आपली माणसं म्हटली की, राग-लोभ, दुखणं-दुखावणंही अपरिहार्यपणे येतंच, कधी नकळत, तर कधी अगदी जाणीवपूर्वक. मात्र तिथेच थांबून समोरच्याला आणि बऱ्याचदा आपल्यालाच त्याची शिक्षा द्यायची की तटस्थपणे त्या घटनेचा अर्थ लावायचा? खरं तर क्षमेच्या अलीकडे राहायचं की पलीकडे जायचं, हे ठरवण्याचं परिपक्व भानच नात्याला खरा अर्थ देत असतो. ‘जागतिक क्षमा दिना’निमित्त (७ जुलै) खास लेख.
अपराध-शिक्षा-प्रेम
‘‘आमच्या आजोबांच्या करारीपणाचे खूप किस्से आहेत श्रुती. एकदा त्यांची धाकटी बहीण, माझी आत्याआजी त्यांना काही तरी बोलली, त्याने ते खूप दुखावले. इतके की, लाडक्या बहिणीशी त्या क्षणापासून त्यांनी जे बोलणं सोडलं ते शेवटपर्यंत. आत्याआजीनं शंभरदा माफी मागितली. ‘माझं चुकलं दादा, माफ कर’ हे शब्दांतून, कृतीतून म्हणत राहिली. नातलगांना मध्यस्थी घातलं, पण अशा मध्यस्थाकडे हे इतकं दुर्लक्ष करायचे की बिचारा अवघडून चूप व्हायचा. शेवटच्या आजारात आत्याजीनं ‘मला शेवटचं भेटून जा’ म्हणून निरोप पाठवला, तरीही आजोबा गेले नाहीत. बिचारी त्यांचं नाव घेत गेली. ती गेल्यानंतर मात्र आजोबा अबोल झाले. असं सांगतात, नंतर त्यांनी तिच्या नावाने भरपूर देणग्या दिल्या, पण ‘मी तिच्याशी बोलायला हवं होतं,’ असं मात्र त्यांच्या तोंडातून कधी निघालं नाही. पूर्वीच्या लोकांचा पीळच वेगळा.’’ आदित्य त्याच्या आजोबांबद्दल श्रुतीला सांगत होता. त्यांचं हल्लीच लग्न झालं होतं. गप्पांमध्ये कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण चालू असायची.

‘‘सख्खी बहीण गेली तरी पीळ सुटला नाही हे तुला करारी आणि भारी वाटतं?’’ श्रुती बोलून गेली.

‘‘तसं नाही गं, मला त्यांचं वागणं उमजत नाही. मी त्यांना पाहिलं नाही, पण आजोबांच्या करारी, पीळदारपणासोबत त्यांचं प्रसंगावधान, धाडसीपणा, भावंडांची, घराची एकहाती जबाबदारी घेणं. अशा चांगुलपणाच्याही कहाण्या आहेत. त्या ऐकल्यावर फार आदर वाटतो त्यांच्याबद्दल. आत्याजीला घरातले ‘बिचारी’ म्हणतात, पण ‘ती तेव्हा थोरल्या भावाला खूप दुखावण्यासारखंच बोलली.’ असंही म्हणतात. आजोबांचं चुकलं असं स्पष्टपणे कुणी म्हणत नाही. त्यामुळे, ‘पीळ असणं हाच पुरुषार्थ, नाहीतर तो माणूस पुळचट’ असं मला लहानपणी खूप वर्षं वाटायचं. कुणाचा राग आला की त्याच्याशी बरेच दिवस न बोलणं आमच्या घरात अजूनही घडतं.’’

‘‘तू सुद्धा रागावल्यावर अबोला धरतोस? मला नाही हं झेपणार आदी.’’ श्रुती धसकून म्हणाली.

‘‘लहानपणी करायचो तसं. आता कधीच नाही. मोठेपणी माझा स्वत:चा विचार सुरू झाल्यावर आत्याजीबद्दल वाईट वाटायला लागलं. एखाद्यानं आपल्याला दुखावल्यावर आपण न्यायाधीश असल्यासारखं वागायचं आणि शिक्षा म्हणून अनेक दिवस, वर्षं अबोला धरायचा हे मला कधीच पटलं नाही.’’
‘‘सख्ख्या बहिणीच्या तोंडून एकदाच निघून गेलेल्या एका वाक्याची एवढी मोठी शिक्षा? आत्याजी आयुष्यभर मनात अपराधीभाव घेऊन भावाच्या एका शब्दासाठी वाट पाहत राहिली. कल्पनेनंही कसं तरी होतं.’’ श्रुतीला सहनच होईना.

