27 May 2020

News Flash

वय आणि मालमत्ता

लाइफ-सायकल संकल्पनेवर आधारित गुंतवणुकीचे धोरण हे निवृत्तीच्या नियोजनासाठी एक आदर्श धोरण आहे.

गुंतवणुकीची रणनीती तयार करताना गुंतवणूकदारांना जोखीम आणि परतावा यांच्यातील संबंध समजून घ्यावा लागेल.

वसंत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लाइफ-सायकल संकल्पनेवर आधारित गुंतवणुकीचे धोरण हे निवृत्तीच्या नियोजनासाठी एक आदर्श धोरण आहे. म्युच्युअल फंडाचा वापर करून उत्तम लाइफ सायकल गुंतवणूक कशी करता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे.

वयानुसार मालमत्ता विभाजन

मालमत्ता विभाजन म्हणजे आपली गुंतवणूक आपल्या वित्तीय ध्येयांनुसार आणि आपल्या जोखिमांकानुसार वेगवेगळ्या मालमत्ता श्रेणींमध्ये विभागणे. उदाहरणार्थ समभाग, रोखे, मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता आणि रोख रक्कम यांसारख्या पूर्व निश्चित गुंतवणूक साधनांमध्ये विभागून जोखीम नियंत्रित करणे होय. गुंतवणूक साधनांचे प्रमाण गुंतवणूकदारांची वैयक्तिक उद्दिष्टे किंवा ध्येय निश्चिती, जोखीम सहन करण्याची पातळी आणि गुंतवणुकीचा कालावधी यांसारख्या घटकांद्वारे निश्चित केले जाते.

वित्तीय ध्येयांची निश्चिती

सेवानिवृत्तीपश्चातचे नियोजन, कौटुंबिक कर्तव्ये, इच्छा, हौसमौज किंवा अन्य कारणांनी विशिष्ट कारण किंवा इच्छेसाठी दिलेल्या पातळीवर परतावा मिळविणे.

जोखिमांक पातळी तपासणे

भविष्यात जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने एखादी व्यक्ती मूळ गुंतवणुकीची किती रक्कम बाजार अस्थिरतेमुळे गमावण्यास तयार आणि सक्षम आहे याचा संदर्भ जोखिमांक दर्शवितो. उदाहरणार्थ, संतुलित जोखिमांक असणारे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित वित्तीय साधनांचा त्यांच्या पोर्टफोलिओत समावेश करतात. उलटपक्षी आक्रमक गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या अपेक्षेने आपली बहुतांश गुंतवणूक अधिक जोखीम असलेल्या समभाग आणि समभाग संलग्न साधनांची निवड करतात.

वित्तीय ध्येयपूर्तीसाठी उपलब्ध कालावधी

वित्तीय ध्येयाची पूर्तता करण्यासाठी असलेला उपलब्ध कालावधी किंवा टाइम होरायझन हा मालमत्ता विभाजनातील महत्त्वाचा घटक आहे. हा घटक गुंतवणूकदार किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहे यावर अवलंबून असतो. बहुतेक वेळा हे गुंतवणुकीच्या ध्येयांसाठी पूर्तता करण्याच्या कालावधीवर तसंच ध्येयावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, दीर्घकालीन गुंतवणुकीची रणनीती एखाद्या गुंतवणूकदारास अधिक अस्थिर किंवा उच्च जोखमीच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त करू शकते. कारण अर्थव्यवस्थेत सतत बदल होत असतात त्यामुळे अर्थव्यवस्थेची गतिशीलता आज अनिश्चित असली तरी भविष्यात गुंतवणूकदाराच्या बाजूने बदलू शकते. तथापि, अल्प-मुदतीचे वित्तीय लक्ष्य असलेले गुंतवणूकदार मिडकॅपसारख्या अस्थिर आणि त्यामुळे धोकादायक पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.

लाइफ-सायकल अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड म्हणजे ज्या फंडात वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मालमत्ता वर्गाचा हिस्सा सेवानिवृत्तीची इच्छित तारीख जवळ येत असताना कमी जोखमीच्या गुंतवणूक साधनांत गुंतविला जातो. याचा अर्थ सामान्य म्हणजे रोखे आणि इतर निश्चित-उत्पन्न गुंतवणुकीची टक्केवारी वाढत्या वयानुसार वाढते तर समभागासारख्या अस्थिर गुंतवणुकीची टक्केवारी कमी होते. लाइफ-सायकल फंडांना ‘वय-आधारित निधी’ किंवा ‘सेवानिवृत्ती निधी’ म्हणून ओळखले जाते. गुंतवणूकदार समभागात आणि रोखे गुंतवणुकीचा एक भाग निश्चित करून गुंतवणूक करतात. त्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. तरुण वयात समभागांची मात्रा (प्रमाण) अधिक असते तर रोखे गुंतवणुकीची मात्र कमी असते. वय वाढत जाते तसे समभाग कमी होतात आणि रोखे गुंतवणूक वाढत जाते. ‘शंभर वजा वय’ हा मालमत्ता विभाजनातील सर्वमान्य नियम आहे.

