योशिता गुरनानी
१० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन. गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं शरीर हे शारीरिक आणि मानसिक व्याधींचं माहेरघर होऊ लागलं आहे. याचं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली अनेक ताणतणावयुक्त व्यवधानं. मुख्य म्हणजे मन मोकळं करायला आवश्यक अवकाश, तसंच व्यक्तींची कमतरता. अशा वेळी अभ्यासकांनी सांगितलेला एक उपाय म्हणजे स्व-प्रेम. जो स्वत:वर विश्वास ठेवतो, अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत स्वत: ठाम राहतो, तोच योग्य निर्णय घेत समाधानी आयुष्य जगू शकतो.. काय आहे हे स्व-प्रेम?
गौतम बुद्ध म्हणाले होते, ‘तुमच्या स्वत:वरच्या प्रेमावर, आपुलकीवर संपूर्ण विश्वात सर्वाधिक हक्क तुमचा स्वत:चाच आहे!’. ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल असं म्हणून गेलाय- ‘स्वत:ला ओळखणं ही सगळय़ा शहाणपणाची सुरुवात आहे.’ आपलं रोजचं जगणं धावपळीतच जातं. बाहेरच्या जगात वावरताना, विविध भूमिका निभावताना आपण त्या त्या भूमिकेत अपेक्षित असलेल्या मागण्या पुरवत राहतो. या सगळय़ात आपलं स्वत:बरोबरचं नातं मात्र दुर्लक्षित राहतं. स्व-प्रेम म्हणजे व्यक्तीनं सतत उत्क्रांत होत राहावं यासाठीची गुरुकिल्लीच म्हणता येईल.
थोडं अधिक सुटं करून सांगायचं, तर आयुष्यात काही प्रतिकूल घटना घडल्या की स्वत:बद्दल वाईट वाटतं, त्या वेळी ‘माझ्यावर अन्याय झालाय, मी ‘व्हिक्टिम’ आहे,’ ही नकारात्मक भावना आपल्याला व्यापून टाकते. असा माणूस कधीच आनंदी होऊ शकत नाही. स्वत:बद्दलचं प्रेम वा विश्वास मात्र ‘आपण कुणी तरी आहोत, आपल्यालाही किंमत आहे,’ ही भावना देतं. स्वत:ला पूर्णत: आणि जसे आहोत तसं स्वीकारणं त्यात आहे. एक वैयक्तिक उदाहरण सांगते. माझे वडील २०१३ मध्ये वारले. कुटुंबाला काही बिकट संकटांचा सामना करावा लागला. आधी प्रेमानं एकत्र राहणाऱ्या कुटुंबातला परस्परविश्वास संपला. नात्यांत कडवटपणा आला. ते सर्व बघून मी बधिर होऊन गेले होते. स्वत:ला एका कोशात गुरफटून घेतलं. कुणाविषयी मला काही वाटेचना.. भावना आत आत दडपून टाकणं तुलनेनं सोपं होतं, त्यामुळे मी तो मार्ग स्वीकारला. पण त्यानं मला काही फायदा झाला का?.. त्यातून पुन्हा दु:खच निपजलं आणि तेच सांगाती असल्यासारखं बरोबर चालू लागलं. मग अर्थातच माझ्यासमोर दोन रस्ते होते. स्वत:च्या या अवस्थेबद्दल वाईट वाटून घेणं, जगाला दोष देत बसणं किंवा आयुष्यात जे काही घडलंय त्यासाठी स्वत:ला आणि इतरांनाही दोष न देता ते स्वीकारणं आणि पुढे जाणं. मी दुसरा पर्याय निवडायचं ठरवलं. आणि खरंच तोपर्यंतच्या इतक्या मोठय़ा काळात प्रथमच मला जाणवलं, की मला स्वत:बद्दल प्रेम वाटतंय. अगदी निरपेक्ष!
पण हे नेमकं कसं साध्य झालं?.. मीही इतर अनेक जणींसारखी सतत कामात गुंतून राहणारी स्त्री आहे. आई, पत्नी, मुलगी, कोच आणि एक चित्रकार या भूमिका निभावते. या सगळय़ात मी बदल इतकाच केला, की दैनंदिन कामात वा ‘रूटीन’मध्ये मी काही क्षण वेगळे काढायला सुरुवात केले. हा वेळ थोडा-थोडका का होईना, पण माझा- फक्त माझा होता. माझ्या बाल्कनीत मी पन्नासएक लहान लहान झाडं लावली आहेत. त्यांच्या सान्निध्यात काही मिनिटं शांततेत घालवणं असेल, किंवा नुसतंच शांत बसून स्वत:वर, आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करणं, श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देणं असेल.. आणि हो, स्वत:ला खोलवर पारखत दैनंदिनी लिहिणं होतंच. हल्ली मोबाइलमुळे आपण कुठेही बसल्या ठिकाणी ती लिहू शकतोच.
