मंगला सामंत – mangalasamant20@gmail.com

मानवी जीवनातील प्रतिकूल किंवा निसर्गविरोधी परिस्थितीचे दुष्परिणाम हे ‘आक्रमकतेत’ रूपांतरित होत असतात.  अनेक कारणांनी मानवी मन जेव्हा प्रक्षुब्ध होतं तेव्हा सर्वसाधारण जनतासुद्धा आक्रमक पवित्रे घेते. लहानसहान मुद्दय़ावरही आक्रमक होते. म्हणूनच पुरुषाची आक्रमकता ही नैसर्गिक असते, या सत्याच्या पलीकडे गेलेलं वास्तव लक्षात घेऊन त्याची कारणं शोधली पाहिजेत.. लेखिका अंजली चिपलकट्टी यांच्या ‘आक्रमकता की साहचर्य’ (११ जुलै) या लेखातील मुद्दय़ांवर आणखी पैलू मांडणारा  लेख..

sea level rise
समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

लेखिका अंजली चिपलकट्टी यांचा ‘आक्रमकता की साहचर्य’ हा एक चांगली मांडणी असणारा लेख (११ जुलै) वाचनात आला.  पुरुषांची आक्रमकता आणि त्याचं होणारं समर्थन, याबाबतची त्यांची तळमळ लेखात दिसून येते. त्यांचे काही मुद्दे योग्यच आहेत. पण त्यांच्या या लेखातून अनवधानानं जे थोडं निसटलं आहे, असं मला वाटतं, ते प्रस्तुत लेखात मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

मूळ लेखाची सुरुवात करताना, लेखिकेनं टाळेबंदीच्या काळात पुरुषांकडून जगभर होत असलेल्या घरगुती हिंसाचाराच्या मुद्दय़ावर भाष्य केलं आहे. टाळेबंदीमधील आक्रमकता ही शारीरिकतेपेक्षा मानसिक स्थितीशी संबंधित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणूस काही लाख र्वष घराबाहेर फिरणारा प्राणी आहे. तसंच कोणतेही प्राणी, त्यांची पिल्लं लहान असण्याचा काळ सोडला तर मुक्तच असतात. अगदी पक्षीही पिल्लांसाठी घरटं बांधतात आणि पिल्लं उडून गेल्यावर पक्षी ते घरटं सोडतात. ती सर्वाची नैसर्गिक स्थिती असते. किंबहुना तो त्यांच्यासाठी असणारा नैसर्गिक नियमच आहे. तसाच तो माणसासाठीही आहे. त्यामुळे माणसानं कोणतंही बौद्धिक, शारीरिक काम न करता घरात सतत बसून राहणं, हे त्याचा मानसिक क्षोभ करणारं (‘इरिटेट’ करणारं) असतं. जे प्राणी किंवा पक्षी हे पिंजऱ्यात ठेवले जातात, तेसुद्धा मुक्त पक्षी वा प्राण्यापेक्षा अस्वस्थ राहतात आणि वेळप्रसंगी हिंसकता दाखवतात. घरात मोकळा असणारा कुत्रा, सतत बांधून ठेवल्या जाणाऱ्या कुत्र्यापेक्षा कमी आक्रमक व जास्त मैत्रीपूर्ण वर्तन असलेला असतो.

