वीणा गवाणकर

अमेरिकेत नुकताच गर्भपातविरोधी कायदा संमत करण्यात आला, पण मुळात या गर्भपाताला संमती मिळवण्यासाठी एका स्त्रीनं, मार्गारेट सँगर यांनी जिवाची बाजी कशी लावली याचा इतिहास अनेकांना ज्ञात नाही. ‘बर्थ कंट्रोल’ अर्थात ‘संतती नियमन’ ही संज्ञाच अस्तित्वात येण्याआधीपासूनच सँगर त्यासाठी आग्रही होत्या. हा विषय अश्लील ठरवून त्याविषयी बोलणाऱ्यास अटक होण्याचा तो काळ आणि सर्व खाचखळग्यांमधून मार्गारेट यांनी पार पाडलेला यशस्वी प्रवास जीन एच. बेकर यांच्या ‘मार्गारेट सँगर, अ लाइफ ऑफ पॅशन’ या पुस्तकातून उलगडतो, पण घडय़ाळाचे काटे उलटे फिरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची ही चरित्रकथा वाचायलाच हवी.

Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
Mumbai Local Female Passenger do not complain about Crimes information comes from the GRP study
चोरी, छेडछाड, लैंगिक छळाविरोधात ७१ टक्के महिलांचा तक्रार करण्यास नकार; कारण काय? अभ्यासातून ‘ही’ माहिती समोर
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम

एकाच वेळी वंद्य आणि निंद्य ठरलेल्या व्यक्तीच्या कार्याचा, योगदानाचा मागोवा घेऊन तो समतोल बुद्धीनं मांडणं हे जिकिरीचं काम. अमेरिकी इतिहासकार जीन एच. बेकर यांनी मार्गारेट सँगर यांचं चरित्र लिहिताना दिलेले तपशील वाचकाला सँगर यांची सुमारे शंभर वर्षांपूर्वीची सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय- आर्थिक पार्श्वभूमी सांगतात. त्या पटलावर सँगर यांच्या कार्याचं वेगळेपण, मोठेपण समजत जातं. स्त्री-मुक्तीच्या विचारांना बळकटी देणारं त्यांचं योगदान अधोरेखित होतं.

