कोणताही मैदानी खेळ खेळण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती ही सर्वांत महत्त्वाची ठरते, जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा पहिल्यांदा तिच्या शरीरात खूप मोठे बदल होत असतात. त्यामुळे काहींनी मातृत्वाच्या नुसत्या चाहुलीनंतर आपली क्रीडा कारकीर्द सोडून दिलेली दिसते. मात्र अलीकडे मातृत्वाचा टप्पा ओलांडून पुढे जाणाऱ्या अनेक जणी स्वत:ला खणखणीतपणे सिद्ध करीत आहेत, त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत उतरलेल्या ९ माता. त्याही आधी सेरेना विल्यम्स असेल, भारतीय खेळाडू बॉक्सर मेरी कोम, धनुर्धर दीपिका कुमारी, टेनिसपटू सानिया मिर्झा, स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लिकल अशा अनेकींनी जागतिक स्तरावर यशस्वी कामगिरी केली आहे. खेळ मैदानी असो वा बैठा, मातृत्वानंतर क्रीडा स्पर्धा किती आव्हानात्मक ते सांगताहेत ‘अर्जुन पुरस्कार’ व ‘पद्माश्री पुरस्कारा’ने सन्मानित बुद्धिबळपटू अनुपमा गोखले.
२०

सेरेना विल्यम्स

२०१७ मध्ये ‘ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धे’त दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या सेरेना विल्यम्सने एकही सेट न गमावता अजिंक्यपद पटकावले आणि सर्व जगाने तिला कौतुकाची पावती दिली. आता नुकत्याच पार पडलेल्या ‘विम्बल्डन टेनिस स्पर्धे’मध्ये तर अशा ९ जणी होत्या, ज्या माता आहेत. यापैकी बेलिंडा बेंचिचने उपांत्य फेरीही गाठली. आणखीही अशा खेळाडू आहेतच, आई झाल्यावर तीन ‘ग्रँड स्लॅम’ जिंकणारी किम क्लाइस्टर्स, विम्बल्डन जिंकणारी इव्हान गुलगॉन्ग-कॉली, नऊ महिन्यांत ‘न्यू यॉर्क सिटी मॅरेथॉन’ जिंकणारी पॉला रॅडक्लिफ, वर्षभरात जागतिक अजिंक्यपद जिंकणारी अॅथलीट जेसिका एनीस-हिल, अकरा आठवड्यांत ‘ब्रिटिश ओपन गोल्फ’ जिंकणारी कॅटरिओना मॅथ्यू अशी मातृत्वानंतर झोकदार पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंची एक मोठी यादीच होईल. भारतीय खेळाडूही यात मागे नाहीतच. बॉक्सर मेरी कोम, तिरंदाज दीपिका कुमारी, टेनिसपटू सानिया मिर्झा, स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लिकल, बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी व द्रोणावल्ली हरिका यांनी मातृत्वानंतरही जागतिक स्तरावर यशस्वी कामगिरी केली आहे. अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. पाण्याखाली बुडलेल्या, न दिसणाऱ्या, हिमनगाच्या प्रचंड विस्ताराप्रमाणे मातृत्वाच्या केवळ चाहुलीनंतर स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्र सोडून दिलेल्या असंख्य स्त्री खेळाडू आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

शिवधनुष्य कसे पेलले?

बाळंतपणानंतर शारीरिक क्षमतेवर दिलेला भर, दुर्दम्य आत्मविश्वास, सरावाकडे जाणीवपूर्वक दिलेले लक्ष, अपराधीपणाच्या भावनेची हकालपट्टी, स्त्री खेळाडूंना आधार देणारी माणसे, या सर्व सूत्रांच्या आधारे या स्त्री खेळाडूंनी ही कामगिरी केल्याचे आपल्याला आढळते. २०२० मध्ये ‘ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मधील गोष्ट. भारतीय संघाची उपांत्य फेरीची लढत पोलंड विरुद्ध चालली होती. लढत बरोबरीत सुटली आणि नियमाप्रमाणे दोन्ही बाजूंकडून केवळ एका पटावर होणाऱ्या लढतीवर अवलंबून होते की भारतीय संघ अंतिम फेरीत जाणार की पोलंडचा? पट निवडला गेला भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा. जिच्या धमन्यांतून रक्त नव्हे, बर्फ वाहाते असे म्हणतात, अशा हम्पीने कोणतेही दडपण न घेता भारतीय संघासाठी विजय नोंदवून भारताला अंतिम फेरीत दाखल केले. पुढे भारतीय संघाने रशियाच्या बरोबरीने कामगिरी करून विभागून सुवर्णपदक मिळवले. हम्पी हे ऑनलाइन सामने खेळताना घरी एका खोलीत बंदिस्त होती, तर तिचे आई-वडील बाहेरच्या खोलीत तिच्या छोट्या मुलीला, आहनाला, सांभाळत होते. अशी ही आधार देणारी माणसे बरोबर असतील तर अनेकदा त्या स्त्री खेळाडूचा मार्ग सुकर होऊन जातो.

