स्वेच्छा पर्यटन अर्थात व्हॉलन्टिअर टुरिझम काय असते, हे जाणून घेण्याच्या उत्कंठतेपासून ते यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर मिळालेले आत्मिक समाधान, आणि ‘मीही हे करू शकते’ या जिद्दीतून आलेले भन्नाट अनुभव सांगतेय, तुमच्या-आमच्यातलीच तद्दन मराठी ‘सोलो ट्रॅव्हलर’पायल भोसेकर-तिडके.
व्हॉलन्टिअर टुरिझम कसं असतं हे जाणून घेण्याच्या उत्कंठतेतून आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी शोधमोहीमच हाती घेतली, त्यात माझं बजेट आणि वेळ याच्या चौकटीत बसेल असा एकच देश मला सापडला, तो होता कम्बोडिया! आíकटेक्ट असल्याने काहीतरी वेगळं करायचा ध्यास होता, पण सुरुवात कुठून करायची तो धागा गवसत नव्हता. पर्यटनाची हौस भारी, मात्र एकटीनं जायचं की नवऱ्याबरोबर की मत्रिणींबरोबर तेही पक्क ठरत नव्हतं. सात-आठ महिने नोकरी करून थोडीफार पुंजी जमविली होती. नेमका व्हॉलन्टिअर टुरिझमचा पर्याय सामोरा आला. नेटसर्फिगमधून या देशातल्या सियामरिप या शहरातील एका अनाथालयात काम करण्याची संधीही मिळत होती. ठरलं, अनाथालयात सकाळी शिकवायचं आणि उर्वरित वेळेत पर्यटन! निर्णय पक्का झाला. अपेक्षेप्रमाणे आई-वडील, सासऱ्यांपासून सर्वच नातलगांनी शंका-कुशंका घ्यायला सुरुवात केली. एकटीच जाणार का? कुठे राहणार? कशी फिरणार? प्रश्नाचा फक्त भडिमार. त्यांना काळजी वाटणं साहजिकच होतं, पण त्यांच्या प्रश्नांची माझ्याकडे खरंच उत्तरं नव्हती. खरं तर माझ्याही मनात चलबिचल सुरू होती. अनेक शंका होत्या; पण निर्धार पक्का झालेला होता. नवऱ्याचा, कश्यपचा भरभक्कम पाठिंबा आणि प्रवासात फक्त त्याच्याशी असलेला ऑनलाइन संपर्क इतकंच माझ्यापाशी होतं. तीन आठवडय़ांनंतर मी धडधाकट सुखरूप परत घरी आले आणि सर्वानाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.. आणि मला कायमस्वरूपी एक मार्ग मिळाला व्हॉलन्टिअर टुरिझमचा. माझ्यासाठी आणि इतरांसाठीही!
ठरल्या दिवशी मी निघाले. पहिला टप्पा होता बँकॉक . बँकॉक विमानतळावर उतरले आणि.. तो क्रिस्टल क्लिअर एअरपोर्ट. नजरेच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत फुललेली हिरवीगार भातशेतं, शिल्पकलेचा भव्यदिव्य वास्तुनमुना असलेली बुद्ध मंदिरं, त्यातील ध्यानस्थ बुद्धापासून निद्रिस्त अवस्थेतील बुद्धमूर्ती. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरील ‘त्वमेव शरणम् गच्छामी’चे अखिल मानव जातीला नतमस्तक व्हायला लावणारे भाव पाहिले आणि आपोआप माझे हात जोडले गेले. बाहेर आले तर आकाशाला भिडणारे मंदिरांचे कळस नजरेस पडले. तिथेच मला या जादुईनगरीने त्या देशाच्या संस्कृतीची चुणूक दाखवली.
