मेघना गुलजार

वेगळे विषय संवेदनशीलतेनं हाताळणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार आपल्या यशाचं मूल्यमापन करताना आपल्याइतकंच श्रेय देतात दोन पुरुषांना.. एक अर्थातच वडील- कवी गुलजार आणि दुसरे- पती गोविंद संधू. सातत्यानं प्रोत्साहित करणारे, घट्ट नातेसंबंध असतील, तर स्त्रीचा पुढचा प्रवास सहज आणि निर्धास्त होऊ शकतो, हे मेघना अधोरेखित करतात. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत..

lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

गीतकार-लेखक गुलजार आणि अभिनेत्री राखी, असे प्रतिभासंपन्न आई-वडील लाभलेल्या मला कधी जीवनात संघर्ष करावा लागलाच नसेल, असं एक सर्वसामान्य मत, पण ते चुकीचं आहे! मलाही खूप संघर्ष करावा लागला, अपयशाशी झगडावं लागलं आणि मार्ग मिळाल्यानंतर मेहनतीनं यश मिळवावं लागलं. सुरुवातीच्या टप्प्यात दिग्दर्शक व्हायचं मी ठरवलं नव्हतं. माझे मम्मी-पप्पा नामांकित व्यक्तिमत्त्वं असली, तरी आपल्या मुलीसाठी करिअरचा मार्ग आखून देणारे ते नाहीत. तशी अपेक्षा मीही कधी केली नव्हती. त्या दोघांनी त्यांच्या त्यांच्या करिअरचा मार्ग स्वत:च शोधला आणि आपापल्या मार्गानं एकटे पुढे गेले. मला माझा शोधायचा होता.

मी झेव्हियर्स कॉलेजमध्ये शिकत असतानाच आम्हा तिघांमध्ये माझ्या करिअरविषयी नेहमी चर्चा होई. मम्मीचं मत होतं, ‘मेघनाला अभिनयात रस असेल, तर ती अभिनेत्री होऊ शकेल..’ पण मला वाटतं, मी संकोची, मितभाषी, बुजरी आहे. कॅमेऱ्यामागे ‘कम्फर्टेबल’; मात्र कॅमेऱ्यासमोर बुजते. त्यामुळे अभिनयाकडे वळण्याचा प्रश्न निकालात निघाला. या काळात माझ्या करिअरचा प्रश्न मला समजून घेत अगदी शांतपणे, संयमानं, अगदी तरलतेनं सोडवला तो पप्पांनी. कॉलेजमध्ये असतानाच अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक कमल हसन यांनी पप्पांना फोन करून सांगितलं, की ‘मेघनाला अभिनयाकडे वळायचं असेल, तर माझ्याकडे चांगली भूमिका आहे,’ पण पप्पांनी सांगितलं, ‘अजून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. पदवी घेतल्यानंतर तिला पुढे काय करायचं आहे हे स्पष्ट होईल.’ माझा कल कशात आहे हे न जोखता त्यांनी मला अभिनयासाठी प्रोत्साहन दिलं असतं, तर १-२ चित्रपट करून मी पुन्हा ‘बॅक टू पॅव्हेलियन’ आले असते. ते झालं नाही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मी लिहावं असं सुचवलं आणि मी काही लेख इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेही. मला लिखाणाची आवड आहे हे त्यावेळी आमच्या लक्षात आलं. त्याच मार्गानं पुढे जावं म्हणून मी पप्पांची साहाय्यक दिग्दर्शक बनले. ‘हुतूतू’ या त्यांच्या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन आणि लेखनही केलं.

मी ‘फिलहाल’ दिग्दर्शित केला ते वर्ष होतं २००२. सरोगसीवर भाष्य करणारा, एका संवेदनशील विषयावर थेट प्रकाशझोत टाकणारा हा पहिलाच चित्रपट होता. काळाच्या आधी हा विषय मांडला गेला म्हणून, की आणखी काही कारण होतं ते नाही सांगू शकत.. पण चित्रपट चालला नाही. या अपयशानं मी प्रचंड निराश झाले. पुढची ८ वर्ष स्वत:साठीच माझा संघर्ष चालू होता. तो काळ फारच कठीण, कसोटीचा होता. माझ्या करिअरचं काय होणार, हा प्रश्न मला नैराश्यात लोटत होता आणि माझ्या मम्मी-पप्पांनाही तो तेवढयाच तीव्रतेनं जाणवत होता. मम्मीकडे याचं त्वरित उत्तर नव्हतं, पण पप्पांकडे मात्र आशेचा किरण होता, दिग्दर्शक विशाल भारद्वाज याच्या रूपानं! विशाल भारद्वाज पप्पांना अगदी मुलासारखा. मोठया भावाचं ‘फर्ज’ अदा करत दिल्लीच्या आरुषी तलवार या मुलीच्या हत्या प्रकरणावर चित्रपट काढावा, असं त्यानं सुचवलं. ही कल्पना विशालनं मांडली नसती तर मी ‘तलवार’ दिग्दर्शित केला नसता! माझ्या निराशेतून मी कधी बाहेर आले असते माहीत नाही. पण ‘तलवार’ चित्रपटानं मला माझं पहिलं व्यावसायिक यश दिलं. त्यानंतर आलेल्या ‘राझी’ (२०१८) ‘छपाक’ (२०२०) आणि ‘सॅम बहादूर’ (२०२३) या तीनही चित्रपटांना समीक्षकांची

वाहवा मिळाली.       

