माधव वझे

१९६७ मध्ये तेंडुलकरांच्या ‘बेणारे बाईं’नी शरीरसुखाच्या तृप्तीबद्दल मनातल्या मनात का होईना, पण बोलायचे धैर्य दाखवले. १९९२ मध्ये मात्र तेंडुलकरांचीच ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’ आपल्या लैंगिकतेबद्दल प्रेक्षकांशी डोळयाला डोळा भिडवून बोलली. रंगभूमीला आज लैंगिकता निषिद्ध नसली, तरी स्त्री-जाणिवांबद्दलचे सामाजिक शहाणपण अद्याप दूर आहे. रंगभूमीवर त्याचा उच्चार करणाऱ्या सुरुवातीच्या कलाकृतींत ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’चे नाव घ्यावे लागेल.

Loksatta anvyarth Priest Literary and social environmental activist Father Francis Dibrito
अन्वयार्थ: पर्यावरणप्रेमी फादर
Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections
उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…”
rishi sunak, Narendra Modi, Rishi Sunak's Humble Resignation, Narendra Modi's Aggressive Approach, Narendra Modi s 400 seat announcement, Narendra modi loksabha performance, vicharmanch article,
या बाबतीत मोदींपेक्षा सुनक निश्चितच वरचढ ठरले!
Why does hatred of Gandhi remain even today
गांधीद्वेष आजही का उरतो?
wedding card, environmental conservation,
अंबानींची लग्नपत्रिका असेल वेगळी, पण चर्चा मात्र ‘या’ लग्नपत्रिकेचीच
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
The team of the film amhi Jarange garajvant marathyacha Ladha at the office of Loksatta
आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Haravlelya Kathechya Shodhat book review
अस्वस्थ करणारा संघर्ष

नाटककार म्हणून विजय तेंडुलकरांच्या यशापयशाची चर्चा ते असताना आणि ते गेल्यानंतरही खूप झाली आहे आणि तशी ती यापुढेही होत राहील. या चर्चेदरम्यान अगदी विरुद्ध टोकाची मते आणि निष्कर्ष व्यक्त झालेले दिसतात. पण एका बाबतीत मात्र त्यांच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे एकमत असू शकते, ते म्हणजे, तेंडुलकरांनी कोणताही सत्य किंवा कल्पित अनुभव कधीही निषिद्ध मानला नाही. जीवनातल्या तर्कातीत अशा सगळया शक्यता त्यांनी गृहीत धरल्या; इतकेच नाही, तर निडरपणे त्या नाटकांमधून समोर आणल्या. विशेषत: ‘मधल्या भिंती’ (१९५८), गिधाडे (१९७१), सखाराम बाईंडर (१९७२), बेबी (१९७६) आणि ‘मित्राची गोष्ट’ (१९८२). या नाटकांमधील जीवनानुभव मराठी रंगभूमीला सर्वस्वी अपरिचयाचे होते. काहीसे आश्चर्यचकित करणारे आणि भयचकितही करणारे होते. त्या जीवनानुभवांनी मराठी रंगभूमीच्या कक्षा रुंदावल्या. तेंडुलकर पथदर्शक ठरले. त्यांच्या नाटकांनी पुढील नाटककारांना आत्मबल दिले आणि मराठी नाटक अधिकाधिक जीवनसन्मुख होत गेले. जीवनातील अशीच एक शक्यता, तेंडुलकरांनी त्यांच्या ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’ या नाटकातून समोर आणली आहे.

