मॅचदरम्यान चेंडू कुरतडल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्टने दिल्यानंतर क्रिकेट जगतात उठलेल्या वादळाने ‘सभ्य गृहस्थां’च्या या खेळाला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आणून सोडले आहे.

‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ म्हणून क्रिकेटचा लौकिक आहे. पण डागाळलेल्या अनेक घटना आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात घडत आल्या आहेत. सामना निश्चिती (मॅच फिक्सिंग), क्षण निश्चिती (स्पॉट फिक्सिंग), उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवन, मदानावरील मारहाण अशा अनेक गंभीर घटनांमुळे क्रिकेटला काळिमा फासला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बँक्रॉफ्टने चेंडू फेरफार केल्याचे कॅमेऱ्याने हेरले आणि या प्रकरणाने पाहता पाहता उग्र रूप धारण केले. चेंडू फेरफार केल्याची ही पहिलीच घटना क्रिकेटमध्ये घडली नव्हती. अनेक मातब्बर क्रिकेटपटूंनी हे गैरकृत्य केले. ते करणाऱ्या खेळाडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार, एखाद-दुसऱ्या सामन्याची बंदी घालण्यात आली किंवा सामन्याच्या मानधनाची काही टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आली. परंतु ताज्या प्रकरणात ऑस्ट्रेलियात आणि जगभरात मोठा जनक्षोभ उसळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेले कृत्य निंदनीयच आहे. परंतु देशद्रोह केल्याप्रमाणेच त्यांना देशात वागणूक मिळत आहे, तर अन्य राष्ट्रांमध्येही त्यांच्या या कृत्यावर क्रिकेटला ‘न भूतो, न भविष्यती’ अशा प्रकारे कलंकित केल्याचे दोषारोप होत आहेत. ऑस्ट्रेलियाचा बडतर्फ कर्णधार स्टीव्ह स्मिथ, या कटाचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट हे महाखलनायक का ठरले, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.

जगप्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) १५ ते १९ मार्च १८७७ या कालावधीत पहिली अधिकृत कसोटी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झाली होती. ती ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकली होती. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात पहिली अ‍ॅशेस मालिका १८८२-८३ मध्ये झाली होती. या मालिकेला १३६ वर्षांचा इतिहास आहे. कसोटी असो किंवा एकदिवसीय क्रिकेट असो, आपल्या वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर कोणत्याही संघाविरुद्ध विजयाची आकडेवारी अधिक असणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलियाचा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेता संघ हा अर्थात ऑस्ट्रेलियाचा. इंग्लंड हे क्रिकेटचे जन्मदाते. परंतु क्रिकेटच्या सुरुवातीच्या प्रवासापासून ऑस्ट्रेलियाचे अस्तित्व दिसून येते. किंबहुना इंग्लंडपेक्षा, नव्हे सर्व अन्य संघांपेक्षा त्यांची कामगिरी वरचढ आढळते.

१९३२ मध्ये क्रिकेटमधील अनभिषिक्त सम्राट डॉन ब्रॅडमन ऐन बहरात होते. त्यावेळी इंग्लिश संघ अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. इंग्लंडचा कर्णधार डग्लस जॉर्डिनने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी ‘बॉडीलाइन’ कट आखला. शरीरवेधी चेंडूंचा मारा करणाऱ्या या पद्धतीमुळे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील राजनैतिक संबंधसुद्धा बिघडले होते. परंतु ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ हा कधीच सभ्य म्हणून ओळखला गेला नव्हता. साम-दाम-दंड-भेद अशी कोणतीही नीती वापरून विजयश्री मिळवणे, हे त्यांचे वैशिष्टय़. खेळाचा रुबाब, विजयाचे वर्चस्व यातून कुठेतरी एक गर्विष्ठपणा त्यांच्या मानसिकतेमध्ये आला. त्यामुळेच त्यांनी जशी विजयासाठी सर्व काही ही रणनीती जोपासली, तसेच पराभव सहन करणेसुद्धा त्यांना कठीण जाते. २०११ मध्ये भारताविरुद्ध उपांत्यपूर्व लढत गमावल्यानंतर तत्कालीन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने ड्रेसिंग रूममधील टेलिव्हिजन सेट फोडला होता.

