं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती केवळ काही जणांची मक्तेदारी आहे का? किंवा त्यांना सहज शक्य आहे का? तर अजिबातच नाही! आपल्या सगळ्यांनाच ती आपसूक मिळालेली असतेच. पण आपण त्यात त्या त्या वेळेस, काय टाकत राहतो, साठवत राहतो, की ती काही, कृतिशील विचार भावना यांच्यासाठी राखीव ठेवतो हे महत्त्वाचं.

एक साधं उदाहरण घेऊ. एका गृहिणीच्या आयुष्यातील साधा दिवस. त्यात आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी म्हणून कराव्या लागणाऱ्या काही रोजच्या कामातून मोकळी होऊन ती निवांत चहा पीत बसली असेल आणि अगदी त्याच वेळेस तिला कोणाशीही झालेलं अप्रिय संभाषण आठवलं, तर तिच्या निवांत क्षणाचं रूपांतर चुटकीसरशी तिलाच त्रासदायक असणाऱ्या विचारांच्या साखळीत तिच्याही नकळत होऊन जातं. त्यानंतर त्या चहाची चव, मिळालेला वेळ, हे सगळं मागे पडून तिचे सगळे विचार, भावना त्या एका संभाषणापाशी केंद्रित होऊन बसतात.

हे तिच्या ‘लक्षात’ येईपर्यंत घडय़ाळातली व्यावहारिक जगाची वेळही बरीच पुढे सरकलेली असते आणि तिच्या मनातली जागासुद्धा नकळत भरत जाते. त्या वेळेस जर तिने एखादं पुस्तक वाचत चहा प्यावा, किंवा काहीही न करता शांतपणे आस्वाद घ्यावा हे ठरवलेलं असेल तर ते घडतच नाही. त्याउलट तिच्या पुढच्या वेळापत्रकावर मात्र तिच्या या नकोशा हरवण्याचा नक्कीच परिणाम होतो. तोही नकारात्मक. कारण यातून तिला ऊर्मी, उत्साह असं काहीही मिळणार नसतं. हेच आणि अगदी असेच, एखादे साठीचे गृहस्थ रोजच्या व्यायामाचा भाग म्हणून फेर-फटका मारायला गेले असतील आणि विचारांनी अशी कूस बदलली, त्यांना बँकेत आलेला नकोसा अनुभव आठवला, किंवा एखाद्या आप्तेष्टाचा मृत्यू असं काही आठवलं, त्यावर विचार झाला, तर त्यानंतर तसेच विचार घोळत राहिले तर त्यात आश्चर्य नाही. शिवाय फेरफटका मारल्याने ताजेतवाने वाटण्याऐवजी अगदीच थकून गेलो, असंही वाटू शकतं. कारण इथे शरीरापेक्षा मनच विचार करून थकून जातं.

वर पाहिलेल्या काही प्रतिक्रियांच्याबाबत साठवलेले न्यूनगंड, नकारात्मक विचार, अनामिक अनावश्यक भीती, दडपण, सतत डोकं वर काढणारा राग, किंवा सतत इतरांना समजावून घेण्याची प्रवृत्ती, इत्यादीचं नकळत, मनातली अत्यावश्यक असणारी जागा कणाकणाने व्यापून टाकणारं जाळं तयार होतं. त्याचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात होतेच. जसे की,

* स्वत:ला किंवा कोणालाही दिलेली वेळ न पळता येणं. कारण या सतत व्यापलेल्या, गर्दीच्या स्थितीचा थेट संबंध घडय़ाळाच्या काटय़ांशी असतो. त्यामुळे अपुरी कामं होणं, त्यातून येणारी विफलता आणि पुढे ती किंवा इतर कामं टाळण्याची प्रवृत्तीच तयार होऊ शकते.

* सतत आपण व्यग्र असतो, स्वत:साठी वेळ मिळत नाही ही भावना अगदी रोज, न चुकता येणे, परंतु खरे पाहता, आपल्या कृतीशील असण्याविषयी एक साशंकताही वाटणं.

* स्वत:चे छंद, आवडी-निवडी यांच्यासाठी अजिबातच वेळ न मिळणं.

