scorecardresearch

पडसाद: खऱ्या सेलिब्रिटी ‘ग्रासरूट’मधल्या!

२५ फेब्रुवारीच्या अंकातील ‘ग्रासरूट फेमिनिझम’ या सदरातील ‘उपजीविकेशी जोडलेलं आत्मभान’ हा शिशिर सावंत यांचा लेख मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे.

padsad
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

२५ फेब्रुवारीच्या अंकातील ‘ग्रासरूट फेमिनिझम’ या सदरातील ‘उपजीविकेशी जोडलेलं आत्मभान’ हा शिशिर सावंत यांचा लेख मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. एकंदरीतच या सदरातील सर्व लेख बाई काय काय करू शकते, या विषयीचे आहेत. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांचं आयुष्य खूप संरक्षक चौकटीत गेलंय. परंतु त्याबाहेरचं जग किती भयानक असतं ते या लेखांवरून समजतं आहे. टी.व्ही., सिनेमा यातील सेलिब्रेटींपेक्षा याच स्त्रिया खऱ्या सेलिब्रिटी वाटतात. या सर्व स्त्रियांचं खूप कौतुक. अशा स्त्रियांना शोधून त्यांचा शून्यातून झालेला प्रवास लेखक व ‘चतुरंग’ आमच्यासमोर मांडतात म्हणून त्यांचेही आभार!‘कलावंतांचे आनंद पर्यटन’ हेही सदर वाचनीय आहे. पर्यटन या विषयाला बरेच आयाम आहेत. प्रत्येक जण आपल्याला भावेल तसं पर्यटन करतो आणि आपली मतं मांडतो. एकूणच ही पुरवणी नुसतीच वाचनीय नाही, तर संग्रही ठेवावी अशीच. – अंजली भातखंडे, अलिबाग

जुन्या पिढीने बदलावे!
‘आईवडील येती घरा’ (११ मार्च) हा डॉ. अंजली जोशी यांचा ‘वळणिबदू’ सदरातील लेख आजच्या वास्तवावर अचूक बोट ठेवणारा आहे. जुनी व नवी पिढी यांच्या राहणीमानात झालेला बदल हा वळणिबदू नसून, समुद्रासारखा विशाल झाला आहे. जुन्या पिढीनं आपलं उर्वरित आयुष्य आनंदात घालवण्यासाठी आता आपली जुनी दृष्टी बदलून, नव्या पिढीशी आनंदानं समरस होणं, ही काळाची गरज आहे. जुनी पिढी अधिक समजूतदार, जास्त पावसाळे पाहिलेली असल्यामुळे त्यांनीच हा बदल दु:खानं नव्हे, तर आनंदानं स्वीकारल्यास, दोन्ही पिढय़ांत आनंद निर्माण होईल. जुन्या पिढीची मावळती संध्याकाळ सुखात तर जाईलच, पण नव्या पिढीचा उगवता सूर्योदयही तापदायक न ठरता, जीवन प्रफुल्लित करणारा ठरेल. – प्रदीप करमरकर, ठाणे

‘दोन्ही पिढय़ांनी संयम बाळगावा’
डॉ. अंजली जोशी यांचा ‘आईवडील येती घरा’ हा लेख विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. या लेखात सांगितलेल्या गोष्टीतल्या सतत मतभेद होणाऱ्या जुन्या व नव्या या दोन्ही पिढय़ांनी थोडा संयम बाळगायला हवाय. मुलानं जसा बोलताना संयम ठेवायला हवा, तसंच आईवडिलांनी प्रश्न विचारण्याची घाई करू नये. यातील तरुण पिढीनं एकमेकांच्या प्रवृत्ती, इच्छा-आकांक्षाचं भान ठेवून सामंजस्यानं त्यांची त्यांची काही एक ‘सिस्टीम’ लावली आहे. त्यांच्या सहजीवनाच्या कल्पना वेगळय़ा आहेत. हे आईवडिलांसाठी नवीन आहे, पण म्हणून मुलाला सुनेनं घरगडी बनवलं आहे, ती बेफिकीर आहे असा समज होणं योग्य नाही. तिचं स्वतंत्रपणे नोकरी करणं, पैसा कमावणं जसं मान्य केलं जातं, तसं तिनं स्वतंत्रपणे इतर काही करणंही मान्य असायला हवं. गरज आहे फक्त मोकळय़ा संवादाची. एवढय़ा किरकोळ कारणावरून खटके उडाले आणि लगेच नात्यात दुरावा निर्माण झाला.. एवढं कमकुवत आईवडील आणि मुलांचं नातं असतं का?.. शिवाय वादावादीनंतर आईवडिलांनीही लगेच आपल्या घरी परत जाण्याची घाई कशाला करायची? एखाद्या दिवशी वाद झाला तरी आपलाच मुलगा आहे, दोन दिवसांनी एकमेकांशी बोलून इच्छा-अपेक्षा-भूमिकांबद्दल मोकळेपणानं चर्चा करता येतेच की! तो जास्त योग्य पर्याय. आपण दररोज घरात स्वयंपाक करत नसणं सासू-सासऱ्यांना स्पष्ट कळू देण्याची सुनेची भूमिका आहे. ‘मी तेवढय़ापुरतं कृत्रिम, खोटं वागू शकत नाही,’ हे तिचं म्हणणंही गैर नाही, कारण आज फक्त महिनाभर सासू-सासरे राहायला आले असले, तरी वयपरत्वे उद्या जर पूर्णवेळ एकत्र राहण्याची गरज पडली तर? या उदाहरणात दोन्ही पिढय़ांनी एकमेकांवर शिक्का मारण्याची घाई केलेली दिसते. हे टाळायला हवं. – अंजली कुलकर्णी

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या