सराव आणि आत्मविश्वास

धनुर्धर दीपिका कुमारीने २०२३ मध्ये, मुलीच्या जन्मानंतर केवळ २० दिवसांत आपले ४४ पौंडाचे शिवधनुष्य उचलून सरावाचा प्रयत्न केला. सुरुवातीचे काही महिने तिचे शरीर तिला साथ देईना. स्थिर उभे राहून बाण मारणे तिला जड जाऊ लागले. जिद्दी दीपिकाने आपल्या दहा महिन्यांच्या मुलीला भारतात ठेवून प्रशिक्षणासाठी साऊथ कोरियाला जायचा निर्णय घेतला. या प्रशिक्षणाचा दीपिकाला इतका फायदा झाला की, तिने नंतर आशियाई आणि जागतिक स्तरावर अनेक पदकांची लयलूट केली. बॉक्सर मेरी कोमला २००६ मध्ये जेव्हा बाळंतपणात सिझेरियन करावे लागले, तेव्हा बऱ्याच लोकांनी आता तिची पहिल्यासारखी उत्कृष्ट कामगिरी होणे कठीण आहे, असे भाकीत केले. मेरीचा आत्मविश्वास एवढा जबरदस्त की दोनच वर्षांत विश्वविजेतेपद जिंकून तिने या लोकांचे म्हणणे खोडून काढले. वयाच्या एकतिसाव्या वर्षी दुसरे बाळंतपण झाल्यावर कोणीही बॉक्सिंगसारखा खेळ सोडून दिला असता. पण मेरीने पुन्हा दोनच वर्षांत एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा… अशा सर्व स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई करून दिमाखदार पुनरागमन केले. तिच्या दुर्दम्य आत्मविश्वासाला सलाम करावासा वाटतो!

बाळंतपणानंतर दोन वर्षे टेनिसला विश्रांती देणाऱ्या सानिया मिर्झाने २०२० मध्ये पुन्हा टेनिस कोर्टवर पाऊल टाकले. मातृत्व आणि टेनिस यांची सांगड घालणे खूप अवघड आहे अशी प्रांजळ कबुली सानिया देते. त्याच वेळी, बालसंगोपनात कुठे कमी-जास्त झाले तर स्त्रियांनी अपराधित्वाची टोचणी स्वत:ला लावून घेऊ नये, असा सल्लाही ती देते. पालकत्व ही आई-वडील दोघांची जबाबदारी असल्यामुळे वडिलांनीही आईच्या बरोबरीने वाटा उचलला पाहिजे हे निश्चित.