मार्गारेट सँगर यांचं खासगी जीवन चाकोरीबाहेरचं, काहीसं गुंतागुंतीचं. त्यावर ‘मार्गारेट सँगर, अ लाइफ ऑफ पॅशन’ या आपल्या पुस्तकात लेखिका बेकर प्रकाश टाकतात. ‘माणूस’ म्हणून त्यांचं दर्शन घडवतात. ‘बर्थ कंट्रोल’ (संतती नियमन) ही संज्ञा अस्तित्वात येण्याआधीपासूनच त्यासाठी आग्रही असणारी प्रभावी व्यक्ती मार्गारेट सँगर. स्त्रीला प्रजनन अधिकार मिळावा, तिच्या शरीरावर केवळ तिचा स्वत:चा हक्क हवा, अवांछित गर्भधारणेतून सुटका करून घेण्यासाठी गर्भपाताचा अधिकार तिला हवा, या आणि अशा मागण्या मांडत आयुष्यभर त्यांच्यासाठी त्या झगडल्या. मार्गारेट हिग्गिन्स (सँगर) यांचा जन्म १८७९ मधला. बावीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांच्या आईची अठरा बाळंतपणं झाली. त्यातली अकरा अपत्यं बालपणातच मरण पावली. उरलेल्या सात मुलांतल्या मार्गारेट या सहाव्या. बाळंतपणांनी थकलेली, खचलेली ती माता अवघ्या पन्नासाव्या वर्षी मृत्युमुखी पडली.. आईसारखं आयुष्य नको म्हणून मार्गारेट यांनी परिचारिका व्हायचं ठरवलं. त्या काळात परिचारिकेचं काम हे आजाऱ्यांची सेवा-शुश्रूषा करणं एवढय़ापुरतंच मर्यादित होतं. काही जणी सुईणीचं काम करत. स्त्री ही जात्याच सेवाभावी असते. घरातले शुश्रूषेचे अनुभव तिला बाहेरही उपयोगी पडतात, त्यातून चार पैसे मिळतात, इतकाच हेतू. नुकत्याच झालेल्या स्पॅनिश-अमेरिकी युद्धात परिचारिकांचा चांगला उपयोग झाल्यामुळे हे एक नवं कार्यक्षेत्र स्त्रियांना उपलब्ध झालं. रुग्णसेवेबरोबरच औषधोपचार, शरीरविज्ञान, शरीररचना यांची थोडीफार ओळख त्यांना होऊ लागली. जननशास्त्र (Gynaecology) नुकतंच रुजत, वाढत होतं. अनेक रुग्णालयांतून परिचारिकांना प्रशिक्षित केलं जात होतं. अशाच एक मोठय़ा रुग्णालयात मार्गारेट जाऊ लागल्या. त्या काळात परिचारिका विवाह करू शकत नसे. ती अविवाहितच असावी लागे. गर्भपात, गर्भनिरोध, लैंगिकता या विषयांवर बोलणं, चर्चा करणं, माहिती देणं, लिहिणं वगैरेंवर कायद्यानं बंदी होती. दुर्गुण, अश्लीलता याविरुद्ध कारवाई करण्यासाठी (अँथनी कॉमस्टॉक यांच्या नावानं) १८७३ मध्ये लागू झालेल्या कॉमस्टॉक कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असे. अश्लील म्हणून ठरवल्या गेलेल्या विषयांवर बोलणाऱ्या-लिहिणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा, वारेमाप दंड होत असे. मार्गारेट राहात कामगार वस्तीत. तिथल्या स्त्रियांच्या, रुग्णालयात येणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, आजार त्या समजून घेत. स्त्री-आरोग्याबाबतची अनास्था, हेळसांड त्यांना अस्वस्थ करी. गरीब स्त्रियांची हतबलता, वारंवारच्या