लिखाणावरही पप्पांचा मोठा प्रभाव आहे. मैं बहुत लाडली जो हूँ उनकी! माझ्या सगळया चित्रपटांची गीतं पप्पांनी लिहिली आहेत. ते एक मान्यवर लेखक आणि सिद्धहस्त दिग्दर्शक. त्यांच्याकडून मी काम कसं करवून घेते, याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांची शिकवण ही, की ‘दिग्दर्शक जहाजाचा कप्तान असतो!’ या न्यायानं त्यांना माझं ऐकावंच लागतं! माझ्या चित्रपटांसाठीची गीतं त्यांच्याकडून ठरलेल्या वेळी लिहून घेताना कधी प्रेमाची दमदाटी असते, कधी लाडिक मतभेदही होतात. पण पप्पांबरोबर काम करण्याचा आनंद वेगळा असतो. मम्मी नामवंत अभिनेत्री. तिनं एक काळ गाजवला. ती माझ्या चित्रपटात का नसते, असा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो. त्याचं उत्तर असं, की ती हिंदीपेक्षा बंगाली चित्रपटांत हल्ली जास्त रमते. काही चाकोरीबाहेरचे चित्रपट बंगाली चित्रपटसृष्टीत निर्माण होताहेत आणि तिला तिच्या अभिरुचीप्रमाणे तिथे काम मिळतंय.

मम्मी-पप्पांप्रमाणेच माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझे पती, गोविंद संधू. आम्ही दोघं एकाच- सेंट झेव्हिअर्स कॉलेजचे विद्यार्थी. कॉलेजमध्ये असल्यापासून आमच्यात जी मैत्री-विश्वास-आदर निर्माण झाला, तो आजतागायत. गोविंदला ठाऊक आहे, की मी जेव्हा माझ्या कामात (दिग्दर्शन-लेखन) असते तेव्हा आनंदात असते. ‘राझी’ आणि ‘सॅम बहादूर’ या माझ्या दोन्ही चित्रपटांच्या माहिती-संशोधनासाठी मला एकेका वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. ‘सॅम बहादूर’चं चित्रीकरण १३ शहरांमध्ये झालं. सलग ३ महिने शूटिंग चालत असे आणि मग ४-५ दिवसांसाठी मी घरी मुंबईला येत असे, मग पुन्हा शूटिंग, असं सुरू होतं. मी जेव्हा घराबाहेर असते, तेव्हा संपूर्ण घर, समयची (मुलाची) पूर्ण जबाबदारी गोविंदची असते. गोविंदला माझ्या कामाबद्दल विलक्षण आदर आहे, आत्मीयता आहे. पती-पत्नीच्या नात्यात हे अतिशय महत्त्वाचं, जर हा पाया घट्ट असेल, तर पुढचा प्रवास सहज आणि निर्धास्तपणे करता येतो..

 मी स्त्री असल्यामुळे नायिकाप्रधान कलाकृती दिग्दर्शित करणं मला प्रिय आहे.. ते सोपं आहे.. असं म्हटलं जातं. पण खरं सांगू का? माझा पहिला चित्रपट सरोगसीवर आधारित होता. हा सामाजिक प्रश्न जितका स्त्रीशी संबंधित, तितकाच पुरुषाशीदेखील संबंधित आहे, असं मला वाटतं. दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट नायिकाप्रधान होता, असं मी म्हणणार नाही. तो अॅससिड हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारा होता. ‘राझी’ ही नायिकेची कथा नसून हा चित्रपट ‘स्पाय थ्रिलर’ होता. त्यात आलिया भटइतकाच प्रभावी अभिनय विकी कौशलचाही होता. (म्हणूनच मी ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट सुरू केला, तेव्हा माझ्यासाठी संवादहीन दृश्यांमध्येदेखील आपला प्रभाव दाखवून देणारा विकी हाच सॅम बहादूर असणार हे निश्चित झालं होतं.) माझ्यासाठी व्यक्तिरेखा महत्त्वाच्या असतात. मग तिथे स्त्री कलाकार असो, वा पुरुष कलाकार. स्त्री-पुरुष समानतेच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सामाजिक महत्त्व असलेले मुद्दे माझ्या चित्रपटांतून मांडणं मला भावतं. माझ्या चित्रपटांतल्या स्त्री कलाकार त्यात कधीही ‘डेकोरेटिव्ह, शो-पीस’ दिसणार नाहीत. त्या संवाद, कथांमधून व्यक्त होतात. व्यक्त होणं ही आजच्या काळाची गरज आहे!  पप्पांच्या सहवासात मोठी झालेली मी.. त्यांचेच संस्कार घेऊन वाढले. आज मी एका मुलाची आई आहे. या आपल्या लाडक्या नातवाचं नाव पप्पांनीच ठेवलंय- ‘समय’. किती अर्थपूर्ण! जे माझ्या बालपणी व्हायचं, तेच आताही होतंय. पप्पा समयला कुशीत घेऊन त्याला कविता ऐकवतात. त्याला पाठीवर घेऊन ते घरभर खेळत असत. त्याचे ‘बेस्ट बडी’ आहेत माझे पप्पा!

शब्दांकन – पूजा सामंत

samant.pooja@gmail.com