याच शहरात मला एक ब्रिटिश मुलगी भेटली. ती ऑस्ट्रेलियावरून थायलंडला आली होती. हॉर्स रायडिंग ट्रेनर होती. बँकॉकमध्ये आम्ही दोघी चार दिवस एकत्र राहिलो. पण आमच्या फिरण्याच्या वाटा वेगळ्या होत्या. बँकॉकमधलं नाइट मार्केट, नाइट लाइफ मी अनुभवलं. रात्र-रात्र लोक तेथे रस्त्यावर फिरतात. एन्जॉय करतात. तिथल्या एक-दोन दिवसांच्या त्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे बँकॉकचा ‘अमेरिकनाइज्ड’ चेहरा. डॉलर संस्कृतीने या देशात चांगलंच बस्तान बसवलं आहे. माझ्या सुरुवातीच्या नियोजनाप्रमाणे थायलंडमध्ये चँगमईला महिनाभर राहून मतिमंद मुलांसाठी काम करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही.
बँकॉक सोडून कम्बोडियाला जायला आता जेमतेम एक दिवस होता. तो दिवस आणि ती रात्र खाओसॅन मार्गावरील गेस्ट हाऊसमध्ये एकटीनं काढली. थोडी उदास झाले. पण सावरलं स्वत:ला. माझ्याबरोबर स्थळांचे नकाशे होते, काय पाहायचे ती स्थळं निश्चित होती आणि बस, स्कायट्रेन आणि बोटींसारखी अत्याधुनिक साधनांची उपलब्धता आणि साथ होती माझ्या सारख्याच इतर एकेकटय़ा प्रवाशांची! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी हवं ते सर्वच होतं? हुश्श..! पहाटेचा साडेपाचचा गजर लावला आणि डोळे मिटले.
काय आहे हे व्हॉलन्टिअर टुरिझम?
‘व्हॉलन्टिअरिंग व्हाइल ट्रॅव्हिलग’ म्हणजेच व्हॉलन्टिअर टुरिझम (व्हॉलेनटुरिझम). सोप्या शब्दात सांगायचे तर, पर्यटनासाठी देश-विदेशातील एखादं स्थळ निवडायचं. तिथे जाऊन स्वेच्छेने एखादे काम करायचे. तुमच्यातील अंगभूत कलागुण, कौशल्य इतरांना शिकवायचं. उभय देशांची संस्कृती आदानप्रदान करायची, तिथल्या शाळांमध्ये जाऊन एखादी भाषा, नृत्य, गायन, चित्रकला शिकवायची वा मुलांना एखादे वाद्य वाजवायला शिकवायचे. या बदल्यात कोणताही आर्थिक मोबदला न घेता संबंधित संस्थेकडून राहण्याची, जेवणाची व फिरण्याची व्यवस्था मोफत होतेच. हेच असतं व्हॉलन्टिअर टुरिझम! अलीकडच्या काळात बराच लोकप्रिय झालेला ट्रेंड.
अर्थात भारतात अद्याप कमीच.
सकाळी सियामरिपला जाण्याची उत्कंठाही होती. तासभर बसची प्रतीक्षा करावी लागली, पण स्वागतकक्षावर बर्माचा एक मुलगा भेटला आणि गप्पांच्या ओघात तास कसा गेला कळलंच नाही. ब्रेकफास्टही करायचा राहून गेला. बस आल्यावर चढण्याच्या तयारीत असतानाच, एका संकटाची चाहूल लागली. स्वत:ला ट्रॅव्हल एजंट म्हणविणारी एक मुलगी, ‘भारतीयांना व्हिसा नाही’ असे थंडपणे सांगून मोकळी झाली. मला काय करावं ते कळेच ना! पण शांत बसूनही चालणार नव्हतं. तिच्याशी जमेल तशी बरीच ‘तू तू मैं मैं’ करण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. ती सरळ तिकीट माझ्या हातात ठेवून निघून गेली. गेस्ट हाऊसमधून चेकआऊट केलेलं, संध्याकाळपर्यंत सियामरिपला पोहोचायचं होतं. देशाची सीमा ओलांडून जायचं होतं. त्यामुळे तोडगा काढावाच लागणार होता. थायलंडहून सियामरिपला जाताना तिकिटांचा काळाबाजार चालतो हेही कानावर आलं होतं. असहाय वाटायला लागलं. रडायचंच तेवढं उरलं होतं. अखेर तिला परत बोलावलं. तिला जास्त पैसे हवे होते. ३०० बाथ (थायलंड चलन) अतिरिक्त मोजले. माझी फसवणूक होते आहे हे कळत होतं, पण पर्याय नव्हता. दिवस वाया न घालवण्यासाठी मोजलेली ती किंमत होती, असं मी स्वत:ला समजावलं.
