|| प्रभा गणोरकर

‘कसाही का असेना, पण कपाळी कुंकू ठेवणारा नवरा, मुले, आपले घर, तिथली भांडीकुंडी, आसरा देणारी जमीन यासाठी बायका अहोरात्र राबत असतात. त्या संसारासाठी त्या उपासतापास, नवससायास करतात, हाडे झिजवतात; पण हे सारे आपण कशाला करीत होतो, असा हताश करणारा प्रश्न विचारणारा क्षण त्यांच्या आयुष्यात उगवतोच..’ जी.ए. कुलकर्णीच्या ‘पिंगळावेळ’मधल्या लक्ष्मीची ही सार्वत्रिक असलेली व्यथा..

स्त्रीत्वाचे विविध रूपबंध जी. ए. कुलकर्णी यांनी प्रकट केलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या वर्तुळात वावरणारी स्त्री आणि तिचे सार्थकतेपर्यंत कधीच न पोहोचू शकणारे जगणे त्यांनी अनेक कथांमधून व्यक्त केले आहे. ‘प्रदक्षिणा’तील शांताक्का, ‘कैरी’तील तानीमावशी, ‘तुती’मधली सुम्मी, ‘शेवटचे हिरवे पान’मधली सीताक्का या काही स्त्रिया त्यांच्या कथांमधून बाहेर पडतात आणि आपल्या मनात कायमच्या वस्तीला येतात.

‘पाणमाय’मधली ‘ती’ आता जरी तृप्त वाटत असली तरी वैभवापूर्वीचे तिचे जगणे म्हणजे नवरा पुष्ट अळीप्रमाणे खायला सोकावलेला. संसाराची त्याला चिंता नाही, दळणकांडण करून तिच्या हाताला पशापशाएवढे घट्टे पडलेले, दुसऱ्यांच्या घरी मिरचीची पूड कुटताना गुडघ्या-ढोपराखाली हातपाय दिवटय़ा पेटवल्याप्रमाणे अदृश्य आगीने सतत जळत राहत. दारिद्रय़ आणि भुकेची कुरतड असह्य़ होऊन एका रात्री ती घराकडे पाहून हात जोडते आणि विहिरीच्या पायऱ्या उतरू लागते, तेवढय़ात विहिरीतली पाणमाय तिची सोन्याच्या चकत्यांनी ओटी भरते. दिवस पालटतात, घरात कस्तुरी दरवळू लागते; पण हा चमत्कार कसा घडला हे तिने कुणाला सांगायचे नाही ही पाणमायची अट असते. नाही तर त्या दिवशी तुझे आयुष्य संपेल, असे तिने म्हटलेले असते आणि ते रहस्य तिला सांगावेच लागते. ती मुलांना विचारते, ‘‘मग मी मेले तरी चालेल?’’ ‘‘हो चालेल,’’ छोटा म्हणतो. ‘‘राहू दे गं, त्याचे काय एवढे महत्त्व आहे, आम्हाला तूच हवी आहेस,’’ असे घरातल्याने, कोणी एकाने तरी म्हणावे असे तिला वाटते आणि तसे कुणीही म्हणत नाही आणि त्या क्षणी प्रत्येकाशी असलेला एकेक अदृश्य धागा तुटून जातो. पुन्हा ती विहिरीकडे जाते. पाणमाय तिला जवळ घेते. सुख अंगावर आले की घरातल्यांना आपण नको नको होतो. ओंजळीओंजळीने देत राहणे एवढाच आपला शेर! तो सरला की पाण्याच्या माहेरी जावे, पाणी आपल्याला जवळ घेते.