आता हे बदल कदाचित तुम्हाला किरकोळ वाटतील, पण हळूहळू त्यांचा रंग चढायला लागला आणि माझं माझ्याशीच पुन्हा नातं जुळण्यासाठी ती प्रभावी साधनं ठरली. कारण आपण आपल्याच सान्निध्यात राहणं, त्याचा आनंद घेणं हा स्वत:वर प्रेम करण्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. अर्थात प्रत्येकाच्या हे साध्य करण्याच्या पद्धती वेगळय़ा असतील, कारण खरं तर या सगळय़ा गोष्टी म्हणजे स्वत: स्वत:ला दाद देणं आहे. कोणताही अतूट बंध जोडायचा असेल, तर आपण पूर्णत:, अगदी कोणत्याही बाबतीत पुढेमागे न बघता खरं वागणं आवश्यक असतं. आपल्या हळव्या बाजू उघड होऊ देणं, आपल्यात असलेले दोष झाकण्याचा प्रयत्न न करता स्वीकारणं यातच येतं. हे मला उमगल्यावर त्याच जोरावर मला असे काही सुहृद मिळाले, असे काही बंध निर्माण होऊ शकले, की कितीही अवघड परिस्थिती आली तरी ते टिकतील, याची मला खात्री आहे.
या सगळय़ाचं सार काय, तर स्वत:वर प्रेम करणं हा एक शोध आहे, प्रवास आहे.. आनंदी राहण्याचा, कृतार्थतेची भावना मनात निर्माण होण्यासाठीचा. आपल्यात जे काही गुणदोष, भक्कम बाजू आणि कमतरता असतील, त्या सगळय़ा मिळूनच आपलं प्रत्येकाचं इतरांपेक्षा वेगळं असं व्यक्तिमत्त्व निर्माण होत असतं, हे मान्य करणं आहे. ‘तुमच्याकडे ठरावीकच वेळ आहे. उगाच कुणा तरी दुसऱ्याचं आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका!’ असं स्टीव्ह जॉब्जचं वाक्य प्रसिद्ध आहे.
काही जण असंही विचारतील, की हे ‘सेल्फ लव्ह’ वगैरे गरजेचं आहे का? हो, कारण जीवन हे एक युद्धक्षेत्र मानलं, तर स्वत:वर प्रेम करणं ही आपल्याला मानसिकदृष्टय़ा लवचीक ठेवणारी, भावनिक बळकटी देणारी आणि सगळय़ा संकटांवर मात करून पुढे जायला मदत करणारी ढाल आहे. आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्याशी त्याचा थेट संबंध आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण कमी पडतोय असं आपल्याला सतत वाटत असतं. सगळी शर्यत तथाकथित ‘पूर्णत्वा’साठी चालू असते आणि आपणही त्यात ढकलले जातो. आकर्षक दिसणं, सडसडीत बांधा, लठ्ठ खिसा.. असं सगळं असलं तरच जग आपल्याला स्वीकारतं! त्यामुळे हा संघर्ष, गोंधळ कायमच आजूबाजूला राहणार आहे. स्वत:शी असलेलं घट्ट नातं मात्र प्रतिकूलतेतून तारून नेतं.
याचा एक दुसरा पैलू असा, की जेव्हा आपण स्वत:ला आहोत तसं स्वीकारतो, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीलाही ते आहेत तसं स्वीकारू शकतो. व्यक्तीव्यक्तींत प्रेमाच्या देवाणघेवाणीचा एक सेतू यातून उभा राहतो. व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होतोच आणि अर्थातच आपली नातीही समृद्ध होतात. थोडक्यात, आपलं जीवन आणि वैयक्तिक विकास बहरेल अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठीचं ते एक साधनच आहे. स्वत:ला स्वीकारणारं, स्वत:वर प्रेम करणारं मन एकसंध, एकाग्र राहू शकतं. आयुष्याच्या प्रवासात एखाद्या भक्कम तारूसारखं. जीवनाचं वस्त्र हजारो नात्यांनी विणलेलं असतं; त्या धाग्यांना एकत्र बांधून ठेवणारा, तो स्वत:च्या स्वत:वरच्या प्रेमाचा धागा!
(लेखिका व्यक्तिमत्त्व विकास सल्लागार व योग प्रशिक्षक आहेत.) अनुवाद – संपदा सोवनी
