08 March 2021

News Flash

२२. अ-भंग धारणा

आजवर आपण अनेक मार्गानं सुखासाठी पायपीट केली, पण सुख काही मिळालं नाही.

गुरुबोधाचं श्रवण, मनन, चिंतन आणि मग त्यानुरूप आचरण व्हायला हवं. तरच जीवनाची रीत सुधारेल. हाच आशय कलावती आई एका भजनातूनही सांगतात. त्या भजनाचं चिंतन आता आपण सुरू करणार आहोत. हे भजन असं आहे:

धरी गुरुचरण अभंग। मना तूं धरी..।। धृ.।। अखिल पसारा विफल असे हा। न कळत पावेल भंग।। १।। आसनी शयनी भोजनी गमनी। गुरुभजनीं राहा दंग।। २।। भाव भक्ति दृढतर होतां। गुरू सांगे अंतरंग।। ३।। गुरूबोधाच्या श्रवणमननें। त्यागी अभिमानी संग।। ४।। कलिमलदहन कृपामृत सेवुनी। आत्मस्वरूपीं रंगिरंग।। ५।।

आई साधकाच्या मनाला सांगत आहेत की, हे मना तू गुरूचे चरण धर.. पण ते कसे? तर अभंग! म्हणजे त्या धारणेत भंग पावू देऊ नकोस, खंड पावू देऊ नकोस. आता हे चरण धरायचे म्हणजे काय? तर त्यानं सांगितलेल्या मार्गानं जायचा अभ्यास करायचा. आजवर आपण अनेक मार्गानं सुखासाठी पायपीट केली, पण सुख काही मिळालं नाही. भौतिकातली कितीतरी साधनं आपण जमा केली, पण त्या साधनांनी कायमचे सुखी काही झालो नाही. मग खऱ्या संतांकडे पाहिलं तर काय दिसतं? तर, भौतिकाचा तुटवडा असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर मोठी प्रसन्नता असते. भौतिकाच्या अभावानं त्यांची आंतरिक भावलयता कधीच लोपत नाही. मग आपल्याला वाटतं की आपण इतकं मिळवूनही, कमवूनही अतृप्तच राहातो तर संत एवढे तृप्त कशानं? अर्थात जो मार्ग आपण सुखाचा समजतो, तृप्तीचा समजतो त्या मार्गापेक्षा काही वेगळा मार्ग असला पाहिजे. मग संतांना तो मार्ग विचारावा, तर ते सांगतात, ‘गुरूबीन कौन बतावै बाट!’ ती वाट कोणती, हे सद्गुरूशिवाय कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे संतांच्या सांगाव्याप्रमाणे सद्गुरूभेट व्हावी आणि ती व्हावी आणि मग त्यांनी सांगितलेल्या मार्गानं गेलो तरच खरी तृप्ती लाभेल, ही जाणीव होऊ लागते. ही जाणीव होणं हीसुद्धा काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. पण नुसती जाणीव होऊन भागत नाही! तो मार्ग जाणून घेण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं, तो मार्ग कोणता हे ऐकून घ्यावं लागतं, त्या मार्गानं जाण्याबाबत चिंतन करावं लागतं आणि एवढं सारं करूनही काही उपयोग नाही, प्रत्यक्ष चालावंच लागतं! आजार झाला. डॉक्टरकडे गेलो. औषधं कोणती, ती दिवसातून किती वेळा घ्यायची, कशी घ्यायची, हे सारं केवळ जाणून घेतलं, तर उपयोग आहे का? नाही. ती औषधं घेतल्याशिवाय काही उपयोग नाही. ती औषधं घ्यावी लागतील, मगच त्यांचा परिणाम होईल आणि रोग दूर होईल. तसं आहे हे. खऱ्या तृप्तीचा, खऱ्या सुखाचा मार्ग कोणता, हे जाणून घेतलं, एवढय़ानं भागत नाही. त्या मार्गानं प्रत्यक्ष चालावं लागतं.. आता कुणी म्हणेल, सद्गुरूभेट सहज होते का? तर एक पुन्हा स्पष्ट केलं पाहिजे. आपल्या बुद्धीनं गुरू शोधायला जाऊ नये, तसं केलं तर बाजारात फसण्याचाच धोका फार! त्यापेक्षा संतांच्या, अवतारपूर्ती झालेल्या सद्गुरूंच्या कोणत्याही एका स्वरूपाचा आधार घ्यावा आणि त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा प्रयत्न करावा. त्या अभ्यासाला सुरुवात केली, तर आपोआप योग्य ते मार्गदर्शन वेगवेगळ्या माध्यमांतून सहज मिळू लागतं. तर महत्त्व आहे ते प्रत्यक्ष कृतीला.. चालण्याला.. आणि निसर्गदत्त महाराज म्हणत त्याप्रमाणे खरा गुरू भेटणं सोपं आहे, खरा शिष्यच मिळत नाही. कारण प्रत्यक्ष  चालायची तयारी फार थोडय़ांची असते!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 2:35 am

Web Title: loksatta chintan dhara part 22
Next Stories
1 २१. अर्पण
2 २०. ध्यास.. देहाचा आणि देवाचा!
3 १९. भक्ती-सुख
Just Now!
X