वर्ष १९३३. मराठीत ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा विभावरी शिरूरकर यांनी लिहिलेला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याने प्रचंड खळबळ माजवली. स्त्रीच्या लैंगिक भावना-वासना, तिचा कोंडमारा या कथांतून धीटपणे व्यक्त झाला होता.
एका कथेतली उपवर मुलगी म्हणते, ‘जो कोणी मला पाहून जाई त्याच्याकडून उत्तर येईपर्यंत, त्याच्याबद्दल मी विचार करत राही. त्याने नाही म्हटले की दुसऱ्याबद्दल! प्रत्येक वेळी मुलीचं मन भावी वराची व त्याच्याबरोबर संसाराची संपूर्ण चित्रं काढून स्वत:च त्यांना आग लावीत असतं. हीच का पावित्र्याची व्याख्या?’ मुलीच्या तोंडून अशा थेट अभिव्यक्तीची तत्कालीन समाजाला सवय नव्हती.
आधीच्या अनेक लेखकांनी सहृदयतेनं स्त्रीचं दु:ख, परवशता, सोशीकता, हट्टीपणा, लढाऊपणा याविषयी लिहिलं होतं. पण त्यात वास्तवाला भिडलेली ही धिटाई नव्हती. त्यामुळे ‘कळ्यांचे नि:श्वास’वर सभेतून उलटसुलट चर्चा झाल्या. सुधारकांनी प्रशंसा केली, तर काहींनी निषेध म्हणून लेखिकेची प्रेतयात्रा काढली. कोणी लेखिकेला विकृत म्हटलं. विभावरी शिरूरकर या नावाची स्त्री विद्यापीठातून पदवीधर झाली आहे का, याचाही तपास केला गेला.
वर्षभरातच १९३४ मध्ये विभावरींची ‘हिंदोळ्यावर’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. यातली नायिका अचला आणखीच बंडखोर होती. इंग्लंडहून शिकून आलेल्या कर्जबाजारी दारुड्या नवऱ्याशी घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार नाही. म्हणून ती विवाहबाह्य संबंध स्वीकारते. मातृत्वाचा अधिकारही धिटाईने घेते. तरी या मार्गावर क्षणोक्षणी साशंक होते. अडखळते. अस्वस्थ होते. पण प्रियकरासमवेत निर्धारानं पुढे जाते. पुढील काळात अनेक टीका-लेख एकत्र करून ‘विभावरीचे टीकाकार’असं पुस्तकच प्रसिद्ध झालं. इतकी ही लेखिका महत्त्वाची होती. विभावरी शिरूरकर हे टोपणनाव धारण करून लिहिणाऱ्या या लेखिका म्हणजेच मालती बेडेकर. मालतीबाईंच्या कथांनी वादळ उठणार, याची मालतीबाईंना आणि पुस्तक प्रकाशक त्यांचे मेहुणे ह. वि. मोटे यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून तो कथासंग्रह ‘विभावरी शिरूरकर’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाला. त्या शिरूर गावच्या होत्या, म्हणून शिरूरकर. विभावरी म्हणजे रात्र. त्या अंधारात लपल्या होत्या म्हणून विभावरी.
मालती बेडेकरांचा जन्म १ ऑक्टोबर १९०५ चा. त्या माहेरच्या बाळूताई खरे. कृष्णाबाई मोटे मालतीबाईंची मोठी बहीण. (याच सदरात कृष्णाबाई मोटे यांच्यावरील लेख १२ जुलैला प्रसिद्ध झाला आहे.) पुण्याजवळच्या घोडनदी ऊर्फ शिरूर या गावी ‘मिशनरी स्कूल’मध्ये मालतीबाईंचे वडील चित्रकलेचे शिक्षक होते. शिरूरमध्ये मुलींची शाळा दोन इयत्तांचीच होती. वडिलांनी आपल्या मुलींना सातवीपर्यंत मुलग्यांच्या शाळेत घातलं. सातवी उत्तीर्ण झाल्यावर १९१७ मध्ये मालतीबाईंना पुण्याजवळच्या हिंगणे येथील महर्षी कर्वे यांच्या संस्थेत पाठवलं. तेथे वसतिगृहात राहून मालतीबाई मॅट्रिक आणि पुढे कर्वे विद्यापीठाच्या पी.ए. (एम.ए.समान) झाल्या. इथेच त्यांचा वेगळेपणा, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची वृत्ती दिसते. ज्या मार्गावर नंतर अनेक स्त्रियांनी वाटचाल केली.