थोडय़ाच वेळात ९ ते १० आसनक्षमतेचं एक वाहन आलं. त्यात मागे ६ मद्यधुंद तरुण बसलेले, आपल्याच मस्तीत होते, कोणा थाई मुलीसंबंधी त्यांची चर्चा चालू होती. बरोबर एकही स्त्री नाही. तिकीट एजंटला विचारलं तर, तू ड्रायव्हरजवळ पुढच्या सीटवर बस, असं निर्विकारपणे सांगून ती निघूनही गेली. हिंमत केली आणि बसले. ‘गाडी सुरू झाली. शहर मागे जाऊ लागलं आणि माझं विचारचक्र दुप्पट वेगानं पुढं.. का आले मी? किती मूर्ख आहे मी, काय साध्य करणार आहे? खरं सांगायचं तर प्रचंड घाबरगुंडी उडाली होती. आपल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेसारखाच प्रचंड मोठा विस्तीर्ण रस्ता. दोन्ही बाजूला चित्रात रेखाटल्यासारखी हिरवळ, दूरवर बांधलेली छोटी छोटी घरं, पण मी काही म्हणून काही एन्जॉय करू शकत नव्हते. जीव मुठीत धरून प्रवास सुरू होता. गाडी ज्या वेगाने जात होती त्याच वेगाने सैरभैर विचार धावत होते. सुदैवाने मागची मुलं आपल्यातच दंग होती. त्यांचं माझ्याकडे लक्षही गेलं नाही. ११च्या दरम्यान एका गॅस स्टेशनवर गाडी थांबली. तिथे छोटी-छोटी हॉटेल्स आणि पर्यटकांची वर्दळ पाहिली आणि एकदमच हायसं वाटलं.
खाली उतरले, पाय मोकळे केले आणि नजर गेली एका फलकावर ‘बीअवेअर ऑफ स्कॅम’ पुन्हा धस्स झालं. थोडय़ाच वेळात तेथे आणखी एका खलनायकी चेहऱ्याच्या ट्रॅव्हल एजंटशी पाला पडला. पुन्हा तोच प्रसंग.. भारतीयांना व्हिसा नाही.. इथंही भ्रष्टाचार. आधीच जास्त पैसे दिले होते, ती पावतीही त्याला दाखविली, पाहून त्याच्या चेहऱ्यावर विकट हास्य उमटलं. पण ते तेवढय़ावरच निभावलं. चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून बॅग ओढत ओढत मी इमिग्रेशन ऑफिसमध्ये पोहोचले. जुनाट इमारत.. मुंगीच्या पावलानं पुढे सरकणारी प्रवाशांची लांबच लांब रांग संपवून अखेर व्हिसा मिळाला! ओएए.. अखेर मला कंबोडियात प्रवेश मिळणार (पान २ वर)
(पान १ वरून) या आनंदातच परत गाडीत बसले, पण तो आनंदही क्षणिकच ठरला..
