|| भाषांतर – सायली परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी माझ्या प्रेयसीला शक्य तेवढं स्वातंत्र्य देतो. कितीतरी वेळा यामुळे मी अडचणीत येतो, मला इजा पोहोचते तरीही. याचा अर्थ असा होतो का, की माझं स्वत:वर पुरेसं प्रेम नाही, म्हणूनच मी स्वत:ला दुय्यम स्थान देतो?

हे तुला वाटतंय त्यापेक्षा खूप गुंतागुंतीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की, तू तुझ्या प्रेयसीला स्वातंत्र्य देतोस ही कल्पनाच चुकीची आहे. तू कोण तिला स्वातंत्र्य देणारा? तू प्रेम करू शकतोस आणि तुझ्या प्रेमातच स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. ती काही देण्याची गोष्टच नाही. ते द्यावं लागत असेल, तर तुला जाणवणाऱ्या सगळ्या समस्या जाणवतीलच.

तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तू काहीतरी चुकीचं करतो आहेस. तुला खरोखर स्वातंत्र्य द्यायचं नाहीये; तुला स्वातंत्र्य द्यावं लागेल अशी परिस्थिती आलीच नाही, तर तुला ते खूप आवडेल. पण प्रेम स्वातंत्र्य देतं असं मला पुन:पुन्हा म्हणताना तू ऐकलं आहेस, त्यामुळे तू अजाणतेपणी स्वत:वर जबरदस्ती करतो आहेस स्वातंत्र्य देण्याची, कारण ते दिलं नाहीस तर तुझं प्रेम प्रेमच नाही असं होईल.

तू आता अडचणीच्या परिस्थितीत आहेस, जर तू स्वातंत्र्य दिलं नाहीस, तर तुला तुझ्या प्रेमाबद्दल शंका येऊ लागेल; तू स्वातंत्र्य दिलंस, तर तुझ्यातला अहंभाव मत्सराने ग्रस्त होईल आणि हजारो प्रश्न विचारेल : ‘‘तुझ्या प्रेयसीला (किंवा प्रियकराला) तू पुरेसा (पुरेशी) नाहीस, म्हणून तिला (त्याला) स्वातंत्र्य हवंय का- तुझ्यापासून स्वातंत्र्य कोणा दुसऱ्यासोबत असण्यासाठी?’’ याचा त्रास होतो, आणि म्हणूनच तुला वाटू लागतं, ‘‘मी स्वत:ला दुय्यम स्थानावर ठेवतो आहे.’’

तिला स्वातंत्र्य देताना तुला दुसऱ्या कोणाला तरी पहिल्या स्थानावर ठेवावं लागतं आणि तू स्वत:ला दुय्यम स्थानावर ठेवतोस. हे तुझ्या अहंकाराच्या विरोधात जाणारं आहे आणि याची तुला काही मदतही होणार नाही, कारण तू दिलेल्या स्वातंत्र्याचा सूड तू घेशील. असंच स्वातंत्र्य तुला दिलं जावं असं तुला वाटेल- तुला त्याची आवश्यकता असो की नसो, तो मुद्दा नव्हे- केवळ तुझी फसवणूक होत नाहीये हे सिद्ध करण्यासाठी.

दुसरी गोष्ट म्हणजे, तुझी प्रेयसी दुसऱ्या कोणासोबत होती, म्हणून तुला तिच्याबरोबर काहीसं विचित्र वाटेल. हे तुझ्या आणि तिच्या मध्ये येईल. तिने दुसऱ्या कोणाची तरी निवड केली आणि तुला डच्चू दिला; तिने तुझा अपमान केला. आणि तू तर किती करत आला आहेस; तू इतका उदार वागला आहेस, तिला स्वातंत्र्य दिलं आहेस. आता तुला दुखावल्यासारखं वाटतंय म्हणून तू तिला या ना त्या मार्गाने दुखावणार आहेस.

पण हे सगळं निर्माण झालंय एका गैरसमजातून. तू प्रेम करतोस, म्हणजे तुला स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं मी म्हणालेलोच नाही. मी म्हणालो आहे की, प्रेम म्हणजेच स्वातंत्र्य. ते देण्याचा प्रश्न येतच नाही. ते जर द्यावं लागत असेल, तर ते न देणं चांगलं. चारचौघांसारखा राहा. कशाला अनावश्यक गुंते तयार करतोस? असेही पुरेसे गुंते असतातच.