१९८९च्या मुलाखतीत ‘कर्वे शिक्षण संस्थे’बद्दल सांगताना मालतीबाई म्हणतात, ‘हिंगण्यातले विद्यार्थिदशेतले दिवस सुंदरच होते. या काळात मी भराभर बदलत गेले. मुलींनी खूप वाचावं, चर्चा कराव्यात, विचार करावा असा शिक्षकांचा प्रयत्न असे. ‘ज्योतीनं ज्योत पेटवावी, तसं तुम्ही शिकून दुसऱ्या स्त्रियांना शिकवा.’ असं गुरुवर्य महर्षी कर्वे सांगत. वा. म. जोशी म्हणत, ‘बोला बोला. तुमच्या मनात असेल ते बोला. प्रश्न विचारा. शंका विचारा. ‘ज्ञानाभिलाषिणीसभा’ या उपक्रमात मुली भाषणं करत.
‘शिक्षणाचे उपयोग’, ‘स्त्रिया शिकल्याने काय होऊ शकेल’, ‘मराठीमध्ये शिकण्याचे फायदे’ इत्यादी विषय भाषणासाठी दिलेले असत. संस्थेत आम्ही मुली खो खो, हुतुतू, लंगडी, ठिकऱ्या सगळं काही दणकून खेळत होतो. काही मुली उपासतापास करत. काहींनी ते स्वेच्छेनं सोडून दिलं होतं. सक्ती कशाचीच नव्हती. संस्थेच्या आत मुली सगळं स्वातंत्र्य उपभोगत. पण बाहेर गेल्यावर मात्र हे स्वातंत्र्य नसे. मराठी माध्यमामुळे आमच्या संस्थेचं शिक्षण जरा कमी दर्जाचं मानलं जात असे. इथून ‘पदवी’ घेतलेल्या मुलींना जरा झगडून बाहेर स्थान मिळवावं लागलं. पण हिंगण्याला शिकलेल्या अनेक मुलींनी शिक्षणाचं कार्य केलं. काहींनी तर स्वतंत्र शाळा काढल्या होत्या.’ मालतीबाई स्वत:चे विचार मोकळेपणानं मांडत, निरनिराळ्या क्षेत्रांत शिरून पाहत, मनाशी योग्य-अयोग्यचा निवाडा करत असत.
१९२३ मध्ये पदवीधर झाल्यावर, मालतीबाई ‘कर्वे संस्थे’च्याच कन्याशाळेत शिक्षिका झाल्या. ‘ही घोडनवरी मास्तरीण लग्न करायची केव्हा?’ या पुणेकरांच्या चौकशीकडे दुर्लक्ष करून, त्या अनेक ठिकाणी साक्षरता प्रसाराला जात. श्री. म. माटे यांच्याबरोबर त्यावेळच्या तथाकथित अस्पृश्यांसाठी वर्ग घेत. ख्रिस्ती झालेल्या एका स्त्रीला हिंदू धर्मात परत यायचं होतं. यात श्री. म. माटे यांना मालतीबाईंनी उत्साहाने मदत केली. या गोष्टी म्हणजे काळाच्या पुढे राहून केलेली कामेच होती.
