डॉ . शुभांगी नारकर

आज जगभरात दरवर्षी ८ लाख आत्महत्या होतात. हा आकडा भयकारी आहे. कारणं कोणतीही असली तरी आत्महत्या होतच आहेत. त्यातून बाहेर पडता येतं, मदत मिळू शकते, फक्त ती मागायला हवी किंवा कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी आणि समाजानं त्यांना समजून घ्यायला हवं. आत्महत्येला प्रतिबंध घालता येतोच, फक्त ती आपल्या सगळय़ांची सामाजिक जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवं..

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं

या सदराच्या निमित्तानं ‘आत्महत्या’ या विषयावर एवढय़ा मोठय़ा व्यासपीठाच्या माध्यमातून सलग वर्षभर वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला याचा डॉक्टर म्हणून मला व्यावसायिक आनंद मिळाला, शिवाय वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया, विश्लेषण, अनुभव, सूचना सगळंच विधायक, प्रेरणादायी आणि समृद्ध करणारं होतं.

आत्महत्येसारखा विषय शब्दांमध्ये मांडताना सामाजिक जबाबदारीची जाणीव माझ्या मनात होतीच. अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी होता, तरीही या विषयाचा परीघ खूप विशाल आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत आणि त्यात वैचारिक, सामाजिक, नैतिक गुंतागुंतही आहे. जगभरात दरवर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्या वा स्वेच्छामृत्यू स्वीकारतात. मानवांमध्ये आत्महत्या ही खरं तर खूप भेसूर गोष्ट आहे. आत्महत्या करणारे स्वप्रेरित असतात. ते इतरांवर होणाऱ्या परिणामाची पर्वा करत नसावेत किंवा त्या क्षणी त्यांच्या भारावलेल्या मनाची तितकी कुवतही नसावी, त्यामुळे आत्महत्या घडतच असतात.

आपण या सदरांतील लेखांमधून पाहिलं, की आत्महत्येची साधारणपणे दोन प्रकारांत विभागणी केली जाते. काही व्यक्ती त्यांच्या आत्महत्येचं नियोजन आधीपासूनच करतात. तर दुसरे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे ऐन वेळी आत्महत्येकडे वळतात. लोक स्वत:ला का मारतात याविषयी मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. गंभीर दुखापत, बेकारी किंवा अत्यंत गरिबी यासारख्या बाह्य कारणानं होणारे भावनिक आघात अनेकदा असह्य मानसिक अस्वस्थतेत नेतात. तर काहींच्या बाबतीत वारंवार अपमान, लाज, अपयश, तिरस्कार यांविषयीच्या भावना तीव्र होत जातात. वैयक्तिक लज्जा वा तीव्र सामाजिक कलंक यासह जगण्यापेक्षा मृत्यू परवडला, असं अनेकांना वाटतं.

जीवनातील विविध अपयशांमुळे तरुण आत्महत्येकडे कसे वळतात हेही आपण या लेखांतून पाहिलं आहे. कथित अपयश, जीवघेण्या स्पर्धात्मक युगात परीक्षा उत्तीर्ण होण्याची असमर्थता, पालकांचा मरणप्राय दबाव, नोकरीची संधी गमावणं किंवा रोमँटिक ब्रेकअप यामुळे त्यांना अपमान किंवा लाज वाटू शकते. आर्थिक समस्या आणि बेकारीमुळे तरुण पिढीचं स्वप्न अंधारमय होऊन जातं. अशा भावना स्वत:च्या वैयक्तिक अपेक्षांमुळे असू शकतात, परंतु बहुतेकदा त्या आपली संस्कृती, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक मूल्यांद्वारे तरुण व्यक्तीवर लादल्या जातात. या अपयशाचा सामना करताना प्रगल्भ अनुभवाविना भावनिक उद्रेक होत तरुण पिढीचं जगणंच पणाला लागतं.

