|| डॉ. रोहिणी पटवर्धन

कुणाला कोण समजावणार?

गोपाळराव आणि यशोदाबाई दोघेही सुशिक्षित, समजूतदार, विचारी. मध्यम पगाराच्या नोकरीतल्या गोपाळरावांनी स्वत:चा छोटासा बंगला बांधला. एकच मुलगा. मुलगीही एकच. दोघांची शिक्षणे झाली. दोघांचीही लग्ने करून दिली. दोघे समाधानाने मुलगा-सुनेबरोबर राहात होती. यशोदाबाईंनी नोकरी केली नाही, पण संसार नेटका केला. लग्न होऊन आलेल्या सुनेला घरात मदत केली. नातू सांभाळला. सासू-सुनेचे नाते अगदी तणावरहित होते. सुनेने पण सासूची माया जाणली होती. त्यांना मान देऊन त्यांची काळजी घेत होती. मुलगी लग्न होऊन लांबच्या ठिकाणी होती. नवरा मोठय़ा पदावर होता. त्याला रजा फार मिळायच्या नाहीत. त्यामुळे मुलगी कारणाकारणाने यायची. नणंद-भावजयीचेही बरे जमायचे.

घर सांभाळून, सून नोकरी करून संसाराला हातभार लावत होती. निसर्गनियमानुसार गोपाळराव गेले. शेवटचे काही महिने अंथरुणावर पडून होते. यशोदाबाई आणि सुनेने चांगली सेवा केली. समाधानाने गोपाळरावांनी डोळे मिटले. गोपाळराव गेल्यावर तर यशोदाबाई आणखी थोडय़ा मोकळ्या झाल्या आणि तब्येतीची साथ होती म्हणून सुनेला खूप मदत करू लागल्या. नातू थोडा सुटा झाला. सून नोकरीत स्थिरावली आणि यशोदाबाई वयोमानानुसार थोडय़ा थोडय़ा आजारी पडू लागल्या. सून मनापासून त्यांचे सारे करायची. इतक्या नेमकेपणाने इतके दिवस राहिलेल्या यशोदाबाईंना खूप चमचमीत खावेसे वाटायचे. दिवसात कधीही खायला हवे असायचे खायला दिले तर पचायचे नाही, पण त्यांना खायला हवेच असायचे, नाही तर चोरून खायच्या. मोलकरणीकडून आणवून खायच्या आणि त्याचा त्रास सुनेला व्हायचा. यावर उपाय असा नव्हता. सून वयाबरोबर येणारा हा बदल जाणून होती. तिने कधी कोणाकडे तक्रार केली नाही. पण तिला आता पदार्थ कुलपात किंवा लपवून ठेवावे लागायचे.

दरम्यान, यशोदाबाईंच्या जावयाची त्याच गावात बदली झाली. सुनेला-मुलाला आनंद झाला. मुलगी नोकरी करत नव्हती. नवरा चांगल्या नोकरीत असल्याने पैशा-अडक्याची कमतरता नव्हती. दिमतीला गाडी होती. रोज दुपारी मुलगी आईला भेटायला यायची. अन्न कुलपात ठेवले, त्याबद्दल सुनेला खूप बोलली. माझ्या आईला मी काय वाट्टेल ते आणून देऊ शकते म्हणून आई म्हणेल ते आणून द्यायची. संध्याकाळी सून घरी आली की तिला सासूने काहीबाही खाल्लेल्याचा त्रास सहन करायला लागायचा. मुलगी गोड. सून वाईट वाटायला लागली. मुलगा घरी आला की आई सुनेबद्दलच्या तक्रारी सांगायची आणि सासूचे निस्तरता निस्तरता दमून गेलेली सून तक्रारी नवऱ्याला नाही सांगणार तर कुणाला? नवरा पण त्रासून गेला. बायको-बहीण-आई तीनही माणसे त्याचीच. कोणाला कसे समजावणार? खरं तर बायकोची बाजू बरोबर आहे, पण तसे म्हटले तर जग नावं ठेवते.

या परिस्थितीत मुलीला परिस्थितीची योग्य जाणीव करून देणे आवश्यक आहे. पण प्रश्न आहे तो ही जाणीव कोण करून देणार? घरातील इतर जवळचे नातेवाईक, मुलीचा नवरा, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ कल्याणासाठी झटणारा एखादा समाजसेवक, मानसोपचारतज्ज्ञ अशा अनेक घटकांकडून मदत होऊ शकते. पण त्यासाठी कडकपणे समज देणे आवश्यक आहे. ती त्यांची खासगी बाब आहे म्हणून स्वस्थ बसणे योग्य ठरेल का? याचा विचार सामाजिक पातळीवर होणे आवश्यक आहे. यशोदाबाईंच्या पिढीतील एखाद्या व्यक्तीने यशोदाबाई व मुलीला समजावून सांगितले तर ते अधिक उपयुक्त होऊ शकेल.

तात्पर्य – जे लोक, ज्या व्यक्ती ज्येष्ठांना सांभाळत आहेत त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ज्येष्ठांबद्दल आपलं मत निश्चित करू नका. ज्येष्ठांमधले दुसरे बालपण खरंच कधी कधी हवं ते मिळवण्यासाठी तऱ्हे तऱ्हेचे मार्ग शोधतात. याची जाणीव ठेवा. चार दिवसांसाठी येऊन त्यांचे सर्व हट्ट पुरवून त्यांना बिघडवून ठेवू नका. पुढे त्यांना आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही ते जड जाते.