मालमत्ता विभाजनासाठी ‘१०० चा नियम’

हा लोकप्रिय नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील मालमत्ता वाटप अधोरेखित करतो. १०० च्या नियमात, तुमचे वय १०० मधून वजा करून जो आकडा येईल तितकी टक्के रक्कम तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओत समभाग संलग्न साधनात गुंतविली पाहिजे. म्हणजेच वयाच्या ३० व्या वर्षी ३० टक्के रोखे आणि ७० टक्के समभाग असतात. वयाच्या पन्नाशीत दोघांची समान मात्रा असते आणि साठीत ६० टक्के रोखे आणि ४० टक्के समभाग असतात. अधिक जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या धाडसी गुंतवणूकदार ‘एकशे वीस वजा वय’ या सूत्राचा मालमत्ता विभाजनासाठी वापर करू शकतात.

गुंतवणूकदार वयानुसार विशिष्ट तारखेला (समजा की १ जानेवारी किंवा स्वत:चा वाढदिवस) रोखे आणि समभाग यांचे संतुलन करतात. वर्षभरात एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला लाइफ सायकल फंडात गुंतवणूक सुरू असते. पुढील विशिष्ट तारखेला लाइफ सायकल फंड गुंतवणूकदाराच्या वयानुसार रोखे आणि समभाग यांचे संतुलन करतात. गुंतवणूकदाराला आपल्या केवळ एकाच फंडासह आपल्या वयानुसार गुतवणुकीचा समतोल साधणे शक्य होते.  लाइफ-सायकल फंडांचे निश्चित मालमत्ता विभाजन गुंतवणूकदारांना दरवर्षी योग्य संतुलित पोर्टफोलिओ देण्याचे काम करते. निवृत्तीसाठी मालमत्ता निष्क्रिय दृष्टिकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लाइफ सायकल फंड योग्य ठरू शकेल. आपल्या गुंतवणुकीचे संतुलन राखताना, त्यांनी मालमत्ता विभाजन लाइफ सायकल मालमत्ता विभाजनाच्या टप्प्यानुसार (वरील कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे) केले पाहिजे. ‘१०० चा नियम’ फक्त मालमत्ता वाटप मार्गदर्शन आहे. आपल्या जोखमीची भूक किती आहे यावर विविध मालमत्ता विभाजन संकल्पनेची निवड करता येईल. परंतु लाइफ सायकल रणनीतीनुसार मालमत्ता विभाजन निश्चित करताना आपली जोखीम क्षमता / जीवनाची ज्या टप्प्यावर आहोत ती अवस्था विचारात घेणे आवश्यक आहे.

‘लाइफ-सायकल’ : गुंतवणुकीची रणनीती.

अमेरिकन फेडरल सरकारने एक संकल्पना म्हणून प्रथम लाइफ-सायकल फंड ही थ्रीफ्ट बचत योजना नावाने सादर केली. आता ही योजना अमेरिकेतील खासगी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) व्यवस्थापित करतात. सेवानिवृत्तीसाठी अमेरिकेत बरेच लाइफ-सायकल फंड लोकप्रिय आहेत. लाइफ-सायकल फंड हे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीच्या नियोजनासाठी, विशेषत: सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी खूप उपयुक्त ठरतात. ‘लाइफ-सायकल’ फंडात संपूर्ण गुंतवणूक कालावधीत गुंतवणूकदाराच्या वयानुसार गुंतवणुकीचा धोका संतुलित केला जातो. भारतात काही अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी (म्युच्युअल फंड) टाटा रिटायरमेंट सार्हिग फंड, निप्पोन इंडिया रिटायरमेंट फंड, एचडीएफसी रिटायरमेंट  सार्हिग फंड या व इतर काही फंड घराण्यांनी ‘लाइफ-सायकल’ म्युच्युअल फंड योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या देशात या प्रकारचे फंड फारसे लोकप्रिय नाहीत. ‘लाइफ-सायकल’ फंड सामान्यत: ‘रिटायरमेंट फंडा’च्या रूपात संरचित केले असले तरी या फंडांतील गुंतवणुकीला आयकराच्या ८०(सी) कलमानुसार, गुंतवणूकदारांना करवजावटीचा फायदा मिळत नसल्याने या प्रकारचे फंड भारतात फारसे लोकप्रिय नाहीत. या ‘लाइफ-सायकल’ फंडांमध्ये समभाग गुंतवणुकीचा वाटा सुरुवातीच्या काळात मोठा असतो. इक्विटी फंडातील दीर्घकालीन भांडवली नफा दोन वर्षांपूर्वीपर्यंत करमुक्त होता. या आíथक वर्षांपासून समभाग गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली लाभाची करमुक्त मर्यादा प्रत्येक आíथक वर्षांत एक लाखापर्यंत सीमित केली असून त्यापेक्षा अधिक दीर्घकालीन भांडवली लाभावर १० टक्के कर आकारला जातो. दुसरीकडे डेट फंडांमध्ये तीन वर्षांहून अधिकचा लाभ दीर्घ मुदतीचा भांडवली नफा समजून त्यावर ‘इंडेक्सेशन’चा लाभ देऊन २० टक्के दराने कर आकारला जातो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या तुलनेत लाइफ-सायकल फंड कर कार्यक्षम नसल्याने लाइफ-सायकल फंड उत्पादनांची संख्या भारतात मर्यादित आहेत.