अंजली भिडे ही पुणेरी, ब्राह्मणी वळणाची मुलगी. वय २९. अविवाहित. एका खासगी कार्यालयात नोकरी करते. तिला दोन बहिणी. एक मोठी, एक धाकटी. दोघींचे लग्न झाले आहे, पण अंजूचे अजून कुठे काही जमलेले नाही. इतर मुलींप्रमाणे एखाद्या पुरुषाला गटवून आपल्या मुलीने लग्न करावे असे वडिलांना- अप्पांना वाटत असले तरी तसे काही अंजूच्या मनात नाही. आपल्यासाठी स्थळे शोधण्याचा अप्पांना या वयात त्रास नको म्हणून अंजूच आता स्थळांच्या शोधात आहे. त्यासाठी आवश्यक तर गावोगावी जात आहे. त्यासाठी ती जळगावला जाते, परंतु त्या स्थळाच्या चारित्र्याबद्दल काही प्रवाद आहेत हे समजताच ती आगगाडीने परत पुण्याला निघाली आहे. आगगाडीत तिच्यासमोरच गोरा, ‘मॉड’ पोशाख केलेला, पाईप ओढणारा तरुण बसला आहे. अंजू स्वत:च पुढाकार घेऊन त्याच्याशी ओळख करून घेते. त्याचे वय ३०. नाव शेखर भागवत. तो आंग्लाळलेल्या मराठीत बोलतो, कारण ‘फॉरेन रिटर्न’! पुण्यातल्या आपल्या घराचा पत्ता अंजू त्याला देते आणि घरी येण्याचे निमंत्रणही. आता अंजू स्वत:त अगदी हरवलेली. आणि एक दिवस अचानक शेखर तिच्या घरी येतो. आपण खास तिला भेटण्यासाठी पुण्याला आल्याचे शेखर शपथपूर्वक सांगतो. पुण्यात तो उतरला आहे, त्या हॉटेलचा पत्ता देऊन आणि तिथे येण्याची गळ घालून तो परत जातो. दुसऱ्या दिवशी अंजू त्या हॉटेलवर जाते खरी, पण शेखर हॉटेल सोडून मुंबईला परत गेल्याचे तिला कळते. मात्र त्याचा मुंबईतला पत्ता तिला तिथे मिळतो. शेखरच्या व्यक्तिमत्त्वाने आणि त्याच्या लाघवी बोलण्याने भारावून गेलेली अंजू त्याला भेटायला मुंबईला जाते.

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व: दहशतीविरुद्धचे बुलंद आवाज

शेखरच्या घरी त्याचा भाऊ गौतम आहे. शेखर आंग्लाळलेल्या मराठीमध्ये बोलणारा, तर त्याचा हा भाऊ गौतम, अनेक वर्षे कोलकात्याला राहिल्यामुळे बंगाली बोलणारा. त्याच्या गोड बोलण्यामुळे, उमद्या स्वभावामुळे अंजूला शेखरपेक्षा तोच जास्त आवडतो. शेखर घरी नसून उद्या सकाळी येईल, असे गौतमने सांगितल्यामुळे त्या रात्री ती तिथेच राहते. तिला इथे आपले लग्न जमेल, अशी आशा वाटायला लागते. दुसरे दिवशी सकाळी ती झोपेतून उठून पाहते, तर गौतम बाहेर गेलेला आणि शेखर घरी परतलेला! शेखर आणि गौतम या दोन व्यक्ती नसून शेखरनेच तो खेळ सुरू केला आहे अशी शंका अंजूला येते. आपले हे नाटक अंजूला कळणार हे लक्षात आल्यावर शेखर तिच्यावर बलात्कार करतो आणि अंजू पुण्याला परतते.