एकाकी

गणेश विठ्ठल काळे. शाळेमध्ये प्रथम मास्तर म्हणून लागले. गणिताचे उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला. शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून विविध उपक्रम राबवले. मुलांना घेऊन विविध संस्थांना भेटी देणे, अभ्यासू सहल आयोजित करणे, विद्यार्थ्यांना विविध परीक्षांना बसवणे. खऱ्या अर्थी शिक्षक. कष्टाळू आणि हुशार. त्यांना सुमतीबाईंची साथ अतिशय चांगली मिळाली. त्याही गणेश काळ्यांच्या या सगळ्या उपक्रमात सहभागी असायच्या. गणेश काळे नोकरीतील शेवटची सहा वर्षे तर मुख्याध्यापक होते. संसार त्यांचा छोटासा, दोन मुले ती पण हुशार. सुसंस्कृत घरी मिळणाऱ्या शिकवणीचा चांगला फायदा करून घेत शिष्यवृत्त्या मिळवून शिकली. गणेश काळ्यांचे अभिमानाचे हेही एक कारण होते. गणेश काळ्यांची राहणी साधी होती. वृत्ती समाधानी होती. एकूण त्यांना माणसांमध्ये राहणे आवडायचे. निवृत्तीनंतरही ते अजिबात रिकामे नसत. माणसांची सतत ये-जा चालू असे. गणेश काळे विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करायला जायचे. १० वीच्या परीक्षेपूर्वी तर त्यांना रोज कुठे ना कुठे १० वी परीक्षेसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायला बोलावणे असे.

उच्चशिक्षित मुलांपैकी थोरला परदेशात स्थायिक झाला होता. धाकटा इथेच होता, त्यांच्याजवळ खरं तर गणेश काळ्यांच्या घरात राहत होता. त्यालाही नोकरी चांगली होती. त्याची बायकोही शिकलेली; नोकरी करणारी होती. दोघेही स्वभावाने चांगले होते. ज्याला-त्याला आपले उद्योग होते. परस्पर सामंजस्य होते. अल्पशा आजाराने सुमतीबाई वारल्या. गणेश काळे एकटे पडले. त्यांचेही वय झालेले. आताशा बाहेर जाणे त्यांच्याच्याने होत नसे. बरोबरीच्या सगळ्यांचीच थोडय़ा फार फरकाने हीच अवस्था होती. गणेश काळे कंटाळायचे. घरातील सगळी चांगली होती, पण तरीही ते एकटे पडायचे. बाहेरचे विश्व बंद झाले आणि त्याच सुमारास सुमतीबाईंची साथ संपलेली. दिवस त्यांना खायला उठायचा. कुठे जायचे म्हटले तर मुलगा-सून कोणीही बरोबर घेऊन जायला तयार असायचे, पण त्यांनाच त्या दोघांना सांगायला नको वाटायचे. मुलांना त्यांची अडचण कळायची, पण काय मार्ग काढावा कळत नव्हते.

एके दिवशी सकाळी गणेश काळे मुलाला म्हणाले, ‘‘संध्याकाळी मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू जरा लवकर येशील का?’’ मुलाला आश्चर्य वाटले. ‘‘संध्याकाळी कशाला? मी पाहिजे तर आज ऑफिसला उशिरा जातो किंवा जाणारपण नाही. बोला ना काय बोलायचे ते!’’

‘‘नको संध्याकाळी सूनबाईही असेल.’’ संध्याकाळ झाली. गणेश काळे मुलाला-सुनेला म्हणाले, ‘‘मला एकटे वाटते. ते तुम्ही जाणताच आहात. मला वाटते मी वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहतो. तिथे मला समवयस्काची साथ मिळेल..’’ पुढचे ऐकायला मुलगा-सून समोर थांबलेच नाहीत. नंतरसुद्धा मुलगा-सून समोर येईनात. गणेश काळ्यांनी खूप प्रयत्न करून पाहिला, पण तो विषय निघाला की, मौनाचे साम्राज्य पसरायचे. शेवटी गणेश काळ्यांनी जाहीर करून टाकले, ‘‘या १ तारखेपासून मी वृद्धाश्रमात राहायला जाणार.’’ मुलगा समोर उभा राहिला, ‘‘बाबा, मला पाहिजे ती शिक्षा द्या, पण वृद्धाश्रमाचे नाव नका काढू.’’ सून म्हणे, ‘‘सासूबाईंना मी शब्द दिलाय, तुमचे सगळे करीन. मला माझा शब्द पाळू दे.’’ गणेश काळे गप्प बसले, नव्हे गप्प गप्पच होत चालले.

तात्पर्य – वय वाढलं की भौतिक गरजा कमी होऊन भावनिक गरजा वाढतात. त्या पूर्ण करण्यासाठी बाजारात कोणतीही गोष्ट मिळत नसते. त्याला माणसे आजूबाजूला हवी. ‘वृद्धसहनिवास’ हा एक चांगला पर्याय आहे. पूर्वीच्या काळी घरात भरपूर माणसे असताना वृद्धसहनिवासामध्ये जाण्याची वेळ येणे यात वाईट वाटण्यासारखी परिस्थिती होती पण आता पुढच्या पिढीला मुळीच वेळ नसतो हे सत्य मान्य करून घरातल्या विशेषत: एकटय़ा व्यक्तीने वृद्धसहनिवासाचा पर्याय स्वीकारायची इच्छा दर्शविली तर जरूर विचार करा, असे सांगावेसे वाटते.

rohinipatwardhan@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com