मन अशुद्ध असेल, तर त्या अशुद्ध मनाची एकाग्रता ही आपसूक विषयांचीच एकाग्रता होते आणि त्यानं आत्मघात होतो, हे आपण श्रीगुलाबराव महाराज यांच्या अभंगाच्या अनुषंगानं जाणलं. महाराज म्हणतात, ‘मलिन सलील सांठवितां घरी। किडे त्यावमाझारीं होति तेव्हां॥ अशुद्ध मनाची तेिव एकाग्रता। होय आत्मघाता कारण ती॥’ जर एखाद्याचं मन नकारात्मकतेत अडकलं असेल, तर मग कितीही सकारात्मक गोष्टी सांगा, मनाला त्या भिडतच नाहीत, मग त्या पटणं तर दूरची गोष्ट! अगदी त्याचप्रमाणे, मन अशुद्ध आहे म्हणजे काय? तर अनंत विषय कल्पनांमध्ये ते इतकं व्यग्र आहे की, त्याची स्थिरताच लयाला गेली आहे, तर त्या मनाला उच्च तत्त्वावर एकाग्र होणं साधेल का? तर नाही. तेव्हा मन शुद्ध झालं पाहिजे म्हणजे भ्रम-मोहानं आसक्तीत अडकून मनाचं निर्माण झालेलं पारतंत्र्य संपलं पाहिजे, मनाची चिंताव्यग्रता संपली पाहिजे. त्यासाठी ते विरक्त झालं पाहिजे. अर्थात बाह्य़ गोष्टींमधील अपेक्षांच्या जखडणीपासून मोकळं झालं पाहिजे. कारण शेवटी जे समत्व, समतोल साधला जाणार आहे त्याचं मुख्य कारण हे वैराग्यच आहे. अभ्यास केवळ निमित्त आहे, असं सांगून हा अभंग विरक्तीचं महत्त्वच अधोरेखित करतो. अशी विरक्ती शक्य आहे का, आवश्यक आहे का आणि साधकानं त्यासाठी काय करावं, याबाबत अन्य सत्पुरुषांनी काय मार्गदर्शन केलं आहे, ते जाणून घेऊ. आता या ‘साधका’ची पू. बाबा बेलसरे यांनी काय व्याख्या केली आहे? ते म्हणतात, ‘कामवासना, पसा, प्रतिष्ठा आणि काळजी यांचे चिंतन करण्यात वाया जाणारी मनाची शक्ती जो युक्तीने भगवंताच्या चिंतनाकडे वळवतो तो साधक जाणावा.’ आता साधना करू लागल्यावरही कामवासना, पशाचं प्रेम, प्रतिष्ठेची अर्थात नावलौकिकाची ओढ आणि हे सारं गमावलं तर जाणार नाही ना? देहसुखात व्यत्यय तर येणार नाही ना? पशाचा ओघ आटून गाठीशी असलेला पसा संपणार तर नाही ना आणि आपली अप्रतिष्ठा तर होणार नाही ना; ही काळजी मनात अधेमधे उद्भवत असतेच. साधना पथावर येण्याआधी मात्र या गोष्टींचा पगडा मनावर सदोदित असतो. म्हणजेच मन बहुतांश वेळा या गोष्टींनी पोखरलं जात असतं. हे पोखरलं जाणं लक्षातही येत नसतं. साधना सुरू होते तेव्हा काळजीची वाळवी आपलं अंतकरण कशी पोखरत आहे, ही जाणीव प्रथमच होऊ लागते. काळजी सुटत नाही, पण ती सोडण्याचा उपाय काय, हे शोधण्याची तळमळ निर्माण होते. कामवासनेची गोडी सुटलेली नसते, पण तिच्या मर्यादांचीही जाणीव होऊ लागते. पशाचा आधार वाटण्याची सवय सुटलेली नसते, पण त्या पशाची चंचलताही लक्षात येऊ लागली असते. प्रतिष्ठेची कल्पना सुटली नसते, पण तिचा ठिसूळ पाया उमगू लागला असतो. असं असलं तरी या कामनांच्या, धनमोहाच्या आणि प्रतिष्ठेच्या; अर्थात दारेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणेच्या प्रभावातून सुटावं कसं, ते नीटसं उमगत नसतं. सदगुरुबोध मनात ठसू लागला की तो खोलवर झिरपून, रुजून आंतरिक पालट होण्याआधीच तो इतरांना सांगण्याची उबळ निर्माण होते. मग ऐकलेलं उदात्त ज्ञान पचण्याआधीच उलटीसारखं तोंडावाटे बाहेर पडतं. या पायरीवर सांभाळलं गेलं तर मग वर सांगितलेल्या ईषणांना प्रामाणिकपणे सामोरं जाता येईल. त्यातून एक स्पष्ट कळेल की, आपण स्वबळावर कामनांच्या, पशाच्या आणि लौकिकासक्तीच्या पकडीतून सुटू शकत नाही. आपण एवढंच करू शकतो की, त्यांच्या विचारात गुंतून जो वेळ वाया जात असतो तो कसा वाचवता येईल, याचा विचार करू शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2018 रोजी प्रकाशित
११४. अंतर्भान
अर्थात बाह्य़ गोष्टींमधील अपेक्षांच्या जखडणीपासून मोकळं झालं पाहिजे.
Written by चैतन्य प्रेम
First published on: 12-06-2018 at 01:52 IST
मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part