ईशा देशपांडे
नकुल आणि माझं ‘लव्ह कम अरेंज मॅरेज’! नकुल इंजिनीअिरग करता करता एक छोटासा व्यवसाय करत होता. तो खूप कमी वयातच प्रगल्भ, अतिशय मेहनती आणि स्वतंत्र वृत्तीचा झाला. वयानं लहान असला तरी तो माझ्या बाबांचा व्यवसायातला सहकारी होता. कामानिमित्त माझ्या बाबांची आणि त्याची सतत भेट होत असे. यातूनच त्या दोघांची मैत्री झाली.

या दरम्यान मी पदवीचं शिक्षण घेत होते. बाबा आणि नकुलच्या भेटींमुळे आम्हा दोघांच्याही भेटी होऊ लागल्या आणि ओळख वाढली. मला तो करिअर, अभ्यासाचं महत्त्व, नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करायचा. भरपूर शिकायला प्रोत्साहन द्यायचा. त्याच्या बोलण्यात वेगळीच ऊर्जा व सकारात्मकता असायची आणि अजूनही असते. आमचे विचार जुळत गेले आणि आम्ही खूप छान मित्र झालो. काही महिन्यांनी नकुलनं मला लग्नासंबंधी विचारलं, तेव्हा मी पटकन ‘माझ्या आई-बाबांना पटणाऱ्या आणि आवडणाऱ्या मुलाशीच लग्न करीन’ असं सांगून मोकळी झाले. योगायोगानं काही दिवसांतच मी, माझी आई, नकुल आणि त्याचे आजोबा पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलो. नकुलच्या आजोबांना माझ्यात त्यांची नातसून दिसली. देवाला नमस्कार करताना मी आणि नकुल नकळत शेजारी शेजारी उभे राहिलो होतो आणि ते बघून, विठ्ठल-रुक्मिणीचाच हा आशीर्वाद आहे, विठ्ठलच आपल्याला हे सुचवत आहे की काय, असं आजोबांना वाटून ते खूप भावुक झाले. या प्रसंगानंतर लगेच नकुलच्या घरातून मला लग्नाची मागणी आली. माझ्या आई-बाबांनी हा निर्णय पूर्णपणे माझ्यावर सोपवला होता. माझ्या मनानं कधीच कौल दिलेला, पण आई-बाबांचं मत माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. नंतर मला कळत गेलं, की माझ्या आई-बाबांना नक्की खात्री होती की नकुल मला कायम सुखात ठेवेल. त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे खूप काही विचार करण्यासारखं नव्हतंच. मात्र आई-बाबांसाठी फक्त एकच गोष्ट विचार करण्यासारखी होती, ती म्हणजे मी पदवीच्या शेवटच्या वर्षांला होते. पण नकुल थांबायला तयार होता. मी पदवी मिळवल्यानंतरच आमचं लग्न झालं. लग्नानंतरही मी पुढे शिकण्यासाठी नकुल आणि त्याच्या घरच्यांचा कायम आग्रह होता.

सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आल्यापासून आमची भावनिक आणि बौद्धिक प्रगतीच झाली. आमच्या दोघांच्या आयुष्यातली ‘प्रॉडक्टिव्हिटी’ वाढली आणि मानसिकदृष्टय़ा आयुष्य सुटसुटीत झालं. आमच्या दोघांच्याही आयुष्याला एकमेकांमुळे वेगळा अर्थ आला. हेच प्रेम असावं. त्याला माझा स्वभाव आणि नम्रपणा- जो माणसं जपताना सगळय़ात महत्त्वाचा असतो हे भावलं. एखाद्यावर प्रेम करायला फक्त चांगलं दिसणं एवढंच कधीच कारण होऊ शकत नाही. नकुल विचारी, प्रेमळ, दुसऱ्यांचा विचार करून वागणारा, समंजस आहे.

