‘‘एकमेकांसाठी वेळ काढला तरच नाती फुलतात यावर आम्हा दोघांचाही विश्वास आहे. आमच्या दोघांच्याही कुटुंबीयांनी आमच्या कलेसाठी खूप वेळ दिला आहे, आम्हीही त्यांच्यासाठी आवर्जून वेळ काढतो. एकमेकांना क्वालिटी टाइम देणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. हे करताना अगदी मनापासून करायचं. त्यामुळे आपापसांतले बंध अधिक घट्ट होत जातात. नात्यांना न्याय मिळतो.’’ सांगतेय सुप्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जेमेनिस पती तबलावादक निखिल फाटक याच्याबरोबरच्या सहजीवनाविषयी..

‘‘लग्नाच्या वेळी शर्वरी सेलिब्रिटी असली तरी मलाही ग्लॅमर नवं नव्हतं. मी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामधून शिकत असताना माझ्यासोबत सतीश मन्वर, मुक्ता बर्वे आदी कलाकार होते. त्यांची लोकप्रियता मी जवळून पाहिली होती. पण शर्वरीला चित्रपटातून मिळणारं ग्लॅमर आणि एका शास्त्रीय नृत्य कलाकाराला मिळणारं ग्लॅमर यामध्ये खूप फरक आहे. आणि एक कलाकार म्हणून माझ्या क्षमतांची जाणीवही शर्वरीला आहे. त्यामुळे ग्लॅमरचा मुद्दा आमच्यामध्ये कधी आलाच नाही.’’ आजही ‘बिनधास्त’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्वरी जेमेनिसचा पती निखिल फाटक तबलावादक आहे. दोघांच्या सहजीवनाबद्दल बोलताना निखिलनं दोन कलाकारांचं माणूस या पातळीवर एकत्र येणं काय असतं ते उलगडून दाखवलं.

what happens if you give up dal for a month
महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?
Fresh vs pre-shaved coconut water
ताजे की पॅकबंद? कोणते नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
children at home
घरात लहान मुलं असतील तर ‘या’ चुका टाळा, अन्यथा अपघात अटळ!
Spicy Rava Kachori Note the ingredients and recipes
फक्त मुलांनाच काय तुम्हालाही आवडेल, चटपटीत रवा कचोरी; नोट करा साहित्य अन् कृती
Loksatta vyaktivedh sangeet Sivan Photographer Film director
व्यक्तिवेध: संगीत सिवन
onion crisis central government lifts ban on onion export before lok sabha poll
ही निवडणूकसुद्धा कांद्याची!
sodyachi khichdi recipe in marathi
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी खास “सोड्याची खिचडी” झटपट होईल तयार
Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!

‘‘कलाकार म्हणून आम्ही एकमेकांना ओळखत असलो तरी, नवरा-बायकोच्या नात्यासाठी माणूस म्हणून एकमेकांची चांगली ओळख असणं महत्त्वाचं आहे. कारण आम्ही दिवसातले काही २४ तास कलाकार नसतो. काही तास आम्ही कलाकार असतो, उरलेला वेळ फक्त माणूसच असतो. दुसरं म्हणजे शर्वरी तिचं ग्लॅमर घरात घेऊन येत नाही. तिनं कधी ते मिरवलंही नाही, कारण त्यातला फोलपणा ती जाणून आहे. तिला स्वतलाच त्याची भुरळ पडली असती तर मला ते चाललं नसतं.’’ शर्वरी आणि निखिलच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल शर्वरी सांगते की, ‘‘प्रेमात पडण्यापूर्वी, मी आणि निखिल १० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. मी रोहिणी भाटे यांच्या ‘नृत्यभारती कथ्थक डान्स अकादमी’मध्ये कथ्थक शिकत होते. तिथे निखिल तबला वाजवायला यायचा. हळूहळू आमची मत्रीही झाली, पण तेव्हा प्रेम वगरे नव्हतं. काही वर्षांनी आम्ही ‘स्पीक मॅके’ या संस्थेसाठी काम करायला लागलो. त्यासाठी आम्ही अनेक एकत्र दौरे केले. ही संस्था शाळा आणि महाविद्यालयामधल्या मुला-मुलींमध्ये शास्त्रीय गायन आणि नृत्य यांच्या जागरूकतेसाठी काम करते. साधारण ८ वर्षांपूर्वी आम्ही सौराष्ट्र-राजस्थानच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्या दौऱ्यात आम्ही खूप कार्यक्रम केले, तो दौरा जवळपास २०-२५ दिवस सुरू होता. त्या वेळी आम्ही खूप गप्पा मारायचो आणि तेव्हा लक्षात आलं की आमच्यामध्ये खूप गोष्टी समान होत्या. उदाहरणार्थ, बोलताबोलता मला अचानक आकाशातल्या रंगछटा किती सुंदर दिसताहेत, हे लक्षात यायचं, आणि त्याच वेळी त्याच्याही ते लक्षात यायचं. आमच्या जाणिवा अशा समान पातळीवर होत्या, त्यामध्ये एक सुंदर गंमत असते. त्या वेळेस आम्ही दोघंही वयाने परिपक्व होतो, आपल्यामध्ये उथळ आकर्षण नाही, खोलवर वाटणारी ओढ आहे हे आम्हाला जाणवलं. शिवाय आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे याचे विचारही स्पष्ट होते. मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.’’

