प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

एका देशातून दुसऱ्या देशात होणारी स्थलांतरं- काही वेळा नाइलाजानं करावी लागणारी, तर काही वेळा मुद्दाम, शिक्षण वा नोकरीतल्या अधिक चांगल्या संधींसाठी केली जाणारी. यातली दुसऱ्या प्रकारची स्थलांतरं स्त्रियांच्या बाबतीत तुलनेनं उशिरा सुरू झाली असली, तरी जगात अनेक स्थलांतरित स्त्रियांनी विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली. यातल्या किती तरी भारतीय (किंवा भारतीय वंशाच्या) आहेत. सध्या अमेरिकेतील निवडणुकांच्या निमित्तानं नव्यानं चर्चेत आलेल्या कमला हॅरिस यांच्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेवरच्या ‘करोना’ परिणामांबद्दल भाष्य करणाऱ्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्यापर्यंतच्या स्थलांतरित स्त्रियांची ही यशोगाथा..

स्थलांतरितांबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. स्वत:च्या देशामधल्या जाचाला, युद्धाला कंटाळून, जिवाची पर्वा न करता, मिळेल त्या पद्धतीनं दुसऱ्या देशात आश्रय घेणारे हजारो लोक आज युरोपमध्ये राहात आहेत. याबरोबरच अधिक चांगल्या राहणीमानासाठी, नोकरी-व्यवसायांमधल्या संधींसाठी मुख्यत: १९६० पासून भारतातले कित्येक लोक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. आधुनिक जगानं अशी खूप मोठी स्थलांतरं पाहिली. औद्योगिक क्रांती, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, रशियाचं विभाजन, भारत-पाकिस्तान फाळणी, हे यातले काही महत्त्वाचे टप्पे. जगाच्या, मानवजातीच्या इतिहासामध्ये अशी स्थलांतरं काही नवीन नाहीत. काही मानववंशशास्त्रज्ञांच्या मते साधारण २ लाख वर्षांपूर्वीही जगात लोक चांगलं पाणी, मुबलक अन्न, राहण्यास योग्य वातावरण आणि मुख्य म्हणजे नव्या संधींच्या शोधात आपल्या मूळच्या ठिकाणापासून बाहेर पडत होते. आपण मानवजातीचा आज जो विस्तार बघतो, तो अशा स्थलांतरांमुळेच!

१९५० पर्यंत एका देशातून दुसऱ्या देशात शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी कुटुंबांतून जाणाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पुरुषच दिसतात. स्त्रियांची नावं अगदी अभावानं आढळतात. काही दिवसांपूर्वी कमला हॅरिस यांना अमेरिकेत डेमोक्रॅ टिक पक्षातर्फे उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. हॅरिस या जरी सर्वार्थानं अमेरिकन असतील तरी त्यांचे वडील आणि आई दोघेही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झालेले. वडील जमैकन आणि आई भारतीय (तमिळ). त्यांच्या नामांकनाचा स्वीकार करताना दिलेल्या भाषणात त्यांनी ‘चित्ती’ (तमिळ भाषेत आईच्या लहान बहिणीला प्रेमानं चित्ती म्हणतात.) या केवळ एका शब्दानं अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या इतर तमिळ लोकांची मनं जिंकली. अर्थतज्ज्ञ वडील आणि कर्करोगावर संशोधन करणारी आई यांच्यामुळे कमला हॅरिस यांचं बालपण अनेक विद्वानांच्या आणि विचारवंतांच्या सहवासात गेलं. बर्कली विद्यापीठाच्या आवारात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांचं माध्यमिक शिक्षण कॅनडात झालं. तेव्हा त्यांची आई माँट्रीयलमधील मॅकगील विद्यापीठात प्राध्यापक होती. लहानपणापासून हॅरिस यांच्या आईनं त्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवलं, असं त्या म्हणतात. जमैकन आणि भारतीय अशा मिश्र वंशाच्या दोन मुलींना एकटय़ा मातेनं वाढवणं सोपं काम नाही. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक भाषणात त्या त्यांच्या आईचा उल्लेख करतात. व्यवस्था बदलायची असेल तर कुंपणावर न राहता व्यवस्थेमध्ये शिरून ती बदला, ही माझ्या आईची शिकवण मी पाळते आहे, असं त्या सांगतात. त्यांनी उच्च शिक्षण हॉर्वर्ड विद्यापीठात घेतलं, तर सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठात विधिविषयक शिक्षण पूर्ण केलं. काही र्वष प्रॅक्टिस केल्यावर हॅरिस यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी’ पदासाठीची निवडणूक लढवली आणि तेथूनच हॅरिस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. कमला हॅरिस आजवर अनेक ठिकाणी ‘पहिल्यां’च्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यांनी ‘काऊंटी’चं आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘डिस्ट्रिक्ट अम्ॅटर्नी’ म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी हे पद भूषवणारी पहिली स्त्री आणि पहिली आफ्रिकन-अमेरिकन आणि भारतीय वंशाची व्यक्ती ठरल्या. जर जो बायडन अमेरिके च्या अध्यक्षपदी निवडून आले, तर त्या अमेरिकेच्या पहिल्या आफ्रिकन- अमेरिकन आणि पहिल्या स्त्री उपाध्यक्ष ठरतील.