* आपल्यासारख्याच परंतु त्यामानाने यशस्वी व्यक्तींविषयी, आकस, असूया वाटणं. त्यांच्या यशाबद्दल, किंवा व्यक्तिमत्त्वाबद्दल अनावश्यक टिप्पणी करत राहणं.

* आयुष्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होणं.

* केवळ आपणच इतरांसाठी राबत आहोत ही भावना येऊन, नात्यात कडवटपणा किंवा अढी निर्माण होणे. याचा परिपाक म्हणून, कशातही रस न वाटता आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंद, समाधान उरलेच नाहीये असंच चित्र आपल्याला दिसू शकतं.

मग ही मोकळी जागा कशी मिळवायची? किंवा नसेल तर कशी तयार करायची? यावर, जगभरातून एक अतिशय साधा सोपा उपाय, बऱ्याच मनसोपचारतज्ज्ञांकडून, समुपदेशकांकडून सांगितला जातो. तो म्हणजे, आपल्या आजूबाजूच्या जागा, राहतं घर, इत्यादी ठिकाणातून अडगळ काढायला हळूहळू सुरुवात करायची. सुरुवात स्वत: वापरत असलेलं पाकीट, पर्स, किंवा बॅग इथून करून, त्यानंतर रोज जागेतला एखादा छोटासा भाग असं करत, सगळं छान मोकळं करत जायचं. हे करताना जितक्या वस्तू इतरांसाठी उपयुक्त आहेत, त्या ताबडतोब मार्गी लावल्या तर इतरांनाही त्याचा उपयोग होतो.

यातून, मन आणि मेंदू यातही जागा मोकळी झाल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. आपल्या काही वस्तू इतरांना देण्यातून, आपण इतरांसाठी उपयोगी पडू शकतो हा एक सकारात्मक विचारसुद्धा वाढीस लागतो. यातून आपल्याला इतका आनंद मिळतो, की आपण हे वारंवार करू लागतो.

आता याच्या पुढे जाऊन इथे असंही करता येईल, की बऱ्याच वस्तू, गोष्टी यांना काही कारणाने लगेच वाटा फुटणं शक्य नसेल, तर त्यांची वर्गवारी करून, त्या बांधून ठेवता येतील. आणि त्यांची एक नोंदही ठेवता येईल. गरज असेल त्याप्रमाणे त्यापुढे सरकवता येतील. यातून आपल्या विचारांना, भावनांनाही एका विशिष्ट पण छोटय़ा जागेत पडून राहण्याची किंवा तिथेच थांबवून ठेवण्याची सवय नक्कीच लागेल, किंवा लावता येईल. बाकीची जागा आपल्यासाठी मोकळी.

पुढचं पाऊल म्हणजे, भावना, विचार हे तसे नित्य-नेमाने येणारे, ठाण मांडून बसणारे. तेही न सांगता, कोणत्याही भलत्या वेळीसुद्धा. त्यांच्या अशा प्रकारे येण्यावर जरी आपला निर्बंध नसला तरीही, त्यांनी तिथे येऊन पोखरत राहावं का यावर मात्र निर्बंध सहज घालता येईल. वर पाहिलेल्या उदाहरणात जर अप्रिय संभाषण आठवलंच किंवा सहज मनात आलंच तर त्याला न धिक्कारता किंवा न टाळता शांतपणे त्याच्याकडे पाहून, थोडक्यात त्याचे माफक स्वागत करून, त्याच्या पुढच्या चक्राला जाणतेपणाने थोपवता येईल. आणि नंतर काही वेळ खास अशा थांबून राहिलेल्या विचार, भावना यासाठी अगदी रोज काढून, त्यांचा तिथेच निचरा करून टाकणं उत्तम. मग तो कोणाशी किंवा स्वत:शी संवाद साधून किंवा लिहून काढून किंवा केवळ त्यांच्याकडे पाहून! अर्थात याची सवय लावणं आवश्यक असतं. अशी सवय लागली की मग मात्र मनात, मेंदूमध्ये प्रचंड जागा ‘मोकळीच’ आहे अशी जाणीव व्हायला लागते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेली, नाती, गोतावळा, मित्र-मंडळी, सहकारी इत्यादी सगळ्यांशीच वागताना नवीन डोळसपणा जन्म घेतो. शिवाय कोणत्या विचाराला, भावनेला किती महत्त्व द्यायचं हेही कळतं.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com