News Flash

२०३. फकिराचा पसारा

अक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही.

चैतन्य प्रेम

अक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही. आता प्रत्येक आश्रम, प्रत्येक आध्यात्मिक संस्था किंवा प्रत्येक जाहीर सत्संग कार्यक्रम हा गैरच असेल, असं नव्हे. काही ठिकाणी खऱ्या आध्यात्मिक तळमळीनंच कार्य होत असतील. पण तरीही अशा ठिकाणी काही गोष्टींच्या आधारावर तपासणी करता येते आणि केलीही पाहिजे. या गोष्टी कोणत्या? तर आश्रमाचा पसारा असो, संस्थांचं जाळं असो किंवा सत्संग कार्यक्रमांची रेलचेल असो; त्यांचा मूळ पाया काय आहे? प्रसिद्धी आणि पैसा हा पाया आहे की शुद्ध आध्यात्मिक ज्ञान हा पाया आहे? तिथे येणाऱ्या भक्तांमध्ये गरीब-श्रीमंत हा भेदभाव आहे का? एखाद्या श्रीमंताला विशेष वागणूक आणि गरीबाची उपेक्षा, असं चित्र आहे का, याची तपासणी केली पाहिजे. जिथं शिष्याच्या हितालाच अग्रक्रम असतो तिथं तो गरीब आहे की श्रीमंत, याचं महत्त्व उरत नाही. जिथं आश्रमाचा पैशाचा ओघ टिकावा, हा मोह असतो तिथंच खऱ्या आत्महिताला अग्रक्रम नसतो. मग तिथं ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्त मान दिला जातो. मग अशा साधकाला जे रूचत नाही ते त्याला सांगितलंही जात नाही. शुद्ध ज्ञानापासून तो वंचितच राहतो. तर सांगायचा मुद्दा असा की, पसारा कितीही मोठा असो, त्यामागचा हेतू तपासता आला पाहिजे. एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या संस्थांचं जाळं असं देशभर उभं होतं. तरुणपणी त्यांच्या भेटीचा योग आला होता. त्यांना मी म्हणालो, ‘‘७७जी तुम्ही इतक्या संस्था उभारल्या आहेत, पण त्या प्रत्येकामागे काही ना काही आध्यात्मिक विचार आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का, की तुमच्यानंतर या संस्थांची जबाबदारी नव्या माणसांच्या शिरी जाईल. तोवर तर हा पसारा खूप वाढलाही असेल. तेव्हा ती माणसं संस्था सांभाळतील, पण त्यांच्या मागचा आध्यात्मिक विचार त्यांना सांभाळता येईल का? जर त्या आध्यात्मिक उद्देशाचं भानच त्यांनी गमावलं, तर मग या संस्थाही अन्य संस्थांसारख्या व्यक्तिकेंद्रित होत जातील. मग तिथं व्यक्तीचं, त्याच्या अहंमान्यतेचं महत्त्वच वाढत जाईल. राजकारण, स्पर्धा, पैसा यांचाच दबदबा वाढत जाईल. मग नुसता डोलारा सांभाळला जाईल, पण निरिच्छतेकडे नेणारा त्यामागचा विचार हरवून जाईल!’’ ते नुसतं हसले आणि म्हणाले, ‘‘मला जशी प्रेरणा झाली, तसं मी केलं. या संस्थांमागचा विचार तर सर्वश्रुत आहे. तो विचार प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या घरात आणि जगण्यातही जपता येईलच ना? बाकी या डोलाऱ्याचं पुढे काय होईल, ही भगवंताची इच्छा!’’ सांगायचं कारण काय, की खऱ्या सत्पुरुषाच्या आधारावरही असा आश्रमीय पसारा उभा राहू शकतो आणि त्यामागे खरा शुद्ध हेतू असतोही, पण तो हेतू सांभाळणं, टिकवणं आणि जपणं समाजाला साधतच असं नाही. तर मग पुन्हा मूळ मुद्याकडे वळू. हा मुद्दा असा की, खरं अखंड परम सुख जर हवं असेल, तर ते ज्याच्याकडे आहे तोच ते देऊ शकतो किंवा त्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगू शकतो. अशा सत्पुरुषाचा संग म्हणूनच अनिवार्य असतो. पण हा संग म्हणजे नुसता शारीरिक सहवास नव्हे! त्यांच्या जवळ राहणं नव्हे. हा सहवास खऱ्या अर्थानं विचारांचाच सहवास असतो. त्या विचारांशी ऐक्यच खरं तर महत्त्वाचं असतं.

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 12:22 am

Web Title: loksatta chintan dhara part 202 2
Next Stories
1 २०२. दुखं आणि सुख : २
2 २०१. दुख आणि सुख : १
3 २००. भावपोषण
Just Now!
X