रेणू दांडेकर
एखादी शिक्षणसंस्था आपल्या विचारातून स्वत:चा अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके, शिक्षक पुस्तिका बनवते हेच मुळी वेगळे आहे. जयपूरमधली ‘दिगंतर’ ही संस्था जाणीवपूर्वक मुलांना घडवते आहे. सातत्याने आपल्याच अभ्यासक्रमात, शिकवण्याच्या पद्धतीत बदल करते आहे. अशा शाळेत मुलांना अभ्यास करताना, स्वत:ला घडवताना पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे.
एखादी शिक्षणसंस्था आपल्या विचारातून स्वत:चा अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके, शिक्षक पुस्तिका बनवते हेच मुळी वेगळे आहे. जयपूरमधली ‘दिगंतर’ ही संस्था जाणीवपूर्वक मुलांना घडवते आहे. सातत्याने आपल्याच अभ्यासक्रमात, शिकवण्याच्या पद्धतीत बदल करते आहे. अशा शाळेत मुलांना अभ्यास करताना, स्वत:ला घडवताना पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे.
आज ‘दिगंतर’ ही संस्था ‘मॉडेल स्कूल’च्या रूपात राजस्थानमध्येच नाही तर देशात प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे सातत्यपूर्ण काम ही संस्था करते. शिक्षणाचा उद्देश नक्की केल्याने अभ्यासक्रमाचे काम, पाठय़पुस्तकाचे काम त्याच भूमिकेतून झालेले आहे. संवेदनशील माणूस निर्माण करणे, हा त्याचा उद्देश आहे. माणूस, जो विवेकी असेल, ज्याच्या मनात न्याय आणि समता असेल, लोकशाहीची मूल्ये ज्याच्या ठिकाणी विकसित होत असतील, ज्याच्या अंगी लोकतांत्रिक मूल्ये असतील. अशी पुढची पिढी तयार करण्याच्या हेतूनेच या शाळेतील अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरावर स्वयंअध्ययनावर जोर दिला जातो.
रोहित धनकर आणि रीना दास दोघेही उच्चविद्याविभूषित. यांचं योग्य मार्गदर्शन ‘दिगंतर’ला लाभलेलं आहे. सध्या रोहितजी बंगळुरूला ‘अझीम प्रेमजी’ विद्यापीठात प्राध्यापक आहेत. रीनाजी जयपूरलाच असतात. रोहितजींनी अलवर येथील ‘निर्वाणम् फाऊंडेशन’, ‘चाइल्डलाइन’मध्ये काम केलंय. वेश्यांच्या मुलांसाठी काम केलंय. छत्तीसगडमधील डी. एड. अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांच्या निर्मितीत काम केलंय. त्यांनी ज्या पद्धतीने रचना केली आहे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे, यात शिक्षकांची रचना, काम करण्याची पद्धत अध्याहृत आहे. कारण या रचनेत शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अभ्यासक्रम आणि त्यानुसार पाठय़क्रम तयार करण्यात शिक्षकांचा मोठाच सहभाग असतो. मुलांना शिकवायचं कसं हे इथे शिक्षकांनीच ठरवायचे असते. ‘दिगंतर’मध्ये येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे चार महिन्याचे प्रशिक्षण होतेच. येणारा शिक्षक आधी औपचारिक प्रवाहातला म्हणून येतो. पण या प्रशिक्षणातून जो तावूनसुलाखून निघतो तोच टिकतो. या प्रशिक्षणात थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असते. लेखी पेपर असतो, गटचर्चा होते, रचनात्मक गोष्टी करायला सांगितल्या जातात. मुलाखत विविध अंगांनी होते. हे प्रशिक्षण शिक्षकांना स्वत:सकट समाजालाही समजून घ्यायला शिकवते, वेगळी दृष्टी देते. शाळेत जे शिक्षक अध्यापन करतात त्यात एक पूर्वीचा आणि एक नवीन येणारा शिक्षक जोडला जातो. त्यातून नवीन येणारा शिक्षक खूप काही शिकतो.
हेमंत शर्मा ‘दिगंतर’मधले समन्वयक आहेत. त्यांच्या मते प्रत्येक क्षणी स्वत: निर्णय घ्यायची तयारी ठेवावी लागते. आणि वारंवार आपल्यात बदल होतोय हेही सर्वाना जाणवते. रोज संध्याकाळी सगळे शिक्षक एक तास एकत्र बसून आपल्या शिक्षकी अनुभवाची देवाणघेवाण करतात, यातून ताकद वाढते. आपणच आपले विश्लेषण करण्यासाठी आधी काहीतरी आशय असावा लागतो. तो इथे शिक्षकांच्यात निर्माण होतो. दर आठवडय़ाला एक लेख वाचायला दिला जातो त्यावर ४०-४५ मिनिटे चर्चा होते. नीट विचार करूनच काम केले जाते. मुलांची भाषा नि पाठय़पुस्तकाची भाषा यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा शिक्षक स्वत: कृती कार्यक्रम बनवतात.