निखिल सांगतो की, ‘‘मी अनेक वर्ष तबला वाजवत होतो. एका कलाकाराचं रुटीन काय असतं, पूर्णवेळ कलाकाराचं आयुष्य कसं असतं, याची मला अगदी तरुण वयापासून कल्पना होती. मी कॉमर्समधून बारावी केलं, पण त्याची मला आवड नव्हती. पुढे मी आर्ट्सला गेलो. तबला या विषयातच मी बीए आणि एमए केलं. सांगायचा मुद्दा असा की, अठराव्या वर्षांपासूनच मला एका कलाकाराच्या आयुष्याची कल्पना होती. मी आणि शर्वरीने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मला आमचं नातं कसं असणार आहे त्याची व्यवस्थित कल्पना होती. ती कार्यक्रम करून रात्री उशिरा घरी परत आली तर सकाळी लवकर उठून तिला माझ्यासाठी न्याहारी तयार करायला जमेल किंवा दररोजच आम्हाला सकाळचा चहा एकत्र घ्यायला मिळेल, अशी माझी अपेक्षाही नव्हती. तिला घरी यायला उशीर झाला तर निदान मी तिला जेवण गरम करून वाढलं तर तिचा थकवा निश्चित कमी होईल याची मला जाण होती, कारण त्या सगळ्यातून मीही गेलो होतो. मी दुसऱ्या क्षेत्रात असतो तर कदाचित मला या गोष्टी कळल्याही नसत्या.’’