बाळंतपणानं त्यांना आलेलं पिचलेपण त्यांना बघवत नसे. श्रीमंत वस्तीतल्या स्त्रियांची गोष्ट थोडी वेगळी होती. तिथे लपवाछपवी करून गर्भनिरोधक साधनं वापरली जात; पण ही सुविधा गरिबांसाठी नव्हती. याबाबत आपण काय करू शकू, याचा अंदाज मार्गारेट घेत होत्या. शिक्षण घेत असतानाच त्या बिल सँगर यांच्या प्रेमात पडल्या. परिचारिकेनं अविवाहितच असलं पाहिजे या नियमामुळे त्यांना उघडपणे लग्न करता येईना. एके दिवशी दुपारच्या सुट्टीत रुग्णालयाबाहेर जाऊन त्यांनी विवाह ‘उरकला’ आणि गणवेश घालून मार्गारेट पुन्हा कामावर हजर झाल्या. अर्थात ही गोष्ट फार काळ लपून राहू शकली नाही. दरम्यान एक घटना घडली. आधीची तीन मुलं असलेल्या एका तरुणीनं चौथ्या वेळचं नको असलेलं बाळंतपण टाळण्यासाठी अघोरी पद्धतीनं स्वत:चा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा मृत्यू ओढवला. मार्गारेट यांनी विचार केला, की आपल्या लग्नाचं गुपित फार काळ राखता येणार नाहीच. शिवाय नुसती रुग्णसेवा करून समाजातल्या स्त्रियांच्या समस्याही सुटणार नाहीत. नको असलेल्या, लादल्या गेलेल्या बाळंतपणापासून स्त्रियांची सुटका व्हायला हवीच.. मग मार्गारेट लैंगिक जीवन, गर्भनिरोध, संतती नियमन यासंबंधीची माहिती मिळवू लागल्या. लवकरच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शिक्षण थांबलं, पण वाचन वाढलं. लवकरच पती-पत्नी ‘न्यूयॉर्क सोशलिस्ट पार्टी’चे सदस्यही झाले. पतीचा मार्गारेट यांच्या विचारांना पाठिंबा होताच. मार्गारेटना तीन मुलं झाली. तिन्ही बाळंतपणांत त्यांना बराच त्रास झाला. आईची बाळंतपणं आठवून, स्वत:ची बाळंतपणं अनुभवून आणि गरीब स्त्रियांवर लादली जाणारी बाळंतपणं पाहून त्या आता पक्षाच्या बैठकांत ‘गर्भधारणा ऐच्छिक असावी, स्त्रीवर लादली जाणारी नसावी, ती टाळण्यासाठी उपाय हवेत,’ यावर बोलू लागल्या. पत्रकं काढू लागल्या. पण लवकरच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यालाही एक कारण घडलं. १९१३ मध्ये बारा हजार रेशीम कामगारांनी न्यू जर्सीत संप केला. वेतनकपात आणि कामाच्या तासांची वाढ याविरोधात तो संप होता. तो पाच महिने चालला; परंतु कामाचे तास कमी झाले नाहीत आणि वेतनवाढही मिळाली नाही. मार्गारेट म्हणतात, ‘‘माझ्या असं लक्षात आलं, कामगारांना वेतनवाढ हवी ती आर्थिक गरज म्हणून. वाढतं कुटुंब पोसण्यासाठी म्हणून.. यात स्त्री आणि तिच्या गरजा विचारात घेतल्या जात नाहीयेत. अशा विचारांवर नवी संस्कृती कशी उभी राहील? नवा समाज कसा घडेल?’’ गरीब स्त्रियांची अवस्था पाहून त्यांनी ‘बर्थ कंट्रोल’/ कुटुंब नियोजन/ संतती नियमन हा विषय स्त्रीमुक्तीशी जोडला आणि त्यांना दिशा मिळाली.

