मनात उमटणारे विचारतरंग कागदावर उमटावेत. आपल्या हातूनही लेखन व्हावं, ते सगळ्यांनी वाचावं अशी अनेकींची इच्छा असते मात्र ती प्रत्यक्षात उतरतेच असं नाही. मनाची सेन्सॉरशिपच अनेकदा या विचारांना मनातच थांबवते, म्हणूनच या स्त्रियांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळे’चं आयोजन नुकतंच नागपूरमध्ये करण्यात आलं होतं.
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यशाळेविषयी..
अनेकींना लिहायला मनापासून आवडतं.. किंबहुना आपल्या मनातल्या भावना, विचार शब्दबद्ध करावेत, त्यांना वाचक मिळावेत, आपले विचार, आपले लेखन लोकांनाही आवडावं, त्यावर चर्चाही व्हावी, अशी अनेकींची इच्छा असते, पण.. हा पणच आडवा येतो. लिहित्या स्त्रीचा हात अनेक ठिकाणी अडखळतो. कसं लिहायचं, नेमकं काय लिहायचं, आपण लिहू ते बरोबरच कशावरून, बरोबर असलं तरी छापणार कोण, अशी स्वत:चीच स्वत:वर लादलेली सेन्सॉरशिप कितीदा तरी या लिहित्या स्त्रियांचे शब्द डोक्यातच जिरवून टाकते आणि लिहायचं राहूनच जातं. कधी अर्धवट लिहिलेलं डायरीत तसंच राहतं. कधी गादीच्या खाली तर कधी भितींच्या कपारीत पुंगळ्या केलेले कागद वर्षांनुर्वष पडून राहतात..
 त्या लिहू इच्छिणाऱ्या, लिहित्या लेखिकांसाठी एक कार्यशाळा नुकतीच नागपूरमध्ये पार पडली. ‘लिहित्या स्त्रियांची कार्यशाळा’ या नावाने. खरं तर ही कार्यशाळा अशी नव्हतीच, ते होतं विविध ठिकाणच्या स्त्रियांना जोडणारं महत्त्वाचं व्यासपीठ. यासाठी नागपूर आणि लगतच्या गावातून अनेक जणी यासाठी उपस्थित होत्याच, पण त्याचबरोबर कोल्हापूर, दिग्रस, वर्धा, वाशिम इथूनही अनेक जणी आल्या होत्या.
 या कार्यशाळेची मूळ संकल्पना ‘आकांक्षा’ मासिकाच्या प्रकाशक अरुणा सबाने यांची होती. ती सर्वानाच ‘क्लिक’ झाली आणि सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ साहित्यप्रेमी स्त्रिया कामाला लागल्या. नागपूरच्या ‘आकांक्षा प्रकाशन’ आणि ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या विभागीय केंद्राच्या एकत्रित प्रयत्नांतून संपन्न झालेल्या या लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळेसाठी सर्वानीच घरातल्या लग्नसोहळ्याप्रमाणे साहित्यसेवेत झोकून देऊन निखळ आनंद मिळवला. यासाठी ना वयाची अट होती, ना अन्य कसली. त्यामुळे केवळ पाच-पन्नास कशा तरी गोळा होतील असं वाटत असतानाच पहिल्या दिवशीच सभागृह संपूर्ण भरलं होतं. आणि ते दुसऱ्या दिवशीही कायम होतं..
 या लिहित्या स्त्रीच्या कार्यशाळेची संकल्पना प्रसिद्ध कादंबरीकार आशा बगे यांनी उलगडून दाखवली. मोजकं बोलणाऱ्या आशाताईंची कळी त्या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमात चांगलीच खुलली.  ‘‘ या कार्यशाळेने लिहित्या स्त्रियांच्या सुप्त गुणांना चालना देण्याची महत् जबाबदारी पार पाडली.’’ असं सांगून, जुन्या पिढीतील अनेक स्त्रियांची, ज्यांनी प्रत्यक्ष नसेल लिहिलं, पण ज्यांच्यात लिहिण्याची ऊर्मी होती, प्रचंड ऊर्जा होती. खूप सारं लिहायचं होतं, स्वत:च्या स्वानुभावातून व्यक्त व्हायचं होतं. अक्षरज्ञान नसल्याने लिहायचं राहून गेलं. केवळ मौखिकरीत्या ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मुखोद्गत झालं. अशा अक्षररूप देऊ न शकलेल्या अनेकींची उदाहरणे त्यांनी दिली. स्पर्धाविरहित आणि प्रत्येकीच्या विचारांना अवकाश मिळवून देणारी लिहित्या स्त्रियांची कार्यशाळा असा उल्लेखही त्यांनी केला.
