डॉ. अतुल आभाळे

२००६ च्या जून महिन्यातली गोष्ट. मी नाशिकच्या ‘आर. वाय. के. सायन्स वरिष्ठ महाविद्यालया’त प्रवेश घेतला होता. एका शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला आणि इंग्रजीतून बोलायला सुरूवात केली. ‘‘मी गिरीश पिंपळे. गेल्या २२ वर्षांपासून भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो.’’ मध्यम शरीरयष्टी, डोळय़ांना चष्मा, नीटनेटके कपडे, स्पष्ट उच्चार आणि प्रवाही वाणी. पहिल्याच तासात त्यांनी जे काही सांगितलं त्यावरून हे शिक्षक इतरांपेक्षा खूपच वेगळे आहेत याची जाणीव आम्हा विद्यार्थ्यांना झाली.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

भौतिकशास्त्र या विषयाचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. पण पिंपळे सरांनी पहिल्याच तासाला सांगितलं, ‘‘हा विषय अवघड आहे असं समजू नका. आव्हानात्मक आहे असं समजा. आणि तरुण वयात आव्हान स्वीकारायलाच पाहिजे, नाही का?’’ त्यांच्या या अतिशय सकारात्मक बोलण्यामुळे आमचा भौतिकशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. पहिल्या दिवशी त्यांनी अभ्यासक्रमातला कोणताच भाग शिकवला नाही, पण रोजच्या जीवनात आपण भौतिकशास्त्र कुठे कुठे वापरतो याची अनेक उदाहरणं सोप्या शब्दांत लक्षात आणून दिली. भौतिकशास्त्र शिकताना आपण वापरत असलेल्या शब्दाचा आधी इंग्रजी भाषेतला अर्थ नीट कळला पाहिजे, त्यानंतर त्याचा वैज्ञानिक अर्थ समजणं सोपं जातं; असं सर उदाहरणं देऊन स्पष्ट करत. या विषयातल्या संकल्पना समजण्यासाठी त्यांनी आम्हाला एक कळीचा शब्द सांगितला होता, तो म्हणजे
‘Why?’. एखादी नवीन संकल्पना समजून घेताना हा शब्द मनाशी उच्चारायचा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. शिकवताना भौतिकशास्त्राचा थोडा इतिहास, एखाद्या वैज्ञानिकाचा गमतीदार किस्साही ते सांगायचे, पण लगेच मूळ मुद्यावर यायचे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपल्याला खूप लांबलचक वाटतो. पण त्यातला प्रत्येक शब्द किती महत्त्वाचा आहे हे सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. अर्थात ते प्रत्येक वेळेला हीच पद्धत वापरायचे. kPhysics is an exact sciencelहे त्यांचं वाक्य माझ्या आजही पक्कं लक्षात आहे. या विषयात भोंगळपणा चालत नाही, असं ते नेहमी सांगत. सरांनी आम्हाला भौतिकशास्त्राची प्रात्यक्षिकंसुद्धा (प्रयोग) शिकवली. हे प्रयोग भौतिकशास्त्राच्या वेगवेगळय़ा शाखांमधले असतात, त्यामुळे प्रत्येक प्रयोगासाठी वेगवेगळं कौशल्य लागतं. ते कसं आत्मसात करायचं हेही त्यांनी मनापासून शिकवलं. एखाद्या प्रयोगात अपेक्षित उत्तर येत नसेल तर सर्वागीण विचार करावा लागतो. अभ्यासकाची विश्लेषण क्षमता वाढीला लागते. सरांनी माझ्याबाबत नेमकी हीच गोष्ट केली होती. विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेरचं जग दाखवण्यासाठी पिंपळे सरांनी विशेष प्रयत्न केले. विज्ञानविषयक स्पर्धा आयोजित करणं, शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी आम्हाला तात्पुरते शिक्षक बनण्याची संधी देणं, विज्ञान कार्यशाळा आयोजित करून जागतिक दर्जाच्या संशोधकांशी संवाद साधण्यासाठी चांगली वातावरणनिर्मिती करणं, हे त्यातले काही प्रयत्न. सरांनी आम्हाला भौतिकशास्त्रातल्या करिअरसाठीसुद्धा मार्गदर्शन केलं. पुढे मी पुणे विद्यापीठातून ‘एम. एस्सी.’ पदवी घेतली आणि आणि बंगळुरूतील ‘भारतीय विज्ञान संस्थे’तून ‘पीएच.डी.’ प्राप्त केली. आता बंगळुरूमध्येच एका कंपनीत मी वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर काम करतो.