‘‘आजोबांच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा मी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा वाटतं, लाडक्या बहिणीवर मरेपर्यंत आकस धरताना त्या काळातला कुटुंबप्रमुख – पुरुषार्थाचा अहं (इगो) वरचढ झाला असावा. जितकं जास्त प्रेम, तितकं दुखणं जास्त असतं हे खरं. पण काही काळाने त्यांना बहिणीशी बोलावंसं वाटलं असेल, माफ करावंसं वाटलं असेल तेव्हा स्वत:चीच पोलादी पुरुषांची ‘इमेज’ मध्ये आली…कदाचित आत्याजी अशी अचानक जाईल असं त्यांना वाटलं नसेल. त्या काळात फारसे फोनही नव्हते. कदाचित निरोप उशिरा मिळाला असेल. नंतर मनाची तयारी करून निघेपर्यंत उशीर झाला असेल…कोण जाणे. आत्याजी गेल्यानंतरचं आजोबांचं कायमचं अबोल होणं आणि तिच्या नावानं देणग्या देणं हे मला पश्चात्ताप किंवा प्रायश्चित्तासारखं वाटतं. पण त्याचा काय उपयोग गं? आपला ‘अहं’ वरचढ न होण्यासाठी, क्षमाशीलता वर येण्यासाठी प्रेम जागं हवं, जाणिवेनं जागं करता यायला हवं एवढं मी नक्की कायमसाठी शिकलोय यातून.’’

‘‘खरंय, गोष्टी घडणं न घडणं आपल्या हातात नसतं, पण त्यातून काय शिकायचं याची निवड नक्कीच ठरवू शकतो आपण.’’ आदित्यचा हात हलकेच धरत श्रुती म्हणाली.

फसवणूक-सूड-सृजन

अक्षराच्या चित्रपटाला आज सर्वोत्कृष्ट कथा-पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. गेल्या सात वर्षांच्या तिच्या कष्टांना आज खरी ओळख मिळाली असं तिला वाटलं. लहानपणीपासून तिला लिखाणाची आवड होती. बरीच बक्षीसंही मिळायची. पण सोसायटीतल्याच ‘शाश्वत’च्या प्रेमात पडली, लग्न झालं. अनेक मुलींसारखं स्वत:च्या आवडी बाजूला ठेवून तिने संसारात स्वत:ला झोकून दिलं. पुढची पाच-सहा वर्षं घरच्या जबाबदाऱ्या, सासू-सासरे, शाश्वतच्या कार्यालयासाठी लागेल ती मदत यात ती रमून गेली. पुढे हळूहळू शाश्वतच्या आर्थिक गडबडी, कर्ज, फसवेगिरी हे बँकांचे फोन, वसुली, धमक्या विविध मार्गांनी तिच्यापर्यंत पोहोचलं. त्यामागोमाग हलक्या पावलांनी व्यसनं आली. आजपर्यंत लाडाकोडात, सुरक्षित वाढलेल्या तिला कधीही न पाहिलेली जगण्याची वेगळी बाजू दिसली. त्याच दरम्यान तिचं गर्भार राहणं, शाश्वतचं एक प्रेम प्रकरण उघडकीस येणं.. असंख्य वाद, भांडणं… एका वादानंतरच्या हातापायीत झालेला तिचा गर्भपात… त्यानंतरच्या कोर्टकचेऱ्या, घटस्फोट सगळंच खूप असह्य होतं. अक्षरा विलक्षण खचली. या काळात तिच्या सोबत होते ते आई-बाबा आणि सखी, तिची जिवलग मैत्रीण. पुढची दोनेक वर्षं तरी तिच्या मनातला, बोलण्यातला शाश्वतबद्दलचा तळतळाट, सुडाची भावना संपत नव्हती. ते न पाहवून घरचे समजवायचे, ‘‘आता सोडून दे गं. घडलेलं कशानेच बदलणार नाहीये. त्याला माफ कर, तुझ्या मनाचा त्रास तरी थांबेल, मोकळी होऊन नव्याने सुरुवात कर.’’ पण अक्षराच्या मनातल्या फसवणुकीच्या भावनेला ‘क्लोजर’ वा पूर्तता मिळत नव्हती. एकेक प्रसंग आठवून संतापाचे, सुडाचे संवाद मनात धुमसत असायचे. त्या दरम्यान बदल म्हणून तिनं एका पटकथा लेखनाच्या कार्यशाळेत भाग घेतला. त्यामुळे लिहायची ऊर्मी जागी झाली. मनातला कल्लोळ वेगळं रूप घेऊन कागदावर उतरला. त्यानंतर ती लिहीतच राहिली.

