19 February 2020

News Flash

यश केवळ पाच टक्के

मराठी चित्रपटसृष्टीतील फायद्याकडे लक्ष ठेवून हिंदीतील काही निर्मातेदेखील या वर्षी उतरले होते.

वर्षांला शंभरच्या आसपास मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना केवळ दोन हिट आणि चार बरे चित्रपट सोडले तर व्यावसायिकतेच्या पातळीवर बाकी सगळ्या चित्रपटांचं काय होतं, याची चर्चाच न केलेली बरी. या हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या चित्रपटांनी केलेल्या प्रयोगांचं कौतुक करत मराठी चित्रपटसृष्टीला आता चांगले दिवस आले असं म्हणणं म्हणजे आत्मवंचना करण्यासारखंच आहे.

या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीने बॉक्स ऑफिसचे नवीन विक्रम प्रस्थापित केले. अगदी ब्लॉकबस्टर म्हणावे असे. तेदेखील अगदी मोजक्याच चित्रपटांच्या आधारे. काही चित्रपटांचं अगदी सातासमुद्रापार जाऊन चित्रीकरणदेखील झालं. काही अमराठी दिग्दर्शकांनीदेखील निर्मितीचे प्रयोग केले. सायफाय फिक्शनचे प्रयोग झाले. हिंदीतल्या काही कलाकारांनीदेखील काम केले आणि हिंदीतल्या निर्मात्यांनीही पैसे गुंतवले. अनेक नवोदित आले, जुन्याजाणत्यांनी शिरस्त्याप्रमाणे एक दोन चित्रपटांचा वार्षिक कोटा पूर्ण केला, पण एवढे करूनदेखील एक इंडस्ट्री म्हणून काही फार मोठी छाप आपल्याला सोडता आलेली नाही.

व्यवसायाची गणितं लावायची तर ‘नटसम्राट’ आणि ‘सैराट’ हे दोन चित्रपट सोडले तर यशस्वी म्हणावा असा तिसरा चित्रपट दिसत नाही. ‘गणवेश’, ‘वायझेड’ या चित्रपटांनी बरा म्हणावा असा व्यवसाय केला. पण निर्मात्याची गुंतवणूक सुटून त्यातून चार पैसे फायदा झाला असं म्हणण्यासारखी परिस्थिती ‘नटसम्राट’ आणि ‘सैराट’शिवाय अन्य कोणाकडे सध्या तरी नाही.

मांडणी, आशय, कथानक या मराठी चित्रपटसृष्टीच्या बलस्थानांचा अगदी मोजकाच वापर झाला. ‘कौल’ चित्रपटाने या सर्वाच्या पलीकडे जात एक वेगळा प्रयोग सादर केला. अनेकांना तो आवडलादेखील. पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी तो म्हणावा तसा उचलून धरला नाही. ‘कौल’बद्दल एका गोष्टीची दखल मात्र आवर्जून घ्यावी लागेल. ती म्हणजे संपूर्ण पठडीबाहेरचा हा चित्रपट असूनदेखील तो केवळ फेस्टिवल्सपुरता मर्यादित राहिला नाही. चित्रपट एक कलाकृती असते आणि त्याचबरोबर तो व्यवसायदेखील. त्यामुळे चित्रपटाने किती पुरस्कार मिळवले याबरोबरच चित्रपटाला लोकाश्रय किती मिळाला हेदेखील महत्त्वाचे असते. ‘कौल’ला लोकाश्रय म्हणावा तसा मिळू शकला नाही, पण त्याने व्यवसायाची सर्व गणितं सांभाळली. चित्रपटगृहापर्यंत चित्रपट पोहचवला. त्यासाठीची मार्केटिंगची गणितंदेखील सांभाळली.   निर्मात्यांबरोबरच ‘कौल’चा तरुण दिग्दर्शक अदिश केळुस्कर याची भूमिका यामध्ये महत्त्वाची म्हणावी लागेल. चित्रपट करायचे स्वातंत्र्य निर्मात्याकडून मिळवणे हे चित्रपटाच्या व्यावसायिक गणितावरच अवलंबून असते हे त्याने ओळखले आहे; अन्यथा आपण केवळ पुरस्काराचं कौतुक करत राहतो आणि प्रेक्षागृहापर्यंत पोहचतदेखील नाही.