 लैंगिक शिक्षणाची गरज मुलांना आहेच; परंतु आधी प्रौढांना ते द्यायला हवं, यावर त्या ठाम होत्या; परंतु कॉमस्टॉक कायद्यामुळे त्यांना आपलं म्हणणं जाहीरपणे मांडता येत नव्हतं. तरीही सावधगिरी बाळगत त्या वृत्तपत्रांत स्त्रियांसाठी असलेल्या सदरांत लिहू लागल्या. ‘व्हॉट एव्हरी गर्ल शुड नो’ या त्यांच्या लेखमालेनं बरीच खळबळ माजवली. त्यांनी समागम आणि प्रजनन या दोन बाबी एकमेकींपासून वेगळय़ा ठरवून वाचकांना धक्का दिला. असुरक्षित शरीरसंबंधातून स्त्रीला सहन करावे लागणारे विविध गुप्तरोग हे सार्वजनिक आरोग्याचे विषय ठरावेत, यावर त्या लिहू लागल्या. ‘कॉमस्टॉक’च्या नजरेतून हे लेख कसे सुटणार? असुरक्षित लैंगिक संबंधांतून निर्माण होणाऱ्या आजारांविषयी लिहिणं कायदाभंग करणारंच. वृत्तपत्रांचे अंक जप्त होऊ लागले. नंतर त्यांनी ‘व्हॉट एव्हरी बॉय शुड नो’ ही लेखमाला सुरू केली. त्यांच्या एका मित्रानं या दोन्ही लेखमालांच्या पुस्तिका केल्या, गुपचूपपणे वितरित केल्या. मार्गारेटनी समविचारी मित्रमंडळींकडून पैसे जमवले, पुरस्कर्ते मिळवले, वर्गणीदार शोधले, कर्ज काढलं आणि १९१४ मध्ये ‘द वूमन रेबेल’ नावाचं नियतकालिक काढलं. लिहिणं, संघटना उभी करणं, निधी जमवणं त्यांना साधत गेलं. कोणताही एक विशिष्ट असा गर्भनिरोधक उपाय न सांगता त्या स्त्रीनं गर्भधारणा कशी टाळावी याचं सुस्पष्ट शास्त्रीय ज्ञान मिळवावं यासाठी आग्रह धरू लागल्या. तसंच गर्भनिरोध करण्यासाठी साधन वापरणं म्हणजे वेश्या व्यवसायाला, स्वैराचाराला बढावा देणं, या रूढीबद्ध विचारांना धक्के देऊ लागल्या. कंडोम्स वापरणाऱ्या पुरुषांना कुठल्याच टीकेला उत्तर द्यावं लागत नाही आणि स्वत:ची काळजी घेऊ पाहाणाऱ्या स्त्रीवर घाणेरडे आरोप का होतात? याचा जाब त्या विचारू लागल्या. त्या काळी क्षयरोग पीडित स्त्रियांनाच रुग्णालयात भरती होता येत असे. मार्गारेट यांनी आता गरीब स्त्रियांना दवाखाने, रुग्णालयं हवीत म्हणून आपल्या मासिकातून हाकाटी सुरू केली. अमेरिकेचं पोस्ट खातं ‘कॉमस्टॉक अ‍ॅक्ट’ला स्मरून मार्गारेट यांचे ‘द वूमन रेबेल’चे अंक जप्त करू लागलं. तरीही वर्गणीदारांपर्यंत अंकाच्या प्रती पोहोचत होत्याच. अनेक बाळंतपणं लादल्या गेलेल्या गरीब मातांच्या कहाण्या प्रकाशित होत होत्या. त्यांच्या स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची दखल कोणी घेत नाही, याची तक्रार मार्गारेट मांडत होत्याच. ‘स्त्रीचं शरीर हे तिच्याच मालकीचं आहे. ती सरकारी मालमत्ता नाही. लादलेलं मातृत्व हे स्त्रीच्या जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्कांची पायमल्ली करतं. मातृत्व हेच स्त्रीजीवनाचं एकमेव ध्येय नाही,’ असं बजावत होत्या. काम आणि वेतन या संदर्भात केल्या जाणाऱ्या दुजाभावाकडे लक्ष वेधत होत्या. शेवटी ‘द वूमेन रेबेल’चे अंक ‘अश्लील’ ठरवून पोस्ट ऑफिसनं जप्त केलेच, वर ‘चाळीस वर्षांची कैदेची शिक्षा का देऊ नये?’ अशी विचारणाही केली. अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन मार्गारेट यांनी तातडीनं ‘फॅमिली लिमिटेशन’ नावाची पुस्तिका प्रकाशित केली. अनेक भाषांत ती अनुवादितही झाली. पुढच्या चार वर्षांत तिच्या दीड लाख प्रती संपल्या. अठरा वेळा तिचं पुनर्मुद्रण झालं. ही पुस्तिका गुप्तपणे छापून घ्यावी लागत होती. तिच्यात गर्भनिरोधासाठीची विविध साधनं, स्त्री प्रजनन संस्थेची सचित्र माहिती होती. गर्भनिरोध आणि गर्भपात यात त्यांनी गर्भपाताला अंतिम उपाय म्हटलं होतं. या दोन्हीतला कारणांचा फरक त्यांनी समजावून दिला होता. गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा करावा यासाठी डॉक्टर, परिचारिका यांचं मार्गदर्शन घ्यावं, असंही सांगितलं होतं.

अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन मार्गारेट यांनी देशांतर (१९१४) केलं. ग्रेट ब्रिटनमध्ये लिव्हरपूलला आसरा घेतला. लंडनमध्ये त्यांनी केलेलं कुटुंब नियोजनावरचं भाषण खूप गाजलं. इकडे न्यूयॉर्कमध्ये पत्नीच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या बिल सँगर यांच्या भाषणावर आणि ‘फॅमिली लिमिटेशन’ या पुस्तिकेच्या प्रती वितरित करण्यावर आक्षेप घेऊन कॉमस्टॉक कायद्यांतर्गत त्यांना अटक झाली. त्यांनी स्वत:च स्वत:ची केस लढवली.

दंड न भरता कैद स्वीकारली. नातेवाईक, मित्रपरिवारानं त्यांची मुलं सांभाळली. याच दरम्यान स्वत: कॉमस्टॉक यांचा न्यूमोनियानं मृत्यू झाला. १९१५ मध्ये अमेरिकेतल्या लोकमानसात बदल घडून आला होताच. या खटल्याच्या निमित्तानं वृत्तपत्रांतून या विषयावर चर्चा झडू लागली. ऑक्टोबर १९१५ मध्ये मार्गारेट परतल्या तेव्हा अमेरिकेतील वृत्तपत्रांत ठाशीव अक्षरांत विचारलं होतं, ‘संतती नियमनाविषयी काय निर्णय घेणार आहोत?’

हे घडत असतानाच सँगर यांच्या धाकटय़ा- पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सरकारला मार्गारेट सँगरना तुरुंगात टाकून त्यांना प्रसिद्धी द्यायची नव्हती. ‘मुलगी नुकतीच गेली आहे, त्या दु:खाचा मार्गारेटच्या मनोस्वास्थ्यावर परिणाम झालाय,’ वगैरे कारणं देत सरकार खटला भरणं लांबवत राहिलं आणि शेवटी ते टाळलं. पुढच्या चार महिन्यांत मार्गारेटनी अमेरिकेतल्या मोठय़ा शहरांत ११९ भाषणं दिली. ‘फॅमिली लिमिटेशन’चा खप वाढत राहिला. त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर कॅथलिक चर्च मर्यादा घालू पाहात होतं. त्यांच्या भाषणासाठी ठरवल्या गेलेल्या सभागृहाच्या मालकाला बहिष्कार घालण्याची धमकी देऊन कार्यक्रम रद्द करायला लावत होतं; पण मार्गारेट यांची लोकप्रियता वाढत होती. आयत्या वेळी दुसऱ्याच सभागृहात सभा घ्यावी लागली तरी सभागृह तुडुंब भरत होतं. त्यांना अटक करणं सरकारला कठीण जात होतं. Agitate-Educate-Organise-Legistate अशा टप्प्यांनी मार्गारेट पुढे जात होत्या. १९१६ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये पहिलं कुटुंब नियोजन केंद्र सुरू केलं. हे केंद्र प्रचंड यशस्वी झालं. शेकडो स्त्रियांनी त्याचा लाभ घेतला. गर्भनिरोधक उपाय, साधनं यांची माहिती, साधनं अल्प दरात मिळू लागली. सरकारनं स्टिंग ऑपरेशन करून मार्गारेटना पकडलं. तिथली उपकरणं, छापील साहित्य, लाभार्थीच्या याद्या जप्त केल्या. अटक झाल्यावर मार्गारेटनी पोलीस व्हॅनमधून जाणं नाकारलं. मैलभर चालत तुरुंगात गेल्या. वृत्तपत्रांनी त्यास भरपूर प्रसिद्धी दिली. त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा केंद्र सुरू केलं. पुन्हा अटक झाली. त्यांना तीस दिवसांची कैद सुनावली गेली, तेव्हा कोर्टात ‘शेम! शेम!’ अशा आरोळय़ा उठल्या. तुरुंगवास भोगत असतानाही त्यांनी तिथलं अनारोग्य, कैद्यांशी गैरवर्तणूक याला वाचा फोडली. स्त्री कैद्यांना संतती नियमनाचे, साक्षरतेचे धडे दिले. तुरुंगवास संपवून त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दोनशे लोक हजर होते.