अनेक सुप्रसिद्ध आणि यशस्वी लोकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकदा किंवा अनेक वेळा आत्महत्येचा विचार आल्याचं नमूद केलं आहे. पण यावर मात करून पुढे आयुष्य उत्तुंग बनवूनही दाखवलं आहे. आयुष्यात समस्या, पुढे मार्ग नाही असे प्रसंग येऊ शकतातच, परंतु अशी परिस्थिती जवळजवळ कधीच नसते, जी तुमचा मार्ग कायमचा थांबवते. तुम्हाला तो मार्ग शोधावा लागतो.

एक प्रसिद्ध युक्तिवाद असा आहे, की आत्महत्या करण्याची अनेक कारणं, म्हणजे नैराश्य, भावनिक वेदना, कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक त्रास या गोष्टी तात्पुरत्या आहेत आणि आत्महत्या हा तात्पुरत्या समस्येवर कायमचा उपाय आहे, असं काही जण मानतात. त्यामुळे ही तात्पुरती समस्या लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार, भावनिक नियंत्रण व जीवनशैलीतील बदलांद्वारे इलाज करणं शक्य आहे. या लेखमालिकेत हे सत्य आपल्याला अनेक वेळा दिसून आलं.

एका २८ वर्षीय तरुणानं आत्महत्या करण्यासाठी पुलावरून उडी मारली, मात्र सुदैवानं तो वाचला. नंतर त्याच्या लक्षात आलं, की उडी मारल्यानंतर आपल्या मनात पहिला विचार आला होता, की ‘माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, जी मला कधीच बदलता येणार नाही असं समजून निराश होत होतो, ती खरं तर पूर्णपणे बदलता येण्यासारखी होती. आणि मी जी नुकतीच पुलावरून उडी मारली होती, ती खरं तर न बदलणारी गोष्ट होती.’ थोडक्यात, बहुतेकांच्या आयुष्यात काही भयानक गोष्टी घडत असतातच, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावनेच्या भरात तुमचं आयुष्य संपवून टाकावं. याचा अर्थ तुम्ही सहन करा, जुळवून घ्या, अनुभव घ्या आणि हळूहळू सफल व्हा.

वैद्यकीय क्षेत्रात सार्वजनिक आरोग्याच्या इतर समस्यांप्रमाणेच, आत्महत्या रोखण्यासाठी दोन पद्धतीनं विचार केला जातो.
१) वैयक्तिकस्तरीय- घटकांची जोखीम, विशेषत: मोठं वय, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे विकार (उदासीनता आणि व्यसनाधीनता), कौटुंबिक आणि आनुवंशिक प्रभाव, मनोसामाजिक आधाराचा अभाव, आदी ओळखून त्यानुसार प्रत्येकासाठी योग्य ते उपचार विकसित करणं. २) लोकसंख्यास्तरीय- प्रतिबंधक धोरणांचा (पॉलिसी) विकास करणं. यात हॉटलाइन, आरोग्य केंद्रं, मीडिया मार्गदर्शक तत्त्वं, शिक्षण आणि लोकसंख्याव्यापी स्क्रीिनग (उदा. सर्व शालेय मुलांची तपासणी) आणि जीवनविषयक धोरणं यांचा समावेश आहे.