लोकाश्रय आणि आशय या दोन्ही बाबतीत वर्षभरात बाजी मारली ती केवळ ‘सैराट’ने. नागराज मंजुळेचा आधीचा ‘फॅण्ड्री’ आणि ‘सैराट’ ही दोन टोकं म्हणावी लागतील. ‘सैराट’ने व्यावसायिक चित्रपट करतानाच आशयाची ठोस मांडणी कशी करता येते हे दाखवून दिले. तुलनेने ‘नटसम्राट’ चालला तो त्याच्या वलयामुळे. अन्यथा ‘नटसम्राट’मध्ये अनेक उणिवा होत्या. ‘सैराट’ आणि ‘नटसम्राट’ हे दोन्ही चित्रपट झी स्टुडिओचे होते. चित्रपटाच्या व्यावसायिक तंत्रात झी स्टुडिओने गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने प्रावीण्य मिळवले आहे तसे मराठीत मोजक्याच निर्मात्यांकडे दिसून येते. पण वर्षभरातील हे दोन चित्रपट सोडले तर ‘कान्हा’, ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ हे दोन्ही चित्रपट कसलाच प्रभाव टाकू शकले नाहीत. ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ हा हरहुन्नरी कलाकार गिरीश कुलकर्णीचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयोग. पण एकंदरीतच पटकथा लेखन, संवाद आणि अभिनय अशा भूमिका एकाचवेळी करताना त्याला दिग्दर्शनाची जोड देणं कठीण असल्याचं त्याला कळलं असावं अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ‘व्हेंटिलेटर’ हा प्रियंका चोप्रा निर्मित चित्रपट अनेकांच्या औत्सुक्याचा विषय होता. त्याने बरा व्यवसाय केला, पण तो हिट असा नव्हता.

झी स्टुडिओचे चित्रपट निर्मितीत आणि त्याचे व्यावसायिक गणित सांभाळण्यामध्ये नाव झाले असले तरी दरवर्षी इतरही अनेक निर्माते एक विशिष्ट गणित बांधून मराठीत चांगला व्यवसाय करत असतात. एव्हरेस्ट एन्टरटेनमेंटचा ‘वायझेड’ हा सिनेमादेखील बऱ्यापैकी लोकप्रिय झाला असे म्हणण्यास वाव आहे. पण अतिशब्दबंबाळ पटकथेमुळे त्याचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. ‘वजनदार’ या सचिन कुंडलकरांच्या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. कुंडलकर कायमच नावीन्यपूर्ण विषय मांडत असतात. पण नोटाबंदीचा  परिणाम त्याच्या व्यवसायावर झालाच नाही असे म्हणणे अवघड आहे. ‘गणवेश’ चित्रपटाने मात्र बरा व्यवसाय केला असे म्हणता येईल.

मराठी चित्रपटसृष्टीतील फायद्याकडे लक्ष ठेवून हिंदीतील काही निर्मातेदेखील या वर्षी उतरले होते. ‘व्हेंटिलेटर’ने प्रियंकाला बऱ्यापैकी दिलासा दिला, पण संजय लीला भन्साळी निर्मित लाल इश्कने सपशेल आपटी खाल्ली. अर्थातच २०१६ हे वर्ष स्वप्निल जोशीसाठी वजन कमी करणारे ठरले असे म्हणावे लागेल. तर दुसरीकडे सई ताम्हणकर या वर्षांच्या उत्तरार्धात ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’, ‘फॅमिली कट्टा’, ‘वजनदार’ अशा चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका करताना दिसली. तिच्या या मेहनतीचा व्यावसायिक फायदा अगदीच मर्यादित होता.

मागच्या वर्षी ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या दोघांची जोडी या वर्षी बराच प्रयत्न करताना दिसली. पण त्यातून हाती मात्र शून्यच आले. वैभव भूमिकेत जीव ओतताना दिसतो, पण मुळातूनच काहीतरी कमतरता जाणवते, तर प्रार्थना बेहेरेकडून काही वेगळं घडेल असे वाटत नाही.

अंकुश चौधरीनेदेखील ‘गुरु’सारखा सिनेमा केला. पण २०१५ मधील अंकुश आणि आत्ताचा अंकुश यात काहीतरी उणीव सारखी जाणवत होती. २०१७च्या जानेवारीत येणाऱ्या ‘ती सध्या काय करते?’ या चित्रपटात वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

