scorecardresearch

‘परम’ विजयानंद !

भारताला संगणक देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर जगाला भारतीय बुद्धिमत्तेचे दर्शन घडवायचे या उद्देशाने झपाटलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तरुणांनी ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती केली…

ch24भारताला संगणक देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर जगाला भारतीय बुद्धिमत्तेचे दर्शन घडवायचे या उद्देशाने झपाटलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तरुणांनी ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती केली आणि आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संगणकीय प्रगतीचा पथदर्शी असलेल्यांपैकी एक असलेल्या विजय भटकर यांचा जीवनपट त्यांच्याच शब्दांत.

एकीकडे जगातील सर्वात समृद्ध मानला जाणारा भारत जगातील सर्वात गरीब देश होत होता. तर दुसरीकडे देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठय़ावर होता. या देशाच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या काळात म्हणजेच ११ ऑक्टोबर १९४६ रोजी माझा जन्म झाला, विदर्भातील अकोला जिल्ह्य़ातल्या जेमतेम तीनशे लोकसंख्या असलेल्या मुरंबा या गावी. माझे आई आणि वडील दोघेही त्या काळी गावाकडे आले होते. दोघेही गांधीजींनी पुकारलेल्या स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय होते. वडील उच्चशिक्षित होते. बी. एड. करून ते मुख्याध्यापक झाले तर आईही देवास येथील एका शाळेत मुख्याध्यापिका होती. महात्मा गांधींनी ‘भारताचा विकास व्हायचा असेल तर आधी गावांचा विकास झाला पाहिजे,’ असे सांगत ‘खेडय़ाकडे चला’ असा नारा दिला होता, तो शिरसावंद्य मानून माझे आई-वडील गावात आले. त्यानंतर त्या भागात सुरू झालेले धार्मिक दंगेधोपे सोडविण्याची जबाबदारी माझ्या वडिलांना देण्यात आली होती. हे काम करताना ते अनेकदा जखमी झाले होते. माझा जन्म झाला आणि लगेचच भारत स्वतंत्र झाला व वडीलही त्या सर्वातून बरे झाले म्हणून माझ्या आईने माझे नाव विजयानंद ठेवले. पुढे त्याचे विजय झाले.
घरात शिक्षणाचे वारे आधीपासूनच असल्यामुळे लहानपणापासूनच वाचन सुरू होते. घरात स्वत:चे ग्रंथालय होते. मोठमोठे ग्रंथ याचबरोबर विविध इंग्रजीसह मराठी पुस्तकांचा साठाही त्यात होता. माझ्या जडणघडणीत आजीचा वाटाही मोठा होता. शिस्त आणि इतर संस्कार आजीने माझ्यावर केले. आमच्या गावात एक राम मंदिर होते. तेथेच आमची शाळा भरायची. एकच शिक्षक पहिली ते चौथीचे वर्ग घ्यायचे. यामुळे सगळे वर्ग एकत्रच भरायचे. आजही अनेक एकशिक्षकी शाळा आहेत. पण आम्हाला त्या शाळेत खूप अगदी उत्तम शिक्षण मिळाले. इतकेच नव्हे तर शिक्षकांचे प्रत्येकाकडे बारीक लक्ष असायचे. कुणाला काय येते कुणाला काय येत नाही हेही ते पाहायचे. त्यापुढील शिक्षण गाडगेबाबांनी उभारलेल्या शाळेत झाले. ही शाळा उभारण्यात माझ्या वडिलांचाही वाटा होता. त्या शाळेत रोज सकाळी गाडगेबाबा स्वत: यायचे आणि ती जागा स्वच्छ करायचे. त्यानंतर ते आपलं खापर काढायचे आणि त्यात आम्ही माधुकरी द्यायचो. त्या वेळेस आम्हाला गाडगे महाराज किती मोठे होते हे माहीत नव्हते. ‘बाबांनो उपाशी राहा, पण शिका’ हा त्यांचा मूलमंत्र होता म्हणून त्यांनी ठिकठिकाणी शाळा उभारल्या, धर्मशाळा उभारल्या. त्यांच्या कीर्तनाचे आज अवलोकन करत असताना असे जाणवते की त्यांची संवादक्षमता किती उत्तम होती. ज्याचा वापर आजच्या जीवनात खूप मोलाचा ठरू शकतो.
