scorecardresearch

Premium

सूर संवाद: श्रोता!

अगदी लहानपणापासूनच मी संगीताच्या मैफली ऐकायला सुरुवात केली होती. बाबा घेऊन जात असत मला.

Tone listener  singing the concert Chabildas Auditorium
सूर संवाद: श्रोता!

आरती अंकलीकर

‘गायकीचे जसे अनेक प्रकार, तसेच मैफल ज्यांच्यासाठी, त्या श्रोत्यांचेही! तल्लीन होऊन, भावनाप्रधानतेनं उचंबळून ऐकणारा श्रोता, अचूक दाद देऊन गायकाची गायकी खुलवणारा श्रोता, मैफलीपूर्वी लवकर येऊन ध्यान करणारा आणि कानावर पडणार आहे, ते ग्रहण करण्यासाठी सज्ज होणारा श्रोता.. लहानपणापासून अनेक गायकांना ऐकता ऐकता माझ्यातला श्रोता तयार झाला आणि त्याबरोबरच गायनासाठीचा कानही! या ऐकण्यानं गायिका म्हणून माझं गाणं इतर श्रोत्यांसमोर मांडण्यासाठी मला समृद्ध केलं..’

Shivaji Maharaj Jayanti Kagal
कोल्हापूर : पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून कागलच्या रंगमंचावर अवतरली शिवसृष्टी
balmaifal marathi news, home of childhood marathi news
बालमैफल: हरवलेलं घर
Loksatta vyaktivedh Shashikanth mule is well known in the field of classical music
व्यक्तिवेध: शशिकांत मुळे
gashmeer mahajani on father ravindra mahajani biopic
वडील रवींद्र महाजनींवरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “सर्वकाही…”

अगदी लहानपणापासूनच मी संगीताच्या मैफली ऐकायला सुरुवात केली होती. बाबा घेऊन जात असत मला. ७-८ वर्षांची असताना ऐकलेली एक मैफल माझ्या स्मरणात आहे; छबिलदास सभागृहात. खूप गर्दी होती. मी एका मध्यमवयीन बाईंच्या शेजारी बसलेले होते आणि माझ्या शेजारी बाबा. संध्याकाळ रात्रीकडे सरकू लागली तशी मी पेंगू लागले. शेजारी बसलेल्या मावशींच्या मांडीवर कधी झोपले ते कळलंच नाही! त्या होत्या प्रसिद्ध गायिका अंजलीबाई लोलेकर!

 लहान वय माझं; पण गाणं ऐकण्याची आवड आणि बाबांचं बटाटेवडय़ाचं आमिष, या दोन्हीमुळे मी बऱ्याच मैफली ऐकल्या. तिथेच माझी श्रवणभक्ती सुरू झाली. मी याआधीच्या लेखांत सांगितल्याप्रमाणे माझा पहिला श्रोता म्हणजे माझी आई. त्यानंतर जसजशी जाहीर कार्यक्रमात गाऊ लागले, छोटेखानी मैफली करू लागले, स्पर्धामध्ये भाग घेऊ लागले, शिष्यवृत्तीच्या मुलाखतींमध्ये परीक्षकांसमोर गाऊ लागले, तसतसे माझे श्रोते बदलू लागले. कौतुकानं, मायेनं माझे बोबडे सूर ऐकणारी माझी आई या एका श्रोत्यापासून नंतर बारकाईनं, डोळसपणे ऐकणारे अनेक श्रोते मला मिळाले. झाकीरभाईंच्या (प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन) अनेक मैफलींनंतर त्यांच्या ग्रीन रूमच्या बाहेर त्यांना श्रोत्यांनी घातलेला गराडा मी पाहिलाय. किशोरीताईंचं (गानसरस्वती किशोरी आमोणकर) गाणं झाल्यानंतर डोळय़ांत पाणी साठलेले, ताईंना चरणस्पर्श करण्यासाठी आतुर झालेले श्रोते मी पाहिलेत. मी मैफलींना जाता जाता केवळ एक श्रोत्याची ‘विद्यार्थी-श्रोता’ कधी झाले हे कळलंच नाही. आपण ऐकत असलेल्या गाण्यातले बारकावे, त्याची खासियत, त्यातलं सौंदर्य, आवाजाचा लगाव, आवर्तन भरण्याची पद्धत, साथसंगत, घराण्याची शिस्त, या सगळय़ा गोष्टींकडे आधी नकळत आणि नंतर जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागलं. जसजशी मी शिकत गेले, गाऊ लागले आणि मैफली ऐकू लागले तसा माझ्या आनंदात होणारा बदलही मला जाणवला. सुरुवातीला स्तिमित होणारी मी.. नंतर बुद्धीनं ऐकणारी मी.. किशोरीताईंचं गाणं संपूर्ण शरणागतीनं ऐकणारी मी..!

