संपदा वागळे
‘व्यक्ती प्राणिप्रेमी असो वा नसो, प्रेम ही भावना प्रत्येकाच्या मनात असतेच. रस्त्यात घायाळ होऊन विव्हळणारा प्राणी दिसला (मग तो उंदीर का असेना) की काळजात हलकीशी कळ उठतेच ना! पण त्याचा जीव वाचवण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं. हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांना देऊन त्यांना ‘प्राणिसाक्षर’ करायचं हे माझं ध्येय झालं..’ सांगताहेत प्राणिप्रेमी आदिती नायर.
प्राण्यांविषयी प्रेम ही आम्हा दोघी बहिणींना आईवडिलांकडून मिळालेली देणगी. बहिणीनं-अरुंधतीनं पशुवैद्य होण्याचं लहानपणीच ठरवलं होतं. पुढे ते तिनं सत्यात उतरवलं. मी मात्र ‘इंजिनीअर होणार’ असा धोशा धरून बसले होते. ‘बी.ई. मेकॅनिकल’ ही पदवी घेतल्यानंतर ‘एम.बी.ए.’ करताना आँत्रप्रेन्युअरशिप संदर्भातल्या रीसर्चसाठी कोणता विषय घ्यावा, यावरच्या चर्चेत आमचे प्राध्यापक डॉ. कौस्तुभ धरगाळकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला जीवनात सदैव खूश राहायचं असेल, तर सर्वप्रथम तुमच्या अंतरात्म्याची ओढ (पॅशन) काय आहे याचा शोध घ्या. त्यानुसार विषय निवडून काम केलंत तर आपण काम करतोय असं तुम्हाला वाटणारच नाही. तुमच्या कष्टांचेही आनंदाचे झरे होतील..’’
त्यांच्या या शब्दांवर मी खूप विचार केला तेव्हा माझ्या मनानं कौल दिला, की मला प्राण्यांच्याच संदर्भात काही तरी करायला आवडेल. झालं! माझा विषय ठरला.. ‘रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांविषयी सहसंवेदना (एम्पथी)निर्माण करणं’. त्यानंतर मी असं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या शोधात सगळा भारत पालथा घातला. केरळपासून सुरुवात करून तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिशा, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड अशा अनेक राज्यांत झपाटल्यागत फिरले. तेव्हा जाणवलं, की ज्यांच्यामध्ये जन्मत: भूतदया आहे अशा काही व्यक्ती, त्यांच्या संस्था अनाथ प्राण्यांसाठी काम करताहेत. पण भटक्या प्राण्यांची संख्या बघता हे काम खूपच तोकडं आहे. सर्वसामान्यांपासून तर हा विषय कोसो दूर आहे. बेघर, कोणीही वाली नसलेल्या प्राण्यांबद्दल आम जनतेच्या मनात आस्था निर्माण झाली, तर त्यांचं जीवन काही प्रमाणात तरी सुखावह होऊ शकेल. हा अभ्यास करताना मला माझ्या जीवनाचा उद्देश सापडला.
२०१० ची ही गोष्ट. त्याच वर्षी मी एका संस्थेची स्थापना केली. ठाण्याची रहिवासी असल्यानं तिथल्या वस्त्यांतून कामाला सुरुवात केली. एकीकडे माझ्या छोटय़ा-मोठया नोकऱ्या चालू होत्या, मात्र दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी एकटीच रस्त्यावरच्या जखमी प्राण्यांचा शोध घेत, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी फिरत असे. माझं काम बघून हळूहळू १५-२० प्राणिप्रेमी माझ्याबरोबर येऊ लागले.