प्रत्येक मुलांचे संपूर्ण सर्वागीण मूल्यमापन हे या शाळेचे वैशिष्टय़. हे काम रोज केलं जातं. त्यावर दुसऱ्या दिवसाचे नियोजन होते. ‘मल्टिलेवल लर्निग’मुळे वर्गरचना नाहिशी होते. इथल्या प्रत्येक मुलाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ग्रुपची नावं ठेवणं, शनिवारच्या चर्चासत्रात मतं मांडणं, मुलांच्या घरच्या समस्या ऐकणं, मुलांच्या सहयोगातून नियम-शिस्त ठरवणं, शिक्षेऐवजी गैरकृत्याची जाणीव करून देणं, पालकांशी सतत चर्चा करणं, पालकांनी मतं मांडणं, अभिव्यक्त कलांना संधी दिली जाणं, अशी या शाळेची अनेक वैशिष्टय़े जाणवली. वर्षभरात फक्त चारच उपक्रम-कार्यक्रम होतात, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, आंबेडकर जयंती, गांधी जयंती याची तयारी एक महिना आधी केली जाते.
मी मुलांचे निरीक्षण करत होते. इथे येणारी जवळजवळ सर्व मुले आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा मागास वर्गातली आहेत. इथं प्रत्यक्ष शिक्षणावर भर आहे. मुलं सतत आनंदी, उत्साही दिसली, निवांतपणे इकडेतिकडे फिरत होती. शैक्षणिक साधनं मुलांनी सहज वापरावी हा त्यांचा हेतू आहे आणि त्यासाठी वाटेल तसा खर्च करण्याची गरज नसते याचीही जाणीव त्यांना असल्याचे जाणवले. ‘दिगंतर’मधील अभ्यासाची पुस्तके मोलाची आहेत. त्यांचा इतरांनाही उपयोग नक्की होऊ शकतो. त्यांचे जे प्रकाशित साहित्य आहे त्यात गणित बोध, भाषा – आरंभिक गतिविधियां, भाषा विकास शृंखला – शिक्षक की पुस्तक, हिंदी – पहली से चौथी पुस्तक, बालगीत – ९३ गीतों का समूह, हस्तकार्य, ‘हम सब तब, और आगे’, ‘जंगल की सभा’, ‘पर्यावरण अध्ययन’, भाषा विकास शृंखला (१० किताबे), भाषा आरंभिक गतिविधियां यात भाषेचे स्वरूप, बोलीभाषा, बोलीभाषेकडून प्रमाण भाषा अशा विषयांचा विचार केला आहे. मुलांसाठी कोणते उपक्रम घ्यायचे, कसे घ्यायचे, त्यांचे मूल्यमापन कसे करायचे याचे अनुभवजन्य विवेचन या पुस्तकात आहे. घर, शेती, परिवार, दागिने, खाद्यपदार्थ, फळभाज्या, शेती उपकरणे, पशुपक्षी, गाणी,
ऋ तू, दिनचर्या, शाळा, वार, वस्तू निरीक्षण, प्रवासाची साधनं, यंत्रं असे अनेक विषय यात असून मुलांनी काय करावे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्या याचे विवेचन भाषिक विकासाच्या दृष्टीने या पुस्तकात केले आहे.
भाषा विकास शृंखलाची १२ पुस्तके आहेत, सगळी गोष्टीची. ही पुस्तके जाणीवपूर्वक तयार केली आहेत. पुस्तके शिकवताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्या याविषयीचे विवेचन महत्त्वाचे आहे. मुलांना आनंद तर वाटेलच, पण मुलांचा भाषिक विकास कसा होईल हेसुद्धा ही पुस्तके सांगतात. पुस्तके वापरताना शिक्षकांची मदतही घ्यावी लागणार नाही. या पुस्तकांतून मुलांपुढे एक आव्हान निर्माण होईल, बौद्धिक स्तरावर सोडवाव्या लागणाऱ्या गोष्टी असतील जे करताना मुलांना मजा वाटेल. ही पुस्तकं वाचताना अशा जागा ठेवल्या आहेत, की मुलं एकत्र येऊन काम करतील, पुस्तकातील कोडी, अपूर्ण विषय-कथाभाग, चर्चेसाठी घेतील. या पुस्तकात अशी सामग्री आहे, की जी मुलांची शिकण्याची वृत्ती वाढवेल, मुलांना स्वावलंबी बनवेल. ही पुस्तकं वाचल्यानंतर त्यांचा परिणाम प्रत्येक मुलाच्या बाबतीत वेगळा असेल. कारण प्रत्येकजण पुस्तकाचा वापर आपल्या भूमिकेतून करेल.
एखादी शिक्षण संस्था आपल्या विचारातून स्वत:चा अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके, शिक्षक पुस्तिका बनवते हेच मुळी वेगळे आहे. प्रत्येक वेळी ‘दिगंतर’ विचारपूर्वक असं मत मांडते, की कोणतीच पद्धती आणि शिक्षणसामग्री पूर्ण-परिपूर्ण नसते. ती नसावीही. त्यामुळे शिक्षणसामग्रीचा वापर शिक्षकांनी आपापल्या स्तरावर, आपल्या पद्धतीने करून पहावा. त्यात बदल करावे, प्रयोग करावे, यातच जिवंतपणा असतो. ‘दिगंतर’ आपले विचार स्पष्टपणे मांडते, अनुभवानं त्यात अधिक परिपक्वता आली आहे. म्हणूनच ‘दिगंतर’ पहाणं हा एक वेगळा अनुभव आहे.
जयपूरसारख्या पर्यटन स्थळासोबत शिक्षणातील हे विद्यातीर्थही आपण पहायला हवं, ही शाळा अनुभवायलाच हवी.
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com