शिल्पा परांडेकर

‘विदर्भ माझी रोज नव्या पदार्थाशी भेट घडवत होता. यवतमाळमधल्या प्रवासात प्रसिद्ध ‘बुढीचा चिवडा’, ‘आजीचा चिवडा’ यांची चव चाखलीच; पण जराशा वेगळय़ा अशा वैदर्भीय पुरणपोळीचाही वारंवार आस्वाद घेतला. पुरणपोळीच्या गोडव्याबरोबरच विविध प्रकारच्या तोंडीलावण्यांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या साध्या, पण चविष्ट धिरडय़ापर्यंतचं वैविध्य या प्रवासात मला अनुभवता आलं.’

Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
ndrf rescue operation sindhudurg
सिंधुदुर्ग: मुक्या जनावराला वाचवण्यासाठी धावले प्रशासन; कुडाळ येथे एका रेड्याला व २ शेळ्यांना मिळाले जीवदान
tiger viral video loksatta
Video: हक्काच्या घरासाठी वाघाचे ‘चिपको’ आंदोलन…व्हिडीओ एकदा बघाच…
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…
vegetable price, pune vegetable, pune,
मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारच्या दरात वाढ
journey of Chief Minister eknath shindes convoy through patholes
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा खड्ड्यांतून प्रवास
Sandalwood, stolen, bungalow, Prabhat Street,
पुणे : प्रभात रस्त्यावर बंगल्यात शिरून शस्त्राच्या धाकाने चंदन चोरी, चंदन चोरट्यांची दहशत

जवळपास दीड महिना उलटून गेला. आता विदर्भातला प्रवास अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचला, तरीही अजून यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांचा प्रवास बाकी होता. विदर्भातला तिसरा मोठा जिल्हा- यवतमाळ. मी जेव्हा यवतमाळचं नियोजन केलं होतं, तेव्हा मला यवतमाळमधील दोन ठिकाणी मुक्काम करून जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करणं शक्य होतं; पण त्याच वेळेस तिथे केंद्र सरकारची एक मोठी परिषद होणार असल्यामुळे सर्व चांगली हॉटेल्स आधीच बुक झाली होती. त्यामुळे मला यवतमाळ शहरात राहूनच आजूबाजूचा प्रवास पूर्ण करावा लागला. यामुळे हा प्रवास नियोजित काळापेक्षा लांबला. तरी अनेक चांगल्या गोष्टी माझ्या पथ्यावर पडल्या याचा मला आनंद झाला.

ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, राळं, कापूस ही इथली मुख्य पिकं. ज्वारीपासून शेंगोळय़ा, फळं, भरडा, कण्या, घाऱ्या, लाह्या आणि धिरडी बनवली जातात. पौष महिन्यात आंब्याच्या दिवसांत आमरसाबरोबर खाण्यासाठी किंवा कधीही खाण्यासाठी केला जाणारा सोपा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे धिरडं. आजच्या भाषेत सांगायचं, तर धिरडं जुन्या लोकांसाठी त्यांचं ‘कम्फर्ट फूड’ होतं. कारण विदर्भात यवतमाळबरोबरच मी इतरही काही ठिकाणी धिरडय़ाबद्दलची एक गंमतशीर गोष्ट ऐकली. अनेक गावांत तर पदार्थाच्या चर्चाचा प्रारंभच मुळी या गोष्टीनं व्हायचा. गोष्टी ऐकायला तर सर्वानाच आवडतं आणि मलाही अनेकदा ऐकलेली ती गोष्ट पुन:पुन्हा ऐकायला जाम आवडायची. ही गोष्ट अशी-

एकदा एक माणूस दुसऱ्या गावी त्याच्या मित्राकडे गेला. मित्र आणि मित्राच्या बायकोनं त्याचा खूप छान पाहुणचार केला. आंब्याची सुगी असल्यामुळे धिरडं आणि आमरस असा बेत त्यांनी केला. या माणसाला धिरडी खूप आवडली. त्यानं ठरवलं, की घरी जाऊन बायकोला धिरडं करायला सांगायचं. पूर्वीचा प्रवास म्हणजे पायी किंवा बैलगाडीचा. त्यामुळे प्रवासात काही दिवस गेले. या पूर्ण प्रवासात तो ‘धिरडं, धिरडं’ अशी घोकंपट्टी करत आला, मात्र नेमका घरी परतेपर्यंत पदार्थाचं नाव विसरून गेला. मग त्यानं बायकोला त्याचं वर्णन करून सांगितलं; पण तिला काही बोध झाला नाही.‘हिला काहीच कसं समजत नाही’ असं म्हणून त्यानं रागावून तिला मारायला सुरुवात केली. ती त्याच्यावर ओरडली, ‘‘अहो, तुम्हाला नाव आठवत नाही, तर त्यासाठी माझी पाठ का म्हणून धिरडून काढता?’’ तो आनंदानं ओरडला, ‘‘अगं, हेच तर खायचं होतं मला!’’