आम्हाला मुलगा झाला, रिहान. तो आता पहिलीत आहे. आई-बाबा झाल्यावर दोघांनी ही जबाबदारी नकळतपणे वाटून घेतली. चुकत चुकत, चुका सुधारत, एकमेकांना सहकार्य करत गेलो. जिथे तो नाही तिथे मी आणि जिथे मी नाही तिथे तो, अशा प्रकारे आयुष्यातल्या जागा भरत गेलो. आई-बाबा ही नवीन जबाबदारी होती. त्यामुळे व्यावसायिक व व्यक्तिगत गोष्टींचा समतोल राखणं दोघांच्याही दृष्टीनं कसोटीचं होतं. पण माझे आई-वडील आणि सासू-सासरे यांचा भक्कम आधार मोलाचा ठरला. त्यांच्यामुळे आम्हाला मानसिक आधार मिळाला आणि आमच्या सगळय़ा जबाबदाऱ्या- व्यावसायिक वा व्यक्तिगत आम्ही पेलू शकलो. माझे आई-बाबा पुण्यातच असतात, त्यामुळे ते आमच्या मुलाला उत्तम सांभाळतात आणि त्याच्यावर संस्कार करतात. त्यासाठी त्यांच्या आयुष्यात लहानमोठय़ा तडजोडीही करतात. म्हणून आम्ही कुठेही अगदी शांतपणे, मोकळेपणानं जाऊ शकतो, आमच्या कामावर शंभर टक्के लक्ष केंद्रित करू शकतो. त्याबरोबर माझ्या व्यावसायिक भेटीगाठी वा इतर कामासंदर्भातल्या भेटीगाठी, या सगळय़ासाठी माझ्या सासू-सासऱ्यांनी मला नेहमी समजून घेतलं, प्रोत्साहित केलं. ते मला आपली मुलगीच मानतात आणि कधी दुजाभाव करत नाहीत.

नकुलनं मला स्वत:ची ओळख निर्माण करायला आणि स्वत:ची आवड जपायला प्रोत्साहित केलं. टाळेबंदीमध्ये मी नकुलच्या मदतीनं एक छोटासा व्यवसाय चालू केला. त्याचा नेहमी आग्रह असतो, की मुलींनी नेहमी स्वत:च्या पायावर उभं राहावं, मग भले तिला गरज असो वा नसो. या आमच्या व्यवसायात इतर कोणत्याही व्यवसायासारखीच भरपूर आव्हानं आली. पण आम्ही दोघांनी संघर्ष करत, त्यातून शिकत यशस्वीरीत्या आव्हानांवर मात केली.

माझे आजेसासरे नेहमी माझ्या हातच्या साजूक तुपातल्या शिऱ्याची फर्माईश करायचे. घरातल्या सगळय़ांनाच मी केलेला शिरा आवडायचा. एकदा मी एक वेगळय़ा प्रकारचा शिरा केला आणि घरातल्या सगळय़ांना तो एवढा आवडला, की माझ्या सासऱ्यांनी मला सुचवलं, की ‘तू वेगवेगळया प्रकारचे शिरे बनवून त्याचा व्यवसाय का नाही सुरु करत?’ हा विचार मी गंभीरपणे घेतला आणि गेल्या दोन वर्षांत आमच्या‘द हाऊस ऑफ शिराज्’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमचा शिरा पुणे, मुंबई, बंगळूरु, अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या ठिकाणीही पोहोचला. माझ्या व्यवसायात आई, सासूबाई आणि माझ्या ७५ वर्षांच्या आजीचे सल्ले खूप महत्त्वाचे ठरले. तसंच माझ्या वडिलांचे अर्थविषयक सल्ले मोलाचे ठरले.