प्रत्येक रविवारी आम्ही आधी एकत्र जमायचो आणि मग जिथे झोपडपट्टी वा चाळी जास्त आहेत असा भाग निवडून (उकिरडे जास्त, म्हणून बेवारस प्राणीही अधिक) तिथे जायचो. रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री किंवा मांजरं, यातील जे आजारानं त्रस्त किंवा जखमी असतील, त्यांना पकडून त्यांच्यावर जागीच औषधोपचार करायचो. अशा भटक्या प्राण्यांना गोचीड खूप त्रास देतात. त्यासाठी औषध लावणं हा मुख्य कार्यक्रम असे. आमचा हा उपक्रम आणि त्याचे व्हिडीओ मी फेसबुक व इतर सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आणि स्वयंसेवकांचा प्रतिसाद वाढू लागला. याच दरम्यान मला समविचारी जोडीदार, पशुवैद्य (सर्जन व फिजिशियन) डॉ. हेमंत ठाणगे भेटला आणि आमच्या कामाला वेग आला. आमच्या लग्नाला कोणतीही आडकाठी नव्हती, फक्त आम्हाला काळजी होती ती दोघांचे कुत्रे एकत्र नांदतील ना याची! तेव्हा माझ्याकडे दोन कुत्रे होते, हेमंतकडे एकच- पण तो कुत्रा अंध होता. मात्र सुदैवानं त्या तिघांनी आपसात जुळवून घेतलं आणि आमचा मार्ग सुकर झाला.
२०१३ अखेर आमचं लग्न झालं. काही महिन्यांतच हेमंतनं नोकरी सोडून स्वत:चं क्लिनिक सुरू केलं. मीही अर्थार्जन थांबवलं, संस्था रजिस्टर केली आणि हेच काम करू लागले. आमचं काम कर्णोपकर्णी पसरू लागल्यावर आम्हाला रस्त्यावरच्या प्राण्यांची दैना सांगणारे खूप कॉल येऊ लागले. एक बोलावणं एका कोपऱ्यातून तर दुसरं पार विरुद्ध टोकावरून. त्यामुळे त्या स्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी, तसंच जर अपघात होऊन प्राण्याची स्थिती गंभीर असेल, तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्हाला वाहनाची निकड भासू लागली. विश्वास ठेवणं कठीण वाटलं, तरी आम्ही निव्वळ लोकांना आवाहन करून ‘क्राऊड फंडिंग’मधून अॅम्ब्युलन्स व्हॅनसाठीचा निधी मिळवला. वाहन हाताशी आल्यावर २०१६ पासून दिवसाला १५ ते २० प्राण्यांवर उपचार करणं आम्हाला शक्य झालं. यासाठी आम्ही आमची रेस्क्यू टीम तयार केली. परिणामी आजवर हजारो निराश्रित प्राण्यांवर उपचार करणं आम्हाला शक्य झालं.
करोनाकाळातली गोष्ट. कळवा स्थानकाजवळील झोपडपट्टी परिसरातून फोन आला, की रेल्वे लाइन ओलांडताना एका कुत्र्याच्या पायावरून गाडी गेल्यानं तो रुळांच्या बाजूला रक्तबंबाळ होऊन पडलाय. त्या वेळी नशिबानं हेमंत व्हॅनबरोबर होता. त्यानं त्याला ताबडतोब आमच्या रुग्णालयात हलवलं. त्यामुळे त्या जीवाच्या प्राणावर बेतलं होतं, ते एका पायावर निभावलं. पूर्ण दोन महिने तो रुग्णालयात मुक्कामाला होता. असे प्राणी- जे त्यांच्या आधीच्या अधिवासात पुन्हा गुजराण करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आणि इतर अनाथ प्राण्यांसाठीही आम्ही दत्तक पालक शोधतो. आनंदाची गोष्ट म्हणजे अपंग प्राण्यांना आपलं मानून त्यांच्यावर प्रेम देणारी देवमाणसंही आपल्या इथे आहेत. आमच्या या ‘किंग’लाही (आम्ही ठेवलेलं त्याचं नाव!) ठाण्यातल्या आरती व राहुल जयराम या दाम्पत्यानं दत्तक घेतलं. आधी एखाद्या भाकरीच्या तुकडय़ासाठी कचऱ्याचा ढीग उकरणारा किंग आता आपल्या नव्या घरी राजासारखा वाढतोय, त्यांच्या गाडीतून भारतभर फिरतोय. आमचा ‘कोको’ तर सातासमुद्रापल्याड थेट अमेरिकेत पोहोचलाय. गेल्या दहा वर्षांत दोन हजारांहून जास्त प्राण्यांना संस्थेतर्फे दत्तक देण्यात आलं आहे. त्या सर्वाची मी नित्यनेमानं खबरबात घेत असते.