१९८१ मधील खिलाडूवृत्तीला काळिमा फासणारी अंडरआर्म गोलंदाजीची योजना ट्रॅव्हर चॅपेल या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची. ‘बेन्सन आणि हेजेस’ जागतिक चषक स्पध्रेतील एका महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची आवश्यकता होती. न्यूझीलंडच्या फलंदाजाला षटकार मारण्याची कोणतीही संधी मिळू नये म्हणून त्यावेळचा कर्णधार ग्रेग चॅपेलने आपल्या छोटय़ा भावाला चक्क अँडरआर्म गोलंदाजी करण्याचे निर्देश दिले. स्वाभाविकपणे फलंदाज षटकार खेचण्यात अपयशी ठरला. त्यावेळी ही कृती अधिकृत ठरली. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला, परंतु खिलाडू वृत्तीच्या भावनेला ठेच पोहोचवल्यामुळे क्रिकेटविश्वाचा विश्वास गमावला.

मागील वर्षीच स्टीव्ह स्मिथ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. बेंगळूरु कसोटी सामन्यात स्मिथ आणि पीटर हँड्सकोम्ब मैदानावर होते. मात्र पंचांनी बाद असल्याचा जो कौल दिला, त्याबाबत डीआरएस घ्यावा की घेऊ नये, यासाठी स्मिथने चक्क ड्रेसिंग रूममध्ये विचारणा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही. त्याने ही बाब त्वरित पंचांच्या लक्षात आणून दिली. मग सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्मिथने माझा मेंदू भ्रमिष्ट झाल्याचे मान्य करीत दिलगिरी प्रकट केली होती.

‘स्लेजिंग’ अर्थात डिवचणे हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा स्थायीभाव. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची ही मानसिकता मग स्थानिक क्रिकेटमध्येही ओघानेच दिसून येते. साधारण १३ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात एक षोड्षवर्षीय गोंडस मुलगा आत्मविश्वासाने फलंदाजी करीत होता. परंतु नजीकच्या क्षेत्ररक्षकांपैकी एक अनुभवी क्रिकेटपटू त्याला वारंवार डिवचत होता. परंतु तो मुलगा मनाने खंबीर होता. त्याने आपले चित्त ढळू दिले नाही. शांतपणे तो गोलंदाजाला सामोरा जात आपल्या धावांचा आकडा वाढवत होता. मग अचानक धैर्याने तो त्या क्षेत्ररक्षकाकडे वळला आणि चेहऱ्यावर स्मित राखतच त्याने त्याला विचारले, ‘‘तुम्ही किती वर्षांचे आहात?’’ त्यावर तो क्षेत्ररक्षक उत्तरला, ‘‘मी ३० वर्षांचा!’’ मग त्या मुलाने हसतच त्याच्यावर भाष्य केले, ‘‘अरे, तुम्ही अजून याच दर्जाचे क्रिकेट खेळताय?’’ हे ऐकताच सर्वानाच हसू फुटले. त्या मुलाची खोडी काढणारा तो स्थानिक अनुभवी क्रिकेटपटू खजील झाला होता. मग सामन्यानंतर त्या मुलाच्या खेळीचे त्या क्रिकेटपटूने स्वत: ड्रेसिंग रूममध्ये जाऊन कौतुक केले होते. तोच हा स्टीव्हन स्मिथ!

डिवचण्यात तरबेज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर १९७४-७५ मध्ये ‘अग्ली ऑस्ट्रेलियन्स’ म्हणजेच ‘दुष्ट ऑस्ट्रेलियन्स’ असा शिक्का बसला. संघाचे क्षेत्ररक्षण चालू असताना यष्टीपाठी यष्टिरक्षक रॉड मार्श आणि कर्णधार इयान चॅपेल फलंदाज डिवचेल, अशा प्रकारचे संभाषण करायचे. त्यामुळे फलंदाजाचा संयम बिघडायचा आणि तो बाद व्हायचा. हे षड्यंत्र ते बऱ्याचदा रचायचे.