नकुलचा परिवार मोठा. घरात सतत माणसांची वर्दळ. पण मीही त्यात छान मिसळून गेले. प्रथम हे सारं थोडं अवघड गेलं, कारण मला त्याची सवय नव्हती. पण नकुल माझ्या पाठीशी खंबीर नवरा म्हणून उभा राहिला. नकुलचा व्यवसाय असल्यामुळे सतत नवीन आव्हानं, चढउतार, आर्थिक असुरक्षितता हे असतंच. पण ते समजून घेऊन वागणं, त्याच्या मागे उभं राहाणं हे नकळतपणे मी करत गेले. नकुल नेहमी म्हणतो, की ‘तू कधी कुठल्याही प्रकारचा हट्ट नाही केलास, तुला कसला हव्यास नाही आणि परिस्थितीला सामोरं जायचा तुझा स्वभाव पहिल्यापासूनच मला भावला. त्यामुळे मलाही भावनिक आधार मिळतो. तू माझ्या कुटुंबाची काळजी घेतेस म्हणून मी चांगल्या प्रकारे माझ्या व्यवसायाकडे लक्ष देऊ शकतो. तुझ्या व्यवसायातल्या आव्हानांनाही तू हसतमुखानं सामोरी जातेस आणि तुझ्या याच सकारात्मक स्वभावामुळे घरातलं वातावरण नेहमी हलकं राहातं.’

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, की ( You are the architect of all your dreams!) हा विचार आमच्या दोघांसाठी अगदी खरा ठरला. एकत्र बघितलेली स्वप्नं पूर्ण करताना अनेक वेळा कधी आर्थिकदृष्टय़ा, कधी मानसिकदृष्टय़ा खचायला होणं स्वाभाविक आहे. पण एकमेकांच्या आधारामुळे आम्ही दोघं हे सहजपणे करू शकतो आहे. ‘एक दूसरे की सीडी बनके, एक दूसरे को आगे बढाओ’ हेच आमचं जगण्याचं तत्त्वज्ञान आहे.

नातं मुरू लागलंय..

कल्पिता सावंत
३ जून २०२२ ला आमच्या सहजीवनाला ११ वर्ष पूर्ण झाली. दोघांचे विभिन्न स्वभाव आणि त्यात ‘अरेंज मॅरेज’ त्यामुळे आपण संसार कितपत निभवू, याची आम्हालाच खात्री नव्हती, पण एकमेकांच्या साथीनं ही वर्ष सहज सरली, कधी चुका करत, कधी त्या सावरत, कधी धडपडत, कधी हसत, कधी रडत, कधी भांडत, कधी समजावत, वेगवेगळे अनुभव देत गेली.

या काळात आम्ही दोघांनी खूप चढउतार पाहिले आणि खऱ्या अर्थानं एकत्र ‘वाढलो’, ग्रो झालो. म्हणून तर आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला ‘ग्रोथ डे’ म्हणतो. कारण ज्या दिवशी लग्नाची वीण बांधली गेली त्या दिवसापासून अनेकविध आव्हानं झेलत संसाराचा पसारा चांगल्या अर्थानं वाढवत गेलो आणि तो वृद्धिंगत होतच राहील, याची सर्वार्थानं आम्हाला खात्री आहे.

