अनेक थोर माणसांच्या, नामवंत व्यक्तींच्या मोठेपणाची मुळं त्यांच्या बालपणात रुजलेली असतात. त्यामागे असतात ते त्यांचे पालक, शिक्षक किंवा एखादी महनीय व्यक्ती. आपण जाणून घेऊ  अशाच काही थोरामोठय़ाचं बालपण. त्यातून ते कसे घडले हे तर कळेलच. शिवाय आजच्या पालकांसमोर तो आदर्श ठरू शकेल. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी.
अत्यंत तर्कसंगत विचार, स्पष्ट दृष्टिकोन आणि ध्येयनिष्ठ आचारप्रणाली यांचं मूíतमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. त्याची पाळंमुळं रुजली होती बालपणात. बालपणी स्वामी विवेकानंद अत्यंत उपद्व्यापी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या अखंड उद्योगांना त्यांची माता भुवनेश्वरीदेवी वैतागलेल्या असायच्या. अशाच वैतागलेल्या आणि कौतुकमिश्रित स्वरात भुवनेश्वरीदेवी म्हणायच्या, ‘‘मी भगवान शिवांकडे एक पुत्र मागितला होता, पण त्यांनी मला त्यांच्याकडच्या राक्षसांपकी एक राक्षस पाठवला!’’
विवेकानंदांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अस्तित्वावर त्यांच्या पालकांचा आणि त्यातही विशेषकरून त्यांच्या आईचा प्रभाव खूप होता. विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ यादिवशी त्यावेळच्या कलकत्ता इथं झाला. त्यांची आई शिवभक्त होती. ती त्यांना वीरेश्वर म्हणून हाक मारायची. त्यांचं खरं नाव नरेन्द्रनाथ दत्ता. त्यांचे वडील वकील होते आणि आई गृहिणी होती. ती धार्मिक वृत्तीची होती. तिचं गोरगरीबांच्या मदतीला धावत जाणं, परमेश्वराप्रती समर्पणवृत्ती, सांसारिक कर्तव्य पार पाडताना वृत्ती तटस्थ ठेवणं, यामुळे तिला समाजात आदराचं स्थान होतं. आईच्या गरीबांबद्दलच्या आस्थेमुळे, नरेन्द्रसुद्धा दारासमोर कुठलाही संन्यासी आला तरी हाताला जे काही सापडेल ते कसलाही विचार न करता त्याला ताबडतोब देऊन मोकळा व्हायचा.
भुवनेश्वरीदेवी नेहमी छोटय़ा नरेन्द्रला रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या. या गोष्टींचा आणि रामायणाचा पगडा छोटय़ा नरेन्द्रवर पडला होता. या गोष्टींचं त्याला खूप आकर्षण वाटायचं. याचबरोबरीनं, लवकरच इंग्लिश अक्षरांशी छोटय़ा नरेन्द्रची ओळख त्याची आई करून द्यायला लागली होती.  हळूहळू नरेन्द्रला वाचनाची आवड निर्माण व्हायला लागली होती. शालेय जीवनात, त्यांनी बंगाली आणि इंग्रजी साहित्यावरची अनेक पुस्तकं वाचली. त्यांची पुस्तकं वाचनाची शैलीही अजबच होती. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘पुस्तकातली ओळ न वाचताही मी लेखकाला समजू शकत होतो. परिच्छेदातली पहिली आणि शेवटची ओळ वाचून मला त्याचा अर्थ समजू शकत होता. नंतर माझ्या असं लक्षात आलं की एखाद्या पानावरच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ओळी वाचूनही मला त्या विषयाबद्दल कळायला लागलं होतं. त्यानंतर मी त्या लेखकाचा विचारप्रवाह केवळ त्यातल्या काही ओळी वाचूनच समजायला लागलो होतो, जरी त्यातला विषय मांडण्यासाठी त्या लेखकाला चारपाच पानं लागली असली तरीही.’’