या देशाच्या प्रथमदर्शी दर्शनानेच निराशा केली. विचार आला, ‘अरे देवा, कसे काढायचे येथे तीन आठवडे? व्हिसासाठी अधिकृतपणे २० डॉलर भरावे लागणार होते, पण अतिरिक्त ५ डॉलरची मागणी करण्यात आली. माझी चिडचिड व्हायला लागली, पण तिकीट काऊंटरवरच्या माणसानं सुहास्य वदनानं स्वागत केलं. त्यानं मला विचारलं, तुम्ही भारतीय महिला कपाळाला लाल टिकली लावता ना? तू हिरवी का लावली आहेस? त्याच्या प्रश्नाचं माझ्याजवळ उत्तर नव्हतं, पण त्याच्या प्रश्नातच मला व्हिसा मिळाल्याचं सूतोवाच केलं होतं. दुपारचे दोन वाजत आले होते. नाश्ता नाही.. जेवण तर दूरच. अधेमधे काहीतरी अरबट-चरबट खाल्लेलं. तरीसुद्धा व्हिसा मिळाल्यामुळे माझं पोट भरलं होतं.
नेटसर्फिगवरून संपर्क झालेली एक स्पॅनिश मुलगी माझ्याबरोबर सियामरिपमध्ये राहणार होती, पण गेल्या पाच दिवसांत तिने एकदाही संपर्क साधला नव्हता. माझ्याजवळ ना तिचा पत्ता ना फोन नंबर, केवळ ई-मेल हाच आमच्या दोघींतील दुवा होता. काय करावं सुचत नव्हतं. खरं तर असे धक्के एव्हाना अंगवळणी पडले होते. अचानक आठवला माझ्या राधिका राज नावाच्या एका मैत्रिणीने दिलेला संदर्भ! किथ नावाच्या टुकटुक ड्रायव्हरचा. ज्याचा चेहरा काळा की गोरा हेही मला माहीत नव्हते. त्या किथशी मी फेसबुकवरून संपर्कात होते. वाटलं, पाहू या वेळप्रसंगी त्याला तरी गाठता येते का? नवख्या प्रदेशात फेसबुकवरील असे आधारसुद्धा तारून नेतील, असा उगाचच विश्वास वाटत होता.
सियामरिपला पोहोचवणाऱ्या एका बसमध्ये बसले. प्रवाशांनी खचाखच भरली होती, पण कशीबशी एक सिट मिळाली. तिथून सरळ अनाथालयातच जाण्याचा विचार पक्का केला. दिवसभराच्या दगदगीने शीण आला होता. थकलेलं मन निद्रेच्या केव्हा अधीन झालं ते कळलंच नाही. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सियामरिप आलं. बस थांबली आणि खडबडून जागी झाले. सूर्य केव्हाच डोंगराआड गेला होता. बाहेर अंधारून आलं होतं. माझा सेलफोन पूर्णपणे डाऊन झालेला, अनाथालयाचा व्यवस्थापक फोन उचलत नव्हता. बसमधून उतरून सर्व प्रवासी आपापल्या मार्गाला लागलेले. गरज पडल्यास मी येथे पोलिसांची मदत घेऊ शकेन का? असा विचारही मनात डोकावून गेला. ट्रॅव्हल एजंट इथेही माझा पिच्छा सोडत नव्हते. त्याच्या मनात त्याने सांगितलेल्या टुकटुकमधून मी जावं असं होतं. कारण त्याला ‘कमिशन’ मिळणार होतं, पण मी दुर्लक्षच केलं. काही वेळानं त्याच्या मोबाइलवरूनच किथला संपर्क साधला आणि काय आश्चर्य थोडय़ाच वेळात किथ माझ्यासमोर हजर! त्याक्षणी मला तो अगदी देवदूतासारखा भासला. खरंच, देवदूताची संकल्पना याहून काय वेगळी असू शकते? नशीब..नशीब म्हणतात ते हेच असतं का?