ऑसी वेगवान गोलंदाज मव्‍‌र्ह ह्य़ुजेस डिवचण्याच्या कलेत पारंगत होता. पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने एकदा त्याला म्हटले की, ‘‘तू इतका जाडजूड आहे, तू क्रिकेट कसा काय खेळतोस? तू तर बस चालवायला हवी!’’ जावेदच्या या वक्तव्यानंतर ह्य़ुजेसने आक्रमक मारा करीत त्याला बाद केले. मग जावेद तंबूत परतत असताना ुजेसने त्याला थांबवले आणि म्हटले की, ‘‘तिकीट प्लीज!’’

सध्या चालू असलेली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली होती. पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानाच्या वेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डीकॉक यांच्यात हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा संदर्भात दोन घटना घडल्या. यापैकी एक वॉर्नर आणि दुसरी स्मिथ यांच्या संदर्भात घटना घडली होती. पहिल्या घटनेत आयसीसीच्या नियमावलीचा पहिला स्तर आणि दुसऱ्या घटनेत दुसऱ्या स्तराच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे रबाडावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली. परंतु रबाडाला स्वत:च्या वर्तणुकीबाबत पूर्ण खात्री होती, म्हणून त्याने या निर्णयाविरोधात दाद मागितली. अखेर लवादाने चौकशीअंती रबाडाच्या बाजूने कौल दिला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रबाडाला दिलासा मिळाला. तो पुढील दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार होता.

तिसऱ्या कसोटी सामन्याला सामोरे जाताना वातावरण तापले होते. रबाडाचा काटा काढण्याचा कट हाणून पाडण्यात आला होता. विजयासाठी आता कोणती नवी क्लृप्ती लढवावी, याचा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू गांभीर्याने विचार करीत होते. यातूनच वॉर्नरने ही नवी योजना आखली. २०१६ मध्ये शेफिल्ड चषक क्रिकेट स्पध्रेत चेंडूशी छेडछाड प्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांना तंबी देण्यात आली होती. परंतु त्यातून कोणताही धडा न घेता पुन्हा त्यांच्या डोक्यात या कटाने घर केले. कॅमेरून बँक्रॉफ्टकडे प्रत्यक्ष कृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु प्रक्षेपण कॅमेऱ्याच्या नजरेतून ही बाब सुटू शकली नाही. सामन्यानंतर स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांनी पत्रकार परिषदेत घडल्या प्रकाराची कबुली दिली. त्यांच्यावर जगभरातून टीकेचा भडिमार होऊ लागला. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मंडळ, सरकार आणि नागरिक यांच्याकडूनही चेंडूच्या फेरफार प्रकरणाची निर्भर्त्सना केली गेली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचे एरवीचे मैदानावरील वागणे हे उन्मत्तपणाचे असल्यामुळे आता सर्वाना त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची ही नामी संधी चालून आली होती. एक प्रकारचा जागतिक जनक्षोभ त्यांच्याविरोधात निर्माण झाला. त्याचेच पर्यवसान म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार पदावरून पायउतार केले. मग चौकशी समितीने स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षांची बंदी घातली, तर बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली. ते मायदेशी परतल्यावर त्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या. प्रसारमाध्यमांसमोर ते ढसाढसा रडले. आम्हाला माफ करा, अशी करुणा भाकली. त्यांच्या माफीनाम्यांनंतर देशात आता सहानुभूतीची लाट आली आहे. त्यांच्यावरील बंदीची शिक्षा सौम्य करावी अशी मागणी होत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटला कलंक लावणाऱ्या या त्रिकुटाच्या या ‘रडी’च्या डावाबाबतही काही जणांच्या मनामध्ये साशंका निर्माण होत आहे.