‘‘दोघांनी जेव्हा आपापल्या घरी लग्नाविषयी सांगितलं तेव्हा विरोधाचा प्रश्नच नव्हता,’’ शर्वरीने आठवणींना उजाळा दिला, ‘‘माझ्या आईला तर खूपच आनंद झाला होता. कारण शास्त्रीय नृत्याची, त्या क्षेत्राची जाणीव असणारे लोक कमी असतात. इतर क्षेत्रातील लोकांना त्याची समज असेलच असं नाही. म्हणजे मला स्टेजवर अडीच तास नृत्य करायचं असेल तर मला त्यासाठी नियमित चार तास सराव करावा लागतो. त्याचं महत्त्व जाणणारा नवरा मिळणं ही माझ्या आईच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. नृत्यासाठी खूप अंगमेहनत लागते. आपण थकून जातो. त्यामुळे मी रात्री रियाज किंवा नाचाचे कार्यक्रम करून परत आले तर मी खूप थकलेली असेल, हे निखिलला जितकं जाणवेल तितकं इतर कोणी समजून घेणार नाही, असं माझ्या आईला वाटलं. लग्नापूर्वी निखिलच्या आईने मला भेटायला बोलावलं. त्या वेळी त्यांनी मला त्यांची सर्व पाश्र्वभूमी सांगितली. आम्ही लग्नाचा निर्णय घेतला तोपर्यंत माझा ‘बिनधास्त’ चित्रपट येऊन गेला होता. तो खूप गाजलाही होता. त्यामुळे मला काहीसं सेलिब्रिटी स्टेटस मिळालं होतं. त्याच्यामुळेही असेल, पण ही मुलगी आपल्याबरोबर जुळवून घेईल का, आपलं साधं घर या मुलीने समजून घेतलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. निखिल माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण त्याला त्यांचा आक्षेप नव्हता. त्यांना काळजी होती ती देवधर्माच्या गोष्टींची. माझ्या सासूबाईंना देवधर्माची खूप आवड आहे. आम्ही तुझ्यावर आमची आवड लादणार नाही, पण तू माझ्या भावनांचा आदर कर, असं त्यांचं साधं सांगणं होतं. तुझ्यावर तुझ्या आईने केलेले संस्कार असतीलच, ते कायम राहू देत, आणि इकडेही सहभागी हो, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचं मला हे असं लग्नापूर्वी समजून सांगणं आणि समजून घेणं मला फार महत्त्वाचं वाटलं. साधारण २००९च्या अखेरच्या दिवसांमध्ये ही भेट झाली. २८ मे २०१० रोजी आमचं लग्न झालं, त्यापूर्वी २५ मे रोजी माझा पुण्यातच कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला तबल्याची साथ करायला निखिलच होता. आम्ही दोघांनीही स्वतपेक्षा आपल्या कामाला नेहमी प्राधान्य द्यायचं असं ठरवलं होतं.’’

‘‘लग्नापासूनच आम्ही दोघेच वेगळे राहत होतो. त्यामुळे हे सणवार शर्वरीसाठीही महत्त्वाचे होते. कारण त्यानिमित्तानं एकमेकांकडे जाणं-येणं होतं. एकत्र जेवण-स्वयंपाक होतो. आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. आई अजूनही सर्व पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक वगरे करते. शर्वरीला तिला मदत करायला आवडतं. आईला स्वतलाच स्वयंपाकाची फार आवड आहे. त्यामुळे ती निरनिराळे प्रसंग शोधून काढून इतरांना जेवायला बोलावत असते.’’ पण वेगळे राहत असल्याने कलेसाठी भरपूर वेळ देता येत होता. घरामध्ये इतर कोणासाठी तरी वेळ द्यायची तेव्हा गरज नव्हती. रात्री उशिरा थकूनभागून घरी आल्यानंतर स्वयंपाक करीत बसण्यापेक्षा बाहेरून काही तरी मागवणं किंवा अगदी साधे सोपे पदार्थ करून खाणं सोयीचं होतं. ‘‘जेवणाच्या ताटात चार पदार्थ नसले तरी चालतील पण रोज दोन तास तरी रियाजासाठी दिलेच पाहिजेत असा आमचा दंडक आहे. मी दोन दिवस रियाज करताना दिसले नाही तरी निखिलचा लगेचच प्रश्न येतो, रियाज सुरू आहे ना? दोघांचीही आपापल्या क्षेत्रातील साधना अखंड राहायला हवी यासाठी आम्ही दोघंही आवर्जून एकमेकांकडे लक्ष ठेवून असतो.’’

भरगच्च आयुष्यात एकमेकांसाठी वेळ काढतानाच एकमेकांच्या माणसांसाठी वेळ कसा काढता, या प्रश्नाचं उत्तर देताना शर्वरी साधे सिद्धांत सांगते, ‘‘एकमेकांसाठी वेळ काढला तरच नाती फुलतात यावर आम्हा दोघांचाही विश्वास आहे. आमच्या दोघांच्याही कुटुंबीयांनी आमच्या कलेसाठी खूप वेळ दिला आहे, आम्हीही त्यांच्यासाठी आवर्जून वेळ काढतो. एकमेकांना क्वालिटी टाइम देणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. हे करताना अगदी मनापासून करायचं. त्यामुळे आपापसातले बंध अधिक घट्ट होत जातात. नात्यांना न्याय मिळतो. मी सकाळी लवकर उठून रियाज करणाऱ्यातली आहे, आणि त्याउलट निखिल रात्री उशिरापर्यंत त्याचा रियाज करीत असतो, त्यामुळे तो उशिरा उठतो आणि मी लवकर उठते. आमच्याकडे रात्री निखिलचे मित्र जेवायला आले तरी जेवणाची सगळी तयारी करून मी झोपायला गेलेलं निखिलला चालतं. बायकोनं वाढलंच पाहिजे, असा काही त्याचा आग्रह नसतो.’’