फेसबुकवरून भेटणारा किथ प्रत्यक्ष भेटला आणि का कोण जाणे एकदमच जीव भांडय़ात पडला. ट्रॅव्हल एजंटला त्याच्या मोबाइल कॉलचे पैसे दिले आणि किथच्या टुकटुकने अनाथालयाचा रस्ता धरला. थोडय़ा वेळात अनाथालयाच्या गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचले. रस्त्यावर अंधार, गर्द झाडीनं वेढलेला तो गेस्ट हाऊसचा परिसर मला एखाद्या भूतबंगल्यासारखाच वाटला. थोडय़ा वेळात व्यवस्थापक आला नि म्हणाला, ‘सध्या अनाथालयाला सुट्टी आहे, १०-१५ दिवसांनी सुरू होईल.’ त्याच्यावर विश्वास ठेवायला मन तयार नव्हतं. काहीतरी गडबड आहे, असं सारखं वाटत होतं. गेले दोन महिने मी ज्यांच्याशी संपर्कात होते आणि ज्यांच्या भरवशावर ‘व्हॉलन्टिअर टुरिझम’वर जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्याकडूनच असा अनुभव आल्यानं चीड तर आलीच, पण उदासही व्हायला झालं. त्या अनाथालयाचा नाद सोडून देण्याशिवाय माझ्या हातात काही उरलंच नव्हतं. कुठं गेली असतील ही मुलं? अनाथालयात राहून नाकारलेपणाचं जीवन जगणाऱ्या या मुलांचा ‘आपलं’ म्हणणारं कोणी असेल? विचारातच मी तेथून निघाले..
पुढे काय? सियामरिपमध्येच शोधमोहीम सुरू केली. काही संस्थांचे पत्ते माझ्याकडे होतेच. उन्हातान्हात पायीपायीच अनेक एनजीओज् पालथ्या घातल्या. त्यांची अपेक्षा काय आहे ते माहीत करून घेतलं. तीन-चार दिवस यातच गेले. मला पैसे नकोच होते फक्त राहण्यासाठी सुरक्षित जागा हवी होती. या प्रवासातली सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे थायलंड, कम्बोडियामध्ये फ्री, ‘वाय-फाय’ इंटरनेटची सुविधा होती. त्याचा मला खूपच फायदा झाला. त्यामुळे मी कायम कश्यपच्या संपर्कात राहू शकले. दिवसातून त्याला दहा/ दहा मेल पाठवायचे. आपण एखाद्या छोटय़ाशा हॉटेलमध्ये जरी चहा विकत घेतला किंवा एखाद्या मॉलमध्ये पाण्याची बाटली विकत घेतली तरी तेथे फ्री ‘वाय-फाय’ ची सुविधा मिळायची. आपल्यासारखं तिथं सायबर कॅफेत जावं लागत नाही. राहून राहून आश्चर्य वाटायचं की, कम्बोडियासारख्या गरीब देशाला हा खर्च परवडतो, तर मग भारताला का परवडत नाही? माझ्याबरोबर गुगल मॅप होताच. मी कोणत्याही गेस्ट हाऊसमध्ये उतरले की, प्रथम त्याचा फोटो काढून मी घरी पाठवायची..
माझ्या एनजीओज्च्या शोधमोहिमेची अखेर ‘स्माइलिंग हार्ट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रेन्स’ ही मनासारखी संस्था मिळण्यात झाली. त्यांनी माझी राहण्याचीही व्यवस्था केली. दिवसा शाळेतल्या मुलांना इंग्रजी शिकवायचं आणि दुपारी सायकलवरून माझा पर्यटनाचा आनंद मनसोक्त अनुभवायचा, असा दिनक्रम सुरू झाला..