शिक्षिका म्हणून मुलींना कितीही जीव तोडून शिकवलं, तरी मॅट्रिकपर्यंत फारच थोड्या मुली पोहोचत. मध्येच त्यांची लग्न होऊन शिक्षण बंद होत असे. आपण जे शिकवतो ते अक्षरश: चूलखंडात जातं, या कल्पनेनं मालतीबाईंना उबग आला. मग ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्या गोदूताई परुळेकरांच्या मध्यस्थीनं सोलापूरमध्ये ब्रिटिश सरकारच्या अमलाखालील समाजकल्याण क्षेत्रात मालतीबाईंना नोकरी मिळाली. आरोपी किंवा गुन्हेगार माणसांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचं हे कार्य होतं. पुढे या अनुभवविश्वावर मालतीबाईंनी लिहिलेली ‘बळी’ ही कादंबरी, विषय आणि आशय दोन्ही बाजूंनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच काळात मालतीबाईंचा विश्राम बेडेकरांशी परिचय, मैत्री, प्रेम सुरू झालं.
विश्राम बेडेकर इंग्लंडला निघाले तेव्हा मालतीबाईंनी विवाहाची गोष्ट काढली. विश्राम बेडेकर विवाहित होते. पण पती-पत्नीत बेबनाव होता. मालतीबाईंनी त्यांच्या पत्नींची भेट घेतली. दोघींत बोलणं झालं. पुढे वयाच्या ३३व्या वर्षी मालतीबाई आणि विश्राम बेडेकर यांनी मुंबईत लग्न केलं.
मालतीबाईंच्या ‘बळी’, ‘विरलेले स्वप्न’, या कादंबऱ्यांत आणि ‘दोघांचे विश्व’ या कथेत राजकीय रेट्यांमुळे व्यक्ती जीवनावर होणाऱ्या परिणामांचे यथोचित भान दिसतं. साम्यवाद आणि गांधीवाद संघर्षाची झलक येथे चित्रित झाली आहे. १९५१ मध्ये पुण्यातून ‘समाजवादी’ पक्षासाठी मालतीबाई निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या, त्यात त्या हरल्या. पण जवळून संबंध आल्यावर त्या पक्षाबद्दल त्यांना निराशाच वाटू लागली. १९५२मध्ये कॉम्रेड चितळे यांच्या सूचनेवरून ३० जणांच्या ‘पीस मिशन’बरोबर त्या तीन महिन्यांसाठी रशियात गेल्या. रशियात दोघा नवरा-बायकोने कमवायचं आणि मुलांसाठी उत्तम सुखसोयींनी युक्त अशी पाळणाघरे, ही संसाराची पद्धत त्यांना आवडली. पण सगळी माणसं कसल्या तरी दडपणाखाली असल्याचं जाणवत होतं. ते स्टॅलिन राजवटीचे दिवस होते.
क्रेमलिन पॅलेस पाहत असताना मालतीबाईंनी वाटाड्या बाईला विचारलं, ‘स्टॅलिन कुठे राहतात?’ ती एकदम घाबरून म्हणाली, ‘डू नॉट आस्क मी सच क्वेश्चन्स मिसेस बेडेकर.’ रशियन अधिकाऱ्यांनी विचारलं, ‘‘तुम्हाला काय पाहायचं आहे?’’ मालतीबाईंनी म्हटलं, ‘‘फिल्म शूटिंग.’’ त्यांचं उत्तर, ‘‘देयर इज नो फिल्म शूटिंग हियर.’’ ‘‘तुरुंग पाहायचं आहे’’ म्हटलं तर, तेही ‘‘नाहीत’’ म्हणून सांगितलं गेलं. मंत्र्यांबरोबर बैठकी झाल्या. तेव्हाही जे प्रश्न विचारले गेले, त्याची उत्तरं डावलून ते स्वत:ला पाहिजे तेच बोलत, हा अनुभव आला. तिकडून आल्यावर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी मालतीबाईंची व्याख्यानं योजली. त्या व्याख्यानात मालतीबाईंनी हे अनुभव सांगितले. दोन-तीन व्याख्याने झाल्यावर पुन्हा निमंत्रणं आली नाहीत.