आणखी वाचा-शोध आठवणीतल्या चवींचा! घनदाट जंगलातील चविष्ट पदार्थ

ही गोष्ट मला सांगून झाल्यावर जमलेल्या बाया मनमुराद हसायच्या. ‘धिरडे काढणे’ याचा अर्थ ‘खरपूस मार देणे’! आता लक्षात राहील ना धिरडं?
यवतमाळमध्ये मी शहरात राहिले होते. हॉटेलवर परतायला रोज रात्री बराच उशीर व्हायचा. हॉटेलच्या बाजूलाच एक मराठमोळं जेवणाचं ठिकाण होतं. खूप गर्दी असायची तिथे. ‘ग्रामीण’ किंवा ‘गावरान’ हीच त्यांच्या हॉटेलची ‘थीम’ होती. त्यामुळे आत जाण्याची मला खूप उत्सुकता होती; पण रोज होणाऱ्या उशिरामुळे माझा हिरमोड व्हायचा. अर्थात त्यामुळे तूर्तास ती उत्सुकता मला बाजूला ठेवावी लागली. पण दुसरं एक आकर्षण होतं. यवतमाळमधील आझाद मैदानावरील प्रसिद्ध बुढीचा चिवडा. ‘बुढीचा चिवडेवाला’ अशी ‘७५ वर्षांकडे वाटचाल’ वगैरे लिहिलेली पाटी लावलेली एक छोटी टपरी दिसली. टपरीवर ज्यांनी चिवडा विक्रीला सुरुवात केली त्या आजींचा म्हणजे ‘बुढी’चा फोटोदेखील तिथे झळकत होता. बुढी हा शब्द ‘माय’ या अर्थानंही वापरला जातो. चटकदार, झणझणीत चिवडा विक्रीचा व्यवसाय भुजाडे दाम्पत्यानं स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केला. पुढच्या पिढीनं तो अगदी जबाबदारीनं पुढे नेला आहे. मला ‘बुढी’चे नातू भेटले. त्यांनी त्यांचा व्यावसायिक, आर्थिक इतिहास, त्यांचा संघर्ष, सर्व काही सांगितलं. गरजेतून उभारलेला व्यवसाय आज खवय्यांना केवळ चवीनं आणि आपुलकीनं साद घालतो, ही बाब खूप चांगली वाटली. याच खाऊगल्लीत पुढेही अनेक चिवडय़ांचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. ‘आजीचा चिवडा’ हा त्यातलाच एक. इथेही एक आजी भेटल्या. त्यांचाही संघर्ष ऐकण्यासारखा. ‘एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो’, असं म्हणतात. अशा लोकांना भेटल्यावर ही म्हण सार्थ वाटते. कित्येक वर्षांपूर्वी सुरू झालेला हा चवींचा प्रवास आजही इतक्या वर्षांनी आपल्या हृदयाला जाऊन भिडतो, तो या चवींमुळे आणि त्यांच्या संघर्षांमुळेच.

काही वर्षांपूर्वी, म्हणजे हा प्रवास आणि अभ्यासाचा विषय येण्याच्या किती तरी आधी मी एका प्रदर्शनात अमरावतीच्या एका स्टॉलवर पुरणपोळी खाल्ली होती. विदर्भातली पुरणपोळी खाण्याचा आणि या वैदर्भीय पोळीची मी ‘फॅन’ होण्याचा तो पहिला अनुभव होता. ‘पहिला’ यासाठी, कारण मी ज्या-ज्या वेळी वैदर्भीय पुरणपोळी खाते, तेव्हा ती पूर्वीपेक्षा अधिक अफलातून वाटते. पुढची मजा अशी, की मी गेले काही दिवस ज्या हॉटेलमध्ये ‘गावरान’ जेवायला जाण्याचा विचार करत होते, त्या हॉटेलचे मालकसुद्धा ‘बुढी’चा चिवडा खाण्यासाठी तिथे आले होते. माझ्या खाद्यसंस्कृतीविषयक गप्पा आणि चिवडेवाल्याची मुलाखत ऐकून त्यांनाही माझ्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली. मला त्यांनी त्यांच्या हॉटेलवर जेवायला येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं.