मन शांत होता होता लिखाणाचा पोतही बदलला. परिपक्वता आली. हळूहळू लेखिका म्हणून ती नावारूपाला आली. एकदा तिच्या कथेवर चित्रपट करण्यासाठी एका दिग्दर्शकाने परवानगी मागितली, तिच्यासाठी एक नवीन दार उघडलं. पटकथेच्या टीमसोबत चर्चा करताना कथेतली पात्रे वास्तववादी असणं, भूमिकांचा चढता-उतरता आलेख, पूर्ण काळ्या किंवा पांढऱ्या रंगातली टोकाची पात्रं टाळून त्यांना मानवी चेहरा देण्यासाठी इतरांकडून आलेल्या अनेक सूचनांमधून माणसांच्या स्वभावाचे कंगोरे उलगडत गेले, तशीच ती स्वत:लाही उलगडत गेली. त्यातूनच कधी तरी शाश्वतचा स्वभावही तिला त्रयस्थपणे उलगडला. शाश्वत जसा होता तसाच होता, आपण ओळखायला कमी पडलो हेही समजलं. त्यासोबत मनाची तडफड, कडवटपणा संपत गेले. गोष्टींकडे बघण्याची तिची नजरच बदलली. त्यानंतर आणखी कामे येत गेली आणि आज या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कथा-पटकथेचा सन्मान तिला मिळाला होता.

‘‘मनापासून आनंदी आहेस ना अक्षरा? आता तरी शाश्वतला माफ करणं जमेल? भूतकाळातून मुक्त व्हायला हवं गं.’’ सखीनं विचारलं.

‘‘खरं सांगू का सखी, आता या कशाची आवश्यकताच वाटत नाही. फसवणूक, संताप, सूड, माफ करणं या सगळ्याला ओलांडून पुढे गेलेय मी. उलट आज शाश्वतचे आभारच मानावेसे वाटतात. त्यानं दिलेल्या अनुभवामुळे माझ्यातल्या सुप्त क्षमता बाहेर पडल्या, चहूबाजूंनी वाढता आलं. फसवणुकीच्या दु:खात अडकून गुदमरण्याऐवजी त्यातून शिकले, सुडाऐवजी सर्जनाचा ‘चॉइस’ जमला. तेव्हा क्षमेच्याही पलीकडे पोचता आलं, हे समजतंय आता.’’ अक्षरा समाधानाने म्हणाली.

जबाबदारी-मर्यादा-स्वत:ला क्षमा

विश्वेश एक आदर्शवादी तरुण इंजिनीयर. जवळच्या सर्व लोकांचं भलं होणं ही स्वत:चीच जबाबदारी वाटायची त्याला. वर्गातल्या राहुलशी त्याची मैत्रीही यातूनच झालेली. राहुलच्या अभ्यासातल्या शंका सोडवताना, याला काहीच येत नाहीये, तो नापास होईल असं लक्षात येताच विश्वेशने स्वभावाप्रमाणे राहुलचं पालकत्व घेतलं. अभ्यास, प्रकल्प, परीक्षा सगळीकडे विश्वेशचा आधार घेतच राहुल पास झाला. पुढे विश्वेशच्या कंपनीत त्याच्या मध्यस्थीनेच राहुलला नोकरी लागली, मदतीचा सिलसिला चालू राहिला. राहुलचं परावलंबी असणं विश्वेशला आवडायचं नाही, अनेकदा तो मदत करायला नाकारायचा पण बहुतेकदा राहुलचं नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी मदतीचा हात पुढे करायचाच.

एकदा स्वत:च्या प्रोजेक्टचं काम गळ्याशी आलेलं असल्यामुळे त्याने राहुलला अपेक्षित मदत केली नाही. दुर्दैवाने त्याचे फारच विपरीत परिणाम झाले. राहुलला नोकरी गमवावी लागली. त्याच वेळी काही कारणाने राहुलच्या भावाचीही नोकरी गेली, आईला गंभीर आजारपण येऊन कर्ज झालं आणि त्यातच आईचं निधन झालं. राहुलचं घर पूर्ण विस्कटलं. ‘‘तू थोडी मदत केली असतीस तर माझा जॉब गेला नसता.’’असं ऐकवून विश्वेशवर सगळ्या परिस्थितीचा दोष टाकून राहुलने त्याच्याशी असलेले सारे संबंध संपवले. विश्वेशने देऊ केलेली आर्थिक मदतही नाकारली.