‘‘(मी) कधीच कुठल्याच पुरुषाबरोबर कुठे जात नाही. बसमध्ये जागा असली पुरुषाशेजारी, तरी बसत नाही. उभीच राहते.. गर्दीत घासू लागलं अंग कुणाचं, तर बाहेर पडते. मनानं आंघोळ करते..’’- अशी जर अंजू आहे, तर आगगाडीत ओळख झालेल्या शेखर भागवतची भेट घेण्यासाठी ती मुंबईला गेली हा खरे तर तिचा अविचारीपणा, मूर्खपणा. शेखरची भेट झाली नाही तरी त्या रात्री ती त्या घरी राहिली. रात्री गॅलरीत झोपलेल्या गौतमचे केस हळूच एकदा तरी कुरवाळावेत असे तिला वाटते. एकदा झोपलेली असताना शेखर येऊन तिची हनुवटी उचलून तिला न्याहाळू लागतो, तरी ती त्याला विरोध करत नाही, फक्त अंग आक्रसून घेते. नंतर शेखरचा भाऊ गौतम (?) येऊन तिचे चुंबन घेतो, तेव्हा ती किंकाळी फोडते खरी, पण तिथेच एका आरामखुर्चीत पडून राहते. शेखर आणि त्याचा तथाकथित भाऊ गौतम म्हणजे एकच व्यक्ती आहे, असा दाट संशय येऊनही ‘‘जेवायला जायचे ना?’’ असे तीच शेखरला विचारते आणि पुढे तर सिनेमाला आणि नंतर समुद्रावर जाण्याचाही हट्ट धरते.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! : ‘घरेलू’ म्हणून एकटीही?

हा घटनाक्रम पाहता स्पष्ट होते, की अंजूने मुंबईला त्या रात्री शेखरच्या घरी राहून घोडचूक केली. कोणी असेही म्हणेल, की अंजूनेच तो बलात्कार ओढवून घेतला. हे काय अंजूला स्वत:ला कळले नसेल? बलात्काराचा मानसिक धक्का तिला बसला नसेल? पण अंजू त्याबद्दल एक अक्षर बोलत नाही. तिला काही वेगळेच म्हणायचे आहे. नाटकाअखेरीस ती तिची कैफियत मांडते-

‘‘.. माझ्यावर त्यानं बलात्कार केला. आधी ठार भ्याले होते. मग उशिरा लक्षात आलं की खूप शांत वाटतंय.. आयुष्यातल्या एकोणतीस वर्षांतला त्या प्रकारचा तो माझा पहिलाच अनुभव. मरणाच्या वेदना देणारा नि तरी अपूर्वाईचा वाटणारा. नकोसा तरी संपू नये असा.. जपावा असा एकुलता एक अनुभव माझ्या गाठी जमला याचं तुम्हाला दु:ख होतं? एरवी कदाचित- ते सुख- मला कधीच मिळालं नसतं. माझं मला ते मिळवताच आलं नसतं. मीच ते माझ्या बापाच्या भयानं नाकारीत राहिले असते. एक क्षण तरी का होईना, मी ते जगले.’’ ‘‘तो क्षण आता पुन्हा न आला तरी तक्रार नाही.. कुणाच्या आयुष्यात तो वाजतगाजत वरातीनं येतो. कुणाच्या आयुष्यात येतो अल्लद, चोरपावलांनी. कुणाला लख्ख प्रकाशात राजरोज भेटत असेल. कुणाला भेटत असेल अंधारात उष्ण श्वासांनी.. एखादं आयुष्य असंही असेल ज्यात तो (अनुभव) येतच नसेल. पेटल्याविनाच एखादी ठिणगी बिचारी विझून जात असेल. माझं निदान तसं नाही झालं. आता न आला तरी चालेल.. तुमच्या प्रेक्षकांना सांगा, मी सुखात आहे.’’

लैंगिकता आणि त्यातही स्त्रीची लैंगिकता हा विषय आपल्या रंगभूमीने नेहमीच निषिद्ध मानला. ‘‘.. या शरीराची किळस येते मला आणि फार फार प्रेम वाटतं त्याच्याबद्दल. त्याचा राग येतो आणि तेव्हाच वाटतं की अखेर ते आहे, मग? तुझ्याशिवाय ते कुठं जाईल? आणि तू तरी ते नाकारून कुठं जाशील? त्यानंच जळत तुला एक अतिशय सुंदर, खूप स्वर्गीय, तृप्त क्षण दिला होता. विसरलीस?’’ असे तेंडुलकरांचीच ‘बेणारे’ बोलली; पण फक्त मनातल्या मनात. बेणारे १९६७ मध्ये जे बोलू धजली नाही, ते १९९२ मध्ये अंजूने कोणतीही भीडभाड न ठेवता जाहीरपणे सांगितले. स्वत:ची स्वत:ला पटलेली ओळख स्वत:पाशी न ठेवता तिने ती सर्वांसमोर सांगितली, हे महत्त्वाचे.