‘एनपीएस’- लाइफ-सायकल गुंतवणूक:

नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) अंतर्गत ‘लाइफ-सायकल फंडा’चा पर्याय उपलब्ध आहे, याला एनपीएस परिभाषेत ‘ऑटो-चॉइस ऑप्शन’ म्हणूनही ओळखले जाते, जिथे समभाग आणि रोख्यांतील गुंतवणूक मालमत्ता विभाजन वयानुसार बदलत राहते. ज्या गुंतवणूकदारांना कर बचत जास्तीत जास्त करायची आहे त्यांच्यासाठी एनपीएस हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे. नॅशनल पेन्शन स्कीममधील दोन लाखांपर्यंत गुंतवणूक (दीड लाख आयकर कलम ८० (सी) + ५० हजार एनपीएस, कलम ८० सीसीडी वन बी) कर वजावटीस पात्र समजली जाते. तथापि, एनपीएस कालावधीची पूर्तता झाल्या नंतर मिळणाऱ्या ६० टक्के रकमेवर कर सवलत देत सरकारने मागील अर्थसंकल्पात एनपीएसला अधिक कर कार्यक्षम केले आहे. एनपीएस कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना ६० टक्के निधी काढून घेता येतो. ही रक्कम सरकारने करमुक्त केली असून शिल्लक ४० टक्के रकमेवर वार्षकिी घ्यावी लागते. या वार्षिकीमार्फत मिळणारे उत्पन्न अन्य उत्पन्नात मिळवून आलेल्या रकमेवर कर आकारणी होते.

लाइफ-सायकल फंड सेवानिवृत्ती योजना

‘युनिट िलक्ड इन्शुरन्स प्लॅन’ (यूलिप्स) च्या माध्यमातून जीवन विमा कंपन्यांच्या लाइफ-सायकल फंडासह सेवानिवृत्ती योजना उपलब्ध आहेत. या योजना काटेकोरपणे लाइफ-सायकल फंड नसल्या तरी आपण आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्याच्या जवळपास समभाग आणि रोखे यांचे प्रमाण राखतात. तसेच इक्विटी आणि डेट यांच्या स्विच करून मालमत्ता विभाजन नियंत्रित करता येते. एका वर्षांत लाइफ इन्शुरन्स कंपनी किती विनामूल्य स्विच देते आणि त्यानंतर प्रत्येक स्विचसाठी काही शुल्क आकारते का हे त्या कंपनीचा पेन्शनप्लान खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना हे माहीत असले पाहिजे की लाइफ-सायकल फंडात मालमत्ता विभाजन हे फंडाच्या मालमत्ता वाटप वेळापत्रकानुसार स्वयंचलित पद्धतीने होते. बहुतेक यूलीप सेवानिवृत्तीच्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना स्वत:ला स्विच अग्रेषित करावे लागतात. गुंतवणूकदारांना हेदेखील माहीत असले पाहिजे की म्युच्युअल फंडाप्रमाणे सर्व रक्कम फंडात न जाता युलिपमधील अंशत रक्कम गुंतवणूकदाराला जीवन विमा संरक्षण देण्यासाठी वापरली जातो आणि उर्वरित भागच गुंतविला जातो. गुंतवणूक केलेल्या रकमेचे प्रमाण गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा कमी असल्याने गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी परतावा मिळतो.

