१९६४ सालची- म्हणजे साधारण साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. मी तेव्हा इयत्ता सातवीत शिकत होतो. त्या वेळच्या कुलाबा जिल्ह्यातील (आता रायगड) अलिबाग तालुक्यात चोंढी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. माझा शाळाप्रवेशही तिथेच झालेला. पहिलीत वडिलांनी नेऊन बसवलेल्या या शाळेतच सातवीपर्यंत शिक्षण झालं. पहिलीपासून प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळे शिक्षक असायचे. मला मात्र त्यातल्या जोशी बाई, राऊत बाई, राऊत गुरुजी, मोरे सर (इंग्रजी शिकवायचे म्हणून ‘सर’) एवढेच आठवताहेत. सुलभा राऊत आणि रघुनाथ राऊत हे पती-पत्नी सहावी आणि सातवीला शिकवायचे. गुरुजी उंच, तर बाई थोडय़ा ठेंगण्या आणि पायानं किंचित अधू. सहावीचा वर्ग आमच्या शेजारील शिवदास शेठ आमले यांच्या घराच्या माडीवर भरत असे. शाळेत पाणी पिण्याची व्यवस्था असली, तरी मी पाणी प्यायला पळत पळत घरी यायचो. वडिलांचं छोटंसं दुकान असल्यामुळे पटकन तिथून एखादी गोळी तोंडात टाकायची नि वर्गात जाऊन बसायचं! बाईंचा माझ्यावर जीव होता. अगदी खूप काही लाडका वगैरे नव्हतो, पण रागवायच्या नाहीत एवढं मात्र खरं. 

सहावीतून सातवीत गेलो आणि राऊत गुरुजी वर्गशिक्षक म्हणून आले. ते शाळेचे मुख्याध्यापकसुद्धा होते. अतिशय हुशार, कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे होते. त्यांना त्या वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून दिल्ली इथे गौरवण्यात आलं होतं. आम्हा विद्यार्थ्यांना आणि शाळेलाच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीत लोकांना त्याबद्दल अभिमान वाटत होता. वर्तमानपत्रात आलेले त्यांचे फोटो नि बातम्या एकमेकांना दाखवून आपल्या शाळेच्या शिक्षकांचा बहुमान म्हणजे आपलं भाग्यच, असं बोललं जात होतं.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

आम्ही सातवीची सर्व मुलं-मुली तर खूपच खूश झालो होतो. आमच्या वर्गात माझ्याबरोबर होते नंदू कर्वे, कमलाकर म्हात्रे, रामकृष्ण म्हात्रे, रामचंद्र पडते, अरिवद शिरधनकर, सदाशिव आग्रे, बाळू गायकवाड, धनाजी जोशी, प्रभाकर म्हात्रे, शालू वेलणकर, कुंदा हळदणकर, वासंती पाटील, प्रमिला पडते, सुषमा पडते आणि आणखीही मुलं-मुली. राऊत गुरुजींचा आवडीचा विषय गणित. इतर विषय शिकवतानाही ते तेवढय़ाच तन्मयतेनं शिकवत. पण एखादी चूक कुणाकडून झाली, तर मात्र हातावर रुळाचे फटके खावे लागत. अर्थात त्यामुळे ती चूक पुन्हा कधीही होत नसे. माझं स्वत:चं गणित पक्कं झालं त्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे.

भूगोल शिकवताना भारताचा नकाशा नीटपणे समजावा म्हणून शाळेच्या पटांगणावर मातीमध्ये आखणी करून आणि छोटे दगड वगैरे लावून नकाशाचा आकार काढलेला होता. त्यात निरनिराळी राज्यं दाखवली होती. त्यामुळे भूगोल सोपा झाला. आजही कधी काही कामानिमित्त किंवा कार्यक्रमासाठी मराठी शाळेत गेलो तर त्या वेळचा तो नकाशा डोळय़ांसमोर येतो. इतका तो मनात कोरला गेला होता. प्रत्येक विषय आणि प्रत्येक विद्यार्थी गुरुजींनी तयार केला. गुरुजी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, राष्ट्रीय दिन वगैरे साजरे करताना गावकऱ्यांनाही सहभागी करून घेत असत. मुलांमधील गुणांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्यात गुरुजींचा पुढाकार. माझं हस्ताक्षर चांगलं होतंच, पण त्याचं कौतुक करून ते आणखी सुधारण्यात मला गुरुजींनी मदत केली. आज मी जे नाव मिळवलंय त्यामागील प्रेरणास्थान माझे राऊत गुरुजीच आहेत.

राऊत गुरुजींचं वयाच्या बहात्तराव्या वर्षी ३० सप्टेंबर १९९२ रोजी, तर राऊत बाईंचं केवळ महिनाभर आधी २२ ऑगस्ट १९९२ ला वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी निधन झालं. राऊत गुरुजींना दोन मुलगे आणि एक मुलगी. आनंद ऊर्फ नंदू आणि चारुहास ही मुलं आणि मुलगी शीला. नंदूचंही २०१८ मध्ये निधन झालं. चारुहास अलिबागला विद्यानगरमध्ये राहतो, तर शीला पुण्यात असते. नंदूच्या मुलीकडून मला गुरुजी आणि बाईंविषयी आताची माहिती मिळू शकली आणि त्यांचा फोटोही तिनंच दिला. त्यामुळेच मी ही कृतज्ञता व्यक्त करू शकलो!

vilasksamel@gmail.com