डॉ. नितीन पाटणकर

‘सूक्ष्म अन्नघटकां’वर लिहिताना एक गोष्ट लक्षात आली, की ‘पूर्वी आणि आता’ या कालावधीत सर्वच पदार्थातील अन्नघटकांचे प्रमाण तेच राहिलेले नाही. आजकाल शरीरात लोहाची कमतरता खूप जणांमध्ये दिसते. १९८९ च्या तुलनेत टोमॅटो आणि सफरचंद यांतील लोहाचे प्रमाण हे ६० टक्के कमी झाले आहे. अंडय़ातून मिळणारे थायामीन ४० टक्के, तर केळ्यातून मिळणारे थायामीन ८० टक्के कमी झाले आहे. हे आपण केलेल्या निसर्गाच्या अवहेलनेमुळे. आपल्या आरोग्यासाठी तरी निसर्ग वाचवायलाच हवा, हे सांगणारा हा या लेखमालेतील अंतिम लेख.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

सूक्ष्म अन्नघटक (micronutrients) ही लेखमाला लिहीत होतो तो पूर्ण काळ आनंद देणारा होता. कधी शेवटचा लेख द्यायची वेळ आली, ते कळलंच नाही. हा विषय तसा किचकट. शोधली तर माहिती प्रचंड मिळते. मात्र त्यातून मोजकेच पण सिद्ध झालेले काही शोधणे, म्हणजे कठीण काम. या विषयावर माहिती शोधताना, बरेचसे लिखाण वाचताना, केशवसुतांची एक कविता सतत आठवत होती,

‘सारेही बडिवार येथिल पहा!

आम्हांपुढे ते फिके;

पाणिस्पर्शच आमुचा शकतसे

वस्तूंप्रति द्यावया सौंदर्यातिशया,

अशी वसतसे जादु करांमजि या;

फोले पाखडिता तुम्ही,

निवडितो ते सत्त्व आम्ही निके!’

या विषयावर लिखाण करताना आपल्या हातून अगदी फक्त ‘सत्त्व’ नाही निवडले गेले तरी अगदीच पाखडलेली फोलपटे वेचली असे तरी होऊ नये, ही मनोकामना होती. त्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच केला.

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत असताना ‘आहार’ हा विषय ४ ते १० गुणांसाठी असतो. त्यामुळे त्यावर व्यासंग सोडाच, वाचनही फारसे नसते. त्यामुळे हा विषय निवडताना, ‘यानिमित्त आपलेही वाचन होईल’ हा स्वार्थी विचार होताच. या किंवा कोणत्याच विषयावर गंभीर शिक्षकांकडून, गांभीर्याने शिकले तरी फार गंभीरपणे इतरांना शिकवणे हा पिंड नसल्याने; लिखाण फार उथळ होणार नाही ना, याचीच काळजी होती. खोलात जाऊन, गांभीर्याने शिकविणे हा आहारतज्ज्ञांचा मान, ते डॉक्टरचे काम नाही, याचीही जाणीव होती. इथेही भाऊसाहेब पाटणकरांची शायरी सतत आठवत होती. भाऊसाहेबांनी म्हटलंय,

‘सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे ।

तो कवींचा मान, ती पायरी माझी नव्हे ॥’