अर्थात टाळेबंदी हा माणसासाठीचा एक भयंकर, अनैसर्गिक प्रयोग आहे. त्यातून जी अस्वस्थता स्त्री-पुरुषांमध्ये येते, ती बाहेर टाकण्याचे स्त्री आणि पुरुषांचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. म्हणजे स्त्री चिडचिड, बडबड आणि आदळआपट करून तिचा मानसिक प्रक्षोभ बाहेर टाकू  शकते, तर प्रत्येक प्रश्न शरीरबळावर सोडवू पाहण्याचा कल असणारा पुरुष या परिस्थतीबाबतची चीड आक्रमक होऊन बाहेर टाकू  शकतो.  तरीसुद्धा टाळेबंदीमध्ये पुरुषांनी आक्रमक का व्हायचं? त्यांना  स्त्रीप्रमाणे चिडचिड, बडबड अशा मर्यादेत वागता येत नाही का?  इथून खरंतर लेखिकेचा विषय सुरू होतो. त्याकरिता लेखिका म्हणते त्याप्रमाणे समाजानं स्त्री आणि पुरुषांवर केलेले अनुक्रमे साहचर्याचे आणि आक्रमकतेचे संस्कार कारणीभूत आहेत, ही मांडणी काही अंशी बरोबर म्हणावी लागते. माणसाला आणि विशेष करून पुरुषाला समतोल बनवण्यासाठी मानवी बुद्धीच्या वापरानं तसे सकारात्मक संस्कार करता आले नसते का?  नक्कीच आले असते. पण आपण हे विसरतो की बुद्धी हे एक दुधारी शस्त्र आहे. तिच्यामुळे आपला स्वार्थ समजण्याचं कौशल्य माणसाला प्राप्त झालं आहे. बुद्धी ही भलं करण्यासाठी आणि तशीच कुणाला उद्ध्वस्त करण्यासाठीही वापरली जाते. बुद्धीमुळे निर्माण झालेली मानवी वृत्ती ही बबून्स, चिम्पांझी यांच्या निसर्गप्रेरित वृत्तीशी ताळमेळ राखत नाही. म्हणून बबून माकडांबाबत जे घडलं ते माणसाबाबत घडवता येईल, असं थेटपणे म्हणता येणार नाही. शिवाय त्या लेखात उल्लेख के ला आहे त्याप्रमाणे बबून्सना क्षयरोगबाधित मांस खायला मिळणं, त्यात ताकदवान नरांचा मृत्यू होणं, आणि त्यातून त्या समूहातील आक्रमकता कमी झालेली दिसणं, हे म्हणजे त्या घटनेचे तात्कालिक परिणाम म्हणावे लागतील.  हीच परिस्थिती उलटी फिरली, तर बबून नर आक्रमक होणार आहेत. आक्रमक झालं की आपल्या मनासारखे फायदे पदरात पाडून घेता येतात, ही  माणसासह प्राण्यांच्याही लक्षात येणारी गोष्ट आहे. कचरा टाकायला गाडी आली की बबून्स त्यावर तुटून पडत होते. अर्थात त्यांच्यापैकी जे आक्रमक होते त्यांचाच निभाव लागत असे, असं लेखिकासुद्धा म्हणते आहे. म्हणजे आक्रमकतेचा उपयोग हक्काचं आणि जास्तीचं काही मिळवण्यासाठीसुद्धा होत असतो.  किंबहुना हक्काची लढाई अनेकदा आक्रमकतेनं खेळावी लागते.  तेव्हा परिस्थिती कठीण आहे, किंवा ती संघर्षमय आहे, त्याप्रमाणे आक्रमकतेचा वापर सहसा होत असतो. तर मग आज मानवी जीवनात काय परिस्थिती आहे त्यावरून पुरुषांच्या आक्रमकतेचा विचार करावा लागेल. बबून्स या माणसाच्या नातेवाईकापासून  काही लाखभर वर्षांनी माणूस पुढे निघून गेलेला आहे. तेव्हा फक्त नराची आक्रमकता हा एकच मुद्दा जैविक विज्ञानानुसार पुरुष नर आणि बबून माकडांमधला नर यांच्यामध्ये समान उरलेला असला, तरी आक्रमकता का कार्यप्रवण होते याची कारणं किंवा विषय हे बबून्स आणि मानवांत एकसमान असणं आता शक्य नाही. कारण विविध शोध लावून माणसानं आपली भवतालिक परिस्थिती बदललेली आहे, निसर्गनियमांवर कब्जा केलेला आहे. मनुष्यासह सर्व प्राणिजग यांच्यामध्ये दोनच साम्य आहेत. एक- अन्नाची भूक आणि दुसरी लैंगिक भूक. या दोन भुका न भागल्यास हे प्राणिजग आक्रमक होत असतं. कारण तो अनेकदा  त्यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न असतो.  प्राणी मादी मिळवण्यासाठी ताकदवान प्राणी नर आक्रमक होऊन तुलनेनं दुर्बल असणाऱ्या नरास पळवून लावतो. कारण चांगल्या ताकदवान नराशी समागम होऊन पुढील पिढी जोमदार निपजावी, हा निसर्गाचा हेतू असतो. प्राणी मातासुद्धा पिल्लांच्या संरक्षणासाठी हिंसक झालेली असते. ‘प्रायमेट्स’ धरून सर्व प्राण्यांमध्ये आक्रमकता आणि हिंसकता यामागे इतकेच विषय असतात.

