– डॉ. प्रदीप पाटकर

हिंसा आता फक्त काही प्रसंगांपुरती, काही माणसांपुरतीच राहिलेली नाही. ‘त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’ हे ठसवत तिचं सार्वत्रिकीकरण, समर्थन व उदात्तीकरण होत आहे. सामाजिक हिंसेचं भीषण रूप पाहाता निदान आपण त्वरित आपल्या घरांमध्ये मुलांचं होणारं हिंसेचं प्रशिक्षण थांबवायला हवं हे अधोरेखित होतं. सारासार विचार करणाऱ्या समाजासाठीचं ते एक पाऊल ठरेल.. हिंसाचाराच्या शोधाचा हा भाग दुसरा.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

गेली काही वर्ष समाजसुधारकांच्या हत्यांनी आपल्या देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. हिंसक दहशतवादी समाजकारणात अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांचं उघड समर्थनही काही तथाकथित आध्यात्मिक पंथ, नेते, कधी मान्यवर व्यक्तींकडून केलं जातं. अशा वेळी साधी सरळ माणसं या आक्रमक वृत्तीच्या, हिंसेच्या उन्मादी घटनांचा कसा अर्थ लावावा याबाबत स्तंभित, संभ्रमित, दु:खी व चिंताग्रस्त झालेली दिसत आहेत. पण त्यांना हे सारं नापसंत आहे यात शंका नाही.

अनेक प्रश्न चर्चेनं सुटताना दिसत नाहीत, उलट काही प्रश्नांमध्ये आक्रमकतेलाच तेवढं (पण बहुधा) तात्कालिक यश येताना दिसतं. आजवर आपण टिकलो आहोत याचं कारण खरं तर अगोदरच्या पिढय़ांतील समाजधुरीणांनी आणि सामान्य माणसांनी दाखवलेलं सामंजस्य हे आहे. आज हे सामंजस्य समाजकंटकांकडून मूर्खपणा, बावळटपणा ठरवलं जात आहे. त्याला भेकडपणा संबोधलं जातं. लोकशाही लोककल्याणासाठी असल्यानं त्या व्यवस्थेतला कायद्याचा आधार राखत संविधानसंमत सत्याग्रह करून न्याय मागणं हाच विवेकी मार्ग ठरतो. न्याय मिळण्यात होणारा विलंब ही व्यवस्थेतली त्रुटी आहे, हे खरं. पण त्यामुळे कायदा हातात घेणं योग्य ठरत नाही. ‘ज्यांच्यात ताकदच नाही, ते चूप राहून, सहन करण्यापलीकडे करणार तरी काय?’ असं मुद्दाम शांतताप्रिय समाजाला उचकवून बेभान करण्यासाठी म्हटलं जातं.

 जगात सर्वत्र काही समाजकंटक गट भ्रामक अस्मिता पेटवून, संस्कृती-धर्म-अस्तित्वावर आक्रमण होत असल्याची आरोळी ठोकत समाजाला उन्मादी आणि बेभान बनवण्याचा पवित्रा घेत असतात. त्यातून सार्वजनिक स्वरूपात हिंसा घडण्यापलीकडे इतर काही होत नाही, न्यायदानात अडथळा येतो, हे सहज समजण्यासारखं असलं, तरी जगभर वंशभेद, जातिभेद, वर्गभेद, आर्थिक विषमता आणि उग्र धार्मिकता यांचे पुरस्कर्ते आता लोकशाही व्यवस्थेतल्या कायद्यांच्या मर्यादा ओलांडून हिंसेचा, दहशतीचा वापर करताना दिसत आहेत. 

