‘‘एकेकाळी प्रेमात पडून लग्न केलेल्या कित्येक जोडप्यांमध्ये नात्याचा ओलावा कायम टिकत नाही. ‘मी प्रेम केलं ती व्यक्ती ही नाहीच,’ इथपर्यंतही गोष्टी बिघडतात. अशा वेळी कुणाला दोष द्यायचा?.. बलराज आणि अमृताचं नातं बिघडताना आणि पूर्णत: शुष्क होताना मी पाहिलं होतं. उतारवयात मात्र दोघंही एकटे होते.. हरवलेले. ‘जिंदगी के सफर में’ आलेल्या या ‘मकाम’वर दोघं आपले ‘इगो’ बाजूला सारू शकतील का?..’’
आज जवळपास वीसेक वर्षांनी बलराज भेटणार होता. माझ्या मित्राच्या मुलानं लिहिलेल्या ‘स्ट्रक्चरल इंजिनीयिरग’च्या पुस्तक प्रकाशनासाठी तो येणार होता. बलराजशी असलेल्या दोस्तीमुळे, त्याला ‘अटेंड’ करण्याचं काम त्या दिवशी माझ्याकडे होतं. प्रवेशद्वारावर स्वागत करताना मला पाहिल्यावर बलराजचे डोळे विस्फारले..
‘‘ओ हो हो हो.. तू यहाँ कैसे? किती बदललायस.. सिरका पूरा चांदी हो गया रे!’’
‘‘और तुम्हारा पूनम का चाँद!’’
यावर तो खळाळून हसला. पूर्वीसारखाच! बलराज तसा फारसा बदलला नव्हता. मूळची पंजाबी शरीरयष्टी तशीच ताठ. शिक्षण कॉन्व्हेंटमधलं, तरी पुण्यात जन्म गेल्यामुळे मराठी चांगलं बोलायचा. वडिलांनी सुरू केलेल्या बांधकाम व्यवसायात असणाऱ्या बलराजला मुळात ‘फाइन आर्टस्’ला जायचं होतं. मनाविरुद्ध सिव्हिल इंजिनीयिरगला जावं लागलं. शेवटच्या वर्षांला असताना वडिलांची तब्येत अचानक खालावल्यामुळे कशीबशी डिग्री मिळवून थेट व्यवसायात शिरला. इंजिनीयिरगचं व्यावहारिक ज्ञान अफाट. कामाच्या बाबतीत कडक शिस्त. डायरीमध्ये लिहिलेली दिवसाची कामं पार पाडताना एखादं काम राहिल्यास त्याची नोंद उद्याच्या पानावर व्हायची. प्रोजेक्टची डेडलाइन गाठायचीच!
आमची मैत्री व्यवसायातूनच झालेली. वीस वर्षांपूर्वी त्याच्याबरोबर पुण्यात आणि आसपास भरपूर काम केलं होतं. कधी रात्री त्याच्या घरी जेवायला बोलवायचा. स्वयंपाकी निघून गेलेला असायचा. बायकोशी-अमृताशी एकदा ओळख करून दिली, तेवढीच. मुलं शिक्षणासाठी पाचगणीला. रात्री बारा वाजेपर्यंत गप्पा झाल्यावर बलराज स्वत: गाडीनं घरी सोडायला यायचा. एरवी बऱ्याचदा मध्यरात्रीपर्यंत कॅनव्हासवर पेंटिंग करत बसायचा. ‘तुला झोप कशी नाही येत रे?’ विचारल्यावर हसून सुरात म्हणाला, ‘‘जब जाग उठे अरमान, तो कैसे नींद आए!’’ तो आणि अमृता एकाच बंगल्यात, पण दोन दिशांना, वेगळय़ा खोल्यांत राहायचे. अलग अलग!
त्याच्या पेंटिंग्जची तो अधनंमधनं प्रदर्शनं भरवायचा. विक्रीची रक्कम गरिबांच्या ‘हियिरग-एड’साठी, ‘आय कॅम्प’साठी हॉस्पिटल्सना द्यायचा. व्यवसायातल्या फायद्यातून शैक्षणिक संस्थांना मदत करायचा. गेली वीसएक वर्ष एकत्र काम नसल्यामुळे आमच्या भेटीगाठी जवळजवळ नाहीच झाल्या. फोन क्वचित व्हायचा, त्यामुळे मुलं अमेरिकेत शिकत असल्याचं माहिती होतं.
प्रकाशन सोहळा संपून गर्दी पांगल्यावर डीनरसाठी दोघांनी कोपऱ्यातलं निवांत टेबल पकडलं. ‘‘बीस साल हो गये, यार! वो गाना हैं ना.. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते.. ‘समय’ निकल जाने के बाद मालूम पडता हैं!’’ तो म्हणाला.