गौरव एक उच्च मध्यमवर्गीय व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात वाढलेला. हवं ते सहज उपलब्ध असणारा, लाडाकोडात वाढलेला मुलगा. कॉम्प्युटर इंजिनीयिरग पूर्ण करून त्यात त्यानं मास्टर्स केलं होतं आणि मी अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. ‘एम.एससी.’ करत असतानाच भरतनाटय़मचं प्रशिक्षण पूर्ण करत याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत होते. घरच्यांनी एका कौटुंबिक कार्यक्रमात आम्हा दोघांची ओळख करून दिली आणि आमचं शिक्षण पूर्ण होताच आमचं शुभमंगल करून मोकळे झाले. म्हणजे शिक्षण पूर्ण करून गौरवला नोकरी लागण्याआधीच आमचं लग्न झालं होतं. मग लग्नानंतर त्याची नोकरीसाठी धडपड सुरू झाली, मात्र तो काळ रिसेशन अर्थात मंदीचा होता. त्यामुळे त्याचे अनेक इंटरव्ह्यू होत, पण पदरी अपयशच येत होतं. त्या तुलनेत मी माझ्या करिअरमध्ये स्थिर व्हायला लागले होते, कारण मी नुकतीच एका स्पर्धेत ‘श्रावण क्वीन’ ठरले होते. नाटक, मालिकांमध्ये छोटीमोठी काम करत होते. त्याच बरोबरीनं भरतनाटय़मचे नृत्यवर्गही घेत होते, पण आर्थिक बाजू तशी अस्थिर होती. कलाक्षेत्रात असल्यामुळे कामाचे तास ठरलेले नसायचे, दौऱ्यांवर जावं लागायचं, घरी येण्याची वेळ ठरलेली नसायची. या सगळय़ाची घरच्यांना सवय नव्हती आणि त्यात गौरवला नोकरी मिळत नव्हती त्यामुळे तो घरीच असायचा. अशा वेळी टिपिकल समाजात होतं ते त्यालाही ऐकायला लागलं. टोमणे, गॉसिप सगळय़ालाच ऊत यायचा, पण त्यावेळी गौरवनं मात्र मला खंबीर साथ दिली. त्यानं माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि माझ्या बाजूनं कायम उभा राहिला. एक साधा किस्सा सांगते, एका कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रण होतं. गौरवसुद्धा सोबत होता, कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी माझ्याबरोबर गौरवाचाही सत्कार केला. मी लग्नानंतरसुद्धा माहेरचंच, मोरे आडनाव लावत असल्यानं निवेदकाने त्याचं नाव गौरव राणे असं घेतलं. नेमकं तिथे उपस्थित गौरवच्या कुणा नातेवाईकांनी ते ऐकलं आणि घरी येऊन सांगितलं. पण सांगताना सर्वासमक्ष म्हणाले, ‘‘बेरोजगार असलं म्हणजे लोक असं बायकोच्या नावानं ओळखू लागतात.’’ तेव्हा गौरवनं जे उत्तर दिलं ते मलाही अनपेक्षित होतं. तसा तो उलट उत्तर देणाऱ्यातला नाही. तरी त्यानं तोडीस तोड उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘‘बायकोच्या नावानं ओळखतात हे मी माझं भाग्य समजतो. कारण इतकी कर्तृत्ववान बायको प्रत्येकालाच मिळत नाही, खूप पुण्यवान असावं लागतं त्यासाठी.’’ या वाक्यानं बोलणाऱ्यांच्या तोंडाला कायमचं टाळ लावलं. हे कितीही फिल्मी वाटलं तरी आम्ही हे अनुभवलंय.

या सगळय़ा काळात त्याचे नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न मला दिसत होते आणि सतत येणारं अपयश त्याला निराश करत होतं. त्याची घालमेलही मला समजत होती. एक वेळ आली, की घरच्यांनीही त्याची साथ सोडली. गौरवला मी धीर देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, पण तो खचत चालला होता आणि त्याचवेळी मला दोन चित्रपटांच्या मध्यवर्ती भूमिकांसाठी ऑफर आल्या. शूटिंगसाठी बाहेरगावी जावं लागणार होतं, सहा महिन्यांसाठी. मात्र गौरवची मनस्थिती खूपच खालावलेली होती, त्याला भक्कम आधाराची गरज होती. मी ठामपणे ठरवलं, चित्रपट नंतरही करता येतील आपलं माणूस महत्त्वाचं. मी त्याला म्हटलं, तू क्षेत्रच बदल. तुला पटत असेल आणि इंटरेस्ट असेल तर तू IATA ( International Air Transport Association)कोर्स कर, त्यानं मन लावून तो अभ्यासक्रम पूर्ण केला. नेमकं त्याच वेळी आम्हाला आम्ही दोघांचे तिघं होणार असल्याची गोड बातमी कळली. मग काय, तेव्हा आम्हीच आमचा आधार झालो आणि त्याच दरम्यान आमच्या चिरंजीवांचा जन्म झाला.. तोच गौरवसाठी लकी चार्म ठरला. गौरवला नोकरी लागली. बाळाकडे पाहायला कुणी नसल्यानं आणि गौरवच्या नव्या पगारात भागण्यासारखंही नव्हतं म्हणून मी एका शाळेत नृत्य शिक्षिकेची नोकरी स्वीकारली, जेणेकरून संसारालाही हातभार लागेल आणि बाळाकडेही लक्ष देता येईल. तो काळ खूप कठीण होता आमच्यासाठी. त्या वेळी जी जी म्हणून माणसं आमच्या मदतीला आली ती खरोखरच आमच्यासाठी देव होती. कारण फक्त नेसत्या कपडय़ानिशी एकमेकांच्या साथीनं लेकरासह आम्ही घराबाहेर पडलो होतो. आता हळूहळू एक एक वस्तू जोडत संपूर्ण संसार उभा केला.