२०१५ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या घरच्या मैदानावर स्मिथने शतकी खेळी साकारून ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेले होते. मग मेलबर्नला मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली एक सुवर्णाध्याय लिहिला गेला. अंतिम सामन्यातसुद्धा स्मिथने अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यावेळी २०१९मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकात स्टीव्हन स्मिथच ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अभियानाचे नेतृत्व करील असे आशादायी चित्र दिसत आहे. अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि क्लार्क यांचा समर्थ वारसा चालवू शकेल असा स्मिथ ऑस्ट्रेलियाकडे असल्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता स्मिथ आणि वॉर्नर हे आपल्या कुकर्मामुळे आगामी विश्वचषकात नेतृत्व करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कदाचित भविष्यात कधीच त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व सोपवले जाणार नाही, असे दिसते आहे.

तूर्तास, चेंडू फेरफार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची अपरिमित हानी झाली आहे. खेळाडू आणि देशातील क्रिकेट संघटनेला मोठा आर्थिक फटकासुद्धा बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही संघाविरुद्ध खेळतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाविषयी जगभरातील क्रिकेटरसिकांना आपलेपणा वाटतो. याचे कारण ऑस्ट्रेलियाची वृत्ती. त्यामुळेच खलनायकत्व आपसुकच त्यांच्याकडे जाते. परिणामी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्या या गैरवर्तनानंतर त्यांच्या विरोधाची लाट प्रचंड प्रमाणात आली. पण या घटनेने ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट बदलेल का?.. तर याचे उत्तर नाही असेच असण्याची शक्यता अधिक आहे. कारण मानसिकता आणि वृत्ती बदलता येत नाही, हेच शाश्वत सत्य आहे. आपण केलेल्या चुकांची कबुली देतानाही या तीन खेळाडूंनी कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडणे, पत्नी मुलांसह कॅमेऱ्याला सामोरं जाऊन सहानुभूती मिळवणे असले उद्योग केले आहेत. चुका कबूल करायलाही निधडेपणा लागतो. देशवासियांसमोर भावनिक खेळ करत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानाबाहेरही आपण रडीचाच डाव खेळतो हे दाखवून दिले आहे.

घटनाक्रम

२४ मार्च

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कॅमेरून बँक्रॉफ्टने खिशातून काहीतरी पिवळसर वस्तू काढली आणि रीव्हर्स स्विंग होण्याच्या उद्देशाने चेंडू त्यावर घासला. मैदानातील कॅमेऱ्याने त्याला रंगेहाथ पकडले.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथने या आरोपाची कबुली दिली. संघाच्या प्रमुख व्यक्तींनी उपाहाराप्रसंगी हा कट आखल्याचे त्याने स्पष्ट केले.

२५ मार्च

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशीला प्रारंभ केला. याचप्रमाणे स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदावरून आणि डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार केले.

आयसीसीने नियमानुसार स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आणि सामन्याचे संपूर्ण मानधन दंड म्हणून ठोठावले. बँक्रॉफ्टच्या मानधनाची ७५ टक्के रक्कम दंड करण्यात आली, तसेच त्याच्या खात्यावर गैरवर्तनाचे दोन गुण जमा करण्यात आले.

क्रिकेटजगतामध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूं विरोधात मोठी विरोधाची लाट निर्माण झाली. त्यांच्यावर किमान सहा महिन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली.

आगामी आयपीएल ट्वेन्टी-२०  क्रिकेट स्पध्रेतील त्यांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार गैरवर्तनाबद्दल आजीवन बंदीची शिक्षासुद्धा होऊ शकते.

२६ मार्च

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नीती अधिकारी इयान रॉय आणि उच्च कामगिरी व्यवस्थापक पॅट होवार्ड चौकशीसाठी केपटाऊनला दाखल झाले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँडसुद्धा दक्षिण आफ्रिकेत दाखल.

शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पध्रेतील सामना संपल्यानंतर सलामीवीर मॅट रेनशॉ याला चौथ्या कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्याने २०१७मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते.

चेंडू फेरफार प्रकरणाचा सूत्रधार वॉर्नर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वानी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केले.

राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून स्मिथ पायउतार. नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवली. सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरबाबत निर्णय घेतला नव्हता.

२७ मार्च

स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट यांची ऑस्ट्रेलियाच्या संघातून हकालपट्टी आणि दक्षिण आफ्रिका सोडण्याचे आदेश जेम्स सदरलँड यांनी दिले.