 कधी कधी क्रोध न आवरता आल्यानं हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत समाज उदार धोरण (की दुर्लक्ष?) स्वीकारताना दिसतो. जे सुरक्षित, त्यांना माथेफिरू व गुंड हिंसेशिवाय दुसरं काय करणार असंही वाटत असतं. कायदा तोडून केलेला मुक्त हिंसाचार सहज कळतो आणि नाकारता येतो. मात्र जे न्याय्य आहे, कायद्यानं जे मिळावयास हवं, ते मिळवतानाही आता माणसं  समाजविघातक मार्गाचा अवलंब करू लागली आहेत, असं दिसतं आहे. हा हिंसाचार नकळत न्याय्य वाटण्याची शक्यता असते. किंबहुना जे नेते आक्रमक, दुराग्रही नाहीत, त्यांना आता फारशी किंमत दिली जात नाही. विवेकी बोल कानाआड केले जातात, आग पेटवण्याच्या भाषेला टाळय़ा दिल्या जातात. सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस, व्यवस्थापक आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले, दैनंदिन (सार्वजनिक) जगण्यामध्ये हिंसक कृत्यांनी खीळ घालण्याचे प्रकार वाढत जाताना दिसत आहेत. लोकशाहीनं न्याय मिळत नाही असं दिसत असल्यानं की काय, ठोकशाहीकडे न्याय मागितला जातो, असं वाटतं. हिंसाचार अक्षम्य वाटण्याऐवजी उदात्त वाटावा अशी वक्तव्यं बेगुमान केली जातात.

समाज येताजाता पेटवणं आता समाजकंटकांना सोपं झालंय का? बेकायदेशीर अतिक्रमणं उठवा, अनधिकृत बांधकामं पाडा, सार्वजनिक व्यवस्थेत बाधा आणणारी कृत्यं रोखा, असं काही घडलं की ताबडतोब संबंधित माणसं दहशत आणि हिंसाचार सुरू करतात. अशा वेळी पोलिसांवर हल्ले होताना दिसले आहेत. अशा वेळी अन्यायाला प्रतिबंध घालणं किंवा त्याचा प्रतिकार करणंही कायदा व सुव्यवस्थेला कठीण जातं. प्रेमभंग असो वा कुटुंबकलह, माणसं नाराजीवर न थांबता हिंसक होताना दिसतात. हे पूर्वीही होत होतंच की, असं म्हटलं जातं. पण मग मधल्या काळात या संस्कृतीत काहीच संवर्धन (उत्कर्ष) घडलं नाही की काय? हिंसक वृत्तीचा आपल्या आचारविचार, भावनांवरचा प्रभाव वाढत चालला आहे ही चिंतेची बाब आहे. मनातलं हिंसेचं जंगल तोडण्याऐवजी ‘हिंसेची झाडे लावा, झाडे वाढवा’ हा कार्यक्रम यांनी हाती घेतला आहे असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. हिंसाचार काही प्रसंगांमध्ये कुणी न्याय्य समजत असलं, तरी जी न्यायव्यवस्था आपण समाजात रुजवू पाहात आहोत, तिला या हिंसाचारानं धक्का पोहोचतो हे विसरून चालणार नाही. न्याय मिळवण्यासाठी समाजाचे आधारस्तंभ हिंसक कृतीनं गदगदा हलवताना ते कोसळून पडणार नाहीत, हेही पाहिलं पाहिजे.

हिंसक वृत्ती ही एक नैसर्गिक प्रेरणा समजली जाते. जंगलात इतरांवर हल्ला हे संरक्षणाचं, पोषणाचं पहिलं पाऊल ठरतं. जंगलात राहायचं, तर हिंसाचारापासून सुटका नाही. पण माणसं तर जंगलं तोडून संस्कृती निर्माण करणारी मंडळी आहेत. सामाजिक अन्याय आणि शोषणापासून मुक्त करून सर्व समाजाला विवेकाच्या आधारे उन्नतावस्थेकडे नेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मानवाला आजही अशा हिंसक वृत्तीवर विवेकी नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. त्यात साधा, सरळ, निरुपद्रवी दिसणारा माणूस उन्मादी समूहात शिरल्यावर क्रूर बनू शकतो, असंही दिसतं.