हे सगळं डोक्यात ठेवून लिहीत गेलो. वाचकांना आपले लिखाण कसे वाटले, ते जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. अशी सोय पूर्वीच्या काळी नसायची. मग लेखक बहुधा, ‘वाचकांचे अंतरंग’ किंवा ‘वाचक पत्रं’ अशा सदरांवर अवलंबून असत; पण ‘चतुरंग’मध्ये लेख प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर वाचकांचे इतके ‘ई-मेल’ येऊ लागले, की त्यासाठी वेगळा ‘मेल आय.डी.’ उघडावा लागला. त्यातील बऱ्याच प्रतिक्रिया या कौतुक करणाऱ्या होत्या. ‘कौतुकाने अंगावर मूठभर मांस चढते,’ असं म्हणतात. सर्व प्रतिक्रिया वाचून बहुतेक मी स्वत:च चांगला जाड लठ्ठ होणार असं वाटू लागलं होतं. काही प्रतिक्रिया या, ‘अजून सोपे करून लिहा, हे कळायला जड आहे’ किंवा ‘डोक्यावरून जाते’ अशा आशयाच्याही होत्या. मी प्रामाणिकपणे, मेहनत घेऊन, बहुतेक शब्दांना मराठी सयुक्तिक प्रतिशब्द तयार करण्याचा प्रयत्न केला. लिखाणात खूप सोपेपणा आणण्याचा प्रयत्न केला. सहज आणि सोपे लिहिताना, क्लिष्ट विषयांतील गुंतागुंत सोडवताना, विषयाचा गाभा तर हरवणार नाही ना, ही भीती असायची. हृषीकेश मुखर्जीच्या ‘बावर्ची’ चित्रपटात एक वाक्य आहे, ‘इट इज सो सिंपल टु बी हॅपी, बट इट इज सो डिफिकल्ट टु बी सिंपल.’ तसंच मला जाणवायला लागलं, की, ‘इट इज सो सिंपल टु बी कॉम्प्लिकेटेड बट सो डिफिकल्ट टु बी सिंपल.’

बऱ्याच जणांनी ‘अन्नघटकांवर लिहून झाले, की वेगवेगळ्या फळं, भाज्या आणि इतर पदार्थावर लिहा’ अशी सूचना केली आहे. त्या दृष्टीने तयारी चालू केली आणि हे लिखाण जास्त रोचक आणि मजेशीर होईल हे जाणवले. अन्नघटकांना शास्त्रकाटय़ाची कसोटी असते; पण अन्नपदार्थाना इतिहास, भूगोल आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. त्यामुळे अन्नपदार्थावर लिहिणे हे जास्त आनंददायी आहे. सूक्ष्म अन्नघटकांवर लिहिताना एक गोष्ट लक्षात आली, की ‘पूर्वी आणि आता’ या कालावधीत सर्वच पदार्थातील अन्नघटकांचे प्रमाण तेच राहिलेले नाही. वानगीदाखल काही उदाहरणे बघू या. १९८९ मध्ये आणि २०१७ मध्ये काय फरक पडलेत ते पाहू या. आजकाल शरीरात लोहाची कमतरता ही खूप जणांमध्ये दिसते. १९८९ च्या तुलनेत टोमॅटो आणि सफरचंद यातील लोहाचे प्रमाण हे ६० टक्के कमी झाले आहे. अंडय़ातून मिळणारे थायामीन ४० टक्के, तर केळ्यातून मिळणारे थायामीन ८० टक्के कमी झाले आहे. ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशी अवस्था आहे.