एकदा छोटा नरेन्द्र शाळेतून नाराज होऊन घरी आला होता. त्याच्यावर शाळेत कुठल्यातरी बाबतीत अन्याय झाला होता. त्याच्या आईने त्यावेळी त्याला समजावून सांगितलं होतं, ‘‘बाळा, तू जर बरोबर आहेस तर तुला घाबरण्याचं काय कारण आहे? नेहमी सत्याची कास धर त्यासाठी परिणामांची पर्वा करू नकोस. खरं बोलण्यामुळे तुला त्रास होऊ शकतो किंवा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पण कितीही आणि काहीही झालं तरी खरं बोलणं सोडू नकोस.’’ अनेक वर्षांनी एका मोठय़ा सभेत विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले होतं, ‘‘आज जे काही ज्ञान मला प्राप्त झालं आहे त्यासाठी मी माझ्या आईचा ऋणी आहे.’’
विवेकानंदांच्या बालपणी त्यांच्यावर आईबरोबरच वडिलांचाही प्रभाव होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ होते. इंग्लिश तसेच पíशअन भाषेचं त्यांना अत्यंत सखोल ज्ञान होतं. मित्रमंडळी जमली की, ते नेहमी हाफिज़्‍ाचं काव्य आणि बायबलमधल्या श्लोकांचं पठण सादर करायचे.
 एके दिवशी नरेन्द्रचा आईशी वाद झाला. त्यावेळी तो आईशी उर्मटपणे बोलला होता. हे प्रकरण त्याच्या वडिलांच्या कानावर आलं. ते त्याला अजिबात ओरडले नाहीत, पण त्यांनी त्याच्या खोलीच्या दरवाज्यावर चारकोलच्या कांडीनं लिहिलं, ‘‘आज नरेन्द्र त्याच्या आईला म्हणाला, …’’ आणि पुढे त्याने वापरलेले शब्द लिहिले.  नरेन्द्र त्याच्या आईशी कशा उर्मटपणे बोलला होता ते त्याच्या मित्रांना कळावं हा त्यामागचा हेतू. आपली मुलं शिस्तीत वाढावीत, मुलं योग्य वळणात तसंच संस्कारात वाढावीत याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
 वळण लावत असताना मात्र आपलं सांगणं नरेन्द्पर्यंत परिणामकतेने कसं पोचेल यावरही त्यांचा विचार असायचा. एकदा नरेन्द्रने गुर्मीतच त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही माझ्यासाठी काय केलंय?’’ यावर न चिडता, शांतपणे त्यांनी म्हटलं, ‘‘ते तू आरशात जाऊन बघ म्हणजे तुला उत्तर मिळेल.’’ एक दिवस नरेन्द्रने, ‘‘जगात मी कसं वागायचं?’’ यावर त्यांना सल्ला विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिले,‘‘जगात वावरताना कशाबद्दलही आश्चर्य व्यक्त करू नकोस.’’
विवेकानंदांना या उत्तराचा प्रत्यय त्यांच्या पुढच्या आयुष्यात सतत येत गेला. २५ फेब्रुवारी १८८४ रोजी त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला.
त्यांच्या आईंच्या शिकवणुकीमुळे त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आपले विचार मांडण्यासाठी एक पाया मिळाला. त्यांच्या घरातल्या सहिष्णू वातावरणामुळे, त्यांना आपल्या तसंच इतर धर्मातील आचार विचार, रूढी, प्रथा यांचा सांगोपांग विचार करता आला. त्यावर ते अधिकारवाणीने बोलत असत. त्यांचं वक्तृत्व संमोहक होतं, याचा प्रत्यय त्यांच्या शैक्षणिक जीवनात आलाच होता, पण त्याचा प्रकर्षांनं प्रत्यय आला तो अमेरिका इथे आयोजित सर्वधर्म परिषदेमध्ये. ‘‘माझ्या बंधू आणि भगिनींनो ..’’ या संबोधनानंतर त्यांनी जगाला आपल्या वाणीने अक्षरश: मंत्रमुग्ध केलं. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलला.
भुवनेश्वरीदेवींच्या एका ‘राक्षसा’चं परिवर्तन एका महान तत्त्ववेत्यामध्ये जाणीवनेणीवेतून झालं. बाल नरेन्द्र, बालपणातील पूरक आणि पोषक वातावरणामुळे, मोठेपणी स्वामी विवेकानंद या रूपात जगासमोर, स्वधर्माचं प्रतिनिधित्व समर्थपणे करू शकला.