सद्गुरू बोधानुसार जीवन जगत असलेला अनन्य भक्त पाहून सद्गुरूही त्या भक्तामध्ये अनेक गुणांचं बीजारोपण करतो. त्या भक्ताच्या जीवनात प्रेमाचं परिपोषण करतो. त्याच्या जीवनातून इतरांना प्रेरणा मिळेल, अशी त्याच्या जगण्याची घडण करतो. अर्थात त्या भक्ताला मात्र यातलं काहीच उमजत नसतं. त्याचं सगळं लक्ष केवळ सद्गुरूकडे केंद्रित असतं. त्याच्या अंत:करणातून जगाची आसक्ती अत्यंत क्षीण झाली असते. त्या साधकाच्या विरक्त दशेचं वर्णन आणि त्याच्या अंत:करणात उमलत असलेल्या, विकसित होत असलेल्या शुद्ध भावाचं वर्णन नाथ करतात, ‘फणस गंभीर कर्दळी दाट.’ फणसाच्या वृक्षाचं वर्णन नाथ एका शब्दात करतात ‘गंभीर’! एखाद्या विरक्ताप्रमाणे हा फणसाचा वृक्ष भासतो. नारळ, सुपारीसारख्या झाडांनासुद्धा त्याची सावली मिळेल, इतका तो विशाल आणि डौलदार असतो. या फणसाच्या झाडाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ असं की त्याच्या खोडापासूनच फळं लगडलेली असतात. अगदी खोडापासून त्या फळांची सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे या भक्तीमार्गावरून जो प्रामाणिकपणे खरी वाटचाल सुरू करतो त्याला पहिल्या पावलापासून अनुभव सुरू होतात! त्याच्या दृष्टीला सृष्टीतली प्रत्येक घडामोड ही भगवद्प्रेमाची जाणीव करून देणारी असते. डोळे मिटल्यावर दिसणारे रंग, दिसणारा प्रकाश किंवा ऐकू येणारा नाद यांनाच अनेकजण अनुभव मानतात किंवा त्या अनुभवावरून साधनेतली प्रगती जोखतात. पण जो प्रकाश काही क्षण दिसतो आणि मग लोपतो, जे रंग दिसतात आणि मग काही क्षणात विरतात, जो नाद ऐकू येतो आणि नंतर ओसरतो त्यांना कितीसं महत्त्व आहे? सदोदित टिकणारा अनुभव हाच खरा असतो, पण जी गोष्ट सदोदित असते तिची जाणीवच आपल्याला होत नाही. श्वास आणि उच्छ्वास सदोदित सुरू आहे, पण त्याची जाणीव आणि त्याचं महत्त्व नाही. अगदी त्याचप्रमाणे या संपूर्ण चराचरात नवनिर्मिती, अस्तित्व आणि अस्त अगदी क्रमानं सुरू आहे. विराट जीवनाचा हा जो अविरत प्रवाह सुरू आहे, त्यामागील परमतत्त्वाच्या जाणिवेनं साधकाच्या वृत्तीत एक विरक्त गांभीर्य विलसू लागतं. कुंडलिनी जागृतीच्या अंगानं विचार केला, तर फणसाच्या झाडाला जशी खोडापासूनच फळं असतात, तशीच मूलाधारापासूनच म्हणजे मूळ बैठकीपासूनच चक्रांची सुरुवात होते! या शक्तीच्या जागृतीनं आणि उन्नयनानं एक गांभीर्य विलसू लागतं. ध्यानस्थ योग्याप्रमाणेच हा ‘फणस गंभीर’ भासतो! पुढे आहे ‘कर्दळी दाट’. फणसाचं झाड उंच असतं, तर कर्दळी पसरत जाणारी असते.  तिच्या कंदातूनच कंद फुटत जातात. अगदी त्याप्रमाणे आंतरिक आनंदस्थितीचा ओझरता अनुभव या ध्यानस्थाला येऊ लागतो आणि त्या क्षीणशा आनंदानुभवातूनही अष्टसात्त्विक भावांच्या कळ्या जणू जन्मू लागतात. कर्दळी आणि केळी यांच्यात फरक आहे, पण काही ठिकाणी केळीच्याच झाडाला कर्दळी (कदली) संबोधलं आहे. कर्दळीची उंची कमी असते, पण तिला पावित्र्याचं विशेष स्थान असतं. थोडक्यात शुद्ध भक्तीनं हा अनन्य भक्त जसजसा विरक्त होतो तसतसं त्याच्या सर्व जीवनव्यवहारात एक सहज पावित्र्य विलसू लागतं. कर्दळीची फुलं ही अर्धोन्मीलित भासतात. म्हणजेच पूर्ण उघडलेलीही नाहीत की पूर्ण मिटलेलीही नाहीत. कुंडलिनी जागृतीची ही प्रारंभिक स्थिती आहे. चक्रं उमलू लागली आहेत, पण पूर्ण उमललेली नाहीत. याच टप्प्यावर ‘सारंगधर’ अवतीर्ण होतो!