‘‘निहारने इन्फ्लेशन कोशंट लक्षात घेऊनच केलीये पुढची तरतूद. नोकरीत असेल तर प्लॅन ए, पुढे मागे स्वत:चा उद्योग सुरू केला तर प्लॅन बी रेडी असेल त्याचा. पहिली पाच-सात र्वष पोराला मुद्दाम आजी-आजोबांचा सहवास देऊ. फॉर कल्चरल हेरिटेज, यू नो! नंतर मात्र सरळ एखाद्या ग्लोबल स्कूललाच टाकू. तू बघ, अजून ५ ते १० वर्षांत ग्लोबल स्कूल्स सुरू होतात की नाही ते.. माझा आणि निहारचा आयुष्यातला प्रत्येक दशकाचा प्लॅन पक्का आहे. एकेक मुख्य प्लॅन.. तो नाहीच जमला तर एकेक दुय्यम प्लॅन.. प्लॅन ए आणि प्लॅन बी.. सगळं कसं, खूप दूरवरचा विचार करून ठाकून ठोकून बसवलेलं पाहिजे.’’ भाचीने ठरवलेले एकेक प्लॅन मी फक्त ऐकत होते.
‘‘मग काय? यंदा काही पेढे-बर्फीचा विचार आहे की नाही?’’ माझ्या तोंडून अडाणी प्रश्न गेला आणि मी जीभ चावली. लग्नाळू मुला-मुलींकडे लाडूची आणि नवविवाहितांकडे पेढे-बर्फीची चौकशी करायला अजूनही जाते मी. मग त्यांना ते त्यांच्या ‘स्पेस’वरचं आक्रमण वाटो नाही तर मी प्रतिगामी वाटो. थेट इराक प्रश्नावर का बोलायचं त्यांच्याशी? असले प्रश्न पडतात मला. तर तसंच त्या तरुण भाचीलाही विचारून टाकलं. तिच्या लग्नाला पाचएक र्वष झाली होती आणि आता जो तिचा नवरा आहे तो नवरा होण्याच्या लायक आहे का, याची चाचपणी ती त्यापूर्वी तेवढीच र्वष करत होती. ‘एवढी स्पेस तुला रगड’ असं म्हणून मी आपलं विचारायचं ते विचारलंच. उगाच आपण विचारलं नाही म्हणून तिला मूल झालंच नाही, असं व्हायला नको पुढे. सहसा अशा प्रश्नांना स्त्रीवर्गाने लाजून प्रतिक्रिया देणं अपेक्षित असतं. त्याऐवजी ती त्वेषाने म्हणाली,
‘‘एवढय़ात? काही तरीच काय मावशी? आय थिंक, मला तेरा सालच्या जुलै-ऑगस्टमध्ये बेबी होईल.’’ २०१० सालामधला तिचा एकूण आत्मविश्वास बघता २५ जुलै किंवा ५ ऑगस्टला दुपारी सव्वादोनला मला मूल होईल, असं ती म्हणाली कशी नाही या बुचकळ्यात मी पडले. जरा सावरल्यावर म्हणाले,
‘‘जुलै- ऑगस्ट का?’’
‘‘मुलांच्या पुढच्या अ‍ॅडमिशन्ससाठी गं. आपल्याकडे जूनमध्ये अ‍ॅकेडमिक इयर सुरू होतं. बाकी बहुतेक जगभरात सप्टेंबरमध्ये. त्या पिरियडमध्ये बॉर्न झालेल्या बेबीचं र्वष वाया जात नाही उगाच. आम्ही तिघांपैकी दोघं भावंडं. स्टुपिडसारखी नोव्हेंबरमध्ये जन्मलेली आहेत. गेलंच ना एकेक र्वष आमचं? आमची कोणतीही चूक नसताना?’’
‘‘अरे अरे असं झालं का?’’
‘‘आमच्या मागच्या लोकांना दूरदृष्टी अशी काही चीजच नाही गं. केव्हाही काहीही करायचे लोक. आमचे तसे नाही. प्रत्येक स्टेप घ्यायची ती खूप मागचा पुढचा विचार करूनच.’’
‘‘उत्तम! जगात सगळ्यांनी असं भान बाळगलं असतं तर जगाची लोकसंख्या एवढी झालीच नसती. पण लोकांचं सोड, तुझं सांग. तेरा सालला एवढं काय सोनं लागलंय.’’