कम्बोडियातील ‘अँगकॉर व्हॉट’ हे हिंदू मंदिर नेटवरून बऱ्याचदा पाहिलं होतं. त्याबद्दल खूप ऐकलंही होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसमधील सहकारी लीनाबरोबर मंदिर बघण्याचा बेत केला. पहाटेचा गजर लावला. उठले तर कळलं लीना आधीच दुसऱ्या ग्रुपबरोबर निघून गेली. पुन्हा एकदा फसगत. पण मी ठरविल्याप्रमाणे सायकल घेतली आणि निघाले मंदिराच्या दिशेनं.. सुरुवातीला ऐकल्याप्रमाणे सायकलने ८ किलोमीटरचा प्रवास मोठा वाटला. पण रस्त्याच्या दुतर्फा दूरच दूर पसरलेल्या उंचच उंच वृक्षवल्ली, त्यांच्यामधून दूरवर पसरलेली हिरवळ आणि मधूनच अंग अंग रोमांचित करणारी थंडगार हवेची झुळूक. खरं सांगू, त्याक्षणीच मी ‘सोलो ट्रॅव्हलिंग’च्या प्रेमातच पडले. मन मानेल तो रस्ता घ्यायचा. मनसोक्त निसर्गसौंदर्य लुटताना कोणावर तरी अवलंबून असल्याचं ओझं मनातून झटकून टाकायचं, माझी स्वत:चीच कंपनी मला इतकी काही भावली की ते शब्दात पकडता येणार नाही. खरं सांगायचं तर त्या वेळी ती सायकलच माझी खरीखुरी साथीदार होती आणि हो! असं निसर्गरम्य बायसिकलराइडचं सुख मला मुंबईत कुठे मिळालं असतं? बघता बघता मी पोहोचलेही! जे ऐकलं होतं, नेटवरून पाहिलं होतं त्यापेक्षा कितीतरी भव्यदिव्य मंदिर होतं हे! मंदिर काय ते अनेक मंदिरांचं संकुल होतं. मुख्य मंदिराच्या चहूबाजूंनी सुंदर तलाव.. त्यात फुललेली असंख्य लोभसवाणी कमळं, कळसामागून हळूच डोकावणारं ते सूर्यबिंब! अमेझिंग.. डोळ्याचं पारणं फिटावं असा तो नजारा होता. राजा सूर्यवमन दुसरा या हिंदू राजाने १२ व्या शतकात या मंदिराच्या उभारणीस सुरुवात केली, असं म्हटलं जातं. मुळात हे विष्णूचं मंदिर पण आता तेथे नि:स्तब्ध, शांत, निरलस भावमुद्रेच्या बुद्धमूर्ती विराजमान आहेत. अॅंगाकोरची भव्यदिव्यता मनात साठवून मी परत शहराकडे वळले. सूर्यास्तानंतर मात्र आम्ही सर्व सायकलस्वार एकामागून एक जात होतो. शहरात पोहोचलो आणि सर्वजण चारी दिशांना विखुरले गेले. कोणी कोणाला ‘गुड-बाय’केलं नाही. एका अनोळखी प्रदेशात एकमेकांच्या सोबतीनं प्रवासाचा आनंद लुटायचा एवढं साधं अंडरस्टॅंडिंग होतं सगळ्यांमध्ये. म्हणूनच माझ्या मते, ‘सोलो-ट्रॅव्हलिंग’ हे आपल्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींबरोबर वा कुटुंबीयांबरोबर करायचे नसते तर परस्परांशी सूर जुळणाऱ्या अनोळखी व्यक्तींबरोबर करावे, जे अशा पर्यटनामुळे परस्परांचे मित्र बनतात आणि कायम स्मृती ठेवून जातात.
सियामरिपमध्ये प्रत्येक दिवस काहीतरी नवीन गोष्ट करण्यात जायचा. एके दिवशी स्लोव्होकियाच्या मुलीशी भेट झाली. तिला मी साडी नेसवून दिली. तिच्यामुळे आणखी काही विदेशी मुली भेटल्या. मी त्यांना बरोबर नेलेल्या विविधरंगी टिकल्या, बांगडय़ा भेट दिल्या. त्यांनी त्या आवडीने घातल्या. खुद्द कम्बोडियातल्या मुलींना मात्र चीन, भारत या देशांचं भारी आकर्षण. कारण याच देशांमध्ये आपल्याला चांगलं भवितव्य आहे अशी त्यांची ठाम समजूत आहे. खरं तर, त्या स्वयंसिद्ध आहेत. कमवतात आणि स्वत:चं पोट भरतात. अगदी छोटय़ा-छोटय़ा दुकानांपासून ते मॉल, हॉटेलांमध्येसुद्धा मुलीच काम करताना दिसतात. मी कोण? कशासाठी आले? याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतंच मुळी. मी त्यांना पुन्हा कधी भेटेन याचीही कल्पना नव्हती पण तरीही आमची मैत्री झाली. अगदी आजही त्या माझ्या संपर्कात असतात.