माणसाच्या आक्रमकतेमागे मात्र अनेक विषय आहेत. तसंच परिस्थितीजन्य कारणंही बरीच आहेत, जी माणसाला आक्रमक बनवतात. उदा. जगातील कोटय़वधी लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही. अन्नाबरोबर वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, नोकरी अशा अनेक गरजांसाठी त्यांना खूप झगडावं लागतं, खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे ते मिळवण्यासाठी अनेकदा आक्रमकता अंगी बाणवावी लागते. पुरुषच नाही, तर अन्नासाठी वंचित असणाऱ्या स्त्रियासुद्धा  त्यासाठी आक्रमक होऊ शकतात. गरीब वर्गाला पिढय़ान्पिढय़ा अशा गरजा न भागणाऱ्या स्थितीत जेव्हा जगावं लागतं आणि दारिद्रय़  संपत नाही, तेव्हा अशा गरजा संघर्षांनं मिळवण्याची त्यांची वृत्ती (‘बिहेव्हिअर’) पुढील पिढय़ांतून आनुवंशिक म्हणून कायम होत असते.  मेंदूच्या याबाबतच्या कार्याबद्दल हे स्पष्ट करणारं मार्गदर्शन आपल्याला डॉ. नॉर्मन डॉईज, ‘द ब्रेन दॅट चेंजेस इटसेल्फ’मध्ये करतात.  माणसाला जेव्हा एखादी सवय लागते, तेव्हा त्याचा मेंदू त्या सवयीनुसार काम करतो, त्यानुसार घडतो. माणसाच्या त्या सवयीमध्ये बदल झाले, तरी मेंदूच्या कार्यपद्धतीत लगेच बदल होऊ शकत नाही. यासाठी एक साधं उदाहरण म्हणजे, ‘राइट हँड ड्रायव्हिंग’ची सवय असणाऱ्यानं एकदम ‘लेफ्ट हँड ड्रायव्हिंग’ सुरू केलं तर त्याच्याकडून चुका होतात आणि प्रसंगी अपघातही होऊ शकतो. तसंच जगण्याच्या ज्या पद्धतीची माणसाला सवय झालेली आहे ती बदलताना ती सवय किती लहान वयापासून आहे, किती र्वष त्या सवयीनं माणूस जगत आहे, आणि त्याचं आताचं वय काय, यावर मेंदूमधील पर्यायी बदल अवलंबून असतो. म्हणून पिढय़ान्पिढय़ा जेव्हा एखादी सवय ही बऱ्यावाईट परिस्थितीनुसार एखाद्या कुटुंबात किंवा व्यक्तीमध्ये रुजते, तेव्हा उपदेश वा संस्कार करून ती बदलणं शक्य नसतं. लेखक डॉ. ब्रायन कोल्ब आपल्या ‘ब्रेन अ‍ॅंड बिहेव्हिअर’ या पुस्तकात लिहितात. ‘‘These behaviors are passed on to next generations because behavior patterns are produced by the activity of neurons in the brain.’’ आक्रमकता किंवा हिंसा अंगभूत झालेल्या त्या व्यक्तीला त्याचं वर्तन चुकीचं वाटत नाही. वर्षांनुर्वष अन्याय सोसलेल्या या वर्गामध्ये, हिंसेनं आपले प्रश्न सोडवण्याची मानसिकता तयार होते. डॉ.बी.एफ. स्कीनर (१९०४ —१९९०) या संशोधकाचं संशोधन सांगतं.  ‘‘The behavior is controled not by organism but rather by the environment through experience.

दुसरा विषय- जो लैंगिकतेचा आहे, त्याबाबत ‘विवाह पद्धत’ आणून मनुष्यजातीनं जास्तीच्या आक्रमकतेला निमंत्रणच दिलेलं आहे. ‘पती-पत्नी संबंधाचा’ माणसानं शोध लावलेला असला, तरी निसर्गानं स्त्रीला पतीशिवाय कोणत्याही परपुरुषापासून गर्भधारणा होऊ देण्याचं थांबवलेलं नाही. निसर्ग त्याच्या मुक्त संबंधाच्या नियमानं चाललेला आहे आणि माणूस मात्र विवाहाद्वारे, गेली काही हजार र्वष ते संबंध नियंत्रित करू पाहतो आहे, दमन करू पाहतो आहे. त्यातून ‘निसर्ग विरुध्द माणूस’ असा पेच निर्माण होऊन, जे नैसर्गिक गमावलं आहे ते मिळवण्यासाठी पुरुष हा कामभावनेनं प्रक्षुब्ध आणि आक्रमक होऊ शकतो, आणि मुख्य म्हणजे हा विषय प्राण्यांमध्ये आढळत  नाही.

अलीकडील शंभर वर्षांत चित्रपट हे माध्यम स्त्री-पुरुष जवळीक, त्यांचे मुक्त संबंध, बेडरूम सीन्स, बलात्कार वगैरेंचं प्रदर्शन करत आहे. आपल्या समाजात जे सहसा दिसत नाही, तसं वागणारा पुरुष चित्रपटांत दिसतो. तो आक्रमक झालेला दाखवला जातो, स्त्रीचं त्याकरिता अवमूल्यन केलं जातं, आणि या सगळ्याचा एक ‘संस्कार’ बनून, समाजातली हिंसकता दिसते. त्यामुळे समाजातल्या स्त्रियांना वाढती असुरक्षितता जाणवते.  यात आपल्याला सुरक्षित ठेवणारा पुरुष, म्हणजे तो आक्रमक असलेला तिला आवडतो. पुरुषांची आक्रमकता ही स्त्रीला ‘मर्दानगी’ म्हणून प्रिय वाटू शकते त्यामागे तिला वाटणारी ‘असुरक्षितता’ हे कारण असतं. स्त्रीची समाजातली असुरक्षितता जशी वाढत जाईल, तशी ती अधिकाधिक आक्रमकतेचं समर्थन करील आणि पुरुष तिच्यासाठी जास्त आक्रमक होण्याचा प्रयत्न करील, असं निर्माण होणारं चक्रही लक्षात घेतलं पाहिजे. इथेही चित्रपटानं निर्माण के लेली सामाजिक परिस्थिती या आक्रमकतेच्या आकर्षणामागे आहे.