‘पिंगळावेळ’ कथासंग्रहातील लक्ष्मीलाही जगण्याच्या निर्थकतेचा हा दाहक प्रत्यय येतो. तिच्या चुलत्याने तिला बोहल्याकडे धाडले आणि पहिल्या बायकोपासून श्रीपाद नावाचा चांगला जाणता मुलगा असलेल्या ऐदी केसूभटाशी तिची गाठ बांधली गेली. उपाशी राहीन, पण गवत खाणार नाही, असे टेचात म्हणणारा केसूभट एखाद्या वेळी जरी समोर भात नसला तर काचेवर टवके पडतील अशा अभद्र शिव्या देत असे. तिच्या लुगडय़ाला दंड घातलेला, मुलीच्या केसाला बोटभर तेल नाही. तिचा संताप संताप होतो. आपण हाडे झिजवीत पाणी भरावे, ज्यातला एक घासही आपल्या पोटात जात नाही असे मसालेदार जेवण परक्यांच्या घरी उकडावे, एकदाही नवे स्वच्छ कपडे आपल्याला मिळू नयेत, रात्रभर भुकेचीच स्वप्ने पडत राहणार नाहीत एवढे तरी अन्न मिळू नये, असे आपण केले आहे तरी काय? चिवचिवणाऱ्या चिमणीच्या चोचीवर टाकायलादेखील घरात एक दाणा नाही अशा एका संध्याकाळी जोगवा मागायला गंगू जोगतीण येते आणि एखाद्या देवळातल्या देवाला, करकरीत तिन्हीसांजेच्या वेळी उलटय़ा प्रदक्षिणा घालण्याचा उपाय तिला सांगते. गाऱ्हाणे घालून देव उठत नाही तर चिडवून त्याला जागे कर! कपिलेश्वराच्या देवळात लक्ष्मी रोज संध्याकाळी जाऊन एकवीस दिवस प्रदक्षिणा घालते. शेवटच्या दिवशी देवळातून बाहेर यायला निघते तो एक भलामोठा अजगर देवळात पसरलेला असतो. लक्ष्मी भयाने थरथरत बराच वेळ उभी राहते. देवा, तूच वाचव मला यातून. पोरं घरी वाट बघत असतील, माझ्या पोरांना अनाथ करू नकोस.. देवाने प्रार्थना ऐकल्याप्रमाणे, अजगर वाटेतून बाजूला सरकतो. लक्ष्मी कृतज्ञतेने त्याच्या शेपटीला हात लावते, तो काय चमत्कार! शेपटाचा तुकडा सोन्याचा होऊन तिची बोटे चेंगरतात. लगड घेऊन ती घरी येते. घरी आल्यावर सारी हकीकत सांगितल्यावर लक्ष्मीला वाटते, एवढय़ा मरणातून आपण सुटलो म्हणताच मुले सोने टाकून गलबला आपल्याला बिलगतील, नवरा निदान दोन शब्द प्रेमाने बोलेल, तर तो विचारतो, साप केवढा होता? खूप मोठा होता, असे तिने सांगितल्यावर तो कपाळ बडवून घेतो. सगळा अजगर समोर असताना ती फक्त एवढासा शेपटीचा तुकडा घेऊन येते म्हणून तिला दूषण देतो. दररोज रक्त जाळीत आपण यांची पोटं भरतो, त्यांनी आयुष्यात कधी मिळवलं नव्हतं तेवढं आपण प्राणपणानं घरी आणतो याचे त्यांना काही सोयरसुतक नाही याची जाणीव लक्ष्मीला होते. आपण सकाळ-संध्याकाळ राबतो; पण त्याची कोणाला किंमत नाही. आपण जेवलो की नाही याची चौकशी करावी असे कुणाला वाटत नाही. लक्ष्मीचा तिळपापड होतो. ती जोरात सोन्याची लगड फेकते, ती केसूभटाच्या डोक्याला लागते आणि रागाने श्रीपाद तिला घरातून बाहेर काढतो. पोरं माझी वाट बघत असतील.. त्यांना अनाथ होऊ देऊ नकोस, असे म्हणणाऱ्या लक्ष्मीला घराबाहेर काढले जाते. कृष्णेलाही तिच्याबरोबर जायचे नाही. रोज लोकांच्या घरी स्वयंपाक करून परतताना उन्हाचे चटके तिच्या अनवाणी पायांना बसत, त्याहून जास्त चटके केसूभटाच्या बोलण्याने तिला बसले आहेत. त्या क्षणी तिला सगळे एकदम परके होऊन जाते. आतापर्यंत घर असलेल्या भिंती मातीचे केवळ ढिगारे होऊन जातात. थोडी भांडी, दांडीवरचे कपडे, घर उबदार करणारा प्रकाश आपल्यासाठी नाही आणि रात्री कुचंबलेले अंग पसरताना आईप्रमाणे वाटणारी भुई पावलांना थंड, बोचरी वाटू लागते.

