केशवदत्त महाराज यांच्या ‘ज्ञानेश्वर वैभव’ ग्रंथातलं आणखी एक नोंद कृष्णचरित्रातील परिचित घटनेची वेगळीच छटा प्रकाशित करते. अर्जुन युद्धभूमीवर आला आणि मला कोणाकोणाशी लढायचं आहे, हे पाहायचं आहे, असं म्हणाला. मग रणांगणाच्या मधोमध रथ नेऊन भगवंतानं त्याला त्याचा ‘शत्रूपक्ष’ दाखवला. आपल्याला कुणाशी लढायचं आहे, हे अर्जुनाला माहीत का नव्हतं? पण तरीही रणांगणावर आपल्या सामोरं उभ्या ठाकलेल्या आप्तस्वकीयांना पाहताच अर्जुनाच्या मनात अनंत आठवणी आणि डोक्यांत अनंत विचार दाटून आले. त्यात वात्सल्याचं स्मरण होतं, प्रेमाचं स्मरण होतं. आज हे सारेजण कोणत्या का भूमिकेत असेनात, कधीकाळी यांनी आपल्यावर प्रेम केलं होतं, हे आठवून अर्जुन मनानं खचला. यांना मारून मिळणारं राज्य का सुखाचं होणार आहे, या प्रश्नाचं खङ्ग त्याचं काळीज भेदू लागलं. तेव्हा भगवान कृष्णानं ‘गीता’रूपी बोध केलाच, पण ज्यांना तू ‘मी मारणार आहे,’ म्हणतोस ते आधीच मेलेले आहेत, तू निमित्तमात्र आहेस, हे दाखवून दिलं. ‘ज्ञानेश्वरी’त माउली फार सुरेख रूपक वापरतात. म्हणतात, ‘‘अगा चित्रींची फळें। वीर हे देखें!’’ अरे हे वीर नुसते दिसताहेत, पण चित्राची फळं जशी पोकळ असतात, तसेच हे आहेत!  ‘‘केशवदत्त महाराज इथंच या प्रसंगाची अगदी वेगळी आणि लक्षात न येणारी छटा उलगडतात. ते म्हणतात, ‘‘चित्राची पोकळ फळे असतात त्याप्रमाणे हे वीर तुझ्यापुढे आहेत. भीष्म, द्रोणाचे भय धरू नकोस आणि कर्णावरही आपले शस्त्र परजण्यास भिऊ नकोस. एखाद्या भिंतीवर सिंहाची चित्रे काढावीत आणि ओल्या हाताने ती पुसून घ्यावीत, त्याप्रमाणे हे आहेत. कारण मी यांचा आधीच ग्रास घेतला आहे, अशी अर्जुनाची निर्भय वृत्ती भगवंतांनी योगैश्वर्यशक्तीने केली. भगवंताचा केवढा कळवळा की त्यांनी त्यास फक्त कौरव सेनेच्या वीरांचा ग्रास केला हे दाखविले! पांडवांकडील वीर थोडेच जिवंत राहाणार होते? परंतु भगवंताचा अर्जुनाला निर्भय करावे हा प्रधान हेतु आहे.’’ (पृष्ठ १०७ ते १०८). आणि ही बाजू आपल्याही लक्षात येत नाही! कौरव सेनेतील आपल्या आप्तांना पाहून अर्जुन व्यथित झाला तेव्हा त्याला त्या सेनेतील वीरांचा आपण आधीच काळरूपानं ग्रास अर्थात घास घेतल्याचे भगवंतांनी दाखवले. जे आधीच मृत आहेत त्यांच्यावर फक्त शस्त्र चालवायचे क्षात्रकर्तव्य पार पाडायचं आहे, असं भगवंत सांगतात. पण भगवंताचा कळवळा किंवा अर्जुनाबद्दलचं प्रेम असं की मृत्यूनं ग्रास तर दोन्ही बाजूंचा घेतलेला आहे, या सत्याची भुली त्याला पडू देतात! जग मिथ्या आहे, असं सद्गुरू शिष्याला सांगतात तेव्हा तूसुद्धा मिथ्याच आहेस, हे सत्य त्याला समजत नाही! हे जग नश्वर आहे, असं सांगतात तेव्हा तूसुद्धा नश्वरच आहेस, हे त्याला समजत नाही. जगात आजूबाजूला तो मृत्यू पाहतो, पण आपल्या आप्तांनाही मृत्यू आहे, हे वास्तव जणू तो विसरतो. म्हणूनच आपल्या आप्तांच्या वियोगाची शक्यता उत्पन्न होताच तो सद्गुरूंकडे धाव घेतो आणि त्यांना वाचविण्याची करुणा भाकतो! गौतम बुद्धांकडे पुत्र गमावलेली एक स्त्री गेली आणि पुत्राला जिवंत करा म्हणू लागली. भगवान गंभीरपणे म्हणाले, ‘‘अवश्य हा जिवंत होईल. पण अशा घरातून मला मूठभर तांदूळ आणून दे जिथं आजवर कुणाचाही मृत्यू झालेला नाही!’’ तिनं आईच्या हृदयानं धाव घेतली, पण परतली ती बुद्धांची अनुयायी म्हणून!

चैतन्य प्रेम