अशा अनुभवांनंतर, मालतीबाई पुन्हा त्यांच्या मूळ क्षेत्राकडे म्हणजे उपेक्षित स्त्रिया, अनाथ मुले, स्त्री समस्या सोडवणे यांच्याकडे वळल्या. त्यांच्यावर लिहू लागल्या. त्यांच्यासाठी काम करू लागल्या. या काळात कथा, कादंबरी, स्फुट लेखन, संशोधन लेखन अशा सर्वच प्रकारांत त्यांची लेखणी फिरत होती.
लेखनाच्या केंद्रस्थानी नेहमी स्त्री होती. पण त्या स्त्रीच्या पक्षपाती नव्हत्या. स्त्री-पुरुष संबंधाच्या संदर्भात अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्या लिहितात, ‘स्त्री-चेष्टितांनी पुरुष लोभावतो हे जसं खरं, तसं पुरुषांच्या नजरेत विशिष्ट मानाचं स्थान आपल्यासाठी निर्माण झालेलं पाहणं, हा सर्वसामान्यपणे स्त्रियांचाही नैसर्गिक खेळ चालू असतो… परिणामी कित्येकदा मोठी विचित्र घटना घडते. खेळ मर्यादेबाहेर जाऊन पुरुषाचं माथं भडकल्यावर तो शरीरसंबंधांचीच अपेक्षा करतो. त्या शरीरसंबंधापर्यंत जाण्याची कित्येक स्त्रियांची इच्छा नसते. काहींचा स्वत:वरचा ताबा सुटतो. मग त्या बायका पेचात आल्या की पुरुष म्हणतो, ‘‘हिनेच गळेपडूपणा केला!’’ आणि बाई म्हणते, ‘‘याने माझा फायदा घेतला!’’ मिश्र सामाजिक आयुष्यात या खेळात अजिबात भाग न घेणारे स्त्री-पुरुषही असतात. पण ते बघ्यांचे काम मनापासून करीत असतात.’
आपल्या समाजात स्त्रीचं मातृरूप खूपच गौरवलं आहे. याबद्दल मालतीबाईंनी लिहिलेले मूलभूत विचार लक्षवेधी आहेत. ‘आध्यात्मिक पुस्तकात पुरुषाला सांगितलेलं असतं- स्त्री ही कामचेष्टा करणारी आहे. पुरुषाला ज्ञानमार्गापासून भ्रष्ट करते. ज्ञानी पुरुषा, तू स्त्रीकडे पाहू नकोस. पण इतकी अधम स्त्री माता झाली की एकजात सगळे तिचा कोण गौरव करतात. माता झाली की ती काय खरोखर संतीण बनते? की खरंच जगाचा उद्धार करते? खरं म्हणजे कामिनी स्त्रीचीच पुढे माता होत असते ना? मग मात्र वाटतं, की स्त्रीनं समाजाला गरजेच्या असलेल्या प्रजेला नीट वाढवावं, म्हणून हे मधाचं बोट असावं. एरवी माता या सर्वगुणसंपन्न नसतात, हे का अध्यात्मवाद्यांना कळत नसेल?’
६ मे २००१ या दिवशी मालतीबाईंचं निधन झालं. त्यांनी नेहमीच उपेक्षित, अनाथ स्त्रिया, मुले आणि त्यांच्या समस्या पुस्तकांच्या रूपात स्त्रीजीवनाच्या अनेकविध बाजू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द अस्तित्वात नव्हते, पण स्त्री जागृतीच्या ठिणग्या दिसत होत्या, स्त्री जीवन चुकतमाकत, अडखळत, धडपडत नव्या विकासाच्या वाटा शोधू लागले होते, त्या टप्प्यावरचा आविष्कार मालतीबाईंच्या ललित लेखनात दिसतो. त्यांचे वैचारिक लेखन स्त्री चळवळीला आजही प्रकाशमार्ग दाखवते आहे.