प्रयोगशाळा उभारली
माझा एक अट्टहास असायचा की मला माझ्या मोठय़ा भावासोबतच शिक्षण घ्यायचे होते. यामुळे मी थेट चौथ्या वर्गातच शिकायला बसलो. यामुळे माझे शिक्षण लवकर सुरू झाले. आमच्या शाळेत प्रयोगशाळा नव्हती. यामुळे मी आणि माझ्या भावाने ठरविले की आपण स्वत: प्रयोगशाळा उभारायची म्हणून माझे वडील नागपूर, अमरावती किंवा बेंगळुरू असे कुठेही गेले की आम्ही त्यांना सांगायचो आमच्यासाठी टेस्ट टय़ूब किंवा चुंबक आदी गोष्टी आणा. अशा प्रकारे सर्व साहित्य आम्ही जमवले. सी. व्ही. रामन किंवा जगदीशचंद्र बोस यांनी ज्या वेळेस संशोधन केले त्या वेळेस त्यांनाही कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. जगदीशचंद्र बोस यांनी वायरलेसचा शोध लावला तर प्रयोगशाळा मिळत नव्हती. त्या वेळेस त्यांना एकाने एका स्वच्छतागृहात जागा उपलब्ध असल्याचे सांगितले. त्या स्वच्छतागृहात बदल करून त्यांनी प्रयोगशाळा उभारली. म्हणजे आपल्याकडे साधने नाहीत म्हणून हातावर हात ठवून न बसता ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रयोगशाळेचे साहित्य मिळवून प्रयोगशाळा उभारल्या. माझी आजी आम्हाला सांगायची की केवळ एकाच पुस्तकाचं वाचन न करता त्यातील मजकुराशी संबंधित अवांतर वाचन करा. यामुळे आम्ही विविध प्रयोग आणि त्यांचे उपयोग समजत गेलो. शिक्षकांचंही खूप मार्गदर्शन मिळत होते. पुढे मॅट्रिकमध्ये आम्ही दोघेही गुणवत्ता यादीत आलो. आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता. मग माझा भाऊ जीवशास्त्राकडे वळला आणि मी गणित व भौतिकशास्त्राकडे वळलो.
रेडिओ बनविला
माझे बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावतीमधील महाविद्यालयात झाले. तेथेही मी जास्तीतजास्त वेळ ग्रंथालयात घालवायचो. आज मराठी माध्यमांच्या मुलांना पदवी शिक्षण सुरू झाल्यावर इंग्रजीची भीती वाटते. तशीच मलाही होती. त्यात मला विज्ञान घ्यायचे असेल तर गणित आणि इंग्रजी आलेच पाहिजे हे कळून चुकले, मग मी तसा प्रयत्न सुरू केला. इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, अवांतर पुस्तके वाचून मी इंग्रजी पक्कं करण्याचा चंग बांधला आणि मला त्यात यश आले. यानंतर मी अभियांत्रिकी शिक्षणासाठी नागपूरला व्हीआयटीमध्ये गेलो. साधारणत: ६३-६४ ची गोष्ट होती. त्या वेळेस चीनचे युद्ध झाले होते म्हणून देशाला जास्तीतजास्त अभियंत्यांची गरज निर्माण झाली. मग आमचा अभ्यासक्रम चार वर्षांऐवजी तीन वर्षांचा केला. अर्थात तो खूप अवघड होता. अगदी नऊ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यात मीही झालो. शालेय शिक्षण लवकर सुरू झाल्यामुळे अवघ्या अठराव्या वर्षीच मी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्या वेळेस इलेक्ट्रॉनिक्स ही स्वतंत्र बॅच नव्हती. पण दुसऱ्या वर्षांत अभ्यासात तो विषय होता. माझ्या जन्माच्या वेळेसच बेल यांच्या प्रयोगशाळेत ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता. आम्ही शिकत असताना आमच्या शिक्षकांनी ट्रान्झिस्टरचे काही भाग आम्हाला दाखविले. ते भाग दुर्मीळ असल्यामुळे त्याचे नुसते दर्शनच आम्हाला घडविले. ते पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. मग मी स्वत: रेडिओ बनविण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस ही संकल्पना इथे कुणाला माहितीच नव्हती. मग कुणी शिकवायचा प्रश्नच नव्हता. मी आणि माझा भाऊ आम्ही सोल्डरिंग वगैरे स्वत: शिकलो व काम करत राहिलो. अनेक चुका झाल्या पण अथक प्रयत्नांतून ट्रान्झिस्टर रेडिओ तयार झाला. जेव्हा तो रेडिओ टय़ून झाला आणि त्यावर विविध भारती लागलं तेव्हा झालेला आनंद हा महासंगणक बनविल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षाही खूप खूप मोठा होता.
