आरती अंकलीकर ‘एखाद्याचा गळा ‘गाता’ आहे का, याचं उत्तर लहान वयातच मिळतं. मात्र अंगची कला ओळखून ती फुलवण्यासाठी गुरू भेटायला हवा. मला अगदी लहानपणी असे दोन गुरू भेटले- आत्मशोधाच्या वाटेवर चालताना महत्त्वाची भूमिका निभावणारी ही मंडळी- अविनाश आगाशे सर आणि विजयाताई जोगळेकर. या दोघांनी माझ्यासाठी संधी निर्माण करून माझं गाणं वाढवलं आणि रियाझाची गोडी लावली. मोठी आव्हानं स्वीकारायची आणि विरस झाला तरी हार मानायची नाही, हे मी या काळात शिकले.’ आमची प्राथमिक शाळा, ‘पालकर विद्यालय’; पण मी प्रवेश घेतला तेव्हा ‘आय.ई.एस. प्राथमिक विद्यालय’ असं नाव होतं. मी दुसरीत होते तेव्हाची आठवण. बहुधा तिसऱ्या-चौथ्या रांगेतल्या बाकावर बसले होते. आमचे संगीत शिक्षक अविनाश आगाशे सर वर्गात आले. बालगीतं शिकवू लागले. पहिलाच तास होता त्यांचा. दोन-तीन गाणी झाल्यावर त्यांनी विचारलं, की कुणाला वर्गासमोर येऊन गायचंय का? सगळीकडे चुळबुळ सुरू. कुणीच तयार नव्हतं जायला. मी तोंडावर हात ठेवून गुणगुणत होते, ‘नारायणा रमारमणा मधुसूदना मनमोहना..’ मात्र वर्गासमोर गाण्याची मानसिक तयारी नव्हती. उमलतानाची मी! थोडी लाजरीबुजरी. माझ्या शेजारी बसलेल्या मुलीनं मात्र तिचं काम चोख केलं आणि सरांकडे जाऊन सांगितलं, ‘‘सर, ही बघा गातेय तोंडावर हात ठेवून. हिला गायला सांगा!’’ सरांनी लगेच पुढे बोलावलं. घराच्या बाहेर केलेलं ते पहिलं सादरीकरण! सर खूश. त्यांनी विडाच उचलला मनोमन मला तयार करण्याचा. आगाशे सर विलक्षण उत्साही. जेमतेम २२-२३ वर्षांचे असतील. गुहागरहून आले होते. पं. भार्गवराम आचरेकरांकडे पुढची तालीम घेत होते. सतत विचार संगीताचेच. अनेक वेळा मी त्यांना चालतानादेखील गाताना, हातवारे करताना, लकेरी घेताना पाहिलंय. संगीतानं पछाडलेले जणू! माझ्यातली निसर्गाची देणगी त्यांना दिसली आणि त्यांनी मला अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी देण्यास सुरुवात केली. मीही चांगली विद्यार्थिनी होते. गळा उत्तम होता, बुद्धी चांगली होती. सरांकडे कल्पना होत्या आणि मला देण्यासाठी वेळ होता. महत्त्वाचं हे! शाळेत पाहुणे आले, की माझं गाणं ठरलेलं. ‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’, प्रार्थना मी गायची. काही तास अभ्यास आणि बरेच तास गाणं अशी शाळा सुरू झाली. नऊ वर्षांची होते, तेव्हा आगाशे सरांनी ‘संगीत शारदा’ नाटकातला तिसरा प्रवेश संकलित करून १५ ते २० मिनिटांचा बसवला होता. त्या प्रवेशात ‘वल्लरी’च्या भूमिकेला अतिशय सुरेख गाणी होती. ‘घेउनी ये पंखा’, ‘म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान’. सरांनी शारदेची भूमिका छोटी ठेवून वल्लरीलाच महत्त्व दिलं त्या प्रवेशात. माझी गाणी बसवून घेतली. संवादफेक, मध्ये गाणी, नऊवारी साडी सगळंच नवीन. सहकलाकारही तिसरीत शिकणाऱ्याच मुली. सरांच्या समर्पणाला सलाम! विद्यार्थ्यांनी शिकावं यासाठी झटणारे, अतिशय कलात्मकतेनं तिसऱ्या अंकाची काटछाट करणारे, नाटकाचे कंगोरे जाणणारे, नाटय़संगीताचा अभ्यास असणारे, अनेक अनवट राग गाणारे आणि चोवीस तास गाण्यात रमणारे सर.. आमचं नाटक ‘हिट’ झालं. गाणी उत्तम झाली. नाटक उभं राहिलं. आणि माझी शाळेतली कार्यक्रम, रियाझ, प्रसिद्धी अशी कारकीर्द सुरू झाली. माझ्या वर्गात आणखी एक मुलगा होता, रघुनंदन (पं. रघुनंदन पणशीकर). सरांनी आमच्या चौथीत ‘संगीत सुवर्णतुला’ हे नाटक बसवायचं ठरवलं. तेही काटछाट करून ४०-४५ मिनिटांचं केलं. असं करताना नाटय़ उभं राहायला हवं, गाण्यांना न्याय हवा, कथा संपूर्ण सादर व्हायला हवी, आम्हा बालकलाकारांना ते पेलायला हवं, वेळेत बसायला हवं अशी अनेक आव्हानं होती. गाणी ठरली. रघुनंदनला नारदाची भूमिका दिली आणि मी कृष्ण झाले होते. रघुनंदनचे वडील प्रभाकरपंत पणशीकरांची ‘नाटय़संपदा’ ही नाटय़संस्था होती. त्यांचीही खूप मदत झाली. नाटकात कृष्णाच्या तुलाभाराचा प्रसंग होता, त्यात खरी तुला आणायचं ठरलं. शोधाशोध सुरू झाली. वर्गातील एका मुलाच्या, केतकरच्या पालकांचे किराणा मालाचं दुकान होतं दादर टीटी सर्कलला. त्याला बलरामाची भूमिका दिली होती. ते तुला देण्यासाठी लगेच तयार झाले. आणि ती जड तुला शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये नेऊन तिसऱ्या अंकात स्टेजवर आणून आमचा प्रयोग दिमाखात पार पडला. ‘रागिणी मुखचंद्रमा’ गायलेलं आठवतंय मी. प्रसाद सावकारांच्या या गाण्याच्या रेकॉर्डचं पारायण केलं होतं मी. रूपक तालात दिमाखात नटलेलं, तानांच्या भेंडोळय़ांनी सजलेलं ते नाटय़गीत. मी ‘माध्यमिक’मध्ये गेले. सर ‘प्राथमिक’ला होते तरी शाळेत असेपर्यंत दरवर्षी आगाशे सर आमचं नाटक बसवत असत. जान्हवी पणशीकर आणि चारुशीला साबळे माझ्या २-३ वर्ष पुढे होत्या. त्यांचाही नाटकांत सहभाग असे. सरांच्या चिकाटीला प्रणाम! अलीकडेच शाळेनं त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार केल्याचं कळलं. मी दुसरी-तिसरीत असताना विजयाताई जोगळेकरांकडे गाणं शिकायला सुरुवात केली. आई मला त्यांच्याकडे नेत असे आणि क्लास संपेपर्यंत तिथेच बसे. घरी आल्यावर रियाझ करून घेई. गृहिणी होती ती, पण मिनिटभराचीदेखील उसंत नसे तिला. विजयाताईंकडे गाणं शिकत असताना अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊ लागले मी. साधनाबरोबरचा (साधना सरगम) स्पर्धेतला प्रवास तेव्हाच सुरू झाला होता. स्पर्धेतलं गाणं किमान शंभर वेळा घोटण्याची सक्ती होती. चिकाटी, सातत्य, शिस्त सगळय़ाचेच धडे. त्या निवडत असलेली गाणी अत्यंत अवघड असत गायला. ‘जाहल्या काही चुका’, ‘जिवलगा’, ‘भेटी लागी जीवा’, ‘स्वप्नातल्या कळय़ांनो’ अशी एकाहून एक अवघड गीतं! उत्तम गळा, बुद्धी आणि भाव मागणारी. प्रत्येक हरकत तशीच येईपर्यंत घोटायची आणि आल्यावर त्यात तेज येईपर्यंत म्हणायची. ‘जाहल्या काही चुका’मधल्या वळणदार, लयदार जागांचं त्या नोटेशन करून देत असत. त्यांच्या शेजारी आजचे सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीतज्ञ डॉ. विद्याधर ओक राहात असत. तेव्हा तो डॉक्टरी शिकत होता. तीक्ष्ण बुद्धी, हार्मोनियमवर लीलया फिरणारी बोटं. तोसुद्धा नोटेशन काढायला मदत करत असे. गाणी गाऊन घेई वारंवार. ‘परफेक्ट’ येईपर्यंत. ‘जाहल्या काही चुका’मध्ये ‘ध नी रेगरे नीसानी प म प’ ही ‘काही’ या शब्दानंतरची जागा, त्याची फोड करून, आवाज बारीक-मोठा कुठे करायचा, भावनिर्मितीसाठी शब्दोच्चार, आवाज, यांवर कसं लक्ष द्यायचं, या सगळय़ाचे संस्कार त्यांनी केले. रियाझाची गोडी लागू लागली. केलं की येतंय.. आलं की आनंद होतोय.. माझं गाणं मला आवडू लागलंय.. गाताना माझ्यातला श्रोता सुखावतोय.. या जाणिवा जागृत होऊ लागल्या. यातली बहुतेक गाणी लतादीदींनी, आशाताईंनी म्हटलेली असत. त्यांचा सूर वरचा. कधी