स्वातंत्र्य अंगभूत आहे अशा दर्जापर्यंत तुझं प्रेम पोहोचलं असेल, तर तुझ्या प्रेयसीला तुझी परवानगी मागण्याचीही गरज भासणार नाही.. खरं म्हणजे, मी तुझ्या जागी असतो आणि तिने परवानगी मागितली असती, तर मला दुखावल्यासारखं वाटलं असतं. याचा अर्थ तिचा माझ्या प्रेमावर विश्वास नाही. माझं प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. मी तिच्यावर प्रेम केलंय; याचा अर्थ असा नाही की, मी सगळी दारं-खिडक्या लावून ठेवेन, म्हणजे ती दुसऱ्या कोणासोबत हसू शकणार नाही, नाचू शकणार नाही, कोणावर प्रेम करू शकणार नाही. कारण आपण कोण आहोत?

हा मूलभूत प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे : आपण कोण आहोत? आपण सगळेच अनोळखी आहोत आणि कोणत्या बळावर आपण इतके अधिकारवाणीने म्हणू शकतो, ‘‘मी तुला स्वातंत्र्य देईन’’ किंवा ‘‘मी तुला स्वातंत्र्य देणार नाही’’ किंवा ‘‘जर तू माझ्यावर प्रेम करतेस, तर तू अन्य कोणावर प्रेम करू शकत नाहीस?’’ ही सर्व मूर्खपणाची गृहीतके आहेत, पण ही गृहीतके मानवजातीवर अगदी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत आली आहेत. आणि आपण अजूनही रानटीच आहोत; प्रेम म्हणजे काय हे अद्याप आपल्याला समजलंच नाही.

मी जर कोणावर प्रेम करत असेन, तर त्या व्यक्तीने तसं करण्याची मुभा मला दिली, मला नाकारलं नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. एवढं पुरेसं आहे. पण मी तिच्यासाठी तुरुंगासारखा व्हायला नको : तिने माझ्यावर प्रेम केलं आणि त्याबद्दल मी तिच्याभोवती एक तुरुंग निर्माण केला; मी तिच्यावर प्रेम केलं आणि परिणामी तिने माझ्याभोवती एक तुरुंग तयार केला. काय महान पुरस्कार देतोय आपण एकमेकांना!

जर मी कोणावर प्रेम करत असेन तर मी त्याबद्दल कृतज्ञ आहे आणि तिचं स्वातंत्र्यही सुरक्षित आहे. ते मी दिलेलं नाही. तो तिचा जन्मसिद्ध हक्क आहे, जो माझं प्रेम काढून घेऊ शकत नाही. प्रेम एखाद्याचं स्वातंत्र्य कसं हिरावून घेऊ  शकेल, विशेषत: तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीचंच? तो अधिकार तिला तिच्या जन्मासोबत मिळालेला आहे. तुम्ही असंही म्हणून शकत नाही की- मी तिला स्वातंत्र्य देतोय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोण? – एक अनोळखी इसमच. तुम्ही एका मार्गावर भेटलात, अपघाताने आणि तिने तुमच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्याबद्दल केवळ कृतज्ञ राहा आणि तिला तिचं आयुष्य तिला हवं तसं जगू द्या आणि तुम्हीही तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जगा. एकमेकांच्या जीवनशैलींमध्ये हस्तेक्षप नको व्हायला.

स्वातंत्र्य म्हणजे हेच. मग प्रेम तुम्हाला मदत करेल ताण कमी करण्यात, चिंता कमी करण्यात, वेदना कमी करण्यात आणि आनंद वाढवण्यात.

पण जगात जे घडतं ते याच्या नेमकं उलट असतं. प्रेम कितीतरी दु:ख निर्माण करतं, वेदना देतं, मग काही लोक अखेर ठरवतात की कोणावर प्रेम न करणं अधिक बरं. ते त्यांच्या हृदयाची दारं बंद करतात, कारण प्रेम हा केवळ नरक आहे, दुसरं काहीच नाही.

पण प्रेमाला प्रवेश नाकारणं म्हणजे सत्याला प्रवेश नाकारणं, अस्तित्वाला प्रवेश नाकारणं; म्हणून मला हे मान्य नाही. मी म्हणेन : प्रेमाची पद्धतच संपूर्णपणे बदलून टाका! तुम्ही प्रेमाला एका कुरूप परिस्थितीत ढकललं आहे- ती परिस्थितीच बदला.

प्रेमाला तुमच्या आध्यात्मिक विकासात मदत करू दे. प्रेमाला तुमच्या हृदयाचा आणि धैर्याचा पोषणकर्ता होऊ दे, म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडू शकाल, कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी.

ओशो, बियॉण्ड सायकॉलॉजी, #२५ WWW.OSHO.COM

सौजन्य- ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

मराठीतील सर्व ओशो म्हणे.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osho philosophy part
First published on: 12-05-2018 at 00:11 IST