२०१३ मध्ये शार्वलिचा जन्म झाला. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा प्रस्ताव आला तेव्हा शर्वरी गरोदर होती. तारखा पडताळून पाहिल्या तेव्हा असं लक्षात आलं की, दौऱ्याच्या वेळेला बाळ फक्त ४ महिन्यांचं असेल. त्या वेळेस सगळ्यांनीच व्यवस्थित सांभाळून घेतलं. शार्वलि एक महिन्याचा झाल्यानंतर शर्वरीने हळूहळू रियाज सुरू केला. एक आई म्हणून शर्वरीबद्दल निखिल सांगतो की, ‘‘एक आई म्हणून मला तिची कमाल वाटते. आई, पत्नी, सून, मुलगी, कलाकार अशी प्रत्येक भूमिका चांगल्याच पद्धतीने पार पाडायचा तिचा आग्रह असतो. ती नृत्याच्या रियाजात जेवढी आनंदी असते तितकीच स्वयंपाक करताना उत्साही असते. आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो, त्यातही मखर सजवायला तिला आवडतं. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तिचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. अनेकदा करिअरला प्राधान्य देणाऱ्या मुली आयुष्यातील इतर गोष्टी गौण मानतात, शर्वरीचं तसं नाही.’’ शार्वलिला वाढवणं ही ओढाताणीची कसरत न होता, आनंदाचा ठेवा व्हावी यासाठी काही नियमही आखून घेतले. ‘‘शार्वलिच्या बाबतीत एक पथ्य आम्ही नेहमीच पाळलं आहे. त्याला आम्ही कधीच फसवत नाही, तसंच त्याच्यावर कधी ओरडतही नाही. मला कार्यक्रमाच्या निमित्ताने चार तास घराबाहेर राहावं लागणार असेल तर आम्ही त्याला ‘आई चार तासांनी येणार आहे, असंच सांगतो. तासाभरात येईल असं सांगून त्याची खोटी समजूत घालत नाही.

मी दोन दिवस गावाला जाणार असेल तर त्याला त्याच्या आजी-आजोबांकडे सोडून जाते. आणि तोही दोन दिवस माझं नावही घेत नाही. तिसऱ्या दिवशी मात्र ‘आज आई येणार आहे ना’ असं नक्की विचारतो. त्याच्याशी वागताना खरेपणा राखल्यामुळे तोही खूप समंजसपणे वागतो. लग्नानंतर माझे प्राधान्यक्रम फारसे बदलण्याची गरज पडली नव्हती, पण आई झाल्यानंतर मात्र नक्कीच फरक पडला आहे. आता कार्यक्रम संपला की मला धावत माझ्या मुलाकडे जायचं असतं. त्यामुळे मला इतरांच्या खूप चांगल्या कलाकृती पाहता येत नाहीत. मी त्याबद्दल ऐकलेलं असतं, पण मला त्यासाठी वेळ देता येत नाही. मला खूप चांगले कार्यक्रम बघायचे आहेत, पण आता ती वेळ नाही. शक्य तेवढा वेळ लेकासोबत घालवते. त्याला आजी-आजोबांकडे सोडून उगाचच हॉटेिलग करायला गेले आहे असं मी करीत नाही. त्याला अर्थातच आई हवी असते, पण कधी मी नसले तरी तो समजून घेतो. आईसाठी नृत्य, बाबासाठी तबला का महत्त्वाचा आहे हे त्याला व्यवस्थित समजतं.’’