संशोधनाकडे वळलो
पदवी मिळाल्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घ्यायचा या उद्देशाने मी मुंबईत दाखल झालो. ज्या दिवशी आमची प्रवेश प्रक्रिया होती त्या दिवशी मुंबईत पूर आला होता. त्यातच आम्ही रात्री त्या वेळच्या व्हीटी स्थानकावर उतरलो आणि रात्रभर तेथेच राहिलो. तेथे माझे पाकीट चोरीला गेले. बॅगेत दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले पैसे काढून मी पुढचा प्रवास केला. आयआयटी मुंबईच्या परिसरात अक्षरश: छातीपर्यंत पाणी साचले होते. आम्ही पोहतच संस्थेत दाखल झालो. पण त्याच वेळी मुंबई नको वाटली. अगदी आयआयटी मुंबईत नंबर लागूनही मी दुसऱ्या पर्यायाचा विचार करायला लागलो. वडिलांनी शिक्षण घेतलेल्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याचे ठरले. त्यानुसार तेथे प्रवेश घेतला. तेथेही समृद्ध ग्रंथालय होते. त्याचा फायदा मला अवांतर वाचनासाठी झाला. एम.ई. पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९६८ आयआयटी दिल्ली येथे दाखल झालो. त्यापूर्वी मला नोकरी मिळाली, पण नोकरी करावी की संशोधनात जावे हा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती तरी आईने मला संशोधनाकडे जाण्याचा निर्णय दिला. आयआयटी दिल्लीत मी सर्व प्रथम संगणक पाहिला आणि माझ्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झाले. अनेक प्रश्न पडू लागले. मग असे कोणते अभियांत्रिकी क्षेत्र आहे की जेथे आपल्याला सर्व शाखांशी जोडता येऊ शकते. मग त्यातून प्रणाली अभियांत्रिकी (सिस्टिम इंजिनीअरिंग)चा पर्याय माझ्यासमोर आला आणि मी त्याकडे वळलो. माझा पीएच.डी.चा अभ्यासही त्याकडे वळविला.
इलेक्ट्रॉनिक्स आयोगात समावेश
त्या वेळेस बरीच मुलं अमेरिकेत जायची. त्याच वेळेस मी माझा एक प्रबंध अमेरिकी प्राध्यापकासोबत लिहिला. त्यामुळे मलाही अमेरिकेतल्या संधी चालून आल्या. होमी भाभा यांनी साधारणत: ६०च्या दशकात देशाच्या विकासात इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे हे भाकीत व्यक्त केले होते. पण त्या वेळेस त्याचे महत्त्व कुणाला कळले नव्हते. यालाच अनुसरून साधरणत: १९७०च्या आसपास पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक्स आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. विक्रम साराभाई त्याचे पहिले अध्यक्ष झाले. मग त्यांना जो पहिला मुख्य समूह तयार करायचा होता त्यासाठी त्यांनी माझ्या प्राध्यापकांशी संपर्क साधला आणि त्यात माझी निवड झाली. त्या वेळेस अमेरिकेत जायचे की इथे राहायचे हा माझ्यासमोर प्रश्न होता. आणि मी येथे राहणे पसंत केले आणि आयोगात दाखल झालो.
देशातला कलर टीव्ही तयार झाला
आयोगाचे काम सुरू झाले त्या वेळेस म्हणजे साधारणत: १९७१ मध्ये इंटेलने चिपचा शोध लावला होता. जगभरात संगणक होते त्यावर संशोधनही सुरू होते. या सर्वात आम्ही असे ठरवले की आपण या सर्वाच्या मूलभूत गोष्टींचा विचार करायचा आणि आमच्या कामाला सुरुवात झाली. त्या वेळेस भारताकडे परकीय चलन नव्हते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कोणत्याही वस्तू येत नव्हत्या. त्या मागवायच्या असल्या तरी भली मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत असे. हे टाळण्यासाठी सर्व भाग भारतातच बनवावे लागत. ते एका दृष्टीने चांगले होते त्यामुळे त्या गोष्टींचा पाया आम्हाला समजला. त्या वेळेस स्वत:ची प्रयोगशाळा असावी अशी गरज निर्माण झाली आणि आम्हाला त्रिवेंद्रमला जागा मिळाली. तेथे वयाच्या ३२ व्यावर्षी मी त्या प्रयोगशाळेचा संचालकही झालो. तेथेच माझी डॉ. अब्दुल कलाम यांची भेट झाली. तेथे आमच्या इलेक्ट्रॉनिक्सवर चर्चा व्हायच्या. या प्रयोगशाळेत संरक्षण खात्याच्या उपकरणांपासून ते कृष्णधवल टीव्हीपर्यंतची संपूर्ण भारतीय बनावटीची निर्मिती होऊ लागली.