भारतामध्ये तर लोकसंख्या हासुद्धा पुरुषांच्या या आक्रमकतेचा महत्त्वाचा विषय आहे. विवाहामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहते हा शेवटी भ्रमच ठरला. उलट जिथे शरीरसंबंधांचे नियम युरोप-अमेरिकेत सैल आहेत, तिथे लोकसंख्या तुलनेनं कमी आढळते. लोकसंख्येमुळेच अनेकांना अनेक चांगल्या संधी गमवाव्या लागतात. शाळेत प्रवेशासाठी लांब रांगा लावाव्या लागतात. वसतिगृहांत राहावयास विद्यार्थ्यांना जागा मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण असूनही पैसे द्यावे लागतात. अन्नधान्य पुरेसं मिळत नाही. राहत्या जागांचे भाव हाताबाहेर जाण्यात ही लोकसंख्याच कारणीभूत असते. राहायला जागा नाही, त्यामुळे कित्येक सामान्य पुरुषांची लग्नं होत नाहीत, त्यातून लैंगिक असमाधान फैलावतं. समाज लैंगिक संबंधात जेवढा जास्त असमाधानी तेवढा तो जास्त अस्वस्थ हे लक्षात घ्यायला पाहिजे.  रीतसर मिळणारी मुलगी गरिबीमुळे नाकारली जात असेल तर तिला मिळवण्याच्या प्रयत्नात सामाजिक संके त झुगारून पुरुष जे वर्तन करतो ती आक्रमकताच असते.

एकं दरीत मानवी जीवनातील प्रतिकूल किं वा निसर्गविरोधी परिस्थितीचे दुष्परिणाम हे ‘आक्रमकतेत’ रूपांतरित होतात.  शिवाय भारतात धार्मिक भावनांचं स्तोम, जातीय तेढ हे जास्तीचे मुद्दे आहेतच. एकंदर जीव या सर्वानी जेव्हा त्रासून जातो, तेव्हा मन प्रक्षुब्ध होऊन सर्वसाधारण जनतासुद्धा मग आक्रमक पवित्रे घेते. त्या कारणानं भारतासारख्या देशातील समाज तुलनेत पाश्चिमात्य समाजापेक्षा नेहमी लहानसहान मुद्दय़ावरही आक्रमक होणारा दिसतो. विविध कारणं पुढे करून पुरुष जेव्हा दारूसारख्या व्यसनांना जवळ करतो तेव्हा हिंसेच्या अजून एका  कारणाची समाजात भर पडते. या विषयांचा बबूनसारख्या प्राण्यात मागमूससुद्धा दिसत नाही.

थोडक्यात, आक्रमकतेपेक्षा साहचर्य केव्हाही चांगलंच. परंतु मानवी जीवनातील पुरुषामध्ये असणारी आक्रमकता ही पुरुषी संप्रेरकांपेक्षा वर विशद केलेल्या परिस्थितीमुळे ‘आक्षेपार्ह’ झालेली आहे. अखेर या सर्व परिस्थितीचे दुष्परिणाम एक ‘व्यवस्था’ घडवत नेतात. पुरुषाची आक्रमकता ही नैसर्गिक असते, या सत्याच्या पलीकडे गेलेलं हे वास्तव आहे. ते वास्तव सुधारण्यासाठी घरगुती किंवा पाठय़पुस्तकातील संस्कार निष्प्रभ ठरू लागलेले आहेत. त्याकरिता ही अन्यायकारक परिस्थिती कशी बदलता येईल, तळातील जनतेचा विचार आधी कसा करता येईल,  जास्तीतजास्त समाज समाधानात कसा राहील, यासंबंधीचे पहिले प्रयत्न हे परिस्थितीनं पोसलेली पुरुषाची आक्रमक वृत्ती नियंत्रणात आणण्याचा एक महत्त्वाचा उपाय वाटतो. मग कुटुंबातील, शाळेतील, पाठय़पुस्तकांतील संस्कार हे त्या प्रयत्नास ‘जोड’ म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी उपयुक्त आहेत, हेसुद्धा मान्य करायला लागेल.

(लेखिका मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि समाजशास्त्र यांच्या अभ्यासक आहेत.)