उल्हास सप्रे

लहानपणी धाक आणि मोठं झाल्यावर खेळीमेळी असं वडिलांबरोबर सर्वसाधारणपणे नातं असतं. आमचे ए. जी. भावे सर या अर्थानंही पितृतुल्यच होते. भावे सरांची पहिली आठवण- मी सहावीत होतो. एका रविवारी हिंदीची कुठलीशी बाह्यपरीक्षा होती. आमच्या हिंदीच्या बाईच ‘सुपरव्हिजन’ला. एका वर्गापुरताच मामला. या बाई चक्क आम्हाला उत्तरंही सांगत होत्या! एकदम कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक भावे सर वर्गात अवतरले. हिंदीच्या बाई जाम तंतरल्या! खरं तर तेव्हा (किंबहुना निवृत्तीपर्यंत) सरांकडे पर्यवेक्षक,  उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यातलं कुठलंही पद नव्हतं. पण या पदांसाठी आवश्यक पात्रता, कर्तबगारी, दरारा हे सारं त्यांच्याकडे होतं. तो तिथे उपयोगी पडला.

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

भावे सर ‘बीएस्सी.- बी.एड.’ होते. पण शिकवायला कोणताही विषय त्यांना वज्र्य नव्हता. बीजगणित-भूमिती हा त्यांचा हातखंडय़ाचा विषय. रूढ अध्यापन पद्धतींपेक्षा वेगळय़ा पद्धतीनं ते शिकवत. अनुभव आणि चिंतन यातून स्वत:ची अशी उमललेली ‘आउट ऑफ द बॉक्स’ पद्धत होती त्यांची. त्यांनी भूगोल आणि जीवशास्त्रही शिकवलं. पण एक खास आठवण म्हणजे संस्कृतच्या ‘ऑफ तासा’ला येऊन त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत सुभाषितमालेचा अर्थ स्पष्ट केला होता. यालाच हल्ली रचनावाद (constructivism) म्हणतात.

त्यांची तरल विनोदबुद्धीही खास. तसंच काही घडलं तर एखादा शेरा मारून गडगडाटी हसायचे आणि ‘होय रे गुलामा?’ म्हणायचे! त्यानं वातावरणातला ताण अगदी निघून जाई.  त्रिकोणमिती शिकवताना ते आम्हाला त्रिकोणांना नावं (उदा. XYZ, PQR) द्यायला सांगून तसं फळय़ावर लिहायला सुरुवात केली. एका वात्रट मुलानं AGB (म्हणजे सरांच्याच नावाची अद्याक्षरं!) सांगितली आणि त्यांनी मिश्कील हसत तेही स्वीकारलं. त्यांनी रासायनिक संज्ञा शिकवल्यावर आम्ही त्यांना ‘AG’ भावे ऐवजी ‘Silver  भावे’ (‘एजी’ म्हणजे रसायनशास्त्रातल्या ‘पिरियॉडिक टेबल’मधली चांदी धातूसाठीची अक्षरं.) म्हटलं! दहावीत असताना त्यांनी आम्हाला अचानक नियोजन करून धोपेश्वरच्या जत्रेला नेलं होतं. परत येताना एका दुकानात चॉकलेटं खरेदी करून तीही आम्हाला वाटली.

आम्ही दहावीत त्यांच्याकडे खासगी शिकवणीला जायचो. या शिकवणीला आर्थिक परिमाण बिलकुल नव्हतं. पुढे रत्नागिरीत बारावीत असताना टय़ूशन टीचर्स, त्यांचे हेवेदावे, स्वत:कडे न येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक, हे सारं पाहिलं आणि ए. जी. भावे विद्यार्थिप्रिय का होते हे सहज लक्षात आलं. शिकवणीत सरांनी ‘आलेख’ हे प्रकरण सुरुवातीला सर्वाना एकदम शिकवलं. त्यानंतर पूर्ण वर्षभर मात्र आम्हा दहा विद्यार्थ्यांचा गट स्वत: हवं ते प्रकरण निवडून शिकत होता. सर मार्गदर्शन करायला उपलब्ध, पण भर स्वयंअध्ययनावर. एकदा त्यांनी आमच्यासमोर जुन्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे आणि कोरे आखीव कागद ठेवले. प्रत्येकाला एकेक प्रश्न नेमून दिला. वेगवेगळय़ा प्रश्नपत्रिकांतून आम्ही तेवढय़ा क्रमांकाचेच प्रश्न उतरून काढायचे होते. आमच्याकडून ही कच्ची सामग्री मिळाल्यावर सरांनी प्रश्नप्रकार, प्रकरण वगैरे पद्धतीनं हे सारे प्रश्न ‘फेअर’ एका वहीत लिहून काढले. आम्हाला म्हणाले, ‘‘आज पहाटे जरा लवकर उठलो आणि आता सहा-सात तासांत झालं बरंचसं काम.’’ परीक्षेसाठीची तयारी.

