मनुष्य आणि प्राणी यांच्यात काय फरक आहे आणि असला पाहिजे? स्वामी तुरीयानंद सांगतात, ‘‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टींमध्ये मनुष्य पशुसारखाच आहे. मनुष्याचं विशेषत्व आहे ज्ञानामध्ये. ज्ञान असल्यामुळेच मनुष्य चांगल्या-वाईटाचा विचार करू शकतो. जीवन जितकं निम्न स्तरावरील तेवढा त्याला इंद्रियसुखाचा आनंद मिळेल; नि जितकं उन्नत होईल तेवढा सूक्ष्म आनंद त्याला दर्शन आणि ज्ञान यामध्ये मिळेल.. निम्न स्तरावरील लोक अशा प्रकारचा सूक्ष्म आनंद समजू शकत नाहीत. ते पशुतुल्य जीवन जगत असतात. मनुष्य जन्म प्राप्त करूनसुद्धा आपण आपल्या वृत्ती जर उन्नत करू शकलो नाही, तर मनुष्यजन्म मिळून काय फायदा?’’ स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे. इथं जो निम्न स्तर आहे तो मानसिक धारणेतला निम्न स्तर आहे. आर्थिक वा सामाजिक नव्हे. कारण आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा निम्न स्तरावर जगत असतानाही अनेक संतसत्पुरुषांनी जीवन कसं सार्थ जगता येतं, हे दाखवून दिलं होतं.  त्यावेळी आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा उच्च स्तरावर जन्मलेले कित्येकजण प्रत्यक्षात संकुचित आणि क्षुद्र जीवन जगत होते, याचेही दाखले आहेत. तेव्हा स्वामीजी प्रथम सांगतात की, पशुचं जीवन हे आहार, भय, निद्रा, मैथुन या चार गोष्टींभोवती घोटाळत असतं. माणसाचं जीवनही या चार गोष्टींभोवतीच घोटाळत राहणं मात्र योग्य नाही. या चौघांच्या जोडीला माणसाला आणखी एका गोष्टीचा विशेष लाभ झाला आहे. ही गोष्ट म्हणजे ज्ञान! या ज्ञानामुळेच चांगलं काय आणि वाईट काय, हे माणसाला समजू शकतं. ती समज पशुला नसते. या ज्ञानाच्या जोरावर आहार, भय, निद्रा आणि मैथुन यात समतोल साधत माणूस त्यांच्या पकडीतून मुक्त होऊन अधिक उन्नत जीवन जगू शकतो. आहार, निद्रा, भय आणि मैथुन माणसाच्या पकडीत नाही, तर उलट माणूस त्यांच्या पकडीत आहे. त्यामुळे त्याचं जगणं खाणं, झोपणं, घाबरणं आणि देहसुखासाठी तळमळणं, धडपडणं; एवढय़ासाठीच जणू उरतं. त्याच्या मनात अनेक प्रकारचं भय असतं. त्या सर्वात मोठं भय असतं ते देहदु:खाचं! अभाव, अपमान, अपयश, आजार  आणि मृत्यू,  ही त्याच्या भयाची काही प्रमुख कारणं असतात. या भीतीचे संस्कार त्याच्या जगण्यावर खोलवर असतात. जेव्हा या भयाच्या पकडीत जगत असताना आहार, निद्रा आणि मैथुन यातच सुखाचा आधार शोधला जात असतो तेव्हा मन एका चाकोरीतच भिरभिरत असतं. त्यामुळे उन्नत जगण्याची कल्पनाही मनाला नसते. जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर माणूस येतो तेव्हा आत्नोन्नतीचा मार्ग शब्दांच्या द्वारे तरी कानावर पडू लागतो. अशाश्वत आणि संकुचित गोष्टींना जखडून जगू लागलो तर जगणंही संकुचित आणि अशाश्वत अर्थात अस्थिरच असेल. जीवन जर शाश्वत आणि व्यापक गोष्टींशी एकरूप होत जगू लागलो तर जगणंही व्यापक आणि शाश्वत होईल, हे बोधातून समजू लागतं. तेव्हा साधनेचा प्रारंभिक मुख्य भाग म्हणजे जो शाश्वत आणि व्यापक आहे त्याचा आधार घेत त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, हाच साधनेचा प्रारंभिक मुख्य अभ्यास होतो. हा अभ्यास स्थिरावू लागला की, म्हणजेच खऱ्या अर्थानं उन्नत जगणं साधू लागल्यावर दर्शन आणि ज्ञानातून सूक्ष्म आनंद माणसाला मिळेल, असं स्वामीजी सांगतात.

चैतन्य प्रेम