अमेरिकेच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या हॅरिस या पहिल्या किंवा एकमेव स्थलांतरित स्त्री नक्कीच नाहीत. त्यांच्याबरोबरच मॅडलीन ऑलब्राइट आणि भारतीय वंशाच्या प्रमिला जयपाल यांचीही अमेरिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे. मॅडलीन अम्ॉलब्राइट या आपल्या कुटुंबासमवेत १९४८ च्या सुमारास झेकोस्लोव्हाकियामधून अमेरिकेत आल्या. त्यांचे वडील परराष्ट्र खात्यात अधिकारी होते. पुढे राजकीय मतभेदांमुळे त्यांना आपला देश सोडावा लागला. अमेरिकेत आल्यावर त्यांनी मुलींसाठीच्या प्रतिष्ठित वेल्सली महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे १९७५ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात पीएच.डी. मिळवली. १९८१ पर्यंत त्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये विविध पदांवर काम करत होत्या. त्यानंतर जॉर्जटाऊन विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक होत्या. हे करताना डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवारांसाठी आंतरराष्ट्रीय विषयांबाबतच्या सल्लागार म्हणून काम करत होत्या. १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांच्या विजयानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसाठी काम केलं. १९९३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रसंघासाठी अमेरिकेच्या राजदूत म्हणून काम करू लागल्या. १९९७ पासून २००१ पर्यंत क्लिंटन यांच्या प्रशासनात त्यांनी ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकेचं ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ हे पद भूषवणारी पहिली स्त्री म्हणून ऑलब्राइट यांचं नाव नोंदवलं गेलं.