‘‘एक पेंटिंग बनाओ ‘समय’ पर..’’
‘‘समय किसने देखा हैं.. पेंटिंग कैसे करे?’’
‘‘कुछ भी करो, अॅब्सस्ट्रॅक्ट.. जो समझेगा नही, पर पैसा अच्छा मिलेगा!’’
‘‘फिरकी लेताय? तू नहीं बदला..’’
‘‘तू कुठे बदललायस! अजून एकटाच आहेस?’’
‘‘एकटेपणाची आदत झालीय.. आता सोबत नकोशी वाटते! क्राऊडमध्ये मी जायचं टाळतो. आज ज्याचं प्रकाशन झालं तो इंजिनीयर लेखक सुरुवातीला दोन वर्ष माझ्याकडे होता. बाद में आगे सीखने को फॉरिन गया. बरसों बाद मिला, गलेही पडा, की सर, किताब का ओपनिंग करो! आना पडा. वो सब छोडो. तुम्ही घरी सगळे कसे आहात?’’
‘‘आमचं काय.. टिपिकल मिडलक्लास लाईफ!
तुझं सांग.’’
‘‘ये क्लासवास बकवास हैं. क्लास कोई भी हो, ‘आदमी’ वोही हैं, ‘इगो’भी वोही है! परिस्थिती आदमी को बनाती हैं, इगो बिगाडता हैं!’’ त्यानं माझा प्रश्न टाळला.
‘‘साहिल आणि सिमरन आता इथेच असतात ना?’’
‘‘नाही. दोघंही यूएसला. एज्युकेशनची कुणावरही जबरदस्ती नाही केली. जो दिल में हैं वोही करो, नहीं तो मेरे जैसा हाल होगा! त्यांचं फील्ड त्यांनी निवडलं. साहिल रोबोटिक्समध्ये आहे, न्यू-जर्सीला. सिमरन कॉम्प्यूटर ग्राफिक्समध्ये, लॉस अॅन्जेलिसला.’’
‘‘म्हणजे तिथेही दोघं दोन दिशांना!’’ त्यावर अर्थपूर्ण हसत म्हणाला, ‘‘सो व्हॉट? दोघांचीही लग्न झालीत. दर वर्षी जातो, सिमरनकडे पंधरा दिवस, साहिलकडे पंधरा दिवस राहतो. मग मात्र कंटाळा येतो. ते त्यांच्या कामावर जातात गाडय़ा घेऊन. मी घरात अडकून बसतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट ना के बराबर! मी आता इथंदेखील ड्रायिव्हग करत नाही. माझा ड्रायव्हर असतो. यू नो हिम.. सलीम. पंचवीस-तीस वर्ष झाली त्याला. तो अजून मला कंटाळून सोडून नाही गेला! बाकी.. बिछडे सभी बारी बारी!’’
‘‘बिछडे हुएं फिर मिल भी सकते हैं! इथे एकटं राहण्यापेक्षा तिकडे मुलाकडेच का राहात नाहीस? कंटाळा आला तर तुझं पेंटिंग आहेच की!’’
‘‘तसा प्रॉब्लेम नाही रे. दोघांचंही ग्रीन कार्ड झालं आहे. पण आपला ‘कम्फर्ट झोन’च बरा वाटतो!’’
‘‘कधी दुसरा विचार केलास.. रिलेशनशिपचा?’’
‘‘ओह, नो.. नेव्हर अगेन! एक अनुभव खूप झाला. अमृता बॅरिस्टर, मी इंजिनीयर. तरी लव्ह-मॅरेज झालं! ती करिअरिस्ट आहे.. इव्हन टुडे. आय रिस्पेक्ट हर फॉर दॅट! साहिलचा जन्म झाला तोपर्यंत सगळं ठीक होतं. सिमरनच्या वेळेस तिला तिच्या करिअरच्या आड येणारं दुसरं मूल नको होतं. साहिल लाडात वाढला, सिमरन निग्लेक्टेड राहिली! सगळी गडबड तिथून सुरू झाली. दिनरात घर में झगडे. एक दिवस तिनं डिव्होर्स पेपर माझ्यापुढे टाकले. मला डेस्परेटली आमचं लग्न वाचवायचं होतं, पण नाही जमलं. वो मुंबई-दिल्ली, हायकोर्ट-सुप्रीम कोर्ट.. आगे बढती रही! अमृता अपने हिसाबसे जिंदगी जी रही हैं. मैं अपने हिसाबसे. ग्लोबलायझेशन के बाद मल्टीनॅशनल कंपनीयों के काम मिलने लगे. काम में बिझी रहेने के लिये मैं भी इंडियाभर घुमता रहा. गुरगांवसे चेन्नईतक, गुवाहाटीसे भूजतक. लेकिन अब थक गया हूँ! साहिल-सिमरनसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं. एवढंच समाधान! आता या वयात पुन्हा कुठं ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायची इच्छा नाहीये. जो चल रहा हैं, ठीकही हैं! चलती का नाम गाडी! जब तक जिंदगी हैं, चलती रहेगी!’’