अलीकडेच मुंबईतल्या सिडको भागातून एक कुत्री रस्त्यावरच्या अपघातात गंभीर जखमी झाल्याचा कॉल आला. रुग्णालयात आणली तेव्हा ती कोमातच होती. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ती त्यातून बाहेर आली. नंतर तिची शस्त्रक्रिया करून मोडलेला पाय काढून टाकला. इतर जखमा अजून भरायच्या आहेत, त्यामुळे ती अजून रुग्णालयामध्येच आहे; पण मला आशा आहे, की आमच्या या ‘क्वीन’लाही किंगप्रमाणे एखादं चांगलं घर नक्की सापडेल!
आमच्या रुग्णालयात सध्या दहा भटके कुत्रे आणि पाच मांजरी उपचारासाठी दाखल आहेत. काही महिनाभरापासून आहेत, तर काही तीन ते चार महिन्यांपासूनही! रुग्णालयाची निम्म्याहून अधिक जागा यांनीच व्यापली आहे. अर्थात डॉ. हेमंत व डॉ. अरुंधती (माझी बहीण) यांच्या सेवाभावी दृष्टिकोनामुळेच हे शक्य झालंय.
आमच्या घरातही आम्हा दोघांशिवाय आठ कुत्रे, एक मांजर, एक कोंबडा, एक कोकिळा आणि त्यांना सांभाळणारे दोन सेवक एवढा परिवार आहे! आमचा ‘मिंट’ (कोंबडा) घराचा सदस्य कसा बनला ती कथाही आवर्जून सांगावीशी वाटते- अगदी छोटी, मुठीत मावणारी कोंबडीची पिल्लं रंग लावून बाजारात (मुलांना खेळण्यासाठी असावी) विकतात. तशी दोन पिल्लं कोणी तरी घेऊन नंतर रस्त्यात सोडून दिली होती. एका गृहस्थांनी त्यांना पकडलं व आम्हाला फोन केला. मी गेले आणि त्या इवल्याशा जीवांना कुठे सोडायचं म्हणून घरी घेऊन आले. गुलाबी पिल्लाला नाव दिलं कँडी आणि हिरवा मिंट. कँडी वर्षभरात गेला, पण मिंट गेली चार वर्ष आमच्याजवळ आहे. ब्रॉयलर चिकन असल्यामुळे (कोणी पकडून खाऊन टाकतील या भीतीनं) मी त्याला बाहेर सोडत नाही. मात्र तो घरात सर्वत्र फिरत असतो. रात्री आपल्या पिंजऱ्यात झोपतो; पण पहाटे उठून ‘कुकूच कू..’ ओरडायची त्याची पिढीजात सवय कशी जाईल? त्याच्या या रोजच्या आरोळीमुळे आम्ही आधी राहात होतो ती जागा आम्हाला सोडावी लागली. तिथल्या रहिवाशांची तक्रार रास्त होती म्हणा! पण आम्ही आमच्या बाळांना कसं सोडणार? मग आम्ही ओवळा परिसरात एक स्वतंत्र बंगला भाडय़ानं घेतला. इथे खाली-वर जागा असली, तरी आमचे सर्व श्वान आमच्याच बेडरूममध्ये झोपतात. तिघे आमच्या बेडवर आणि पाच त्यांच्यासाठी केलेल्या बेबी बेड्सवर. रोज रात्री हे बेड्स घालणं आणि सकाळी आवरणं हे काम हेमंतचं!
रस्ता अपघातात जखमी झाल्यानं जबडय़ाची सहा ऑपरेशन्स झालेल्या आणि एक डोळाही गमावलेल्या आमच्या ‘मिरॅकल’ला (मांजरीला) बाहेर सोडायलाही माझा जीव धजावला नाही. त्यामुळे तीही घरीच असते. काही महिन्यांपूर्वी कोकिळेची दोन पिल्लं जखमी अवस्थेत माझ्याकडे आली. बरं झाल्यावर एक उडून गेलं, पण दुसऱ्यानं आमच्या बाल्कनीतच मुक्काम ठोकला. दिवसभर ‘कुहू कुहू’ गात असतं. बाहेर गेलं तरी फिरून घरी येतं.