त्यात सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे १९८२मध्ये. त्या वेळेस आपल्याकडे आशियायी स्पर्धा होणार होत्या. याआधीच्या आशियायी स्पर्धा बँकॉकला झाल्या. तेथे सर्व खेळांचे प्रक्षेपण रंगीत टीव्हीवर करण्यात आले. अर्थात त्यांनी अमेरिकेची मदत घेतली होती. तर आपणही रंगीत टीव्हीवर प्रक्षेपण करावे असे इंदिरा गांधी यांनी सांगितले. आमच्या समोर रंगीत टीव्ही तयार करण्याचे आव्हान होते. या टीव्हीची रचना माझ्या प्रयोगशाळेत तयार झाली. टीव्हीची रचना झाली, पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून रंगीत प्रक्षेपण करता येऊ शकते का हा प्रश्न होता. वेळही खूप कमी होता. त्या वेळेस केरळमधील वैज्ञानिक एबीपी नंबियार यांनी हे आपणही करू शकतो असा आत्मविश्वास दिला आणि सहा महिन्यांत प्रक्षेपण करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यावर काम करून त्यात आम्हाला यशही आले. त्या वेळेस वसंत साठे हे माहिती आणि प्रसारण मंत्री होते त्यांच्या परवानगीने त्रिवेंद्रम शहरात भारतीय बनावटीच्या पहिल्या रंगीत टीव्हीचे प्रक्षेपण झाले. ते इतके लोकप्रिय झाले की लोक रंगीत टीव्ही खरेदी करू लागले आणि आशियायी स्पर्धाचे प्रक्षेपण रंगीत टीव्हीवर झाले आणि देशाची इलेक्ट्रॉनिक्स क्रांती सुरू झाली. यानंतर प्रत्येक राज्यात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स आयोग उभे राहू लागले. त्या वेळेस सॅमसंग आणि एलजी या कंपन्या आमच्या प्रयोगशाळेत येऊन हे तुम्ही कसे केले हे पाहून गेले.
पुढे इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि राजीव गांधी आले. त्यांना यात रस होता. मला एक जोखमीचे आणि गोपनीय काम देण्यात आले ते म्हणजे पंतप्रधान कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा प्रणाली तयार करण्याचे. ही प्रणाली मी तयार केली आणि ती आत्तापर्यंत कार्यरत होती. या कामादरम्यान राजीव गांधी यांच्याशी विशेष ओळख झाली.
‘परम’चा प्रवास सुरू झाला
हवामानाच्या अंदाजासाठी आपल्याला महासंगणक हवा होता आणि आपण तो अमेरिकेकडे मागत होतो. तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचीही त्याला संमती होती, पण हे तंत्रज्ञान आपण कोणत्याच देशाला देऊ नये विशेषत: भारताला, असे अमेरिकी तज्ज्ञांचे म्हणणे होते. रिगन हे उदात्त विचाराचे असल्यामुळे त्यांनी केवळ हवामानाच्या अंदाजासाठी महासंगणक देऊ. त्याचा वापर केवळ हवामानाच्या अंदाजासाठीच झाला पाहिजे. जर दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला तर भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लगातील असे सांगितले. हे राजीव गांधी यांना अपमानास्पद वाटले आणि त्यांनी आपण भारतातच महासंगणक तयार करू असे आव्हान दिले. त्या वेळेस योगायोगाने सॅम पित्रोदा भारतात आले होते आणि त्यांनी दूरसंचार क्रांती सुरू केली होती तेही महत्त्वाचे ठरले होते. या महासंगणकाची निर्मिती पुण्यात सीडॅकच्या माध्यमातून होईल अशी संकल्पना मी मांडली आणि त्याला राजीव गांधी यांनी मान्यता दिली.