 मुळातच आपल्या मनात एक ‘उन्माद’ लपलेला असतो. प्रकटीकरणासाठी गर्दीत त्याला प्रेरणा व उत्तेजना लाभते. आपली ‘नगण्यता’ समूहात लपून जात असल्यानं सुरक्षित वाटतं. (कुणाला कळणार आहे मीच दगड मारला ते, हाही विचार धैर्य देत असावा!) या हिंसाचाराची जबाबदारी सामूहिक राहील, हे आश्वासनही समूह देतो. समूहापुढे कायदा व सुव्यवस्था हतबल ठरते. (कधी कधी ती समर्थकही होते!) तेव्हा तर शिक्षेचंही भय उरत नाही. पकडलं, तर नेते सोडवतील असा अनेकांना विश्वास वाटतो. आता पोलिसांवर हल्ले होताना दिसतात, कायद्याची भीती दिसत नाही, समूह न्यायालयाच्या हुकमाची तमा बाळगताना दिसत नाहीत. उन्मादानं भारलेल्या अशा समूहाला नैतिक मूल्यांचं आवाहन करणं हास्यास्पद ठरतं. त्यात अशा वेळी इतिहासातल्या वीरपुरुषांच्या उल्लेखानं आक्रमकता जागवली जाते, पण त्या वीर पुरुषानं दाखवलेला संयम व विवेक आठवला जात नाही. अत्याचाराला पराक्रम, बलात्काराला पुरुषार्थ समजलं जातं अनेकदा. नीतिमूल्यं घसरली, नैतिकता हरवली, नेतृत्व भरकटलं, तर या साऱ्याची जबरदस्त किंमत नव्या पिढीलाच नव्हे, तर सर्वानाच  मोजावी लागते. बहुसंख्य माणसं पिचलेली, क्षुब्ध, दुभंगलेली दिसतात. त्यात आजूबाजूला परस्परांबद्दलच्या द्वेषानं भारून गेलेल्या उन्मादी समूहांनी पेटवलेल्या विध्वंसक गोष्टी त्याला अधिक भयभीत बनवतात. हिंसेचं मुक्त थैमान सुरू झालं, शासन कायदा व सुरक्षितता सांभाळण्यात अपयशी ठरलं, तर हिंसाचार निर्भय होतो. हिंसा जेत्यांना उन्माद देते, तर पराजितांना द्वेष आणि वैफल्य! कितीही प्रतिवाद केला तरीही हिंसा समाजातल्या शोषणावरचं, विषमतेवरचं, कुठल्याही समस्येवरचं उत्तर ठरत नाही.

दुसऱ्याकडून- विशेषत: दुर्बल, अज्ञानी माणसाकडून त्याचं स्वत्व हिसकावून घेऊन अधिक बलवान, श्रीमंत होणाऱ्या व्यक्तीबाबत बहुतेकांना भीतीयुक्त आदर वाटतो. फसवणाऱ्यांच्या बुद्धीचं आपापल्या गप्पांमध्ये कौतुक होतं. कामगारांना पिळून धनाढय़ होणाऱ्या कारखानदारांचं उद्योग पुरस्कार देऊन कौतुक केलं जातं. काही श्रम न करता भ्रामक आश्वासनं देऊन, भक्तांना गुंगवून अपरंपार ‘दक्षिणा’ जमवणाऱ्या ढोंगी बाबा, स्वामी, महाराजांचं तारणहार म्हणून कौतुक होतं. हे आपणच जमवून दिलेले पैसे आहेत, हे भक्त विसरून जातात. ग्राहकांना फसवून कोटय़धीश झाल्यावर रुग्णालय, देऊळ वा धर्मशाळा बांधणाऱ्या उद्योगपतींचं ‘दानशूर’ म्हणून कौतुक केलं जातं.

भ्रष्टाचारानं, बेकायदेशीर मार्ग वापरून जमवलेली संपत्ती परकीय कर्ज फेडण्यासाठी, देशातले प्रश्न सोडवण्यासाठी सरकार का वापरत नाही, हा प्रश्न इथे नजरेआड केला जातो. त्याबाबत पीडित समाजात पुरेशा प्रमाणात या सर्व गोष्टींबद्दलची जाणीव जागृती दिसत नाही.  इतरांकडे आपल्यापेक्षा सुख जास्त आहे, या भावनेतून मनात हेवा, मत्सर वा द्वेष निर्माण होतो. या तुलनात्मक अभावातून हताशा, निराशा आणि हिंसक भावना निर्माण होऊ शकतात. जात, धर्म, लिंग, प्रांत, देश, सामाजिक दर्जा, सांपत्तिक स्थिती, अशा विविध भेदभावाच्या भेगा मनात पडल्या की माणसं सामंजस्य, विवेकनिष्ठा, नीतिमूल्यं, सात्त्विकता हरवून बसतात. 