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व : लढा.. लोकशाहीसाठी!

कालविपर्यासाचा दोष स्वीकारून इथे अगदी अलीकडेच रंगमंचावर आलेल्या ‘मॉल प्रॅक्टिस अॅलन्ड द शो’ या अतुल पेठे यांनी दिग्दर्शन केलेल्या नि:शब्द नाटयप्रयोगाचा उल्लेख केला पाहिजे. कोणी एक नृत्यांगना तिच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी स्वत:च्या घरी अंतर्वस्त्र म्हणता येईल अशा कपडयांमध्ये सराव करत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरते. त्यावर तिला फोन करून तिच्याशी अर्वाच्य भाषेत कोणी कोणी बोलतात; तिला धक्काच बसतो. आपण इतरांच्या नजरेमध्ये फक्त एक उपभोग्य वस्तू आहोत या जाणिवेने ती सैरभैर होते. इतकी, की आत्महत्त्येचा विचार करते. पण सावरते. जे घडले ते घडले; आपल्याला लांछन वाटावे असे त्यामध्ये काही नाही, असे स्वत:ला समजावून ती पुन्हा नृत्याचा सराव सुरू करते. स्त्रीचे आत्मभान अधोरेखित करणारा हा नाटयप्रयोग.

कुटुंबव्यवस्था विशविशीत होऊन तरुण पिढी तिचा बहुतेक सगळा वेळ घराबाहेर, मित्रमैत्रिणींकडे किंवा एखाद्या आवडत्या अड्डयावर घालवायला लागली, तेव्हाचे- म्हणजे तरुण पिढी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ लागली तेव्हाचे चित्र मनस्विनी लता रवींद्र यांच्या नाटकांमध्ये उतरले. त्यांच्या ‘सिगारेट्स’(२००४) या नाटकात विशीबाविशीची मुलेमुली त्यांच्या लैंगिकतेबद्दल अगदी सहज, मोकळेपणाने बोलतात. ‘व्हाइट लिली अॅवन्ड नाईट रायडर’ (२००९) या मिलिंद फाटक आणि रसिका जोशी यांनी लिहिलेल्या नाटकात स्वाती आपटे आणि माधव सोमण अनुरूपतेची चर्चा करताना लैंगिक अनुरूपताही अजमावून पाहतात. आता साहित्यात आणि रंगभूमीवर पुरुष आणि स्त्रियांची लैंगिकता हा विषय निषिद्ध राहिलेला नाही. धर्मकीर्ती सुमंत यांच्या ‘चारू आरो इत्यादी’ या नाटकातले चारू आणि आरो ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या स्त्रीचे अनुभवसुद्धा एखाद्-दुसरा अपवाद वगळता आपल्या रंगभूमीवर आलेले नाहीत.

स्त्री-जाणिवांबद्दल अजूनही शहाणपण न आलेल्या आपल्या समाजात त्या अधिकाधिक व्यक्त व्हाव्या ही आजच्या काळाची गरज आहे. आणि त्या रंगभूमीवर व्यक्त व्हाव्यात. कारण रंगभूमी व्याख्यान देत नाही, स्पष्टीकरण देत नाही, निवेदन करत नाही. रंगभूमी आपल्याला थेट अनुभव देते. यासाठी तेंडुलकरांच्या ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’ला तिचे श्रेय दिले पाहिजे.

vazemadhav@hotmail.com