गेल्या भागात जे लिहिलं ते पुरेसं स्पष्ट असलं, तरीही काहींना असं वाटेल की, दुसऱ्याचं दु:खं दूर करण्यासाठी जगणं हेच अनेक सत्पुरुषांनी महत्त्वाचं मानलं नव्हतं का? दु:खितांची सेवा हीच भगवंताची सेवा आहे, असं सांगितलं नव्हतं का? तर त्याचा थोडा विचार करू. ज्या साधकाच्या अंत:करणात सद्गुरू शुद्ध प्रेमाचं बीज रोवतात त्याचे अष्टसात्त्विक भाव जागे होतात. त्याच्यात चराचरावर प्रेम करण्याची वृत्ती उफाळून येते. सर्व जगच परमात्म्याची लीला आहे, या भूमिकेतून जगाला प्रेम अर्पण करण्याची भावना होते. करुणा, दया, सहानुभूती हे गुण तीव्र होतात. पण प्रत्यक्षात आपण जगावर पूर्ण प्रेम करू शकतो का? आपण आपलं जगच तेवढं जाणत असतो आणि त्यातही त्या आपल्या जगातले फार थोडे आपल्या जाणिवेच्या कक्षेत येत असतात. त्यातल्या अनेकांची पीडा ही बरेचदा त्यांच्या अहंभावातून, आसक्तीजन्य भ्रम आणि मोहातूनही उत्पन्न झाली असते. तेव्हा ते दु:ख पोसणाऱ्याला त्या दु:खातला फोलपणा कठोरपणे सांगणं, हीच खरी मदत असते! तेव्हा जगावर प्रेम करायला जे संत सांगतात ते ज्यांना खरंच गरज आहे, जे खरेच वंचित आहेत, जे खरंच उपेक्षित आणि पीडित आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण आपल्याच जगातल्या अशा व्यक्तींना भावनिक वा मानसिक आधार द्यायला पुढे होतो ज्यांना आपण आपलं मानत असतो.. आणि त्यातून आपणच भावनिक गुंत्यात अडकतो आणि साधनेपासून दुरावतो. तेव्हा ज्याच्या हृदयात शुद्ध प्रेम जागं झालं आहे त्याला ते प्रेम परमध्येयावर करणं आधी साधलं पाहिजे. तर आता पुन्हा मूळ विषयाकडे वळू. तर सद्गुरूंनीच प्रेमाचं बीज रोवलं आहे आणि त्या प्रेमानं भावजागृती होऊन आपण अध्यात्माच्या मार्गात पुढे जाऊ लागलो, तर अशा अनन्य भक्ताबद्दल सद्गुरूंना फार प्रेम वाटतं. त्याच्या त्या अंतर्निष्ठ साधनेला ते भुलतात आणि थेट बैलाचं दूध काढू लागतात! आता बैलाचं दूध काढण्याच्या रूपकाचा एक अर्थ हा की ज्या जिवाच्या हृदयात शुद्ध प्रेम, त्याग, समर्पण भाव येणं एरवी अशक्यच असतं त्याच जिवाच्या हृदयात ते या सर्व गोष्टी प्रकट करतात. दुसरा अर्थ असा की, बैल म्हणजे प्रारब्धाचं प्रतीक आहे. अनन्य भक्ताचं प्रारब्ध काही सद्गुरू बदलत नाहीत, पण त्या प्रारब्धातलं त्याचं वर्तन मात्र बदलतात! म्हणजेच अत्यंत प्रतिकूल भासणाऱ्या परिस्थितीचं प्रारब्ध वाटय़ाला आलं असताना त्यात या भक्ताचं वर्तन धीरोदात्त राहील, अशी त्याच्या मनाची घडण करतात. थोडक्यात परिस्थिती पालटत नाहीत, पण तिला सामोरं जाणाऱ्या भक्ताच्या मनात सकारात्मक पालट घडवतात. त्यामुळे त्याचा तो प्रारब्धभोगही इतरांना अत्यंत प्रेरक होतो. संकटात माणसानं कसं धीरानं वागलं पाहिजे, याचा आदर्श त्या घटनेतून इतरांना सहजपणे प्राप्त होतो. ही प्रेरणा म्हणजे दूध आहे! तर प्रारब्धरूपी बैलाच्या माध्यमातून सद्गुरू प्रेरणारूपी दूध उत्पन्न करतात. बरं हे बैलाचं दोहन वगैरे हे सारं हा सद्गुरू, हा ‘हरी’ कुठे करतो? या चरणाचा एक पाठभेद ‘बैल दोहितो नंदाघरी’ असाही आहे. तेव्हा हे दोहन हा हरी ‘आपुले घरी’ नंदाघरी करीत असतो. हे हरीचं घर कंसाच्याच राज्यात आहे. आपलं जगणंही अनेक कंसांनी भरलेलं आहे. अर्थात बाहेर एक आणि मनात एक, अशा आपल्या कंसा-कंसांच्या जगातच सद्गुरू ही लीला घडवत असतात. साधकाच्या मनातले सगळे संकुचित कंस तोडून ते त्याला सतत व्यापक करत असतात. हेच ‘बैल दोहितो नंदाघरी’आहे!