‘‘तुमचा दोघांचा अजून संवाद आहे ना?’’
‘‘तीदेखील यूएसला जात असते. तिथेही आम्ही एकत्र येण्याचं टाळतो. मुलं त्यांच्या संसारात सुखी आहेत.. सो फार, सो गुड! दोघांची लव्ह मॅरेजेस आहेत. माझंही होतंच की! मला सांग.. प्रेम कशाला म्हणतात, रे?’’
‘‘सांगणं कठीण.. मात्र प्रेमात स्वार्थ नसावा, एकमेकांचा गुणदोषांसकट स्वीकार व्हावा.’’
‘‘जो भी हैं.. मला ‘जजमेंटल’ नाही व्हायचं. मी दोष कुणालाच देत नाही!’’
‘‘भाभीदेखील एकटय़ाच राहतात ना? मग तुम्ही दोघं पुन्हा एकत्र का नाही येत?’’
‘‘गेल्या महिन्यात यूएसला गेलो असताना, समहाऊ.. अमृतादेखील तिथे होती. जरा वेगळी, हरवल्यासारखी वाटली. तब्येत बरी नसावी. सिमरनदेखील जोर देत होती.. आता एकत्र का नाही राहात? व्हाय नॉट? तिच्या प्रश्नाचं मला उत्तर अजून सापडलं नाही. अमृता काहीच बोलली नाही. खिडकीबाहेर बघू लागली. तिचा ‘इगो’आड येत असणार!’’
‘‘इगो.. की पश्चात्ताप?’’
‘‘व्हॉटएव्हर! आज अकेला हूँ.. ठीक हूँ! अब तक की जिंदगी तो वैसेही गुजर गयी!’’
‘‘हा फक्त तुझ्यापुरता विचार झाला. आयुष्य नव्यानं सुरू करता येतंच की!’’
‘‘नॉट फॉर मी! मी जिच्यावर प्रेम केलं ‘ती’ ही नव्हे. ती कधीच हरवली!’’
‘‘एरवी तू आधी इतरांचा विचार करतोस, अनोळखी गरिबांना मदत करतोस, देणग्या देतोस! मग एकेकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलंस.. तिच्यासाठी काय करणार? ‘निग्लेक्टेड’ सिमरनदेखील आईच्या भल्याचा विचार करू शकते. तुमचं पहिलं प्रेम तर खरंच होतं ना? मग आता गुणदोषांसकट पुन्हा ‘तिच्याच’ प्रेमात पडायला काय हरकत आहे? जिंदगी के सफर में कुछ मकाम फिरसे जरूर आते हैं.. ते फक्त समजलं पाहिजे. सोडून गेलेला प्रवासी कालांतरानं पुन्हा गाडीत चढतो. त्याच्याबरोबर प्रवास तर अटळ आहे.. मग ‘व्हाय नॉट’? सिमरनच्या प्रश्नावर विचार कर.. तुझाही ‘इगो’ बाजूला ठेवून!’’
तो गप्पच झाला. कुठेतरी शून्यात बघत राहिला. मी जास्तच बोललो होतो का?..
काही न बोलता दोघंही उठलो. बाहेर आलो. बलराजचा ड्रायव्हर गाडी घेऊन दारावर आला. गाडीत बसण्यापूर्वी हातात हात घेऊन बलराजला म्हटलं, ‘‘सॉरी! इतक्या वर्षांनी भेटलास, राहावलं नाही म्हणून बोललो. मला तुला दुखवायचं नव्हतं!’’
‘‘सॉरी? इन फॅक्ट, आय मस्ट थँक यू! रियली.. ‘व्हाय नॉट?’ सिमरनच्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं. ज्या क्षणी आमचं प्रथम प्रेम जमलं, तो क्षण उरलेल्या प्रवासात अखेपर्यंत जपायचा. उद्या इथेच फुल बॉडी चेकअपसाठी अमृता अॅडमिट होतेय.. एकटीच आहे. तिच्यासाठी मला गेलं पाहिजे, असं वाटतंय आता!’’
‘‘ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. टेक केअर!’’
pbbokil@rediffmail.com