कधी एक-दोन दिवसांसाठी फिरायला म्हणून बाहेर पडलो, तरी आमच्याबरोबर सगळी वरात असते. त्यांनाही थोडा बदल हवाच ना! दोन वर्षांपूर्वी आम्ही केळवा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो, तेव्हा आमचं हे विस्तारित कुटुंब तिथल्या सर्वाच्या चर्चेचा विषय बनला होता.
अपघातात पाय वा दृष्टी गमावलेल्या प्राण्यांना उपचारानंतर कुठे सोडायचं हा माझ्यापुढचा यक्षप्रश्न होता. कारण सर्वाना पालक मिळणं अशक्य असतं, तसंच त्यांना रस्त्यावर जगणंही कठीण! शेवटी मी धीर करून दोन वर्षांपूर्वी ठाण्यात गायमुख परिसरातल्या दुर्गम भागात सोळा गुंठे जागा भाडय़ानं घेतली. तिथे आवश्यक त्या सोई केल्या. आज या आश्रमात २५ कुत्रे आणि एक गाढव (मादी-मॉली) राहताहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी सहा कर्मचारी आहेत. ही मॉली माझ्याकडे दोन वर्षांपूर्वी आली, तेव्हा फक्त एक महिन्याची होती. कापूरबावडी भागात फिरताना तिच्या पायांवरून चारचाकी गाडी गेली. रुग्णालयातल्या उपचारांनंतर तिला इथे ठेवलंय. आता ती आपल्या लंगडय़ा पायानं आवारात ठुमकत असते. माझ्या या लाडूबाईला रोजची आठ किलो गाजरं लागतात. त्यासाठी मला दर तीन दिवसांनी हजारभर रुपयांची गाजरं आणावी लागतात.
आश्रमातल्या सर्व प्राण्यांना आठ दिवसांनी श्ॉम्पू लावून आंघोळ घालावी लागते. जे कुत्रे दहा-बारा वर्षांचे, म्हणजे म्हातारे झाले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही बंगळूरूवरून एक खास आयुर्वेदिक उटणं मागवतो. ते तेलात मिसळून लावलं, की त्यांची रूक्ष त्वचा मऊ होते. या कामासाठी पैसा तर लागतोच, शिवाय मदतीचे हातही. निधीसाठी मी फेसबुक, इन्स्टाग्राम अशा माध्यमांतून सतत आवाहन करत असते, व्हिडीओ टाकत असते. गेल्या नऊ-दहा वर्षांच्या प्रयत्नांतून लोकजागृतीही होऊ लागलीय. व्हॅन दुसऱ्या मदतकार्यात असेल, तर लोक जखमी प्राण्याला स्वत:च रुग्णालयात घेऊन येतात. झोपडय़ांत राहणारेही व्हॅनच्या पेट्रोलसाठी शंभर रुपयांची तजवीज करतात. आता असेही फोन येतात की, ‘‘मागे तुम्ही हे हे औषध दिलं होतं. या वेळी तीच लक्षणं आहेत, मग तीच गोळी देऊ का?’’ नंतर तो प्राणी बरा झाल्याचाही कॉल येतो, तेव्हा आजवरच्या तपश्चर्येचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मदतनीसांच्या बाबतीत मी भाग्यवान आहे. माझ्या मोबाइल व्हॅनवरची तरुण मुलं म्हणजे आमच्या ‘माय पॅल क्लब फाऊंडेशन’चे हिरे आहेत. कायद्याचा अभ्यास करणारा चिन्मय आढाव, याचं भटक्या प्राण्यांवर विलक्षण प्रेम.