५४ वर्षांच्या प्रमिला जयपाल यांचा राजकीय प्रवास बराच वेगळा आहे. त्या त्यांच्या कुटुंबाबरोबर नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आल्या. २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मांडलेल्या काश्मीरविषयीच्या ठरावाला विरोध म्हणून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांची भेट घ्यायला नकार दिला होता. या ठरावामध्ये जयपाल यांनी भारताला काश्मीरमधील दळणवळण व संपर्कमाध्यमांवरील सर्व बंधनं उठवण्याची आणि तिथल्या सर्व नागरिकांचं धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासंबंधीची विनंती केली होती. भेटीसंबंधीच्या या वादामुळे जयपाल एकदम चर्चेत आल्या होत्या. जयपाल यांचा जन्म मद्रासमध्ये (चेन्नई) झाला असला, तरी त्यांचं बालपण इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये गेलं. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेत आल्या. जॉर्जटाऊन आणि नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून शिक्षण घेऊन त्यांनी आर्थिक विश्लेषक म्हणून काम करायला सुरुवात केली. २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं. अमेरिकेत अनेक ठिकाणी स्थलांतरितांविरोधी भावना वाढत होती. त्यात जॉर्ज बुश प्रशासनानं नव्यानं अमेरिकेत स्थायिक होत असलेल्या अनेक नागरिकांवर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. अशा नवस्थलांतरितांना मदत म्हणून त्यांनी ‘हेट फ्री झोन’ या गटाची स्थापना केली. २०१३ मध्ये व्हाइट हाऊसकडून त्यांना ‘चँपियन ऑफ चेंज’ ही पदवी मिळाली. सार्वजनिक आयुष्यात नाव मिळवल्यावर जयपाल यांची राजकीय कारकीर्द सियाटलच्या मेयरच्या  सल्लागार समितीमधल्या कामातून सुरू झाली. तिथे त्यांनी किमान वेतन १५ डॉलर व्हावं यासाठी प्रयत्न केले. २०१६ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये पदार्पण केलं. तिथे त्या विद्यार्थ्यांवरचा शिक्षण शुल्काचा बोजा, सर्वासाठी आरोग्य विमा, वातावरण बदलासाठी मोठय़ा कंपन्यांच्या वर्तनात आवश्यक असलेले बदल, अशा विषयांवर काम करतात. याबरोबरच अमेरिकेतल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावर त्या आजही काम करतात.

वस्तुनिष्ठतावादाच्या प्रवर्तक आयन रँड यादेखील एक स्थलांतरितच. रशियामधील उच्चभ्रू वातावरणात वाढलेल्या रशियन-ज्युईश अलिशा झिनोव्येव्ना रोझेनबॉम यांना, १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर कुटुंबीयांसह रशिया सोडावा लागला आणि त्या पूर्व युरोपात क्रिमियामध्ये स्थलांतरित झाल्या. शिक्षण झाल्यानंतर त्या परत रशियात आल्या; पण तेव्हापर्यंत तिथली परिस्थिती बदलली होती. इथल्या पेट्रोग्रॅड विद्यापीठात त्यांनी विविध विचारधारांचा खोलवर अभ्यास केला. पुढे त्यांच्या सर्व लेखनासाठी त्यांनी आयन रँड हे नाव धारण केलं. १९२५ मध्ये अमेरिकेत आल्यावर त्यांच्या लेखनाला नवे आयाम मिळाले. पुढे रिपब्लिकन पक्षाबरोबर काम करत असताना त्यांनी लिहिलेल्या

‘द फाऊंटनहेड’ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ या दोन कादंबऱ्या त्यातल्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे गाजल्या.

लेखिका-विचारवंत आयन रँडप्रमाणेच प्रख्यात शास्त्रज्ञ मारी क्यूरी यादेखील एक रशियन स्थलांतरितच, पण त्या उच्च शिक्षणासाठी फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठात आल्या. नोबेल  पुरस्कार मिळवलेली पहिली स्त्री आणि दोन नोबेल पुरस्कार मिळवलेली पहिली व्यक्ती आणि एकमेव स्त्री अशी ख्याती असलेल्या मारी क्यूरी या मूळच्या पोलंडच्या. वॉरसॉ विद्यापीठात शिक्षण घेतल्यावर १८९१ मध्ये त्या फ्रान्समध्ये आल्या. सकाळी शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी पैसे हवेत म्हणून संध्याकाळी शिकवण्या घेऊ लागल्या. पुढे शास्त्रज्ञ पेरी क्यूरी यांच्याशी त्यांचं लग्न झालं. किरणोत्सर्ग या विषयातील त्यांच्या संशोधनाला १९०३ मध्ये नोबेल  पुरस्कार मिळाला.