अमेरिकेत गेली शंभर वर्ष अनेक परंपरागत आणि आधुनिक पद्धतीचे प्रयत्न करूनही आत्महत्या कमी झालेल्या दिसत नाहीत. पण आत्महत्या टाळता येऊ शकतात ही त्यातल्या त्यात चांगली बातमी आहे. आत्महत्येच्या कारणांत जैविक, भावनिक आणि सभोवतालची परिस्थिती याचा किती आणि कसा सहभाग आहे याचं वैद्यकीय विश्लेषण महत्त्वाचं आहे. आत्महत्येचा प्रतिबंध करणं आणि प्रयत्न झाल्यावर आग्रही उपचार करणं एक आव्हान आहे. मनोरुग्णांमध्ये आत्महत्येचा धोका कमी करण्यात ‘सायकोट्रॉपिक्स’ प्रकारची मानसिक उपचारातली औषधं मेंदूतल्या रसायनांवर महत्त्वाची भूमिका बजावतात. अर्थात अशा झपाटय़ानं वाढणाऱ्या आणि बहुआयामी समस्येला सामोरं जाण्यासाठी, कोणतीही एकच रणनीती उपयोगी पडणार नाही. आत्महत्या रोखण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांवर रणनीती आवश्यक आहे. यामध्ये व्यक्ती, कुटुंबं आणि समाजासाठी प्रतिबंध आणि संरक्षणात्मक धोरणांचा समावेश झाला पाहिजे. आत्महत्या कमी करण्यासाठी, सामान्य लोकांमध्ये तणाव, चिंता, भीती आणि एकाकीपणा कमी करणं अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्रास कमी करण्यासाठी पारंपरिक आणि समाजमाध्यमांचा प्रभावी आणि सक्रिय उपयोग करून घ्यायला हवा. शैक्षणिक किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये संवाद आणि अनुभवाला प्रोत्साहन देणारं वातावरण तयार करणं आज गरजेचं आहे. आत्महत्या करणारे लोक आपल्या अपरिहार्य दु:खाला अनन्यसाधारण महत्त्व देतात आणि निराशाजनक विचारांत गुरफटून जातात. अशा वेळी जीवनाला प्रोत्साहन देणारा दृष्टिकोन विकसित करून व विचारांची लवचीकता वाढवून आत्महत्येसारखे विचार टाळणं आणि प्राथमिक प्रतिबंध करणं शक्य आहे.

जीवनकौशल्यं ही संरक्षणात्मक घटक आहेत. त्यात कुशल विचार, तणाव व्यवस्थापन, समस्या सोडवणं आणि विपरीत परिस्थितीशी सामना करण्याची कौशल्यं यांचा समावेश आहे. आर्थिक ताण, घटस्फोट, दीर्घ शारीरिक आजार, भंगलेली नातीगोती आणि वृद्धत्व यांसारख्या आधुनिक युगाच्या नवीन आव्हानांना तोंड देताना ही कौशल्यं वाढवणारे उपक्रम लोकांना मदत करू शकतात.

कठीण काळात आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना दु:खाशी जुळवून घेताना, मानसोपचार व आध्यात्मिक अनुभूती, आयुष्याशी समतोल साधणारी तात्त्विक वृत्ती, या गोष्टी एक वास्तववादी आणि चांगलं जीवन देऊ शकतात. आत्महत्या करणं ही कुणासाठीही अवघड निवड आहे, पण आपल्या जाण्यानं आपण आपल्या प्रियजनांना किती गंभीर रीतीनं दुखावणार आहोत याचा विचार आत्महत्येपूर्वी केला जातो का? अनेक प्रियजनांना या निर्णयामागचं खरं कारण कधीच समजणार नाही. तो निर्णय त्यांना कायमचा जायबंदी करून जाईल. लक्षात घ्या, जी समस्या एखाद्याला जीवघेणी वाटते, त्या समस्येवर कुरघोडी करत लाखो लोक या जगात समाधानानं जगत असतात. फक्त जगण्याची आणि त्या जगण्याला निभावून न्यायची प्रवृत्ती त्या व्यक्तीत असायला हवी. शिवाय घोर संकटकाळी आपला सामाजिक व भावनिक आधार आपणच कसा वाढवायचा हा विचार कळीचा मुद्दा ठरतो. यासाठी सुजाण नागरिकांनी दुसऱ्यांचंही दु:ख जाणून घ्यायला हवं.
या अनुषंगानं या ओळी आठवतात-
आसपास के लोगोंसे मिलते रहा करो,
उनकी थोडी खैरखबर भी रखा करो
जाने कौन कितने अवसाद में जी रहा हैं,
पता नही कौन बस पलोंको गिन रहा हैं
कभी कभी अपने पडोसियोंकी कुंडी
तुम बेवजह ही खटखटाया करो..
pshubhangi@gmail.com