तारेवरची कसरत

कोणत्याही क्षेत्रात मातृत्वानंतर कारकीर्द करायची तर मानसिक कणखरता, वेळेचे सुयोग्य नियोजन, बालसंगोपनासाठी मदत अशा अनेक गोष्टी लागतात. पण एक खेळाडू म्हणून मातृत्वानंतर कारकीर्द चालू ठेवणे जास्त कठीण असते असे मला वाटते. त्यात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मोठा भाग स्पर्धेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा असतो. एकदा बाळाला ठेवून या खेळाडू प्रवासाला बाहेर पडल्या की बाळाशी प्रत्यक्ष संपर्क तुटतो आणि त्याची उणीव, टोचणी सतत मनाला जाणवते. स्पर्धेला गेले असताना मुलाचे आजारपण निघाले तर धड परत येणेही शक्य नसल्याने आईचा जीव तुटतो. मुलाचे वाढदिवस, शाळेतील कार्यक्रम अशा मुलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या दिवसांना कदाचित आईची स्पर्धेमुळे अनुपस्थिती असू शकते. याचा मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. कार्यालयीन कामाची एखादी बैठक बरेचदा सोयीनुसार ठरवण्यात येते. परंतु स्पर्धांचे वेळापत्रक ठरलेले असते, त्यामुळे तुमची सोय-गैरसोय तुम्हालाच पाहावी लागते. एखादी दीर्घ कार्यालयीन बैठक असली तर साधारणपणे त्यासाठी एखादा आठवडा बाहेर राहून काम होऊ शकते. याउलट स्पर्धा बरेचदा दोन-तीन आठवडे चालणाऱ्या असतात. कधी कधी लागोपाठच्या स्पर्धा असतात. त्यासाठी महिनाभरदेखील घराबाहेर जावे लागते. बाळाला घेऊन स्पर्धेला जावे, तर परक्या ठिकाणी बाळाची सोय करणे महाकठीण काम असते. स्पर्धांच्या ठिकाणी जर मुले सांभाळायची चांगली सोय केली तर काही प्रमाणात ही समस्या कमी होऊ शकेल. बैठकांसाठी किंवा कामासाठी आयत्या वेळी तुमच्या ऐवजी तुमचा एखादा सहकारी जाऊ शकतो. आजकाल बरेचदा काम किंवा बैठका ‘ऑनलाइन’ म्हणजेच घरबसल्या होऊ शकतात. परंतु खेळासाठी मात्र त्याच खेळाडूची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते. बुद्धिबळात फक्त काही स्पर्धा ‘ऑॅनलाइन’ होतात. सर्व क्षेत्रांत तशी स्पर्धात्मकता असते, पण खेळात सतत नवीन खेळाडू तुमचे स्थान घेण्यास तयार असतात. त्यामुळे या पराकोटीच्या स्पर्धेलाही खेळाडूंना तोंड द्यावे लागते.

स्त्री खेळाडूंमध्ये स्पर्धेला आवश्यक अशी आक्रमक वृत्ती थोडी कमीच असते, असा आरोप नेहमी होत असतो. मातृत्वानंतर स्वभावातील आक्रमकता आणखीनच कमी होण्याचा धोका असतो. साधारण याच वयात खेळाडूंची क्रीडा-कारकीर्द बरेचदा उताराला लागलेली असते. त्यामुळे पुन्हा जिद्दीने पुनरागमन करण्यापेक्षा ‘आता पुरे’ हा प्रेमळ सामाजिक आणि कौटुंबिक सल्ला स्वीकारला जातो.

सामाजिक जबाबदारी

भारतीय समाजात अजूनही क्रीडा क्षेत्राला म्हणावी अशी मान्यता नाही. तुटपुंजे प्रायोजक, तुरळक नोकरीच्या संधी, सरकारी पाठबळाचा अभाव या सर्व समस्यांशी भारतीय क्रीडा क्षेत्र अजूनही झगडतेच आहे. त्यात स्त्री खेळाडूंना मातृत्वाची चाहूल लागताच, प्रायोजक, निवड समिती सदस्य किंवा नोकरी देणारी आस्थापने आता जणू काही यांची क्रीडा कारकीर्द संपलीच अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहतात. हळूहळू हा दृष्टिकोन बदलत असला, तरी मुंगीच्या पावलांनी हा बदल घडून येत आहे. मुळात क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करायला कमीच प्रोत्साहन असते, त्यात स्त्रियांना आणखीनच कमी आणि मातृत्वाची चाहूल लागली की आता कशाला ही कारकीर्द असा प्रश्न हमखास विचारला जातो. मुलाच्या तोंडावर आईच्या खेळातील नैपुण्याचे कौतुक करण्याऐवजी एखाद्या प्रसंगात ‘‘अरे, तुझी आई नाही आली का?’’ असे विचारून नकारात्मक परिणाम करणारी माणसेही समाजात असतात. या दृष्टिकोनातून मला माझ्या क्रीडा कारकीर्दीत भले-बुरे दोन्ही प्रकारचे अनुभव आले आहेत.