संस्थेत संशोधन पूर्ण होऊन संगणक काम करू लागला. त्यात आम्ही समांतर प्रक्रियेचा वापर केला हे नवीन होते. त्याचे नाव आम्ही ‘परम’ असे नाव दिले. पण त्याच्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. भारताने महासंगणक तयार केला हे कुणी मानायलाच तयार नव्हते. मग मला स्वामी विवेकानंद यांच्या वाक्याची आठवण झाली. ‘आपण आपल्या गोष्टी जोपर्यंत परदेशात जाऊन मांडत नाही तोपर्यंत आपल्या देशातील लोक ते मानणार नाहीत.’ त्यानुसार मी ‘परम’ परदेशात दाखविण्याचे ठरविले. त्या वेळेस महासंगणक या विषयावर झुरीचला एक परिषद होणार होती. तेथे महासंगणक नेण्याचे ठरले. पण संगणक नेणार कसा हा प्रश्न होता. शिवाय राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यामुळे नेमके काय करावे हे समजतच नव्हते. त्याच वेळेस अशी कल्पना सुचली की आम्ही तो महासंगणक पुन्हा वेगवेगळ्या भागात करून तेथे येणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत बॅगांमधून घेऊन जायचे ठरवले. अशा रीतीने तो झुरीचला नेला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी पुन्हा आम्ही तो जोडत होतो. पण एवढी मोठी संगणक प्रणाली जोडणे शक्य होईल की नाही अशी भीती होती. ते काम सुरू असताना आगही लागली. मात्र या सर्वावर मात करून आम्ही तो संगणक जोडला आणि तो सादर केला. त्या वेळेस जगाने ‘परम’ची दखल घेतली आणि बरोबरीने भारतानेही दखल घेतली. मग या प्रकल्पाला गती मिळायला लागली.
संगणकात भारतीय भाषा दाखल झाल्या
राजीव गांधींनी सुरू केलेला हा प्रकल्प बंद करावा अशी राजकीय भूमिका तयार झाली. आमचे सर्व अनुदानही बंद झाले. महासंगणक तयार झाला तरी तो तळागाळात पोहोचणार नाही, त्यासाठी संगणक क्रांती महत्त्वाची होती. त्या वेळेस अशी अवस्था होती की संगणक इंग्रजीत होता आणि देशात केवळ सात टक्के लोकांनाच इंग्रजी येत होते. यामुळे भारतीय भाषांमध्ये संगणक यावा किंवा संगणकात भारतीय भाषांचा समावेश व्हावा यासाठी आम्ही काम सुरू केले. त्या वेळेसच्या १४ भाषा आणि दहा लिपींचा अभ्यास करू लागलो. यासाठी त्या वेळेस आमच्या प्रयोगशाळेत भाषातज्ज्ञ, संगणकतज्ज्ञ सर्व एकत्र येऊन काम करू लागले आणि पहिली चिप तयार झाली. ज्याचा वापर संगणकात भारतीय भाषेसाठी होऊ लागला. यातून सीडॅकला निधी मिळू लागला आणि पुढचे संशोधन सुरू राहिले. काही काळातच ‘परम १००००’ तयार झाला. हा ‘परम’ आता आपल्या मोबाइलमध्ये सामावलेला आहे.
महा महासंगणक
हे सर्व काम करत असताना सगळं क्षणिक आहे हे जाणवलं आणि शाश्वत काय आहे याचा शोध मी घेऊ लागलो. यातून मी अध्यात्माकडे वळलो आहे. त्यातही विज्ञानाचं सार शोधत मी रमतोय. आता नुकताच भारत सरकारने महा महासंगणकाच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. त्याचे कामही सुरू झाले असून या नवीन संगणकाच्या माध्यमातून आपण एका सेकंदात दहा लाख खर्व गणिती आकडेमोड करू शकणार आहोत. आम्ही शून्यातून सुरू केलेले माहिती तंत्रज्ञानाचे काम, सध्या भारताची त्यात १०० करोडहून अधिक गुंतवणूक आहे. यामुळे जागतिक स्पध्रेत टिकून राहण्यासाठी आपल्याला या संशोधनाची मोठी गरज भासणार आहे.
डॉ. विजय भटकर
– शब्दांकन : नीरज पंडित -niraj.pandit@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay bhatkar

ताज्या बातम्या