आता पिंपळे सर सेवानिवृत्त झाले आहेत, पण पूर्वीपेक्षा ते अधिक कामात असतात. खगोलशास्त्र या विषयावर त्यांनी पाच पुस्तकं लिहिली आहेत. मी त्यांची ऑनलाइन भाषणं माझ्या छोटय़ा मुलीसह आवर्जून ऐकत असतो. त्यांच्याकडे स्वत:ची मोठी दुर्बीण आहे. शेकडो जिज्ञासू व्यक्तींना त्यांनी आकाशदर्शन घडवलं आहे. स्वातंत्रवीर सावरकर हासुद्धा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. असं सरांचं व्यक्तिमत्व विविधांगी आहे.

शालेय जीवनात स्वत: अतिशय हुशार असलेले सर पुढे ठरवून शिक्षण क्षेत्रात आले. अशी उदाहरणं दुर्मीळ असतात. ‘विज्ञान शिक्षकानं केवळ विज्ञान शिकवायचं नसतं, तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा असतो,’ असं ते आम्हाला सांगायचे. स्वत:च्या जीवनात त्यांनी नेहमीच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. त्यांनी विवाह केला तेव्हा कुंडली जुळवून पाहिली नाही, मुहूर्त बघितला नाही. त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीनं झाला. नवीन घरात प्रवेश केला तेव्हा वास्तुशांत केली नाही. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा पितृपंधरवडा जवळ आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ‘शस्त्रक्रियेची घाई नाही, पंधरा दिवस थांबलं तरी चालेल.’ पण सरांनी त्याला नकार दिला. पितृपंधरवडय़ातच शस्त्रक्रिया पार पडली आणि यशस्वीही झाली. सर भौतिकशास्त्र जगणारा शिक्षक आहे, असं मी म्हणतो ते या गोष्टींमुळेच. त्यांच्या कृतीतून त्यांनी आमच्यावर असे अनेक संस्कार केले.
असा शिक्षक मला लाभला आणि त्यानं माझी जडणघडण केली, हा माझ्या आयुष्यातला मोठा भाग्ययोगच मी मानतो.

करडी शिस्त – संजय केदार

माणसाच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्याच्या शालेय जीवनापासून होत असते. कारण इथूनच त्याच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असणारे पैलू पाडण्याची प्रक्रिया सुरू होते. हे पैलू पाडणारे शिल्पकार जेवढे उत्तम, कार्यकुशल, प्रामाणिक आणि संवेदनशील असतील तेवढं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व आयुष्यभर खुलून आणि उठून दिसतं. निर्जीव शालेय भिंतींमधला हा शिल्पकार म्हणजे शिक्षक. माझ्या जीवनाच्या आजच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना मला घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये शालेय वयात लाभलेल्या दत्तात्रय परदेशी सरांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं.
कडक शालेय शिस्तीचा आणि विविध शालेय सुविधांच्या अभावांचा तो काळ होता. सरांच्या व्यक्तिमत्त्वात मात्र काटेकोरपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, टापटीप आणि उपलब्ध परिस्थितीशी अनुकूलता हे गुण ठासून भरलेले. मध्यम उंची, मजबूत बांध्याची शरीरयष्टी, नाकाची लांबसडक दांडी आणि डोळय़ांवर चष्मा. डोक्यावर दाट काळय़ा कुळकळीत केसांचा वाकडा भांग. या सगळय़ाला शोभेल असा पांढराशुभ्र नेहरू शर्ट आणि पायजमा ते घालत. उंच पट्टीतला खणखणीत, स्पष्ट आवाज. त्यांच्या काही लकबी होत्या. मैदानात उभे असताना किंवा फिरताना ते छडी हातात घेत आणि हात पाठीवर एकात एक धरून चालत. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी घसा खाकरत. आम्हाला ते वर्गात येण्याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही सवय त्यांनी बहुतेक लावून घेतली असावी!

