चैतन्य प्रेम
माणसाचं जीवन हे नात्यागोत्यांच्या विणीनं बांधलेलं असतं. आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ, बहिण आणि चुलत-मामे अशी नाती जन्मासोबत निर्माण झाली असतात, पती किंवा पत्नी आणि मुलं, सुना, जावई ही नाती संबंधांनंतर निर्माण झाली असतात, मित्र, मैत्रिणी ही नाती मानसिक पातळीवर जोडली गेलेली असतात आणि मालक-नोकर, कर्मचारी-सहकारी, शेजारी, परिचित आदी नाती ही व्यवहारातून निर्माण झाली असतात. या सर्व नात्यांचा तोल सांभाळत प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवाह वाहात असतो. सनातन तत्त्वज्ञानानुसार या प्रत्येक नात्यांचं मूळ गेल्या अनेक जन्मांतील परस्पर व्यवहारात असतं. काहींवर आपण प्रेमाचा वर्षांव केला असतो, तर काहींशी द्वेष आणि वैराचा अतिरेकही केला असतो. त्यातून जी ‘देणी-घेणी’ निर्माण झाली असतात ती या आणि पुढच्या जन्मांमध्ये चुकती होणार असतात. त्या ‘देव-घेवी’नुसारच अनेक घडामोडी आयुष्यात घडत असतात. म्हणजेच काहीजण आपल्याला अवचित मदत करतात, काहीजणांशी अकारण तेढ उत्पन्न होते, काहीजण निर्हेतुक प्रेम करतात, तर काही आत्यंतिक द्वेषही करीत असतात. त्यामुळे माणसाचं जीवन हे सापशिडीच्या खेळाप्रमाणे कधी अचानक यशाच्या शिडीवर चढवणारं, तर कधी अचानक अपयशाच्या घसरगुंडीवरून खाली आणणारं ठरत असतं. पण तरीही याच नात्यांचा माणसाला सातत्यानं मोठा आधार वाटत असतो. आपल्या विरोधात असलेल्या माणसांवर मात करण्यासाठी त्याला आपल्याला अनुकूल असलेल्या माणसांचं पाठबळ आवश्यक वाटतं. त्यामुळेच त्याच्या जगण्याचा बराचसा वेळ आणि त्याचे बरेचसे श्रम हे अनुकूल माणसं जोडण्यात किंवा आपल्या जीवनातील माणसांना आपल्या अनुकूल बनवण्यात आणि राखण्यात खर्च होत असतात. या सर्वच नात्यांकडून त्याला निश्चित काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्या नात्यालाच तो निर्थक ठरवतो. म्हणजे भावाकडून अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर त्याला भाऊ असून नसल्यासारखाच वाटतो! म्हणजेच नात्यांशिवाय आयुष्याला अर्थ नाही, अशी माणसाची भावना असली तरी जी नाती त्याचा स्वार्थ पुरवतात किंवा त्या स्वार्थाला अनुकूल असतात तीच नाती त्याला खरी वाटतात, आपलीशी वाटतात.
तेव्हा अशा नात्यागोत्यांत गुंतलेला माणूस या नात्यांपलीकडील, निर्हेतुक अशा सद्गुरूंकडे जातो आणि मग त्यांचं महात्म्य मांडताना तो या नात्यांचाच आधार घेतो. म्हणजे तूच आई आहेस, तूच बाप आहेस, तूच बंधू आहेस, तूच सखा आहेस.. वगैरे. प्रत्यक्षात जन्मानं लाभलेल्या नात्यांना आपण जितकं खरं मानत असतो, तितकं ज्याच्याशी आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं त्या सद्गुरूशी असलेलं नातं आपल्याला सुरुवातीला तितक्या पक्केपणानं अस्सल वाटत नसतं. पण जसजसं सद्गुरूहृदयातील विराट वात्सल्याचं दर्शन घडू लागतं तसतसं प्रत्येक नात्यांचं कर्तव्य तेच अत्यंत शुद्ध स्वरूपात पार पाडत असल्याची जाणीव होऊ लागते. इतकंच नव्हे, तर त्यांच्या हृदयात आपल्या हिताविषयी खरी कळकळ आहे, हे सुद्धा अनुभवानं जाणवू लागतं. त्यामुळेच ‘सर्वथा तू हितकर्ता’ हे शब्द मनापासून उमटतात.
chaitanyprem@gmail.com