स्त्रियांना कादंबरी, कथा, कविता, नाटकाचं तंत्र सांगून स्त्रियांना एकदम लिहिण्यासाठी तयार करायचं असा कार्यशाळेचा हेतू नव्हता. स्त्रियांनी व्यक्त व्हावं, स्वत:मधल्या लिखाणाच्या गुणाला नीट पारखावं, हा एक प्रमुख संदर्भ त्यामागं होता. हे त्यांचं व्यक्त होणं विविध रूपात व्यक्त झालं. म्हणजे एकमेकींची ओळख करून देण्यातून, कवितेच्या सादरीकरणातून, संचालन व स्वागत करण्यातून आत्मविश्वास मिळवलेल्या स्त्रिया सुखावलेल्या दिसल्या.
चार भिंतींच्या बाहेर फारशा न पडलेल्या किंवा फार मर्यादित अवकाशात जगणाऱ्या या स्त्रियांना एका मोठय़ा व्यासपीठावरून भवताल पाहता आलं. स्वत:ला ओळखता आलं. त्यांच्यापेक्षा प्रतिभेनं मोठय़ा असलेल्या स्त्रियांचं मोठेपण अनुभवता आलं. स्वत:चं सुख-दु:ख मांडता आलं. हसता-खिदळता आलं आणि प्रतिभेच्या सान्निध्यात राहून समृद्धही होता आलं.  हे दोन दिवस या स्त्रिया आपल्या साहित्यिक जगणं अक्षरश: जगल्या. पण काही हिरमुसल्याही. अनेक कवयित्रींना कविता सादरीकरणाचा आनंद वेळेअभावी उपभोगता आला नाही. त्याची एक लटकी खंत त्यांना आणि आयोजनकर्त्यांनाही राहिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीही तेवढय़ाच स्त्रियांनी आणि तीही वेळेवर हजेरी लावणं म्हणजे या स्त्रियांना ही कार्यशाळा प्रचंड आवडल्याची पावतीच होती. ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. कुमुद पावडे, अभ्यासक डॉ. जया द्वादशीवारांनी परखड मतं व्यक्त करून  स्त्रियांनी कोषातून बाहेर पडण्याचं आवाहन केलं. प्रभा गणोरकर म्हणाल्या, ‘‘केवळ गोंजारण्याने खूश न राहता घडण्याचे व घडवण्याचे हे दिवस आहेत. त्यामुळे भावभावनांच्या कोषातच फक्त रमून राहू नका,’’ डॉ. कुमुद पावडे म्हणाल्या, ‘‘वाङ्मयविश्वाने दखल घ्यावी, असं आपलं लिखाण असावं. स्वान्त्य सुखाय लिहायचं की लिहिण्यातून व्यक्त होऊन स्वत:ची नाळ दुसऱ्या व्यक्तीशी जोडायची, हे आपलं आपणच ठरवण्याबरोबरच त्यासाठीचा अभ्यास, दुसऱ्या लेखकांचं वाचणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या वेळी डॉ. अलका गायकवाड, डॉ. निशा शेंडे, डॉ. संध्या अमृते, डॉ. अलका देशमुख आणि ज्योती पुजारी आदींची भाषणं स्त्रियांकडून विशेष नावाजली गेली. आणि स्त्रियाचं स्वत:ला अभिव्यक्त करण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
या दोन दिवसांच्या कार्यशाळेने अनेकींना आपल्या आयुष्यात एक नवं वळण दिलं, साहित्याचं एक नवं दालन उघडून दिलं..
कार्यशाळेच्या उद्घाटक कवयित्री नीरजा यांनी आपली एक वास्तवदर्शी कविता म्हणून दाखवली, त्याप्रमाणे ही कार्यशाळाही या लिहित्या स्त्रियांसाठी ‘दुसरा घरोबा’च ठरली. आपल्या आयुष्याशी या कवितेला जोडत सर्वानी या कार्यशाळेचा निरोप घेतला, ती ही कविता,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरगच्च हिंदकळणारा बायकांचा डबा
श्वासात मिसळताना अनेक श्वास
ऐकू येतात एकमेकींच्या काळजाची स्पंदनं..
तयार करतात इथंच त्यांचं छोटंसं कुटुंब
पुरुषांशिवायचं;
वाटून घेतात तिखट गोड क्षण.
खिदळतात
उधळतात
दावं सुटलेल्या गायीसारख्या..
..दुसऱ्या दिवशीची स्वप्नं स्वत: डोळ्यात साठवत
बायका उतरतात गच्च भरलेल्या डब्यातून
शेवटच्या स्टेशनावर तर संपून जातो
त्यांचा इवलासा संसार.
आपल्या हातानं बंद करून दार
या हव्याहव्याशा घराचं
त्या प्रवेशतात त्यांच्या पुरुषाच्या घरात
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या हास्याचा
अर्थ लागत नाही त्यांच्या पुरुषांना
आणि बायकांनाही नाही सांगावंसं वाटत काही
या दुसऱ्या घरोब्याविषयी.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women start writing workshop of lihitya striyanchi karyashala in nagpur
First published on: 26-01-2013 at 01:02 IST