आता तिला पुन्हा कपिलेश्वराच्या देवळाचाच आसरा होता. तिथे ती येते. त्याच्याचमुळे ही वेळ आपल्यावर आली असे क्षणभर तिला वाटते; पण तसे नव्हते. धड अन्न-वस्त्र मिळावे यासाठी तिने मनावर दगड ठेवून उलटय़ा प्रदक्षिणांचा तो अघोरी उपाय केला होता. देवाचा काही दोष नव्हता. ती ज्यांच्यासाठी खपत होती, हाडे झिजवत होती, ती माणसे उलटली होती. त्यांनी तिला परके करून सोडले होते. कपिलेश्वराच्या देवळासमोरच असणारा चौकोनी तलाव नि कुणी एखादा दगड टाकला की त्रस्त झाल्याप्रमाणे वाटोळा डोळा उघडून पाहणारे हिरवे पाणी, त्या कपिलतीर्थाच्या भिंतीवर बसणारी दुसऱ्या जगातली माणसे.. त्यातलीच एक वृद्धा लक्ष्मीचा हात धरते नि तीर्थाच्या पायऱ्या उतरून तळव्यांना थंड स्पर्श करण्यासाठी पाण्याचा हिरवा पडदा बाजूला करीत लक्ष्मी आत शिरते.

कसाही का असेना, पण कपाळी कुंकू ठेवणारा नवरा, मुले, आपले घर, तिथली भांडीकुंडी, आसरा देणारी जमीन यासाठी बायका अहोरात्र राबत असतात. तानीमावशी म्हणते त्याप्रमाणे तिला काय घोडागाडय़ा, वाडा, अंगावर पासरीभर सोनं नको असतं. पोटापुरतं खायला असावं, आपला म्हणता येईल असा संसार असावा. डोकंभर प्रकाश, पाऊलभर ओल एवढय़ावरच समाधानाने जगणाऱ्या बाभळीच्या झाडाप्रमाणे त्या समाधानाने जगू शकतात. त्या संसारासाठी त्या पोथ्यापुराणे वाचतात, उपासतापास करतात, नवससायास करतात, हाडे झिजवतात आणि हे सारे आपण कशाला करीत होतो, असा हताश करणारा प्रश्न विचारणारा क्षण त्यांच्या आयुष्यात उगवतो. त्यानंतर जगण्याला अर्थच उरत नाही. ओसाड, टाकून दिलेले भग्न मंदिर आणि त्याच्याजवळच असणारा लोकांनी टाकून दिलेला तलाव यांचा आश्रय घेणे एवढेच त्यांच्यासाठी उरते. माहेरची शेवटची आठवण असलेले सोन्याचे फूल, ट्रंकेत जपलेली माहेरची हिरवी पठणी, शाकंबरीच्या देवळापाशी असणारे निळेशार पाणी असणारे तळे हे सारे त्यांच्या आयुष्यातून एकएक करीत निघून गेलेले असते; पण जे मिळाले ते स्वीकारत त्या जगत राहतात. तेही हिरावून घेतले जाते तेव्हा त्या पाण्याचा तो हिरवा पडदा बाजूला सारून दुसऱ्या जगात निघून जातात. अशा हजारो बायकांपकी लक्ष्मी ही एक आहे.

prganorkar45@gmail.com