‘‘त्या वर्षी अमेरिकन इकॉनॉमी सुधारेल.’’
‘पोरं वाढवायला आपल्या घरची इकॉनॉमी बरी असली की झालं नाही का?’’
‘नो वे! असलं कोमट समाधान आम्ही लोक नाही करून घेत. अमेरिकन इकॉनॉमी सुधारली की निहारला ग्रीनकार्ड मिळेल. मग त्याचं तिथे जन्मणारं मूल आपोआपच यू.एस. सिटिझिन होईल.’’
‘‘असं असतं का? हा यू. एस. पी. मला माहीत नव्हता.’’
‘‘हा चेष्टेचा विषय नाहीये मावशी. लाइफ सीरियसली डिझाईन करायचं म्हणजे असं सगळं ठरवावंच लागतं.’’
‘‘आणखी काय काय ठरवलंयस तू?’’
‘‘माझ्या एका इश्यूमागे दोन इश्यूज आहेत गं. तेरा साली आई ५९ वर्षांची होईल.’’
‘‘मग?’’
‘‘१४ साली तिचा साठावा वाढदिवस आणि तिच्या नातवंडाचा पहिला वाढदिवस एकत्रच एका ग्रँड पार्टीत सेलिब्रेट नाही का करता येणार?’’
‘‘हो. म्हणजे फक्त दोन दोन केक्सचाच खर्च पडेल. बाकी हॉटेल, हॉल, जेवण हे सगळं एकच पुरेल,’’ मी पुन्हा एकदा स्वत:ची ‘लेव्हल’ दाखवून दिली. किती लागेल यापेक्षा ‘केवढय़ात भागेल’ असा दरिद्री विचार करण्यात जन्म गेलेला. वेगळं काय सुचणार? भाची मात्र तोवर तेरा सालात पोचलेली होती. पुन्हा काही तरी आकडेमोड करत म्हणाली,
‘‘साधारण ३५ सालपर्यंत निहार शुड बी वर्किंग! म्हणजे त्या बेबीच्या सगळ्या गरजा तो उत्तम भागवू शकेल.’’
‘तेवढं सोडून बोला मॅडम. पोरांना आई-बाबांनी त्यांच्या परीने कितीही पुरवलं तरी त्यांना ते पुरेसं वाटू शकतच नाही.’’ माझा सांसारिक अनुभव बोलला पण ती आकडय़ात जास्त अडकली होती. उत्साहाने म्हणाली, ‘‘निहारने इन्फ्लेशन कोशंट लक्षात घेऊनच केलीये सगळी पुढची तरतूद. नोकरीत असेल तर प्लॅन ए, पुढे मागे स्वत:चा उद्योग सुरू केला तर प्लॅन बी रेडी असेल त्याचा.’’
‘‘अरे व्वा! इसको बोलते है प्लॅनिंग.’’
‘‘नुसतं बोलत नाही आम्ही लोक. करतोसुद्धा. पहिली पाच-सात र्वष पोराला मुद्दाम आजी-आजोबांचा सहवास देऊ. फॉर कल्चरल हेरिटेज, यू नो! नंतर मात्र सरळ एखाद्या ग्लोबल स्कूललाच टाकू.’’
‘‘इंटरनॅशनल म्हणायचंय का तुला?’’
‘‘छे गं. असले नॅरो थॉट्स नसतात आमचे. तू बघ, अजून ५ ते १० वर्षांत ग्लोबल स्कूल्स सुरू होतात की नाही ते..’’
‘‘बघेन. नाही तरी दुरून दुरून बघण्याशिवाय दुसरं काय करत असते मी सध्या?’’
‘‘रिटायरमेंटनंतरचा प्लॅन बी करून ठेवला नाहीस ना तू, म्हणून ही वेळ आली. माझा आणि निहारचा आयुष्यातला प्रत्येक दशकाचा प्लॅन पक्का आहे. एकेक मुख्य प्लॅन.. तो नाहीच जमला तर एकेक दुय्यम प्लॅन.. प्लॅन ए आणि प्लॅन बी..’’
‘‘पण तो दुसराही प्लॅन फिसकटला तर..’’
‘‘असले फिसकटणारे बेत आम्ही करतच नाही. सगळं कसं, खूप दूरवरचा विचार करून ठाकून ठोकून बसवलेलं पाहिजे.’’
‘‘आमचंपण साधारण तसंच होतं. म्हणजे नशिबाने आमच्या आयुष्यामध्ये जे ठाकून ठोकून बसवलं ते आम्ही निमूट स्वीकारलं.’’
