|| प्राची पाठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एका नवऱ्याची बायको’ हॉस्पिटलात दाखल होती. त्याला एक-दोन वेळेस बायकोला खाऊ घालताना बघितले होते. कोण काय म्हणेल, याकडे त्याचे जराही लक्ष नसायचे. डबा आणणे, वेळेवर खाऊ घालणे, औषधे देणे, हॉस्पिटलमध्ये मिळेल तिथे रात्री झोपणे, परत कामावर जाणे, असे काही दिवस तो करत असावा. मग बायको बरी झाली, घरी गेली. मी त्याला एक-दोनदाच बघितले होते, तर मीही विसरून गेले. दोन-तीन आठवडय़ांनी अचानक रात्री दुचाकीवर एक माणूस मोठय़ाने गाणं म्हणत जाताना बघितला. मी बाइक स्टँडवरून उतरवत होते. सुनसान रस्ता असल्याने गाणे नीटच ऐकू आले. गाणे होते –

‘‘रविवार मुलींनो,

आज वार रविवार.

दुकाने बंद आहेत,

आज वार रविवार.

तुमची फर्माईश उद्या परवा.

रडू नका बार बार..’’

तो हे गाडी चालवत तालासुरात म्हणत होता. मी पटकन गाडी काढून त्याच्यामागे गेले. त्या हॉस्पिटलमधला ‘गृहकृत्यदक्ष’ नवराच होता तो. मुलींचा हट्ट पूर्ण करायला आला असावा. ट्रिपल सीट चालले होते ते. पाठीमागे दहा-बारा वर्षांची आणि सात-आठ वर्षांची अशा दोन मुली होत्या. मुली हिरमुसल्या होत्या, कारण त्या वेळी सगळी दुकाने खरोखर बंद होती. फार प्रेमळ बाप माणूस होता त्या माणसात. त्या गाडीचा नंबर बघितला. मुलींची नावे टाकलेली असावी. छान वाटले एकूण. आजारी आई घरात सतत पाहिल्याने मुलींना सहजच फिरवून आणणारा बाप. एकमेकांना किती धरून होते ते सगळे. अशा कुटुंबाची आस वाटतेच.

माझी आई हॉस्पिटलला आजारी असताना तिला रोजच नाश्ता स्वत: बनवून घेऊन जाणारे माझे बाबाही बघत आले आहे. सहजीवन ही किती गोड गोष्ट आहे, हे आई मला त्या आय.सी.यू.मधल्या बंदिस्त कक्षातूनदेखील एकदा खुणेने सांगत होती. अर्थात, हे सहजीवन कोणत्याही स्त्री-पुरुष, पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री, थर्ड जेंडर-पुरुष, थर्ड जेंडर-स्त्री, थर्ड जेंडर-थर्ड जेंडर, दोन स्त्रिया – एक पुरुष, दोन पुरुष – एक स्त्री, लग्न, लिव्ह इन, वृद्धापकाळाने एकत्र राहणारे कोणीही, कितीही जण वगरे – वगरे अशा कोणाचेही असू शकते. या सगळ्या शक्यतांचे आणि मस्त मजेत ‘संसार’ करणारे लोक आजकाल दिसतात; भारतात, भारताबाहेर. कुणाचा एकटय़ाचादेखील संसार असू शकतो आणि तोही त्याबद्दल सुखात असू शकतो. म्हणूनच पुरुष असलेच, स्त्रिया तसल्याच आणि तृतीयपंथी ढमकेच असे साचेबद्ध काहीच नसते, याची जाणीव होते. चटकन कशाला लेबल लावायला धजावत नाही आपण.

सामान्यत: ज्या वयात मुलं-मुली शिक्षण पूर्ण करून लग्नाचं पाहत असतात, घरून तसा दबाव झेलत असतात, लग्न जुळवत असतात, त्या वयात मी सुखासुखी एकटीने राहायचा प्रयोग केला. घरून पाठिंबा होताच. मला तर कधी प्रकर्षांने असे वेगळे काही जाणवले नाही सुरुवातीला; पण कामानिमित्ताने मला घरी भेटायला येणाऱ्या कोणालाही इमारतीखालचा वॉचमन, ‘‘इतनी अच्छी लडम्की है, अकेली क्यूँ रहती हैं?’’, असे कुतूहलाने विचारत असे, तेव्हा मला ‘त्याच्या नजरेतील ती’- म्हणजे मी – कोणी तरी वेगळी आहे, याची जाणीव झाली! तोवर मला एकटय़ा राहणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा बघतो, तिला घरं मिळत नाहीत, वगरे वगरे उगाचच बोलतात की काय, असेच वाटायचे. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरसुद्धा एकटीने राहून बघितले. तेव्हा मला हळूहळू हा ‘जेंडर गेम’ नीट कळायला लागला. मला असे अनुभव आले नाहीत कोणा स्त्री-पुरुषांचे म्हणजे तसे होत नसावेच असे नसते, ही जाणीव झाली. कोणाचेही बरे-वाईट वैयक्तिक अनुभव म्हणजेच जगाबद्दलचे अंतिम सत्य नसते, ते कळले.