दादर, माटुंगा, वरळी, किंबहुना दक्षिण मुंबईच्या होणाऱ्या प्रत्येक मैफलीला एक श्रोता, श्यामभाऊ गोडबोले आवर्जून हजर असत. त्या वेळच्या भारतीय बैठकीच्या मैफली. कलाकार बसत त्या रंगमंचाला अगदी लागून बसत श्यामभाऊ! गायकाची आणि त्यांची सहज नजरानजर होईल असं स्थान ते ग्रहण करत. आपली दाद गायकाला ऐकू येईल एवढय़ा अंतरावर बसलेले असत. गायकानं तानपुरे सुरात मिळवले आणि ते सुरात झंकारू लागले, की श्यामभाऊ दाद द्यायला सुरुवात करत. खूप आनंद घेत तानपुऱ्याच्या झंकाराचा. गायकाचा मूड ओळखून वेळोवेळी दाद देत. प्रत्येक आवर्तन संपल्यावर येणाऱ्या समेला दाद देत. एखादा आकर्षक स्वरसमूह, पेचदार तान, लयकारी, भावोत्कट स्वर, या सगळय़ाला पुरेपूर, मनमुराद दाद देत असत. त्यांच्या या उत्स्फूर्त दाद देण्यामुळे कलाकाराचाही मैफलीत लवकर जम बसलेला मी पाहिला आहे आणि त्या कलाकाराला एका वेगळय़ा उंचीवर जाताना पाहिलंय. श्यामभाऊ मैफलीला हजर नसलेल्या दिवशी मैफलीत असलेलं सुनंपणसुद्धा मला जाणवलं आहे.

पुण्यामध्ये दत्तोपंत देशपांडे हा एक श्रोता. ते प्रत्येक मैफलीला हजर असत. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रत्येक सभेत प्रत्येक कलाकाराचं गाणं आपुलकीनं ऐकणारे ते. पांढरंशुभ्र धोतर, पांढरा सदरा, काळी टोपी, काळय़ा फ्रेमचा चष्मा घालणारे सावळय़ा रंगाचे दत्तोपंत! जसा गायक मैफली गाजवतो तसंच श्रोतेदेखील मैफली गाजवतात, असं मला जाणवलं आहे. पुण्याचे व्यावसायिक नंदा नारळकर, भाईकाका- म्हणजेच पु.ल. देशपांडे यांचे जिवलग मित्र! तेदेखील अत्यंत आपुलकीनं, प्रेमानं गाणं ऐकत. माझ्या पुण्याच्या कार्यक्रमाच्या आधी मला पत्र लिहून रागांची फर्माईशदेखील करत! एखादी खास बंदिश, खास प्रकारची गायकी त्यांना माझ्याकडून ऐकायची असल्यास पत्रामध्ये त्याचा उल्लेख करत.

सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा जितक्या प्रगल्भ गायिका होत्या तितक्याच उत्तम श्रोता होत्या. अत्यंत बुद्धिमान, चतुरस्र गायिका माणिकबाई! पण समोरच्या कलाकाराचं गाणं ऐकताना लहान मूल होऊन जात! अत्यंत निर्मळ मनानं, शुद्ध बुद्धीनं गाणं ऐकत. गाणं ऐकताना आपला सांगीतिक विचार पुढे येऊ न देता गाणाऱ्याच्या विचाराचं स्वागत करत आणि त्याचा आनंदही लुटत. सगळय़ांचे लाडके पु.ल. देशपांडे हेही उत्तम गाणं ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मांदियाळीतले. मनमुराद गाणं ऐकणारे! एखादं लहान मूल निरागसपणे त्याच्या नवीन खेळण्याचा जसा आनंद लुटेल, त्या निरागसतेनं ऐकणारे. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा नुकीला-सुरीला आवाज, त्यांच्या जयपुरी गायकीतल्या पल्लेदार ताना, मधूनच येणारी एखादी मुरकी याला भाईकाकांनी दिलेली मनसोक्त दाद अजूनही माझ्या लक्षात आहे. ते जितकं पं. मन्सूरांचं गाणं निखळपणानं ऐकत, तितकंच कुमारजींचंही (पं. कुमार गंधर्व), तितकंच पं. वसंतराव देशपांडय़ांचंही आणि किशोरीताईंचंही ऐकत. आणि तेवढय़ाच निर्मळपणानं एखाद्या होतकरू गायक-गायिकेलाही भाईकाका दाद देत असत.

किशोरीताईंकडे मी नुकतीच शिकायला सुरुवात केली होती. मी आणि रघू (शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर). मी तानपुरा छेडत होते आणि रघू स्वरमंडळ घेऊन बसला होता. इतर दोन शिष्यादेखील आमच्याबरोबर बसल्या होत्या. ताईंनी राग ‘नायकी कानडा’ सुरू केला, ‘मेरो पिया रसिया’. माझ्याबरोबर असलेल्या शिष्येच्या तोंडून नकळत दोन-तीन वेळा वाहवा निघाली. ताईंच्या गाण्याला ती आपल्या मानेनं दाद देते आहे हे ताईंच्या लक्षात आलं. ताईंनी लगेच आम्हाला तानपुरे बंद करायला सांगितले आणि म्हणाल्या, ‘‘इथे तुमची भूमिका शिष्याची आहे, श्रोत्याची नाही! श्रोत्याच्या दृष्टीनं माझं गाणं ऐकू नका. वाहवा करू नका, दाद देऊ नका. मी जे गाते आहे त्याकडे बारकाईनं लक्ष द्या, ग्रहण करा, आत्मसात करा, त्याचं चिंतन करा. श्रोता आणि शिष्य यांत खूप अंतर आहे.’’ हे त्याचं सांगणं कायम लक्षात राहिलं.

विशिष्ट घराण्याच्या गायक-वादकांच्या मैफलींना जाणारे श्रोते सहसा इतर घराण्यांच्या गाण्याला जात नाहीत. असे केवळ एका विशिष्ट कलाकाराचंच गाणं ऐकणारे श्रोतेदेखील पाहिलेत मी.. श्रोत्यांचं मंडळच म्हणा ना! त्या विशिष्ट गायकाचा कुठेही आसपास कार्यक्रम असला, की हे सगळं मंडळ त्या कलाकाराच्या मैफलीला हजर होत असे! त्या कलाकारा- शिवाय इतर कोणत्याही कलाकारांच्या गाण्यांच्या मैफलींना ही मंडळी दिसत नसत. व्यक्तिपूजा म्हणावं का याला?..

श्रोत्यांचेही अनेक प्रकार असतात. गायकाची गळय़ाची तयारी, जलद ताना, मुरक्या, गायकाचं खूप वेळ लांब स्वर लावणं, याला आकर्षित होणारा श्रोता.. मैफलीत गायक-वादकाच्या वाजवीपेक्षा जास्त बोलण्याला अनावश्यक प्रतिसाद देणारा श्रोता! (असा श्रोता गायक-वादकांच्या बोलण्याच्या इच्छेला खतपाणीच घालतो!) बुद्धीप्रधान गायकी ऐकणारा श्रोता.. जाणकार श्रोता.. थोडंबहुत शिकलेला, खूपसं गाणं ऐकलेला, संस्कारित, गाण्यातल्या तांत्रिक बाजूंची समज असलेला श्रोता.. काही श्रोते अत्यंत भावनाप्रधान गायकी पसंत करणारे.