एक ‘दहावीसुलभ’ प्रकार- आमचा वर्ग फक्त मुलग्यांचा. कारण दहावी ‘ड’ ही आमची तुकडी ‘टेक्निकल कोर्स’ची. आमच्या वर्गातल्या एका मुलानं शाळेच्या पहिल्या मजल्यावरून (त्याच्या  त्रिकोणमितीच्या ज्ञानानुसार!) ‘नयनबाण’ मारत असलेल्या एका फटाकडय़ा मुलीवर               ४५ अंशांतून कागदी बाण मारला. भावे सर आमचे वर्गशिक्षक. मधल्या सुट्टीनंतर त्यांचाच तास चालू होता. त्या मुलीनं आम्हा मुलांवर कृतककोपानं कटाक्ष टाकत कागदी बाण सरांकडे सोपवला. वातावरण एकदम ‘टाईट’! आम्ही सर्वानी प्रचंड एकीचं दर्शन घडवत त्या ‘धनुर्धारी’ मुलाचं नाव सांगितलं नाही. व्यथित झालेल्या सरांनी आम्हाला वर्गात उभं करून ठेवलं. स्वत:ही उभेच राहिले. आपण शिकवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. तो डिसेंबर-जानेवारीतला कालावधी. संध्याकाळी आमच्या वर्गातला नीलेश त्यांच्या घरी शिकवणीसाठी सर्वप्रथम पोहोचला, पण पेपर वाचत बसलेल्या सरांनी त्याला दाराजवळच अडवत टय़ूशन घेणार नसल्याचं सांगून टाकलं. शाळेतल्या या कारणामुळे आमची घरगुती टय़ूशनही बंद पडली. कारण तत्त्वांशी तडजोड नाही! याला मी ‘इंटिग्रिटी’ (प्रामाणिकपणा) म्हणतो. पुढे सरांनी शाळेत गणिताचा नियमित सराव घेतला, पण सर आणि आम्हा सर्वात काही काळ अंतराय पडला हे निश्चित.

दहावीच्या सुट्टीत त्यांनी माझ्यासह काही मित्रांना शाळेत बोलावून संपूर्ण ग्रंथालयातल्या पुस्तकांचं परिगणन, तालिकीकरणाप्रमाणे पुनर्रचना ही जबाबदारी दिली. याच सुट्टीत त्यांनी मला ‘आईनस्टाईनचे नवे विश्व’ हे पुस्तक वाचायला दिलं होतं. पुढे एका भेटीत सर मला म्हणाले होते, की सध्या ते फुकूओका यांचं ‘एका काडातून क्रांती’ (One Straw Revolution) हे पुस्तक वाचताहेत. सरांच्या ज्ञानसाधनेची झेप थोर होती, हे माझ्या मनावर ठसलं. पुढे मी शिक्षक झाल्यावर चौफेर वाचनाच्या या शिकवणीचा मला फायदा झाला हे वेगळं सांगायला नको.

याच भावे सरांनी विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतंगही उडवले! तीच गोष्ट पोहण्याची. सर्वप्रथम श्रमदानाचं आवाहन करून तळं साफ केलं आणि मारुतीच्या देवळाजवळच्या त्या छोटय़ा तळय़ात त्यांनी खंबीर जलतरणपटू घडवले. दोन वर्षांपूर्वी गणपतीत त्यांच्या घरी गेलो असता मोठय़ा उत्साहानं आणि अभिमानानं या प्रशिक्षणाचे व्हिडीओ त्यांच्या टीव्हीवर मला दाखवले होते.

नोकरीच्या उत्तरार्धात त्यांचे संस्थेशी खटके उडाले. त्याबद्दल त्यांनी आवश्यक ते पुरावे जोडून चक्क प्रदीर्घ ब्लॉग लिहिला. ‘इष्ट तेच बोलणार’ हा खाक्याच होता त्यांचा.मृत्यूपूर्वी सर मला एका लग्नसोहळय़ात भेटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचाच उत्साह होता. ती भेट शेवटची ठरेल, असं बिलकुल वाटलं नव्हतं. आमच्या ‘सिल्व्हर भावे सरां’नी शाळकरी वयातल्या स्मृतींवर सुवर्णाक्षरांत अमीट ठसा उमटवला. त्याच्याप्रति आदरांजली!