 बऱ्याचदा परंपरेतून आलेले अविवेकी, अंधश्रद्ध पूर्वग्रह माणसांना वास्तवापासून व वर्तमानापासून दूर लोटतात. पूर्वग्रह प्रगतीस खीळ घालतात. घातक पूर्वग्रहांना मनातून दूर करणं माणसांना कठीण जातं. कारण पूर्वग्रह भ्रामक सुरक्षितता देत राहातात. अस्मितेचं इतिहासाशी जोडलं गेलेलं नातं अधिक घट्ट करतात, भावनिक सुख देतात. असं मन परंपरेत गुंतून पडतं, व्यर्थ कर्मकांडात कृतार्थता मानतं, प्रगती व विवेक नाकारतं. अशी मनं भूतकाळ आणि वर्तमान यात दुभंगलेली राहातात, वर्तमानात भूतकाळ जगत राहतात. आज भेदाभेदांच्या भिंती उंच उंच वाढवण्याचं काम काही जणांकडून सुरू आहे. त्यामुळे सभोवतालचा अंधार वाढतो, एकाकी आणि असुरक्षित वाटतं, आयुष्य एक अंधारकोठडी होत जाते. मग मनातच छळछावण्या उभारल्या जातात. मनात या साऱ्याचं एक स्फोटक, हिंसक रसायन बनतं..

 कधी सामान्यांशी सतत संवाद साधणाऱ्या प्रसारमाध्यमांची भूमिका हिंसावृत्तीस पोषक ठरताना दिसते. टीव्ही, सिनेमा, नाटकं माणसांसमोर हिंसक हीरोंचं उदात्तीकरण करताना दिसतात. पडद्यावर हिंसेचा, असहिष्णुतेचा ‘डोस’ कळत-नकळत मिळत राहातो. माध्यमांमधून हिंसेचं, लैंगिकतेचं, मानवी व्यवहारांचं बीभत्स, असंवेदनशील चित्रीकरण सामोरं येत राहातं. या सतत नजरेसमोर येणाऱ्या आभासी हिंसक हल्ल्यांच्या देखाव्यांमुळे प्रेक्षकांची संवेदनशीलता कमी होत जाते. अतिपरिचयामुळे ‘हिंसा’ एक करमणूक ठरते. कलास्वातंत्र्य, नावीन्य आणि सर्जकतेच्या नावाखाली हिंसेची नवनवीन तंत्रं दाखवली जातात. अन्यायामागच्या कारणांचा वरवरचा शोध त्यात चवीपुरता असतो. सामाजिक अन्याय आणि शोषणाचा मूलभूत शोध त्यात नसतो (ही अपेक्षा ठेवणंही अडाणीपणाचं लक्षण समजलं जातं). त्यातल्या कथेत या सर्व प्रश्नांवर उत्तर असतं तेही हिंसक! समाजातले तथाकथित मार्गदर्शक हिंसेच्या कारणांविरुद्ध अिहसकरीत्या लढायचं कसं ते न सांगता, कारणांवरचा रोष माणसांकडे वळवण्याचं काम करतात. विरोधक असतील तिथे ठेचावेत, असा संदेश समाजात विविध मार्गानी दिला जातो. हिंसा त्यांच्या दृष्टीनं ‘न्याय्य कारणांसाठी’ असल्यानं ती स्वीकारावी, वर ती आदरणीय मानावी असा सल्ला दिला जातो!  प्रसारमाध्यमं माणसांना माहिती पुरवतात आणि मार्गदर्शनही करू शकतात. प्रत्यक्षात याबाबत ती पुरेसे प्रयत्न करतात का? प्रेमाच्या आणि करमणुकीच्या नावाखाली स्त्री शरीराबद्दल कामुकता जागवली जाते आणि हिंसेच्या नावाखाली मानवी शरीराबद्दल अधिकाधिक अनादराचं भडक चित्रीकरण केलं जातं. माणसं उत्तेजित होतात अथवा त्यांच्या संवेदना बधिर होत जातात. समाजात याचा रोज सराव केला जातो. हळूहळू माणसं रस्त्यावरच्या हिंसाचाराचे, ट्रेन, बसमधल्या बलात्काराचे, घरातल्या माणसांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचे मख्ख प्रेक्षक बनतात.