‘व्हॉलन्टिअर टुरिझम’साठी आवश्यक आहे धीटपणा, आत्मविश्वास, एखादं लक्ष्य ठरवून ते नेटाने पूर्ण करण्याची चिकाटी, विपर्यस्त परिस्थितीत तडजोड करण्याची तयारी आणि विचारांमधील स्पष्टता. हे गुण अंगी असतील तर अशा प्रकारच्या पर्यटनाचा तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता. भारतासह परदेशातही काही बिगर-सरकारी संस्था आहेत ज्या अशा पर्यटनाला प्रोत्साहन देतात. नेटसर्फिगमधून तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती मिळू शकते.
नियोजन कसे करायचे?
सर्वप्रथम आपण एखादा देश आणि तेथे उपलब्ध असलेल्या संधीसाठी किती वेळ देऊ शकतो? आपले छंद कोणते? आपल्यात कोणती कौशल्ये आहेत? हे कळले की प्रवासाची आखणी करणं सोपे जाईल. आपला व्यवसाय वा नोकरी सांभाळून, प्रकृतीला मानवेल यानुसार एखादं काम निवडायचं. लहान मुलांना शिकवणं आवडत असेल तर अनेक संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या सामाजिक कार्यात रस असेल, प्रशासकीय कार्याची आवड असेल वा वैद्यकीय सेवा देण्याची आवड असेल तर तशी सेवा देऊन तुम्ही पर्यटनाचीही मजा लुटू शकाल.
बजेट कसं ठरवायचं?
व्हॉलन्टिअर टुरिझमसाठी वयाचं बंधन नसतं, कोणतेही पर्यटन
स्थळ निवडण्याची मुभा असते. फक्त त्यासाठी किती खर्च येणार आहे, तो कसा करायचा, तेथे मोफत सेवा द्यायची की खर्चापुरते पैसे घ्यायचे वा त्याबदल्यात राहण्याची- खाण्याची सोय करून घ्यायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. एकूण खर्च आणि निधीची उपलब्धता त्यासाठी तुमचं बजेट निश्चित असायला हवं.
कार्यक्रम ठरविणे
अशा प्रकारच्या पर्यटनासाठी तुम्ही किती वेळ देऊ शकता, हे पाहून त्यानुसार पर्यटनाला निघण्यापूर्वीच कोणते काम करायचे हे ठरवा. तेथे गेल्यावर अर्धवेळ काम करणार की पूर्णवेळ, उर्वरित वेळेत की वीकएंडला पर्यटनाला जाणार हे ठरवून त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करावी लागणार. याशिवाय विदेशी भाषा, तेथील खाद्यपदार्थ, तेथील संस्कृतीशी जुळवून घेण्याची तयारी ठेवावी लागते. तडजोड करण्याच्या तयारीबरोबरच भावनेपेक्षा व्यवहार जपण्याची मानसिकता अंगी बाणवून घ्यावी लागेल. उदा. तेथे गेल्यावर एखाद्या विदेशी मुलगा वा मुलगीबरोबर रूम शेअर करण्याची, स्वत:चे जेवण स्वत: बनविण्याची, अस्वच्छ टॉयलेट्स वापरण्याची तयारी ठेवावी लागेल. त्याचबरोबर हे पर्यटन आपण एकटे करत आहोत याचे सतत भान ठेवावं लागेल. कोणत्याही क्षणी बेसावध राहता येणार नाही, हे जरूर ध्यानात घ्या. व्यक्तीव्यक्तींना याचे भिन्न भिन्न अनुभव येतात. म्हटले तर सगळंच ‘अभूतपूर्व’, म्हटलं तर पुन्हा कधीही जाणार नाही इतपत मानसिकता तयार होऊ शकते. प्रत्येकानं ठरवायचं साहसी, धाडसी पर्यटन करायचंय मग चला पुढे!
