22 September 2020

News Flash

६९. देह देवाचे मंदिर

संतभेटीनं, त्या संतसंगानं प्रेमाचा झराच हृदयात वाहू लागतो.

विठ्ठलानं नामदेवाला साकाराच्या अशाश्वततेचं ज्ञान सांगितलं आणि त्यानं मनाचं समाधान करून घ्यायचा सल्लाही दिला. नामदेव त्यावर उसळून म्हणतात, ‘‘नामदेव म्हणे देवा। ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा।। तुम्ही माये संगें गूढ। ज्ञान जाणिवेचे आड।। आम्हां नाहीं याची चाड। वाटे संतभेटी गोड।। संतभेटी प्रेम फावे। प्रेमें देवाशीं भेटावें।। प्रेम आहे पोटभरी। देव त्यासी पोटीं धरी।। नामदेवा ठायीं प्रेम। मार्गी आडविलें ब्रह्म।।’’ नामदेव म्हणताहेत, हे देवा तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्याच पोटात ठेवा, म्हणजे तुमच्याकडेच ठेवा. तुमची आणि मायेची संगत गूढ आहे. तुम्ही जे ज्ञान सांगत आहात ते जाणिवेच्या आड आहे. म्हणजे आमची जाणीव त्या ज्ञानाच्या आड येत आहे. ही जाणीव आहे संतप्रेमाची. ते प्रेम आम्ही जाणतो, मग त्या प्रेमविव्हल मनाला शाब्दिक ज्ञानानं तृप्ती कशी वाटावी? आम्हाला ज्ञानाची चाड नाही. संतभेटीची आस आहे. ती भेटच गोड वाटते. कारण त्या संतभेटीनं, त्या संतसंगानं प्रेमाचा झराच हृदयात वाहू लागतो. त्या प्रेमानं मग देवाला भेटता येतं. ज्याच्या पोटात प्रेम भरून आहे त्यालाच देव पोटी धरतो! अर्थात जो प्रेमानं पूर्ण भरून आहे त्यालाच देव पूर्ण आश्रय देतो. याचं कारण जो प्रेमानं पूर्ण भरून आहे त्याला जगाचं भानच नाही. त्याचा या जगातला वावर देहभान हरपलेल्या वेडय़ासारखा असतो. तो स्वत:ला उधळून देत असतो. स्वत:ची पर्वा करीत नसतो. त्यामुळे त्याची चिंता भगवंताला वाहावी लागते. गीतेतही भगवंतानं म्हटलं आहे की, जो अनन्य होऊन माझ्याच चिंतनात गढून जातो त्याचा योगक्षेम मी चालवतो.. पण जो भक्त आहे तो योगक्षेम चालावा म्हणून भक्ती करीत नाही. त्याला भक्तीशिवाय काही सुचतच नाही, काही येतच नाही. त्यासाठीच त्याला आपल्यासारख्याच अनन्य भक्तसख्याचा संग हवासा वाटतो. दुसऱ्या भक्ताच्या संगाची त्यांच्या मनात जी ओढ असते आणि आवडत्या व्यक्तीच्या संगाची आपल्याला जी ओढ असते त्यात फार मोठा फरक आहे. आपण देहबुद्धीनंच इतरांकडे पाहतो, इतरांना जोखतो. त्यामुळे आपल्याला शरीररूपातच इतरांना जाणता येतं. त्यामुळे शरीर बघूनच आपण आनंदी होतो आणि शरीर बघूनच आपण दु:खी होतो. शरीराचाच सहवास मिळावा यासाठी आपण धडपडतो आणि शरीरालाच टाळण्यासाठी प्रयत्न करतो. काही शरीरांवर आपण मित्रवत् प्रेम करतो आणि काही शरीरांची शत्रुवत् घृणा करतो. पण जे देहबुद्धीच्या पलीकडे असतात असे भक्त दुसऱ्या भक्तांच्या देहाकडे भगवत्प्रेमाचा आधार म्हणूनच पाहतात. म्हणूनच तर नामदेवांनी ज्ञानेशांना ‘सौख्यसरोवर’ म्हटलं आहे.. आणि ज्ञानेशांच्या प्रेमाचं हे प्रकटन खरं तर आपल्यासाठीच आहे. आपण देहबुद्धीनं, शरीरभावानं जे इतर नश्वर शरीरांत अडकून आहोत त्या आपल्या मनाला, चित्ताला, बुद्धीला भगवत्स्वरूप आकारांची तेवढी ओढ का वाटत नाही? मृत्यूनं दुरावलेल्या आपल्या आप्तांची छायाचित्रं पाहताना आपलं मन हेलावतं, पण ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, नामदेव यांचे सगुणाकार पाहून आपल्या मनात प्रेम का उत्पन्न होत नाही? हा प्रश्नच नामदेवांचे हे अभंग आपल्या मनात जागा करतात. ज्या देहाला संत देवाचं मंदिर म्हणतात त्या देहालाच आपण भ्रम, मोह, आसक्तीचं कोठार बनवून टाकतो. त्यामुळे ज्यांचे देह खरंच मंदिरासारखे मंगलमय, पवित्र आहेत आणि होते त्या ‘आकारां’कडे नामदेवांचे हे अभंग आपल्याला वळवत आहेत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:47 am

Web Title: loksatta chintan dhara part 69
Next Stories
1 ६८. समजूत
2 ६७. सौख्यसरोवर
3 ६६. आकार.. निराकार
Just Now!
X