प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना दिलासा.

२८ मार्च

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाई करताना स्मिथ आणि वॉर्नरवर वर्षभराची बंदी घातली, तर बँक्रॉफ्टला नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली.

बीसीसीआयकडून स्मिथ आणि वॉर्नर यांना आयपीएल क्रिकेट स्पध्रेत खेळण्यास मज्जाव करण्यात केला.

वॉर्नरची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी.

२९ मार्च

सिडनीत दाखल झाल्यानंतर स्मिथने आणि पर्थमध्ये बँक्रॉफ्टने आम्हाला माफ करा, असे भावनिक आवाहन केले. मी खोटे बोललो, अशी कबुली बँक्रॉफ्टने दिली. आवडत्या खेळाला मी डागळले, अशी शब्दांत वॉर्नरने आपल्या भावना प्रकट केल्या.

स्मिथ-वॉर्नरच्या पत्रकार परिषदेनंतर लेहमन यांनी चौथ्या कसोटी सामन्यानंतर प्रशिक्षकपद सोडणार असल्याचे जाहीर केले.

सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाचे नेतृत्व केन विल्यम्सनकडे सोपवण्यात आले.

३० मार्च

स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्टवरील बंदीबाबत सहानुभूतीची लाट.

दोन वर्षांपूर्वी शेफिल्ड शिल्डमधील एका सामन्यात वॉर्नर आणि स्मिथने चेंडू फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी त्यांना तंबी दिली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या प्रायोजकांनी करार संपुष्टात आणला.

३१ मार्च

वॉर्नरने सिडनीत आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी खंत व्यक्त केली.

चेंडू फेरफारीच्या घटना

१९७७

चेंडू अधिक स्विंग व्हावा, या उद्देशाने इंग्लंडचा गोलंदाज जॉन लेव्हरने चेन्नई येथे झालेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूच्या एका बाजूला व्हॅसलिन लावले. लेव्हर आणि बॉब विलिस यांनी त्या चेंडूने गोलंदाजी केली.
कारवाई : कारवाई झाली नाही.

१९९०

फैसलाबाद येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने बॉलमध्ये फेरफार करण्याच्या उद्देशाने बाटलीचे झाकण वापरले होते. माजी यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम परोरेने दशकानंतर ही गोष्ट उजेडात आणली. चेंडूमध्ये फेरफार केल्यामुळे तो अधिक स्विंग होऊ लागला. परिणामी वेगवान गोलंदाज ख्रिस प्रिंगलने सामन्यात ११ बळी मिळवले.
कारवाई : कोणतीही कारवाई नाही.

१९९४

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मायकेल आथर्टनने आपल्या खिशातून काढून सुका चिखल चेंडूला लावले. हात कोरडे रहावे, या हेतूने मी मैदानावरीलच माती घेऊन ती चेंडूला लावल्याचे आथर्टनने सांगितले.
कारवाई : आथर्टनला दंड ठोठावण्यात आला. मात्र निलंबनाची कारवाई झाली नाही आणि कर्णधारपदसुद्धा गमवावे लागले नाही.

२०००

२०००मध्ये श्रीलंकेत झालेल्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसने आपल्या बोटांनी चेंडूमध्ये फेरफार केला होता.
कारवाई : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेला युनूस हा पहिला खेळाडू ठरला. सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के दंडाची कारवाईसुद्धा त्याच्यावर झाली.

२००१

सचिन तेंडुलकर बोटांनी चेंडूची शिवण उसवत असल्याचा आरोप सामनाधिकारी माइक डेनीस यांनी २००१मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात केला होता. मैदान ओलसर असल्यामुळे चेंडूवर घाण पुसत असल्याचे सचिनने प्रामाणिकपणे सांगितले.
कारवाई : सचिनवर एका सामन्याची बंदी.
पुढील वाद : सचिनवर बंदीची कारवाई मागे घेतली नाही, तर भारतीय संघ दौऱ्यावरून माघारी परतेल, असा इशारा बीसीसीआयने दिला. बीसीसीआयने तिसऱ्या कसोटी सामन्यावर बहिष्कार घालताना अनधिकृत कसोटी नमूद करीत आपला दुसऱ्या फळीचा संघ खेळवला. अखेर आयसीसीने नमते घेतले. सचिन चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी नसून, तो पंचांची परवानगी न घेता चेंडू साफ करीत होता, असे नमूद केले.