कालांतराने राहुलने कष्ट करून कुटुंबाची परिस्थिती सावरली, पण ‘जे घडलं ते माझ्याचमुळे, मी चांगला माणूस नाही, मी राहुलचा अपराधी आहे,’ असं विश्वेशच्या मनानं धरलं ते कायमचं. त्यामुळे कितीही आनंदाची घटना घडली, तरी पुढच्याच क्षणी राहुलची आठवण येऊन तो दु:खी व्हायचा.

एकदा विश्वेशला ऑफिसमधून उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. त्याचा सहकारी अंकुश अभिनंदन करायला लागला तेव्हा विश्वेश म्हणाला, ‘‘राहुलची नोकरी माझ्यामुळे गेली असताना या पुरस्काराचा मला आनंद कसा वाटेल?’’ विश्वेशची ‘मेंटॉरगिरी’ आणि राहुलचं परावलंबित्व दोन्ही अंकुशला माहीत होतं. तो म्हणाला, ‘‘विश्वेश, राहुलचं जे झालं ते वाईटच घडलं, पण इतके महिने झाले तरी तू स्वत:ला माफ करायलाच तयार नाहीस. सगळं तुझ्यामुळेच घडलं असं जबाबदार कसं धरू शकतोस तू स्वत:ला? यात तुझी नेमकी जबाबदारी काय होती सांग बरं.’’

‘‘मी त्याला इतकी वर्षं मदत केली, पण नेमक्या वेळी मित्र कर्तव्याला कमी पडलो…’’

‘‘तेव्हा तू स्वत:चा प्रोजेक्ट पूर्ण करण्याला महत्त्व दिलं नसतंस, तर कदाचित तुझी नोकरी गेली असती. महाविद्यालयापासून तू मदत करत होतास, राहुलची शिकण्याची जिद्द कमी पडली. तुझ्या मदतीने त्याला वेळोवेळी वाचवलं, नाही तर यापूर्वीच नोकरी गमावली असती त्यानं. आयुष्यभर राहुलचं पालकत्व निभावेन असं वचन दिलंयस का तू कुणाला?’’

‘‘अरे, पण त्याच्या अडचणी केवढ्या वाढल्या…भावाचीही नोकरी, आईसुद्धा…’’

‘‘त्यासाठी पण तू स्वत:ला जबाबदार धरतोयस का? एवढं सगळं तुझ्यामुळे घडलं, म्हणजे तर तू स्वत:ला परमेश्वर समजायला लागलास.’’ अंकुश म्हणाला तसा विश्वेश गप्पच झाला.

‘‘विश्वेश, आपण राहुलला तेव्हा मदत करायला हवी होती असं आता वाटणं स्वाभाविक आहे, पण इतकं विपरीत घडेल हे तुला तेव्हा माहीत होतं का? जीवन-मरण असंही कुणाच्या हातात नसतं पण प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वत:चीच ठरवून अपराधीभावात तळमळत राहणं ही तू स्वत:ला नेमकी कुठल्या गुन्ह्याची शिक्षा देतो आहेस? घर विस्कटत असूनही तुझी मदत राहुलने नाकारली. यात त्याचीही जबाबदारी येते. खरं तर तुझी मदत नाकारल्यावर आज राहुल स्वत:च्या जीवावर उभा आहे हे मला महत्त्वाचं वाटतं. ‘मेंटॉरगिरी’पर्यंत ठीक आहे. पण त्या ओघात स्वत:ला गुन्हेगार ठरवून जगायचं की, आपली नेमकी जबाबदारी समजून घेऊन स्वत:ला माफ करायचं? हे तू ठरवायचं आहेस भावा. तर, पुरस्काराबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.’’ आपला हात पुढे करत अंकुश म्हणाला.

‘‘धन्यवाद अंकुश. नवीन दृष्टिकोन दिलास. राहुलला मदत करताना हेतू चांगलाच होता माझा. पण कदाचित योग्य वेळी ठामपणे थांबून त्याला स्वावलंबी व्हायला भाग पाडलं नाही, एवढीच माझी जबाबदारी असेल यात. यापुढे मात्र ‘मेंटॉरगिरी’ करताना मधली रेष ठरवून घ्यायची एवढं शिकतोय मी यातून.’’ विश्वेश शांत होत म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

neelima.kirane1@gmail.com