व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे. माझ्या या शैक्षणिक प्रवासात नेहमी ऐकायला मिळायचं की, भरपूर फिरा, फिरण्यामुळे त्या-त्या ठिकाणचे वास्तुस्थापत्य कला कळते. आपण ‘ऑफ-बीट’स्थळं बघितली की तेथील रस्ते, घरे कशी बांधली आहेत ते कळते. तेथील इतिहासप्रसिद्ध वास्तुशिल्प बघितली की, कॉलम, बीम कसे घेतले आहेत, मंदिरांची पुनर्बाधणी कशी केली आहे ते कळते. कम्बोडियातील भारतीय पुरातत्व विभागाचे काम खरोखरच चित्तवेधक आहे. खरं सांगू, म्हणूनच मी तिथे इतके दिवस राहिले.
इथल्या शाळेत शिकवता-शिकवता तेथील सुंदर शिल्प, वास्तुरचनेचे नमुने बघता बघता जितकी मी रोमारोमातून आनंदून गेले पण तितकीच इथल्या कोवळ्या मुलांचं भवितव्य काय या प्रश्नानं उद्विग्नही झाले. मी ज्या शाळेत शिकवायला जात होते तिथली काही लहान मुलं दु:खाचे कढ पिऊन पिऊन गलितगात्र झाल्यासारखी वाटत होती. त्यातील कोणी, युद्धात डोळ्यादेखत आई-वडिलांचा मृत्यू पाहिला आहे, कुणाचे हात वा पाय तुटले आहेत, एवढेच नव्हे तर आजही तिथे अनेक मुलं जन्मजात काही ना काही शारीरिक व्यंगं घेऊन जन्माला येतात, हे वास्तव हृदय पिळवटून टाकतं. ही मुलं-मुली आयुष्यात पुन्हा कदाचित भेटणारही नाहीत पण त्यांची निरागसता, असाहाय्यता मात्र मनावर कायमची कोरली गेली. भारतातही अशी मुलं नजरेसमोर येतात तेव्हा तेव्हा मला कम्बोडिया आठवतो.
बँकॉक आणि कम्बोडियातून बरोबर काय आणलं, असं जर कोणी विचारलं तर ट्रॅव्हल एजंटकडून झालेली फसवणूक, त्यांची लालसी वृत्ती, परदेशी मुलींनी ऐनवेळी दिलेला दगा पण त्याचबरोबर शाळेतील मुलांसाठी काही तरी योगदान दिल्याचा परमानंद आणि किथसारख्या गरीब, पण इमानदार टुकटुकवाल्यानं अडचणीत दिलेला मदतीचा हात या सर्व अनुभवांचं गाठोडं मी बरोबर आणलं आणि या गाठोडय़ातल्या एका खणात आहे थायलंडची झगझगीत डॉलरसंस्कृती तर दुसऱ्यात, निरपराध मुलांची असाहाय्यता आहे. त्याही परिस्थितीत आयुष्याला ठिगळं लावत त्यांचं केविलवाणं जगणं आणि तरीही उद्याकडे नजर लावून मनात आशेची ज्योत कायम तेवत ठेवणं या सर्व भावनांचा कल्लोळ सामावला आहे. त्यांच्या एका डोळ्यात कारुण्य आणि दुसऱ्या डोळ्यात अगदी सहज टिकवलेलं निरागस हास्य दोहोंनी जीवन सुंदर करण्याची ऊर्मी स्वत:मध्ये काही अंशी रुजवता आली तरी माझी भटकंती सार्थकी लागेल.
amruta.karkare@expressindia.com
payalbhosekar@gmail.com