 घराघरात शाब्दिक हिंसा ते प्रत्यक्ष हिंसाचार घडत आहे असं समाज संशोधक सांगतात. लहान मुलांना तर कुठल्याही पौष्टिक गोष्टींपेक्षा हिंसेचं बाळकडूच मोठय़ा प्रमाणात दिलं जातं. इतरांच्या मताचा आदर ठेवण्याचं शिकवण्याऐवजी मनं किती विविध प्रकारे अपमानित करता येतात, हेच रोजच्या व्यवहारात मुलांना समोर दिसत राहातं. शिस्तीच्या नावाखाली अपमान, क्रौर्य, असंवेदनशीलता त्यांच्या वाटय़ाला येते. शिस्तीचे धडे देताना, त्याच्या चुकीच्या कृत्याविषयी समजावून सांगताना व्यक्तिगत टीका टाळायला हवी, मुलांविषयी शब्दांत वा कृतीत अनादर दाखवू नये. शिस्त लावताना शारीरिक इजा, दडपशाही, आक्रमकता असू नये. मुलास काय चुकलं हे नीट कळलं पाहिजे. स्नेहबंधास इजा पोहोचू नये ही दक्षता घ्यायला हवी.

 आपल्या घरातली शाब्दिक आणि शारीरिक हिंसा आपल्याला थांबवता येईल. सारे भेद विसरून आपापसात खेळणं मुलांना निसर्गत: जमतं. ते टिकवणं व आपापसात जोपासणं आपल्याला सहज शक्य आहे. मुलांचं घरातलं हिंसेचं प्रशिक्षण त्वरित थांबवायला हवं. यात आशादायक गोष्ट आहे, की जशी हिंसा ही जैविक प्रेरणा आहे (तरीही ती समर्थनीय ठरत नाही) तशीच सहवेदना, करुणा, संयम यादेखील मानवी मनातल्या प्रेरणा आहेत. मनातल्या हिंसक भावना प्रयत्नपूर्वक, संयमानं कमी करता येतात, मनात सहिष्णुता आणि सहजीवन जागवणं, विवेकी संस्कारांद्वारे मुलांमध्ये त्या भावना संक्रमित करणं आपणास शक्य आहे. आजही अनेकांना दुसऱ्यांच्या दु:खाशी समरस होणं आणि संकटकाळी दु:खितास मदत करण्यासाठी धावून जाणं आवडतं. सहजीवन हे तर मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे.

 समाजघातक विचारांविरुद्धचा लढा आता अधिक तीव्र, लक्षवेधी व्हायला हवा. लढायचं ते विचारांविरुद्ध; व्यक्तींविरुद्ध नव्हे. समाधानाची गोष्ट ही आहे, की आजवर समाजसुधारकांच्या हत्यांनी जगातले विवेकजागृतीचे प्रयत्न बंद पडताना दिसले नाहीत. उलट ते अधिक चिकाटीनं केले जात आहेत. हिंसेविरुद्ध चाललेल्या जनजागृतीच्या कार्यात सर्व असंघटितांनी, शोषितांनी, जागरूक नागरिक, पत्रकार, प्रसारमाध्यमं व मनोविकासासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी एकत्र यायला हवं. मानसिक आरोग्यासाठी चाललेल्या प्रयत्नांतलं ते एक महत्त्वाचं पाऊल आहे.

patkar.pradeep@gmail.com