एरवी स्त्री चळवळीत काम करणाऱ्या काही जणी, ‘‘मी आजारी पडले तर घरातले पानसुद्धा हलत नाही. कोणी साधा चहा करून घेणार नाही, घेत नाहीत,’’ असे प्रौढीने बोलताना ऐकल्या होत्या. यांचा नवरा पारंपरिक व्यवस्थेत वाढला असेल बुवा! त्याचे एक वेळ सोडून देऊ, पण यांची मुले म्हणजे यांनी स्वत: वाढविलेले पुरुष जराही वेगळे का निघू नयेत? हा प्रश्न मला कायम पडलेला असायचा. मग या स्त्रियांचे काम बघून छान म्हणावे, की त्या जी वैयक्तिक गोष्ट प्रौढीने सांगत असतात, त्याबद्दल खेद मानावा, यावर मी माझ्या परीने विचार करीत बसायचे. त्याच वेळी अशा कोणत्याही विचारधारेला नुसतेच डोक्यावर घ्यायला किंवा मनापासून अंगीकारायलासुद्धा न धडपडणारे, पण स्त्री-पुरुष चौकट स्वत:च्या घरातल्या जेंडर रोल्सपासूनच पुसून टाकणारे आणि आपण काही तरी पुसले आहे बरं, असाही आवेश नसलेले माझे आईवडील खूपच वेगळे वाटायचे. कालांतराने मला त्या चळवळीतल्या स्त्रियांचे बोलणे प्रौढी नसेल, कदाचित हतबलता असेल किंवा एक साधे-सरळ सत्य असेल, असेही बघायची स्पेस माझ्या विचारांमध्ये कमावता आली! तेव्हा मला त्यांच्या नजरेतले त्यांच्या आसपासचे पुरुष आणखीन वेगळे दिसू लागले.

कामासाठी मला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेने खूपच फिरावे लागते. वाटेत टॉयलेट्स सापडणे म्हणजे महामुश्कील. अशा वेळी ‘वावरात’ काम उरकावे लागते! कोणाही अनोळखी पुरुषाला ‘‘टॉयलेट आहे का इकडे?’’ विचारून माझ्यासाठी काही रास्त सुविधा सार्वजनिक जागी नाहीत, हे सत्य त्या पुरुषावर ढकलून दिल्यावर फार वेगवेगळे अनुभव सतत येत असतात. ते पुरुष मग खात्रीचे आडोसे सुचवतात. प्रवासाची बॅग सांभाळायची काळजीही घेतात. ‘‘मी थांबतो या वळणावर, तुम्ही जाऊन या तिकडे ताई,’’ असेही सुचवतात आणि मी ते ऐकतेसुद्धा! आजवर कधी वाईट अनुभव आलेले नाहीत. कुठे दुर्गम ठिकाणी बस मिळत नाहीत. इतरही काही सोय नसते. पायी जाणे शक्य नसते. जो दिसेल, त्याला हात करून लिफ्ट मागायची वेळ येते. फक्त लिफ्ट द्यायची आहे, इतर काहीही देवाणघेवाण या दोन जीवांमध्ये घडणार नाही, याचे भान देहबोलीतून आणि आपल्या वावरातून समोरच्याला देत ती- ती रिस्क घेऊनसुद्धा आपण सुखरूप राहू शकतो, हेही मला कळत जाते. अशीही एक स्त्री असते, ते त्यांना कळत जाते! एकटीने केलेला हर एक दुर्गम प्रवास असे अनोखे धडे देत राहतो. माझ्या नजरेत स्त्री-पुरुष-थर्ड जेंडर असे वॉटर टाइट काही राहत नाही मग. एक माणूस म्हणून समोरच्यातले बरेवाईट समजून घ्यायची क्षमता विकसित होते. स्त्री असायचा कसला आलाय अभिमान? कारण मी काही तो जन्म निवडलेला नाहीये, हेही लक्षात येते; पण ही वाट जरा जास्त कचकचीची आहे, हेही समजून घेता येते. पितृसत्ताक व्यवस्थेचे बळी स्त्रियांइतकेच पुरुषसुद्धा आहेत, याची जाणीवच कोणालाही माणूसपणाकडे घेऊन जाऊ शकते.

आपल्या सुरक्षित घराबाहेर पडल्यावर इतर सगळे पुरुष जणू लांडगेच आहेत, असे बघायची काही एक गरज नाही, हे तर जवळपास येता-जाता मला आकळत राहते! आजारी बायकोची मनापासून काळजी घेणारा तो नवरा आणि रस्त्यावर भेटणारे कोणीही अनोळखी पुरुष, जे मला माझ्या टम्र्सवर समजून घेतात, त्यांच्याबद्दल काहीच कटुता मनात राहत नाही मग! ते पुरुष आहेत बरं, पुरुषासारखे पुरुष, असेही वेगळे काही मनातल्या मनात बजावायची गरज उरत नाही. ‘माणूसपणाकडे’ असतो तो प्रवास हाच असावा, असे माझ्या नजरेतून ते पुरुष आणि त्यांच्या नजरेतून मी सहजच शिकत राहते!

prachi333@hotmail.com

 

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story by prachi pathak
First published on: 01-12-2018 at 00:05 IST