काळी १, तर कधी काळी २. पातळ आवाज. माझा आवाज काळी ५ चा. थोडा जाडसर, पण लयदार, हवा तसा वळणारा. एकच गाणं काळी २ आणि काळी ५ मध्ये गायल्यानं होणारा ‘असर’ मात्र निराळा. त्यामुळे गाण्याची निवड करणं अवघड होई. आव्हानात्मक हवं गाणं, अवघडच असलेलं उत्तम, पण असरदारही हवं. अशी गाणी निवडून ती आत्मसात करण्याचं वेड लागलं. आत्मशोधाच्या वाटेवर चालताना महत्त्वाची भूमिका निभावणारी ही मंडळी- आगाशे सर, विजयाताई. माझ्यासमोर बसून ज्यांनी रियाझ करवून घेतला. ‘कठोर परिश्रमास पर्याय नाही’ याचं प्रत्यंतर येईपर्यंत रियाझाचे, प्रवासाचे मार्गदर्शक-साक्षीदार!१९७२ मध्ये २ ऑक्टोबर रोजी ‘दूरदर्शन’चं मुंबई ऑफिस सुरू झालं. तेव्हा मी ९ वर्षांची होते. विजयाताईं निर्मात्या म्हणून रुजू झाल्या. तिथल्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी मला संधी दिली. ‘किलबिल’मध्ये अनेक गाणी गायले, निवेदन केलं, नाटय़प्रवेश केले. बहुतेक कार्यक्रम ‘लाइव्ह’ असत. आम्ही मेकअप करून तयार राहात असू आपल्या नियोजित जागी. आधीचा कार्यक्रम संपला की मध्ये ५-१० सेकंदाचा वेळ मिळत असे आणि आमचा कार्यक्रम सुरू होई. बटण ‘ऑन’ केल्यावर दिवा लागतो तसं. ५-४-३-२-१ म्हटलं की आम्ही कार्यक्रम सुरू करत असू. आपलं सर्वोत्तम देण्याची कसोटी. मन क्षणात एकाग्र करण्याचं आव्हान. दृकश्राव्य म्हटलं की अनेक परिमाणं असतात. ती सांभाळून कामावर लक्ष केंद्रित करायचं. लहान वय, थोडा अल्लडपणा, पण बरीच शिस्त, मोठय़ांचा धाक यामुळे नैय्या पार होई! असाच एकदा ‘दूरदर्शन’वर बालगीतांचा कार्यक्रम होता. आम्ही ६-७ जण गाणार होतो. तालमी सुरू झाल्या. सगळे जमलो एकत्र, संगीत दिग्दर्शक आले. बालकलाकारांची छोटी ‘ऑडिशन’ घेतली गेली. दोन दिवसांत आम्हाला चाली शिकवल्या दिग्दर्शकांनी. मग आमच्याकडून गाऊन घेऊ लागले. एका वेळी एकानंच गायचं. सगळय़ांनी गाणी सादर केल्यानंतर गाण्याचं, ओळींचं वाटप सुरू झालं. काही ‘सोलो’ ओळी होत्या, तर काही ‘कोरस’. काही अवघड, आव्हानात्मक. अवघड ‘पिकअप’ असलेल्या ओळी नेमक्या माझ्या वाटय़ाला आल्या. इतर मुलीही प्रयत्न करत होत्या, पण तितकंसं जमत नव्हतं त्यांना. त्यामुळे माझ्या वाटय़ाला ‘सुपीक’ ओळी आल्या आणि आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ११ वाजता तालीम होती. तालमीला गेले आणि लक्षात आलं, की आदल्या दिवशी मला गायला दिल्या गेलेल्या गाण्याच्या ओळी आज इतर मुलींना दिल्या आहेत. आदल्या दिवशी मला गाण्यात महत्त्व मिळालं होतं, ते आज नव्हतं. माझा विरस झाला. डोळय़ांत पाणी आणून मी आईकडे बघत होते. तिनं खुणेनं ‘गात राहा’ असं सांगितलं. तालीम संपली. घरी येऊन मी खूप रडले. एवढय़ात त्या संगीत दिग्दर्शकांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, की आदल्या दिवशी तालीम झाल्यानंतर इतर मुलांचे पालक- जे नामवंत होते, काही ‘खानदानी कलाकार’ होते त्यात, त्यांनी आक्षेप घेतला होता, की त्यांच्या मुलांना न्याय मिळत नाहीये म्हणून! त्यांच्या धमकीला बिचारा तो नवोदित संगीत दिग्दर्शक घाबरला होता. आईनं मला समजावून सांगितलं. खरं तर इतकं राजकारण समजण्याचं वय नव्हतं माझं, पण ही संधी शेवटची नाही हे इवल्याशा मेंदूला कळलं असावं. नवीन फ्रॉक, मेकअप, टीव्हीचे कॅमेरे, आपल्या ओळी यांत रमले मी. आणि पुढील संधींकडे डोळे लावून नव्या जोमानं गाऊ लागले!