दोघंही खरं तर नोकरी करत होतो, पण माझ्यातला कलाकार घुसमटत होता. गौरवला ही घुसमट कळत होती. शेवटी त्यानं एक दिवस मला म्हटलंच, ‘‘तू नोकरी सोड आणि पुन्हा नृत्यवर्ग घ्यायला लाग, ऑडिशन दे. आता बाळही मोठा झालाय.’’ तो हे म्हणाला खरा, पण मलाच धीर होत नव्हता. स्थिरतेकडून पुन्हा अस्थिरतेकडे वळायचं? मी काही इतक्या सहजासहजी ऐकणार नाही, असं गौरवच्या लक्षात आल्यावर त्यानं माझ्या नकळत, ‘मिसेस इंडिया, वल्र्डवाइड’साठी माझा अर्ज भरला. मी निवडले गेल्याचा ईमेल आला तेव्हा गौरव म्हणाला, ‘‘तुझी जागा तिथेच आहे कलाक्षेत्रात. तुला संधी मिळाल्याशिवाय तू या रामरगाडय़ातून बाहेर येणार नाहीस. गो फ्लाय’’ त्यानं असं म्हटल्यावर मागे फिरायचा प्रश्नच येत नव्हता. मी नोकरी सोडली. त्या स्पर्धेत मी ‘ फायनल टॉप १०’ मध्ये आले आणि ‘मिसेस टॅलेन्टेड’ चा किताब जिंकला तेव्हा घरच्यांनी आमचं जल्लोषात स्वागत केलं. आम्हीही सारं मागचं विसरून आनंदानं एकत्र राहू लागलो. हळूहळू नृत्यवर्गाचं रूपांतर संस्थेत झालं, गौरवही आता त्याच्या ‘ट्रॅव्हल-टुरिझम’च्या नोकरीत स्थिरावला आहे. चिरंजीवसुद्धा हळूहळू मोठे होतायत, दोन्ही कुटुंब आमच्यासोबत आहेत. आज आमचं सहजीवन माणसांनी, विचारांनी, प्रेमानं बहरलेलं आहे आणि ते अधिकाधिक बहरेल यात शंकाच नाही.

आमच्या सहजीवनात कधी तुझं- माझं असं आलंच नाही, कायमच ते ‘आपलं’ होतं, म्हणूनच कदाचित आम्ही या प्रवासात नवरा- बायकोपेक्षाही एकमेकांसाठी सखा आणि सखी झालो आणि त्यामुळेच आमचं साहचर्य समृद्ध झालं. वास्तविक आमचं अरेंज मॅरेज आहे हे आता कुणाला सांगूनही खरं वाटत नाही.. आपला जोडीदार कसा हवा, यापेक्षा तो जसा आहे तसा स्वीकारणं, प्रेम, आदर आणि विश्वासानं एकमेकांच्या साथीनं वाढणं यामुळेच तर परस्परांमधलं नातं खुलतं आणि मुरू लागतं. तेव्हाच तर जगणं जास्त चवीनं अनुभवता येतं.
अंतरपाट सरून अवघी अकरा वर्षे लोटली
सहजीवनाची गोडी हळूहळू पटली
आता कुठे नातं जरासं मुरलंय
चव यायला अजून बरंच आयुष्य उरलंय..

kalpitarn@02shraddhaw

ishanadesh@gmail.com