आणखी वाचा-शोध आठवणीतल्या चवींचा!: भौगोलिक विविधतेतील खाद्यसंस्कृती

ग्रामीण सेट-अप, मात्र जेवणासाठी ‘बुफे’ पद्धतदेखील होती. मला उशीर जरी झाला असला तरी त्यांनी माझ्यासाठी त्यांची खासियत असणाऱ्या पदार्थाचे काऊंटर्स आवर्जून चालू ठेवले होते. त्यातला एक होता वैदर्भीय पुरणपोळीचा. या पुरणपोळीचं वैशिष्टय़ म्हणजे या पोळीची पारी अगदी लवचीक अशा कणकेची असते आणि यात पारीपेक्षा पुरण अधिक असतं. पश्चिम महाराष्ट्रात बनणाऱ्या पुरणापेक्षा हे पुरण अधिक ओलसर आणि चवीला किंचित अधिक गोडदेखील असतं. पुरणाचा गोळा कणकेत भरला की पोळीला आधी भाकरीप्रमाणे हातानंच गोल आकार द्यावा लागतो आणि गरज असेल तरच हळुवार पोळी लाटून भाजली जाते. पोळीबरोबर भरलं वांगं, कतली, आंबट बेसन, अशा वैदर्भीय पदार्थाचा आस्वाद घेऊन मी तिथून निघाले. ‘‘तुम्हाला पुरणपोळी इतकी आवडत असेल, तर एकदा आजनसरामधील संत भोजाजी महाराज यांच्या मंदिरात तुम्ही आवर्जून जा,’’ असं त्यांनी मला सुचवलं. योगायोगानं मी दुसऱ्या दिवशी आजनसराजवळच्या गावांमध्येच जाणार होते आणि योगायोगानं त्या दिवशी रविवारदेखील होता. विदर्भाच्या विविध भागांतून भोजाजी महाराजांना मानणारे हजारो भाविक दर रविवारी आणि बुधवारी इथे येतात. मी महाराजांच्या वंशजांना भेटले. या स्थळाची माहिती घेतली. महाराजांना पुरणपोळी आवडायची, असं सांगितलं जातं. त्यामुळे इथे हजारो पुरणपोळय़ा या दोन्ही दिवशी केल्या जातात. मंदिराच्या बाजूलाच एका मैदानावर स्त्रिया या पुरणपोळय़ा बनवण्याचं काम अविरतपणे करत असतात. पुरण बनवण्यासाठी मोठाली पुरणयंत्रं इथे बसवली आहेत. पुन्हा एकदा वैदर्भीय पुरणपोळीचा मनमुराद आस्वाद आणि आणखी एक अफलातून अनुभव घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघाले.

आणखी वाचा-शोध आठवणीतल्या चवींचा!: आदिवासींची खाद्यसंस्कृती

वाशीममध्ये प्रवास करताना वाटेत एका गावात काही स्त्रिया त्यांच्या घरासमोर हातमोजे घालून काही तरी फोडत असल्याचं मी पाहिलं. जवळ जाऊन पाहू लागले, तशी एक बाई ओरडली, ‘‘पोरी, मागं सरक. बिब्बा हाय त्यो. तुझा रंग गोरा हाय. चुकून उडला तर कायमचा डाग पडंल!’’ ग्रामीण भागात आजही सर्रास काही लागलं, कापलं तर बिब्ब्याचा डाग देतात; पण बिब्बा सर्वानाच उपयोगी पडत नाही. नाही लाभला, तर त्याचे शरीरावर काळे डाग पडतात. बिब्बा फोडणं हे खूप जिकिरीचं आणि मेहनतीचं काम असतं. या स्त्रिया बिब्बा फोडून यातून गोडंबी बाजूला करण्याचं काम करत होत्या. बदाम किंवा काजूच्या बरोबरीनंच भाव आणि पोषणमूल्यं असणारा आणि विदर्भातल्या वाटणांतला एक मुख्य घटक म्हणजे गोडंबी. बिब्बा फोडल्यानंतर त्यामध्ये जी बी मिळते तिला गोडंबी म्हणतात. मसाल्यांप्रमाणेच डिंकाचे लाडू वगैरे पदार्थात गोडंबी वापरली जाते. शेणानं सारवलेलं आणि जमिनीत बसवलेलं, मात्र थोडंच खोलगट असणारं उखळसदृश दगडी भांडं आणि बत्ता, हेच त्यांचं बिब्बा फोडण्याचं प्रमुख साधन. दररोज काही किलो बिब्बे त्या सहजपणे फोडतात.

धिरडं

साहित्य- एक ग्लास ज्वारीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ किंवा गव्हाचा कोंडा प्रत्येकी एक वाटी, लसूण, जिरं, मिरची
किंवा तिखट, मीठ, ताक.
कृती- सर्व पिठं आणि मसाले एकत्र करून ताकात पीठ भिजवा. चवीनुसार मीठ घाला. अर्धा तास बाजूला ठेवा. गरम तव्यावर डोशाप्रमाणे पीठ घालून ओल्या हातानं पसरवून घ्या. हे धिरडं दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
धिरडं ज्वारीच्या पिठाचं, मिश्र पिठांचं किंवा मूग डाळीपासूनही बनवलं जातं. पिठं पाण्यात अथवा ताकात भिजवून केली जातात. धिरडं गुळवणी/ आमरस/ चटणी/ खीर, कशाही बरोबर खाता येतं.

(क्रमश:)
parandekar.shilpa@gmail.com