 अमृतसरला दर वर्षी होळीच्या दिवशी तेथील दुर्गियाणा मंदिरात गायन-वादनाचा मोठा महोत्सव होतो. तिथला श्रोता अत्यंत भक्तीनं गाणं ऐकतो. सभागृहात येताच मैफलीला नमस्कार करून मगच तो गाणं ऐकायला सुरुवात करतो. ऐकण्यात आपला भाव ओतून गाण्याचा रस घेतो हा श्रोता!

मैफल संपल्यानंतर कलावंताची स्वाक्षरी घेण्यासाठी गराडा घालणारे श्रोतेही मी पाहिलेत! जुना, पूर्वीचा काळ स्वाक्षऱ्या घेण्याचा होता. कलाकाराला जवळून पाहावं, त्याचे आशीर्वाद घ्यावेत, त्याची स्वाक्षरी घेऊन त्या स्वाक्षरीतून प्रेरणा घ्यावी, यासाठी धडपडणारा श्रोता होता.. हल्ली अशीच गर्दी करतात श्रोते; पण स्वाक्षरी घेण्यासाठी कमी, सेल्फी घेण्यासाठी जास्त! कलाकाराला जवळून पाहून त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात त्यांना आनंद मिळतो.

 युरोपातल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीची हकीगत मला मुंबईचे प्रसिद्ध तबलावादक विश्वनाथ शिरोडकर यांनी सांगितली होती. श्रोते विदेशी. कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धा तास  आधी ते हॉलमध्ये येऊन तिथे ध्यानाला बसतात. मन एकाग्र करतात आणि शास्त्रीय संगीताचा अनुभव घेण्यासाठी आपली तयारी करतात. आपणही भारतातल्या आपल्या मैफलींमध्ये श्रोत्यांना थोडं लवकर बोलवावं का? त्यांनी मन एकाग्र करावं असं मला वाटतं. घाईगडबडीनं येऊन अस्थिर मनानं गाणं ऐकण्यापेक्षा स्थिर झालेलं मन हे एका उत्कट अनुभवाला सामोरं जाणारं असतं.. अशा वेळी त्या मैफलीचा आनंद अनुपमच असेल!

पं. उल्हास कशाळकरांची मैफल आणि त्यांना पं. सुरेश तळवलकर यांची तबला संगत मी अनेक वेळा अनुभवली आहे. अगदी उल्हासदादांनी लावलेल्या पहिल्या स्वरापासूनच सुरेशदादा त्यात पूर्णत: रमलेले असत. त्यांचा प्रत्येक स्वरसमूह ते आत्मीयतेनं ऐकत आणि वेळोवेळी आम्हा श्रोत्यांकडे पाहून सांगत,‘‘हे वझेबुवा, हे गजाननबुवा,  हे रामभाऊ,’’(या गायकांच्या गायकीची आठवण करून देणारे ते स्वरसमूह असत.) संगत करता करता उल्हासदादांना एखादा स्वरसमूह परत गायला लावणारे, एखादं आवर्तन परत आळवायला लावणारे, ‘खास गजाननबुवांच्या शैलीतलं एक आवर्तन गा,’ अशी फर्माईश करणारे सुरेशदादा, त्यांच्या त्या मैफली आजही आठवतात!

लहानपणापासून अनेक श्रोते भेटले, अनेक श्रोत्यांचं प्रेम मिळालं. श्रोत्यांना आनंद देता आल्यामुळे खूप समाधानही मिळालं. श्रोत्यांना गाणं ऐकवता ऐकवता गायक स्वत: कधी श्रोता होतो हे कळत नाही.

 श्रोत्यांसाठी गाता गाता मीही स्वत:साठीच गायला लागले. माझ्यातल्या श्रोत्याला आनंद देण्यासाठी गाऊ लागले.. अंतर्मुख झाले!

 aratiank@gmail. com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tone listener singing the concert chabildas auditorium amy

First published on: 02-12-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×