सरांच्या व्यक्तिमत्त्वातला उठून दिसणारा गुण म्हणजे त्यांची करडी शिस्त. याचमुळे कदाचित, पण माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध फारसे जुळले नाहीत. तरी त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप आजपर्यंत कायम मनावर राहिली आहे.आमची शाळा म्हणजे बीड जिल्ह्यातील शिरूरमधली ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वारणी’. काळ आहे १९९१ ते १९९५ चा. पाचवीपासून सातवीपर्यंत परदेशी सरांनी आम्हाला शिकवलं. मी पाचवीला असताना ते आमचे वर्गशिक्षक होते. वर्गाला सामूहिक शिस्त लावण्यासाठी त्यांनी उशिरा येणाऱ्याला पाढे म्हणण्याची शिक्षा आणि अनुपस्थित राहणाऱ्यांना एक रुपया दंडाची शिक्षा जाहीर केली होती. (अर्थात आम्हा सर्वाच्या सुमार आर्थिक स्थितीमुळे ही शिक्षा काही दिवसांनी मागेही घ्यावी लागली होती.) सर आम्हाला गणित शिकवायचे. गणितं समजावून सांगताना त्यांनी दिलेली उदाहरणं आमच्या भावजीवनाशी निगडित असायची आणि त्यामुळे ती मला सहज भावायची. कधी ते संख्यांची भांडणं लावायचे, हातच्याची वजाबाकी शिकवताना घरी पाहुण्यांना बोलवायचे आणि घरातली साखर संपवायला लावायचे, कधी एखाद्या संख्येला ऊस तोडणीसाठी बेलापूरला पाठवायचे! अशी उदाहरणं समजावून सांगायची त्यांची हातोटी होती. हे प्रसंग नेहमी अनुभवत असल्यामुळे मला ही गणितं पटकन समजायची. शाळेत येताना चार-दोन दिवसांत नक्कीच एखाद्या शेजाऱ्यांचं भांडण नजरेला पडायचं, पाहुणे घरी आल्यावर आमच्या घरची साखरही बऱ्याचदा संपलेली असायची आणि त्यामुळे वजाबाकीच्या हातच्यासारखी ती शेजाऱ्यांकडून आणावी लागायची आणि आई-वडील तर दरवर्षीच ऊसतोडीला जायचे. पुढे शिक्षण पेशात नोकरी करायला लागल्यावर मीसुद्धा सरांच्या या कौशल्याचा पुरेपूर वापर करू लागलो.

सहावी आणि सातवीला सर मराठी आणि हिंदी त्याच तन्मयतेनं आणि व्यापकतेनं शिकवायचे. पण कधी कधी समानार्थी शब्द किंवा प्रश्नोत्तरांवर छडय़ांचा मारही खावा लागायचा. हा मार चुकवावा किंवा कमी लागावा म्हणून आम्ही वेगवेगळय़ा युक्त्या योजायचो. एकदा छडीचा मार कमी लागावा म्हणून मी मोहटादेवीच्या यात्रेतून एक जाडजूड अंगठी आणून ती बोटात घातली आणि छडी त्या अंगठीवर घ्यायचं ठरवलं. परंतु एका फटक्यात अंगठी तुटून तुकडे होऊन खाली पडली. तरीही सरांच्या या धाकामुळे त्यांच्या विषयाचे धडे आणि कविता माझ्या कधी पाठ होऊन जायच्या ते कळायचंही नाही. त्यामुळेच की काय, पण माझं अक्षर खराब असूनही वर्गात माझा दुसरा किंवा तिसरा नंबर ठरलेला असायचा.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या वेळी सगळी शाळा सरांच्या भोवती केंद्रित व्हायची. कारण सर गायन आणि वादनात तरबेज. या कार्यक्रमांच्या तयारीसाठी पेटीच्या सुरावर आपल्या सुरेल आवाजात ते गायचे आणि आमच्याकडूनही ती गीतं म्हणून घ्यायचे. ती देशभक्तीपर गीतं आमच्या जिभेवर दिवसरात्र रेंगाळायची आणि आमच्याकडून गावात संक्रमित होत जायची. साधी कवायत, झेंडा कवायत, रुमाल कवायत, काठय़ा कवायत अशा वेगवेगळय़ा कवायती सर बसवून घ्यायचे. वार्षिक स्नेहसंमेलन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची सूत्रंही त्यांच्याकडेच. तेव्हा आतासारखी ध्वनिमुद्रित गाण्यांची फारशी सोय नव्हती. गवळणी, भारुड, लोकगीतं, भक्तीगीतं, चित्रपटगीतं प्रत्यक्ष गाऊन स्नेहसंमेलनांमध्ये सादर केली जायची आणि ही सर्व गीतं सरांनी पेटीवर बसवलेली असायची. मी शिक्षक झालो आणि पूर्वी पाहिलेल्या सरांच्या अध्यापन शैलीचा मला भरपूर फायदा झाला. त्यांच्या काही सवयी, लकबी नकळत माझ्यातही उतरल्या. कार्यक्रमांचं निवेदन करणं, वेगवेगळय़ा गीतांचं गायन करणं (तालासुराचं मला कोणतंही ज्ञान नसताना!), वर्गात किंवा अगदी घरातही प्रवेश करण्यापूर्वी घसा खाकरून साफ करणं, अशा गोष्टी सरांकडून माझ्यात आल्या असाव्यात.

आता मी नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याकारणानं सरांची नियमित भेट होत नाही. मागे एकदा शेवगावच्या बस स्थानकात ते मला भेटले होते. पण थकलेल्या वयातही सरांमध्ये पूर्वीसारखंच चैतन्य, उत्साह, नीटनेटकेपणा आणि तशीच आपुलकी मला जाणवली आणि शाळेत त्यांनी वर्गावर घेतलेले तास डोळय़ांसमोर तरळून गेले!