भरपूर अन्न तयार करून, ‘भूक’ या मूलभूत गरजेची तृप्ती करण्यासाठी माणसाने अनेक प्रयोग चालू केले. यात वृद्धी साध्य झाली, पण समृद्धी मात्र असाध्य राहिली. संशोधनाचा हेतू चांगला असला तरी निसर्गाशी किती छेडछाड करायची, याच्या मर्यादा ओळखायला हव्यात. माणसाचे वेळेचे गणित आणि निसर्गाचे वेळेचे गणित हे वेगळेच असते. माणसाच्या चालीला उत्तर देण्याची निसर्गाची चाल पटकन कळत नाही. भरपूर अन्न तयार करण्याचे प्रयोग माणसाने चालू केले आणि त्याला निसर्गाचे उत्तर म्हणजे ‘बायो डायल्यूशन’. याला विचित्र समतोल म्हणता येईल. आपण केळ्यांचे एकरी उत्पन्न वाढवले, तर प्रत्येक केळ्यातील अन्नघटक निसर्गाने कमी केले. याच्या उलट जेव्हा असंपृक्त मेदाम्ल (अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स) वर लिहिण्यासाठी संदर्भ शोधत होतो तेव्हा ‘बायो कॉन्सन्ट्रेशन’ हे निसर्गाचे धोरण वाचनात आले. आपण अनेक अपायकारक पदार्थ समुद्रात सोडून देतो. व्यवहारात, हे पदार्थ जरी पोटात गेले तरी ते इतक्या अल्प प्रमाणात असतात, की त्यामुळे नुकसान होत नाही. समुद्रात मात्र असे पदार्थ माशांच्या शरीरात शिरतात. त्यांच्या शरीरातील चरबीमध्ये हे पदार्थ साठत राहतात. तिथे त्यांची घनता (कॉन्सन्ट्रेशन) वाढत जाते. असंपृक्त मेदाम्ल मिळविण्यासाठी आणि एकूणच अन्नासाठी जगभरात मत्स्याहार केला जातो. अशा आहारातून विषारी पदार्थ मोठय़ा प्रमाणात पोटात जातात. निसर्गाचे नियम आहेत, लय आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आपली हाव वाढली आणि आपण निसर्गाच्या नियमांत ढवळाढवळ केली, तर निसर्ग शिक्षाही करतोच. सूक्ष्म अन्नघटकांबद्दल वाचन करताना एक गोष्ट जाणवली. निसर्ग बदलांना ‘नाही’ म्हणत नाही. घरातील कर्तृत्ववान, करारी आणि धीरगंभीर, वडीलधाऱ्या माणसांसारखा असतो निसर्ग. लहान मुलांचा खोडकरपणा तो सहन करतो. काहीही बदल करायचे असतील, तर तो लागलीच तयार नसतो, पण त्याच्या कलाने घेत, त्याला पटवून देत, बदल केले तर तो स्वीकारतोही. ‘सर्व प्रयोग करून उपलब्ध ज्ञान मिळविले, की निसर्ग आपली गुपिते तुमच्यासमोर उघडी करतो.’ अशा अर्थाचे एक वाक्य वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता काव्‍‌र्हर’मधे आहे. ते किती खरे आहे, हे वाचनादरम्यान जाणवत गेले.

प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, हे मातब्बर सदस्य. त्यांच्या तुलनेत नगण्य प्रमाणात लागणारे सूक्ष्म अन्नघटक. जी कामं त्यांच्याकडून होतात त्यांच्याशिवाय या सदस्यांचे काम होणार नाही. तेव्हा एक गोष्ट जाणवली, की अत्यल्प प्रमाणात लागणाऱ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असू शकतात. पूर्वी कुठल्याही गोष्टीचे नियोजन करताना, बारीकसारीक गोष्टी लिहून काढून, त्याबद्दल प्रश्न विचारून हैराण करणाऱ्या सहचारिणीचा राग यायचा. आता तो कमी येईल किंवा येणार नाही, हा एक वैयक्तिक फायदा म्हणायला हरकत नाही. असताना किंमत किंवा महत्त्व कळत नाही, पण नसले की उणीव भासते, नव्हे नसून चालतच नाही, अशी माणसे आयुष्यात असतात. ‘सूक्ष्म अन्नघटक’ मला अशा लोकांसारखे वाटले. आता तर असे लोक मी लक्ष देऊन शोधू लागलो आहे. गेले सहा महिने सतत वाचकांचा अदृश्य सहवास जाणवायचा. ती भावना सुखद होती. समर्थ रामदास म्हणून गेलेत,

‘दिसामाजी काहीतरी  लिहावे।

प्रसंगी अखंडित वाचीत जावे॥’

हा उपदेश ‘चतुरंग’च्या या लेखमालेमुळे अंगवळणी पडला आहे. वाचन तर होत राहीलच. लिहिणे आता ‘फेसबुक’वर असेल. ‘Health and Wisdom’ या ‘फेसबुक’ पेजवर तुम्ही याबद्दल वाचू शकता. अन्नघटकांबद्दल वाचताना सुचलेल्या, टिपून ठेवलेल्या, गोष्टींना लेखरूप देण्याचा प्रयत्न असेल.

शेवटी, कळावे, लोभ असावा!

(सदर समाप्त)

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com