तो व त्याची आई उज्ज्वलाताई हे दोघं ते राहातात त्या ‘वसंत विहार’परिसरातल्या शंभर-सव्वाशे भटक्या कुत्र्यांना रोज रात्री चिकन करी आणि भाताचं जेवण देताहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांचं हे काम सुरू आहे. त्यासाठी या मायलेकांनी आपापले रस्ते वाटून घेतलेत. रात्री नऊ-साडे नऊला त्यांचं हे फिरतं अन्नछत्र चालू होतं आणि सर्वाची तृप्ती होईपर्यंत कधी कधी बाराही वाजून जातात. एवढय़ा सगळय़ांसाठी रोज स्वयंपाक करणं ही आईनं घेतलेली जबाबदारी, तर त्यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था वडिलांची जबाबदारी! आमच्या कामाशी संलग्न होण्याआधी चिन्मय त्याच्या कुत्र्यांपैकी कोणी आजारी असेल, तर आम्हाला फोन करे. जेव्हा त्याला आमच्याविषयी अधिक समजलं तेव्हा तो आम्हाला मदत करू लागला. आता तो आमची हेल्पलाइन सांभाळतो. त्याबरोबर रेस्क्यू ऑपरेशनला जाणं, लोकांना उपचारांसाठी शिक्षित करणं यातही तो तरबेज आहे. रोशन ठाकूर हा शाळकरी मुलगा आमच्याकडे आला, तो रस्त्यात सापडलेल्या दोन जखमी पपींना उराशी धरूनच! त्यांना बरं करा, म्हणून गयावया करत होता. आम्ही त्यालाच प्रशिक्षण दिलं. नंतर ती पिल्लं त्यानं घरी नेऊन स्वत:च तंदुरुस्त केली. या अनुभवानंतर तो आमच्या कार्याकडे ओढला गेला. तोही रेस्क्यू टीमचा उत्साही सदस्य आहे. रोशनचा पशुवैद्य होण्याचा निर्धार आहे.
ठाण्यातील ‘नंबर वन डॉग कॅचर’ म्हणून ओळखला जाणारा हरीश माझ्याकडे आला तो प्लंबर म्हणून. नंतर हे काम बघून तो आम्हाला चिकटला. आम्ही त्याला ड्रायिव्हग शिकवलं. आता तो अॅम्ब्युलन्स तर चालवतोच, शिवाय कितीही चावरा-बोचरा कुत्रा असला तरी त्याला शिताफीनं पकडतो. रेस्क्यू ऑपरेशनसाठी या मुलांबरोबर बऱ्याचदा मीही जात असते. या कामात माझाही जीव गुंतलाय. ही तरुण, तत्पर, तडफदार मुलं हे आमच्या कामाचं वैभव आहे. एखादा प्राणी खूप प्रयत्न करूनही आमच्या डोळय़ांसमोर अखेरचा श्वास घेतो, तेव्हा सर्व जण मूक होतात. आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेल्यासारखं दु:ख आम्हाला होतं. मृत प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईत फक्त परळ इथेच सुविधा आहे. तिथले दरही सेवाभावी संस्थांना परवडणारे नाहीत. दफन करायचं, तर पुरेशी जागा नसते. तरीही एखादा प्राणी आमच्याकडे एक दिवस आधी का आला असेना, मृत्यूनंतर त्याला त्यांच्या स्मशानभूमीतच नेलं जातं. पुढचा जन्म अधिक चांगला मिळावा यासाठी मनोमन प्रार्थना केली जाते.
रस्त्यावरील निराधार प्राण्यांचं जीवन सुखकर व्हावं म्हणून आमचे आणि आमच्यासारख्या इतर प्राणिप्रेमींचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांची प्रचंड संख्या बघता ते पुरेसे नाहीत याची जाणीव होते. त्यामुळे जनतेच्या मनात या जीवांबद्दल आस्था निर्माण करणं, ‘ढाई अक्षर प्रेमके’ हे कबीरांचे बोल त्यांच्या मनात रुजवून त्यांना प्राणिसाक्षर करणं हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे असं मला वाटतं. म्हणूनच साद घालताच धावून जाणारी, उपचारांबरोबर लोकजागृती करणारी मोबाइल (फिरती) युनिट्स ठिकठिकाणी सुरू व्हावी हे आमचं ध्येय आहे. याबरोबर रस्त्यावर राहाणाऱ्या, थकलेल्या, जर्जर प्राण्यांना जगणं कठीण होतं म्हणून त्यांच्यासाठी वृद्धाश्रम काढण्याचाही आमचा मनोदय आहे. मला माहीत आहे की हे शिवधनुष्य उचलणं अतिशय आव्हानात्मक आहे. पण लोकांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. ‘तुम्ही-आम्ही मिळून इतिहास घडवू शकतो’ यावर असलेल्या दृढ विश्वासातून हे निश्चित साध्य होईल असं वाटतं..
waglesampada@gmail.com