‘‘तिथेच तर तुमचं चुकलं. आम्ही ती चूक करणार नाही.’’
‘‘हो ना, त्याच त्या चुका करूच नयेत. जुन्या सुधाराव्या आणि नव्या कराव्या..’’
मी उगाचंच बसल्या बसल्या टाचण्या लावायला बघत होते. ती अजिबात लागू देत नव्हती. तिचे प्लॅन्स ए टू झेड माझ्यासमोर टाकत होती.
अजून पाच वर्षांनी त्यांची अमुक एवढी  शिल्लक असेल.
अजून दहा वर्षांनी त्यांचे आई-वडील त्यांच्याकडे राहायला लागतील. त्यांच्यासाठी लागणाऱ्या जादा खोलीची तरतूद ते अमुक वर्षांनंतर करतील.
अमुक साली त्यांचं अपत्य पदवीधर होईल. तमुक साली कमवू लागेल. त्यातल्या अमुक टक्के मासिक हप्त्याने ते शैक्षणिक कर्ज फेडेल.
आज फिटनेससाठी निहारला बॅडमिंटन खेळणं भाग आहे. पण ते खेळत राहिल्याने त्याच्या वयाच्या साठीत त्याचे गुडघे बदलावे लागू शकतील. त्या काळात अमुक मटेरियलचे कृत्रिम सांधे बनतील, त्यांना अमुक खर्च पडेल, तो अमुक प्रकारे जमवावा लागेल..
भावी आयुष्यात येऊ शकणाऱ्या किंवा न येऊ शकणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनसाठी तिच्याजवळ एकेक बेत तयार होता. आयुष्याने परीक्षेचा पेपर काढण्याआधीच तिची उत्तरपत्रिका तयार होती हे पाहिल्यावर     (पान ४ वर)    
(पान ३ वरून)    मी साहजिकच निरुत्तर झाले. तिच्याकडे ‘न्यूज’ आहे हे २०१३च्या सुरुवातीला समजलं. तेव्हा आपण बुवा तिला मानलं. जन्माआधीपासून ह्य़ांची पोरं ह्य़ांचं ऐकतात म्हणजे कमाल आहे.
मध्यंतरी कानावर उडत उडत बातमी आली. भाचीच्या पोटात जुळं आहे! डबल धमाका. पण प्लॅन ‘ए टू झेड’ना तेवढाच सज्जड धक्काही. तिने सगळं नियोजन एका अपत्याच्या दृष्टीने केलेलं असणार. इथे ‘एकावर एक फ्री’ मिळणार आणि सगळ्या नियोजनाचे बंबाळ वाजणार. सांत्वनपर कौतुक किंवा कौतुकभरलं सांत्वन करणारा फोन तिला केला तर ती म्हणाली,
‘‘ह्य़ा नव्या तयारीत आहे ना, म्हणून तुला फोन करायला वेळ नाही झाला.’’
‘‘ते असू दे. पण गोंधळली असशील ना एकदम?’’
‘‘माझ्यापेक्षा आमचा कन्सल्टंट जास्त गोंधळलाय अगं.’’
‘‘तुला जुळं होणार म्हणून तो का गोंधळला?’’
‘‘त्याला आमच्या भविष्याचं सगळं वेगळं नियोजन करावं लागतंय ना आता? दोन जुळे मुलगे असले तर वेगळं प्लॅनिंग, दोन कन्या असल्या तर वेगळं, एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर वेगळे.. इथेच प्लॅन ए, बी, सी झाले..’’
‘‘अगोबाई असं पण असतं का?’’
‘‘हो तुला जुळं झालं असतं म्हणजे कळलं असतं,’’ तिनं सुनावलं.
तिला वाटलं मी जुळ्याबद्दल आश्चर्यचकित आहे. मी तिच्या ठरवाठरवीबद्दल जास्त चाट पडलेले होते. प्लॅन बनवण्याचा हिचा उत्साह आणि ते उधळण्याचा आज्ञाताचा उत्साह, थोडक्यात म्हणजे ‘खालची’ ठरवाठरवी आणि ‘वरची’ बनवाबनवी ह्य़ांचा सामना बघायला लागले. जराशाने वाटलं आपल्या भाषेत आपल्या पातळीवरसुद्धा आयुष्यभर आपण दुसरं काय केलंय?    
mangalagodbole@gmail.com