पहिल्यापासूनच मार्गारेट जागतिक युद्धाच्या विरोधातच होत्या. युद्धासाठी सैनिक हवेत, मातांनी मुलांना जन्माला घालून देशकार्य करावं, अशा मतप्रवाहात संतती नियमनाचे वारे थंडावले. सुधारणांचा वेग ओसरला. मार्गारेट मात्र सांगत होत्या, ‘स्त्री मानवी जीव जन्माला घालते, उद्ध्वस्त करत नाही. ती युद्धासाठी मुलं जन्माला घालणारं यंत्र नाही. राक्षस जन्माला घालण्याचं साधन नाही.’ लवकच त्यांनी ‘द बर्थ कंट्रोल रीव्ह्यू’ नावाचं मासिक सुरू केलं. अडीच हजार वर्गणीदार मिळाले. पहिल्याच अंकात पहिल्याच पानावर त्यांचा लेख होता, ‘श्ॉल वुई ब्रेक धिस लॉ’. न उल्लंघावा इतका कोणताच कायदा पवित्र नसतो, हे त्यांनी ठासून मांडलं.

याच काळातली महत्त्वाची घटना म्हणजे युद्धकाळात सैनिकांतील वाढत्या गुप्तरोगांचं प्रमाण लक्षात घेऊन सैनिकांना प्रशिक्षित करताना मार्गारेट यांची पुस्तिका ‘व्हॉट एव्हरी बॉय शुड नो’ उपयोगात आणली गेली. हे मार्गारेट यांचं यश होतं; पण त्यावर त्या समाधानी नव्हत्या. रोगी सैनिकापासून गर्भधारणा होऊ नये म्हणून स्त्रीनं कोणते उपाय करावेत, साधनं वापरावीत, याविषयी सरकार उदासीन होतं.

मार्गारेट यांच्या अथक प्रयत्नांनी लोकमत बदलत होतं. त्यांचे आता विदेशांत दौरे सुरू झाले. १९२७ मध्ये जीनिव्हात पहिलं जागतिक लोकसंख्या संमेलन भरलं. तिथे केलेल्या भाषणात त्यांनी सर्व देशांना संतती नियमनविषयक कायदे शिथिल करण्याची विनंती केली. लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली, की मनुष्याची किंमत कमी होते. त्यातून दारिद्रय, दडपशाही, दुष्काळ, कुपोषण, प्रसंगी युद्ध अशा समस्या उभ्या राहातात, याकडे त्या लक्ष वेधत होत्या. लवकरच अमेरिकेत सहाशेच्या वर संतती नियमन केंद्रं निघाली. १९४६ मध्ये ‘इंटरनॅशनल प्लॅन्ड पॅरेंटहूड फेरडेशन’ची स्थापना झाली. आपल्या विचारांच्या प्रचारार्थ मार्गारेट भारतातही दोन वेळा येऊन गेल्या.

र. धों. कर्वे, पं. नेहरू, म. गांधी यांना भेटल्या. अलौकिक कामगिरी पार पाडणाऱ्या या नायिकेचं चरित्र सांगताना लेखिका बेकर तिचे स्वभावदोषही सांगते. केवळ व्यक्तिपूजा करत नाही, हे विशेष. १९५० मध्ये मार्गारेट यांनी डॉ. जॉन पिंकस यांना गर्भनिरोधक औषध शोधण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन १९६० मध्ये अमेरिकेत संतती प्रतिबंधक गोळी ‘द पिल’ तयार झाली. जगभरातल्या स्त्रियांचं त्या गोळीच्या उपलब्धतेनं आयुष्यच बदललं. पुढे १९६५ मध्ये ‘कॉमस्टॉक’ कायदा रद्द झाला. मार्गारेट सँगरना आपल्या अथक, प्रदीर्घ लढय़ाचं यश आपल्या मृत्यूपूर्वी (१९६६) पाहायला मिळालं.

 हाच जिद्दीचा प्रवास मार्गारेट यांच्या चरित्रातून उलगडतो. मात्र आता अमेरिकेतल्या गर्भपातविरोधी एका कायद्याने मार्गारेट यांच्या कष्टांवर पाणी फिरेल का, की तिथली राज्यं हा कायदा शिथिल करतील, हे काळच ठरवेल.

veena.gavankar@gmail.com