प्रकाश अ. जोशी
सातवीपासून माझं पुढचं शिक्षण दादरच्या छबिलदास शाळेत झालं. दहावी-अकरावीची वर्ष ही आम्हा सर्वासाठी मोलाची होती. या दोन्ही वर्षांसाठी विषय सोपा करुन शिकवण्याची विलक्षण हातोटी असलेले शांताराम बांदेकर सर आम्हाला महत्त्वाच्या अशा बीजगणित व भूमिती आणि विज्ञान (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्र) या विषयांबरोबरच वर्गशिक्षक म्हणूनही लाभले. मुलांना उत्सुकता वाटेल अशा प्रकारे प्रत्येक विषय सावकाशीनं उलगडत नेण्याच्या सवयीमुळे सरांचा तास कधी संपूच नये असं वाटायचं. त्यांच्याबद्दल मनात कायम आदरयुक्त धाक असायचा, पण भीती मात्र अजिबात नसायची.
एखाद्या विषयाचं सादरीकरण किती नीटनेटकं, सुबक आणि आकर्षक असावं, याचा वस्तुपाठ म्हणजे सरांचं फळय़ावर लिहिलेलं लिखाण. ‘विज्ञाना’मधले सर्व विषय बांदेकर सर समर्पक उदाहरणांसहित शिकवत असत. प्रयोगशाळेत त्या विषयांची प्रात्यक्षिकं बघणं ही आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असायची. सर सगळी प्रात्यक्षिकं समरसतेनं अन् अत्यंत उत्साहानं करून दाखवायचे. याच कारणामुळे माझ्यात विज्ञानाची आवड आपसूक निर्माण झाली. बीजगणिताचे प्रश्न आमच्याशी संवाद साधत टप्प्याटप्प्यानं सोडवून दाखवण्याची सरांची पध्दत होती. त्या अनोख्या पध्दतीमुळे प्रश्न हळूहळू सुटत जायचाच, शिवाय खात्रीनं उत्तराला भोज्जाही केला जायचा!
माझ्या पुढच्या आयुष्यात अनेक समस्या वा संकटं आली, पण अशा संकटसमयी सरांच्या त्या ‘टप्पा पध्दती’ची उपयुक्तता माझ्या ठळकपणे कामी आली अन् आलेल्या संकटांतून, प्रश्नांतून मुक्तता मिळत गेली, मार्ग सापडत गेले. पुढे विज्ञानात प्रावीण्यासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं. परंतु नोकरीसाठी मला त्याहून वेगळय़ाच अशा बँकिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय काही अपरिहार्य कारणानं घ्यावा लागला. ‘प्रोबेशनरी ऑफिसर’पदासाठी शेवटच्या मुलाखतीत मला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरानं माझी निवड पक्की झाली होती. मी त्या वेळी दिलेलं ते उत्तर मला अजून आठवतंय. ते होतं- ‘कोणत्याही प्रश्नाकडे वा समस्येकडे बघण्याची विज्ञाननिष्ठ विश्लेषणात्मक दृष्टी ही विज्ञानामुळेच मिळते. हीच दृष्टी नव्या क्षेत्रात मला यशाकडे निश्चितपणे घेऊन जाईल!’. माझं ते उत्तर सरांकडून मिळालेल्या विचार-संस्कारांचं फलित होतं, याची जाणीव मला प्रकर्षांनं झाली.
शास्त्रज्ञांच्या एखाद्या शोधामागची कथा बांदेकर सर अत्यंत उत्कंठावर्धकरितीनं आम्हाला सांगत. ‘वस्तूचं आकारमान, घनता आणि त्या वस्तूनं बाजूला सारलेलं पाणी यांचा असलेला परस्पर संबंध, पाण्यानं पूर्ण भरलेल्या टबात उतरलेल्या आर्किमिडीजच्या लक्षात आला.. काहीतरी नवीन गवसल्याचा आनंद आर्किमिडीजनं ‘युरेका, युरेका’ म्हणत साजरा केला. या घटनेनंतर आर्किमिडीजचा सिध्दांत प्रकाशात आला.. आयझ्ॉक न्यूटनच्या डोळय़ांसमोर झाडावरुन पडलेलं सफरचंद गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी कारणीभूत झालं. साध्याशा वाटणाऱ्या या घटना महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लागायला कारणीभूत ठरल्या. म्हणूनच कोणत्याही घटनेकडे वा प्रसंगाकडे डोळसपणे बघायला हवं. साध्याशा घटनांतून प्रत्येक खेपेला एखादा शोध लागेलच असं नाही, पण अशा घटनांचा अन्वयार्थ वेगवेगळा असू शकतो. त्यातून काहीतरी चांगलं गवसू शकतं. विचारांबरोबरच आयुष्यालाही कलाटणी मिळणाऱ्या संधी गवसू शकतात,’ असे सरांचे विचार होते. काहीशा अशाच प्रकारच्या निरीक्षणात्मक विचारक्षमतेतून वेगळा विचार करण्याची उर्मी मला कायम मिळत गेली. आणि महत्त्वाच्या घटना घडण्यासाठी योग्य वेळ साधता आली.
असाच एक अनुभव मी बँकेत शाखा प्रमुख असताना आला. नव्या ब्रँचची सुरूवात माझ्यापासूनच झाली होती आणि शाखेच्या व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळय़ा क्लृप्तय़ा मी वापरत असे. तेव्हाच एक अगदी साधी वाटणारी घडना घडली. आमच्या भागातील आमच्या स्पर्धक बँकेनं त्यांच्या शाखेचं स्थलांतर, मूळ जागेपासून थोडय़ाशा दूरच्या जागेत केलं. मला त्यात आमच्यासाठीच्या व्यवसायवृध्दीची संधी दिसली. परिसरातील चार मोक्याच्या ठिकाणी आम्ही कापडी बॅनर्स लावले, त्यावर लिहिलेलं होतं, ‘We are close to you! BANK WITH US!’ याचा अपेक्षेप्रमाणे इष्ट परिणाम आमच्या शाखेच्या व्यवसायावर झाला. मनाची जडणघडण, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाची नांदी शाळाकाळातच व्हायला लागते. शिक्षणाच्या निमित्तानं बांदेकर सरांकडून जे काही कानावर पडत गेलं, त्यातूनच माझ्या विचारांना दिशा मिळू शकली, विचारांत प्रगल्भता आली. योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली. याच कारणानं आजही आयुष्यात येणारे अनेक प्रसंग आणि घटना बांदेकर सरांच्या आठवणी मनात जागृत व्हायला कारणीभूत ठरतात!