इंदोरला एका खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी मी व माझे बुद्धिबळ प्रशिक्षक पती (रघुनंदन गोखले)आमच्या लहान मुलाला बरोबर घेऊन गेलो होतो. आधी काहीही कल्पना नसतानादेखील तेथील आयोजकांनी छोट्या मुलाची खाण्या-पिण्याची वेळ, आवड-निवड सर्व सांभाळून घेतले आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र मी गर्भवती असताना एक असहिष्णू अनुभव मला आला. बंगळूरुला झालेल्या एका राष्ट्रीय स्पर्धेत गर्भारपणातल्या त्रासामुळे मला डावाला जायला थोडा उशीर झाला. डावाच्या शेवटी मला वेळ कमी पडला आणि मी तो डाव हरले. खेळात हार-जीत असतेच, त्यामुळे मला त्याचे विशेष काही वाटले नाही. एका बुद्धिबळ खेळाडूने स्पर्धा संपल्यावर त्या स्पर्धेवर एक लेख बुद्धिबळाच्या एका लोकप्रिय मासिकात लिहिला होता. त्यात त्याने लिहिले की, ‘अनुपमा डावाला उशिरा आली आणि त्यामुळे डाव हरली.’ इतक्या वर्षांच्या माझ्या कारकीर्दीत मी कधीच कोणत्याही डावाला उशिरा जात नसे. सबळ कारण असल्याशिवाय एवढी अनुभवी खेळाडू डावाला उशिरा येणार नाही या गोष्टीचा त्याने लिहिण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता, असे मला वाटले.

बुद्धिबळातील सकारात्मक परिस्थिती

‘बुद्धिबळ’ बैठा खेळ असल्यामुळे इतर खेळांच्या तुलनेत शारीरिक तंदुरुस्तीचे आव्हान या खेळात कमी असते. अर्थात एका जागी बसून खूप वेळ एकाग्रता ठेवून खेळण्यासाठी मूलभूत शारीरिक तंदुरुस्ती लागतेच. पण गर्भारपणातली आव्हानं इतर मैदानी खेळांच्या तुलनेत स्त्रिया निभावून नेऊ शकतात. त्यामुळे बहुतांश स्त्री बुद्धिबळपटू आई झाल्यावरदेखील आपली कारकीर्द चालू ठेवत आहेत. भाग्यश्री ठिपसे, मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, स्वाती घाटे, इशा करवाडे अशा अनेक महाराष्ट्रीय स्त्री बुद्धिबळ खेळाडूंनी बुद्धिबळाशी संबंधित आपली कारकीर्द मातृत्वानंतरही चालू ठेवली आहे. मुलगा झाल्यानंतर केवळ तीन वर्षांत राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवणे मला केवळ माझ्या आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे शक्य झाले. त्यांच्या गैरसोयीच्या वेळेत माझ्या सासूबाई, पती, सासर-माहेरची माणसे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाचा समंजस स्वभाव यांची मला मदत झाली.

भविष्यातील अनिश्चितता

हळूहळू एक मोठा सामाजिक बदल भारतात येऊ घातला आहे. तो म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती नंतर, आता कुटुंब संस्थाच कोसळते की काय असे वाटावे असा बदल. आता कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या खूप जोडप्यांना मुले नको असतात. विभक्त कुटुंबपद्धती, घटस्फोटाचे वाढते प्रमाण यामुळे मुलांचे संगोपन हे आव्हानात्मक झाले आहे. या परिस्थितीत स्त्री खेळाडूंना आपल्या कारकीर्दीत मुलाची आडकाठी नको असे वाटणे शक्य आहे. बरीच कुटुंबे आजकाल आई-वडील एका शहरात, तर मुले दुसरीकडे अशी राहतात. अशा परिस्थितीत स्त्री खेळाडूंना आपल्या शहरात नसलेल्या आई-वडिलांचा किंवा सासू-सासऱ्यांचा आधार मिळणे कठीण आहे. अर्थात आजकाल तंत्रज्ञानाने घेतलेली मोठी झेप ही एक सकारात्मक बाजू आहे. त्यामुळे जग जवळ आले आहे. प्रवास सुकर झाला आहे. व्हिडीओ संपर्कामुळे दूर असलेल्या आपल्या मुलांना प्रत्यक्ष पहिल्याचा अनुभव आता सहज घेता येतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्हिडीओवर तज्ज्ञांशी संपर्क साधता येतो. इंटरनेटवर माहितीचा खजिना सहज उपलब्ध आहे. खेळाडूंसाठी आज क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक क्षेत्रे उपलब्ध होत आहेत. प्रशिक्षक, समीक्षक किंवा आयोजक म्हणून क्रीडापटूंना त्यांच्या खेळाबरोबर संलग्न राहणे सहज शक्य आहे.

मला वाटते जर तंत्रज्ञानाचा, मनुष्यबळाचा योग्य उपयोग केला तर स्त्री खेळाडूंसाठी मातृत्व हा पूर्णविराम न होता एक सशक्त टप्पा ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

gokhale.anupama@gmail.com