आशयाच्या बाबतीत ‘कौल’च्या जोडीनेच आणखीन दोन चित्रपटांची वर्षअखेरीस नोंद घ्यावी लागेल. ‘रंगा पतंगा’ आणि ‘अस्तु’. दोन्ही चित्रपटांची निर्मिती होऊन एक-दोन वर्षे उलटून गेली होती. ‘अस्तु’ तर पुण्यातील काही दोनचार चित्रपटगृहांत यापूर्वी प्रदर्शित झाला होता, तर ‘रंगा पतंगा’ आर्थिक अडचणींमुळे प्रदर्शित होऊ शकला नव्हता. ‘अस्तु’साठी क्राऊड फंडिंगसारखा थेट जनसहभागाचा प्रयत्नदेखील केला गेला. ‘अस्तु’ बरीच वाट पाहायला लावून प्रदर्शित झाला, पण व्यापक  जनमानसांपर्यंत कितपत पोहचला हे शोधावंच लागेल. ‘रंगा पतंगा’ हा सामाजिक परिस्थितीवर अत्यंत वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट होता. मकरंद अनासपुरेने पठडीबाहेरची भूमिका साकारली होती. पण दोन्ही चित्रपटांना मर्यादितच प्रतिसाद मिळू शकला.

या वर्षीच्या आणखीन एका असफल प्रयोगाची नोंद घ्यावी लागेल, ती म्हणजे एनएफडीसीचा ‘वीस म्हणजे वीस’. एनएफडीसीने चित्रपट निर्मितीमध्ये केलेले प्रयोग, त्यांना एकेकाळी मिळालेला प्रचंड यशस्वी प्रतिसाद, त्यातून निर्माण झालेले दर्जेदार चित्रपट हे सारं वलय यंदा त्यांनी मराठी चित्रपटासाठी वापरले. चित्रपट निर्मितीसाठी संपूर्ण अर्थसहाय्य देत ‘वीस म्हणजे वीस’ हा ग्रामीण भागातील शालेय शिक्षणावर भाष्य करणारा चित्रपट साकारला. पण एकंदरीत चित्रपटाच्या रचनेतच मूलभूत चुका असणारा हा चित्रपट आला आणि गेला कधी तेच प्रेक्षकांना कळले नाही. ‘फुंतरु’ हा सायफाय म्हणजेच तंत्रज्ञानाची करामत मांडणारा चित्रपट. सुजय डहाके हा दिग्दर्शक ‘शाळा’ चित्रपटामुळे पाच वर्षांपूर्वी चर्चेत आला. त्याच्याकडे संकल्पना अतिशय वेगळ्या आणि भन्नाट असतात. पण निर्मितीच्या टप्प्यात त्यामध्ये मजबूत गोंधळ होतो आणि चांगल्या विषयाची माती होते. ‘फुंतरु’मध्ये तेच झाले.

‘अलबेला’ हा दोन तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला चित्रपट. भगवानदादाच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट स्मरणरंजनाचा खास अनुभव देणारा होता. विद्या बालनची मराठीतील पहिली भूमिका यामध्ये होती. चित्रपटाच्या निर्मितीत तांत्रिक उणिवा नव्हत्या. पण पटकथेवर काम अपेक्षित होतं. माहितीपटाचा विषय चित्रपटासाठी हाताळताना होणारी नेहमीची गल्लत काही प्रमाणात झालेली दिसून येते.

मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकायला सुरुवात केली त्याला आता बराच काळ झाला. त्यानंतर बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. केवळ पैसे आहेत आणि वलयाची हौस आहे म्हणून चित्रपट निर्मिती करणारे निर्माते हा प्रकारदेखील आता बऱ्यापैकी कमी होत चालला आहे. चित्रपट निर्मितीचं पुरतं गणित उमगलं नसलं तरी बऱ्यापैकी जाणीव होताना दिसत आहे. पण त्यातून शहाणपण कितपत आलं असं म्हणता येणार नाही. पुरस्कारांमध्ये आपली वर्णी अगदी सणसणीत असते. वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट दिमाखात झळकत असतात. पण याचा अर्थ सारंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. मागचं वर्ष तुलनेने बरंच बरं होतं असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती यंदा झाली. कलाकृतीचं सौंदर्य जपत व्यावसायिक गणित कसं जोपासायचं हे आजही आपल्याला पुरेसं कळलं आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासावं लागेल. कारण आजदेखील केवळ चित्रपट करता येतो म्हणून करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते, पण त्यात मेहनतीचा अभाव असतो. आपल्या आशयघनतेला मेहनतीची ठोस जोड जेव्हा मिळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.

सुहास जोशी response.lokprabha@expressindia.com

First Published on December 30, 2016 2:31 am

Web Title: unimpressive marathi movie collection in 2016
Next Stories
1 वजनदार महिना
2 समाजातील बदलांवर भाष्य
3 नाही भव्य-दिव्य तरी…
Just Now!
X