साधारण १९७०-८० पासून भारतात उच्च शिक्षणासाठी परदेशी- मुख्यत: अमेरिकेत जाण्याचा प्रघात पडला. (याआधी भारतातून इंग्लंडला जाण्याकडे कल अधिक असायचा.) इंद्रा नूयी याच पिढीतल्या. भारतातल्या सर्वोत्तम अशा आय.आय.एम. कोलकाता या व्यवस्थापन संस्थेमधून शिक्षण घेऊन पुढे अमेरिकेतल्या येल विद्यापीठातूनही त्यांनी व्यवस्थापनात शिक्षण घेतलं. विविध व्यवस्थापन सल्लागार संस्था आणि पुढे कंपन्यांमध्ये काम करत १९९४ मध्ये त्या ‘पेप्सिको’मध्ये रुजू झाल्या. २००६ मध्ये त्या पेप्सिकोच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी बनल्या. तेव्हापासून त्या प्रसिद्धीच्या झोतातच आहेत. ‘फोब्र्ज’ मासिकानं त्यांना अनेकदा प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत मान दिला आहे. २०१६ मध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर स्त्रियांविषयी हीन दर्जाची विधानं केल्याबद्दल जोरदार टीका केली होती. नूयी यांनी ट्रंप यांच्या व्यवसायात सल्लागार म्हणून काम केलं आहे, तसंच ट्रंप प्रशासनाचं आर्थिक धोरण ठरवण्यामध्येही हातभार लावला आहे.

सध्याच्या ‘करोना’काळात जगाची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेनं जाईल, जागतिक मंदी कशा प्रकारे वाढेल आणि याची झळ विकसनशील देशांना कमीत कमी बसावी यासाठी त्यांनी काय करावं, याविषयी सतत भाष्य करणाऱ्या गीता गोपीनाथ या भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. कोलकात्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गीता गोपीनाथ, त्यांचे आई-वडील मूळचे केरळचे. आधी केंद्रीय ‘आयएएस’ होण्याचं स्वप्न बघणाऱ्या गीता गोपीनाथ यांनी ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. नंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुढे वॉशिंग्टन विद्यापीठातूनही पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्या ‘आयएएस’चा अभ्यास करत असतानाचे त्यांचे सहपाठी आणि नंतर गीता यांचं ज्यांच्याशी लग्न झालं ते इकबाल सिंग धालीवाल हेदेखील पाच र्वष केरळमध्ये ‘आयएएस’ अधिकारी म्हणून काम केल्यावर गीता यांच्याबरोबर अमेरिकेत आले होते. गीता यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केल्यावर अमेरिकन बँक, फेडरल रिझव्‍‌र्ह बँक यांसारख्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम केलं. २०१८ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २०१९ मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा ‘प्रवासी भारतीय’ हा सन्मान मिळाला. भारतातील स्थलांतरित स्त्रियांच्या यादीमध्ये गीता गोपीनाथ हे नाव सर्वात यशस्वी नावांपैकी एक आहे.

कमला हॅरिस यांना हे पक्कं माहीत आहे, की त्या काही आफ्रिकन-अमेरिकनांसाठी पूर्णपणे ‘त्यांच्या’ होऊ शकत नाहीत. त्याबरोबरच त्यांच्या जमैकन वंशामुळे आणि त्यांच्या भारताविषयीच्या भूमिकांमुळे त्या सर्व अमेरिकन-भारतीयांनाही आपल्या वाटत नाहीत; पण अमेरिका ही स्थलांतरितांनीच मोठी केली. कमला हॅरिस अशाच दोन स्थलांतरितांची उच्चशिक्षित मुलगी,  यशस्वी वकील आणि एक अशी स्त्री- जिला आज तिच्या कर्तृत्वामुळे अमेरिकेतील दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या पदावर बसण्याची संधी समोर आली आहे. हॅरिस यांच्या भाषणातलं एक वाक्य आहे, ‘‘तुम्ही कोण आहात हे तुम्हाला लोकांनी सांगता कामा नये. तुम्हीच ते दाखवून दिलं पाहिजे.’’ हॅरिस यांना ती संधी मिळाली आहे. कोणत्याही स्थलांतरिताचं यापेक्षा मोठं यश ते काय असू शकतं!