एका कलाकार नवऱ्याला आपल्या कलाकार बायकोच्या यशाबद्दल काय वाटतं? निखिल शर्वरीच्या सध्याच्या प्रगतीवर खूश आहे का? या प्रश्नावर निखिल म्हणतो, ‘‘नाही, शर्वरीमध्ये खूप क्षमता आहे. ती उत्तम नृत्य करू शकते, अभिनय चांगला करू शकते, तिच्या जाणिवा अगदी जागरूक असतात. ती उत्तम लिहू शकते, कवितावाचन खूप छान करते. त्यातूनच तिनं स्वत काही कविता केलेल्या आहेत. तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे आहेत, पण त्यांचा माझ्या मनासारखा पूर्ण विकास झालेला नाही. तिला नृत्य दिग्दर्शनही चांगलं जमतं, त्याची तिला चांगली समज, जाण आहे. आम्ही एकमेकांशी खूप बोलत असतो. त्यातून एकमेकांना कल्पना सुचवतो. शर्वरीचा ‘फुटिपट्र्स’ हा कार्यक्रम अशाच बोलण्यातून आला. हिंदी चित्रपटांमध्ये कथ्थकचे पडसाद ही संकल्पना आमच्या चर्चेतून बाहेर आली आहे. तिला स्वतला नृत्यामध्ये रस आहेच, त्यातही ती एकल नृत्यांमध्ये सर्वाधिक रमते. हा प्रकार तिचा जीव की प्राण आहे. ती तिला आयुष्यभर आनंद देणारी गोष्ट आहे, त्याचा तिने अधिकाधिक रियाज सुरूच ठेवावा असं मला वाटतं.’’

शर्वरीच्याही स्वतकडून काही अपेक्षा आहेत. ‘‘महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत ‘ऐकणारा’ जसा एक दर्दी वर्ग तयार झाला आहे, तसा शास्त्रीय नृत्य ‘बघणारा’ वर्ग तयार झालेला नाही. मला शास्त्रीय नृत्य जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत न्यायचं आहे. ए.आर. रहमान आणि आशा भोसले यांच्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या ऑपेरा हाऊसमध्ये कार्यक्रम करणारी मी केवळ तिसरी भारतीय कलाकार आहे, याची आपल्याकडच्या लोकांना माहितीच नसते. शास्त्रीय नृत्याबद्दलची ही अनास्था दूर व्हायला हवी यासाठी मला काम करायचं आहे. तसे माझे प्रयत्न सुरूही आहेत. चित्रपटातही माझ्या वयाला साजेशी जबरदस्त भूमिका करायला मिळावी अशीही माझी मनापासून इच्छा आहे. मात्र सध्या नृत्यालाच प्राधान्य दिलं आहे.’’

कलाकारांचा संसार निसरडय़ा वाटेवरून चालणारा असेल अशी बाकीच्यांना शंका असते. दोघांमध्ये शर्वरीची लोकप्रियता अधिक आहे, त्याबद्दल शर्वरीचं म्हणणं असं आहे की, ‘‘एक कलाकार म्हणून निखिल खूप मेहनत करतो. पण तबला हे मुळात साथीचं वाद्य असल्यामुळे त्याला काहीसं दुय्यम स्थानच दिलं जातं. त्यामुळे त्याचे रिटर्न्‍सही कमीच मिळतात. झाकीर हुसेन यांच्यासारखे तबल्याचे सोलो कार्यक्रम करणारे एखाद-दोनच असतात. पण निखिलची क्षमता काय आहे, तो किती मेहनत घेतो, त्याचा रियाज या सर्वाबद्दल मला आदर आहे. एकमेकांबद्दलचा हा आदर आम्ही सांभाळतो, अन्यथा संसाराचा ‘अभिमान’ होतो, आम्हाला ते होऊ द्यायचं नाही हे आम्ही कायम लक्षात ठेवतो.’’ एकमेकांचा आदर करण्याबरोबरच ज्या कलेनं दोघांना एकत्र आणलंय, त्या कलेचाही सर्वोच्च आदर करायचा गुरुमंत्र दोघांनाही मिळालेला आहे. ‘‘कलेची साधना सुरू ठेवा, काही मिळवण्याच्या मागे धावू नका. काम सुंदर करा, बाकी यश वगरे आपोआप तुमच्या मागे येईल, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे आम्ही दोघांनीही आपापल्या कलेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे.’’

निमा पाटील nima_patil@hotmail.com