भारतात उपलब्ध असलेले लाइफ-सायकल फंडाचे मर्यादित पर्याय कर कार्यक्षम नाहीत. तथापि, गुंतवणूकदारांना ‘लाईफ सायकल’ मालमत्ता विभाजनाची गुंतवणुकीची संकल्पना समजली असेल तर ते म्युच्युअल फंड योजनांचा वापर करून कार्यकुशलतेने आणि प्रभावीपणे ही संकल्पना अमलात आणू शकतात. ‘लाइफ सायकल’ ही गुंतवणुकीची मूलभूत संकल्पना म्हणजे गुंतवणूकदाराच्या लाइफ सायकलपेक्षा जोखिमांकाशी संबंधित मालमत्ता विभाजन आहे. जोखीम क्षमता आणि उच्च जोखीम परताव्याची इच्छा यांमधील फरक समजणे महत्त्वाचे आहे. जोखीम क्षमता ही गुंतवणूकदाराची आíथक लक्ष्ये आणि रोकड सुलभतेशी प्रतारणा न करता आत्मसात करण्याची गोष्ट आहे. जीवनाच्या ज्या टप्प्यावर तुम्ही आहात, वित्तीय ध्येय सुरू होण्यास किती कालावधी शिल्लक आहे, उत्पन्नाची स्थिरता, कौटुंबिक कर्तव्यासाठी करायची आíथक उत्तरदायित्व इत्यादी विविध घटकांवर जोखीम क्षमता अवलंबून असते. उदाहरणार्थ एखाद्या तरुण कार्यरत व्यावसायिकाला कमी जोखमीची भूक असू शकते, तर कमी जोखीम क्षमता असणाऱ्या उदा. सेवानिवृत्त व्यक्तीला जास्त धोका असलेल्या गुंतवणूक खुणावू शकतात.

‘लाइफ-सायकल’ आधारित गुंतवणूक संकल्पनेचा आधार म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेली जोखीम स्वीकारण्याची क्षमता. लाइफ-सायकल आधारित गुंतवणुकीची संकल्पना दीर्घकालीन वित्तीय लक्ष्यांसाठी, खास करून निवृत्तीच्या योजनेसाठी वापरली जाते. गुंतवणुकीच्या दीर्घ कालावधीत गुंतवणूकदार जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जातात आणि त्यानुसार त्यांची जोखीम क्षमता बदलते. उदाहरणार्थ, गुंतवणूकदार तरुण असतो तेव्हा त्याच्याकडे जास्त जोखमीची क्षमता असते.  गुंतवणुकीतील तोटय़ाची भरपाई करण्यासाठी त्याच्याकडे भविष्यात पुरेसा कालावधी असतो. वृद्ध गुंतवणूकदारांना कमी धोका स्वीकारावासा वाटतो, कारण सेवानिवृत्ती जवळ येत असते.

गुंतवणुकीची रणनीती तयार करताना गुंतवणूकदारांना जोखीम आणि परतावा यांच्यातील संबंध समजून घ्यावा लागेल. मालमत्ता विभाजन करण्यासाठी जोखीम आणि परतावा यांच्यातील संबंध व्यस्त असतात. मालमत्ता विभाजन म्हणजे गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये विविध मालमत्ता साधनांचे विशिष्ट प्रेरणेने केलेले विभाजन. सर्वात मूलभूत स्वरूपात मालमत्ता विभाजन म्हणजे गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीत समभाग आणि रोखे भिन्न मालमत्ता वर्गात भिन्न जोखमीशी निगडित असतात. समभाग गुंतवणूक कमी कालावधीसाठी धोकादायक असली तरी दीर्घ मुदतीत सर्वाधिक भांडवली लाभ मिळवून देते. रोखे सुरक्षित असतात, परंतु कमी भांडवली लाभ देतात. दोघांच्या मिश्रणाने समभागांच्या अस्थैर्याची दाहकता कमी होते तर कमी उत्पन्न देणाऱ्या रोख्यांवरील भांडवली लाभ वाढविता येतो.

सारांश :

लाइफ-सायकल संकल्पनेवर आधारित गुंतवणुकीचे धोरण हे निवृत्तीच्या नियोजनासाठी आदर्श धोरण आहे. दुर्दैवाने, आपल्याकडे  निवडीस मर्यादा आहेत. वास्तविक म्युच्युअल फंडाचा वापर करून उत्तम लाइफ सायकल गुंतवणुकीची आखणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, मालमत्ता विभाजन करताना करविषयक मानसिकता कशी असते यावरही विचार करणे गरजेचे आहे. लाईफ तयार

(लेखक वित्तीय नियोजनकार आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 1:02 am

Web Title: age and property
Next Stories
1 थाळीत महागाईचे वादळ
2 खेळ मांडला…
3 पिकांचा चिखल, भाववाढ अटळ
Just Now!
X