२००४

तिरंगी क्रिकेट स्पध्रेतील ब्रिस्बेन येथे झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज राहुल द्रविडने चेंडूच्या लकाकी असलेल्या भागावर खोकल्याच्या गोळ्यांचे पाकीट घासून त्यात फेरफार केल्याचे निष्पन्न झाले होते.
कारवाई : सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी द्रविडला दोषी ठरवून त्याच्या सामन्याच्या मानधनाची ५० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला.

२००५

२००५मध्ये इंग्लंडने १८ वर्षांच्या अंतरानंतर पहिला अ‍ॅशेस मालिका विजय मिळवला होता. याबाबत इंग्लंडचा माजी फलंदाज मार्क ट्रेस्कॉथिकने आपल्या आत्मचरित्रात चेंडूला लकाकी येण्यासाठी मिंट प्रेरित लाळ वापरल्याचा गौप्य गौप्यस्फोट केला होता. चेंडूशी छेडछाड केल्यामुळे तो पुरेशा प्रमाणात स्विंग होऊ लागला. त्यामुळे इंग्शिल गोलंदाजांना ही कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकता आली.
कारवाई : आत्मचरित्राच्या प्रकाशनाआधीच ट्रेस्कॉथिक निवृत्त झाल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

२००६

ओव्हलमधील वादग्रस्त कसोटी सामन्यात पाकिस्तानवर चेंडूशी छेडछाड केल्याचा ठपका ठेवून पंच डॅरेन हेअर आणि बिल डॉक्ट्रॉव्हने इंग्लंडला पाच अतिरिक्त धावा दिल्या. या निर्णयाच्या निषेधार्थ पाकिस्तानने चहापानानंतर मैदानावर येण्यास इन्कार केला. आता इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळात वर्षोनुवष्रे हा वाद धुमसतो आहे.
कारवाई : पाकिस्तानला ५ धावांचा दंड.

२०१०

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी चेंडूत फेरफार करण्यासाठी स्पाइक्सचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे चेंडू स्विंग होऊ लागल्याचे म्हटले गेले. या दोघांनीही आरोप फेटाळला.
कारवाई : कोणत्याही खेळाडूवर कारवाई झाली नाही.

२०१०

पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात चेंडूला चावा घेताना पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला टीव्ही कॅमेऱ्याने रंगेहाथ पकडले.
कारवाई : आफ्रिदीवर दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली.

२०१२

होबार्ट येथील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप श्रीलंकेच्या खेळाडूंनी ठेवला होता. त्याने पहिल्या डावात ५४ धावांत ५ बळी मिळवले.
कारवाई : सिडलवर आधी कारवाई करण्यात आली. मात्र नंतर आयसीसी तो दोषी नसल्याचा निर्वाळा दिला.

२०१३

२०१३मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करीत असताना चेंडूत फेरफार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डय़ू प्लेसिसने तो पँटच्या झिपरला घासल्याचे निदर्शनास आले होते.
कारवाई : मैदानावरील पंचांनी पाकिस्तानला ५ धावा देऊन चेंडू बदलला. डय़ू प्लेसिसने आपली चूक कबूल केली. त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम दंड करण्यात आली.

२०१४

गॉल येथील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडरने आपल्या बोटाने आणि अंगठय़ाने चेंडूवर ओरखडे आणले होते.
कारवाई : फिलँडर दोषी आढळल्यामुळे त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ७५ टक्के रक्कम दंड करण्यात आली.

२०१६

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस होबार्ट येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकीर्दीत दुसऱ्यांदा चेंडू फेरफार प्रकरणात दोषी आढळला. मिंट किंवा लॉलिपॉपची लाळ त्याने चेंडूसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई : आयसीसीने डय़ू प्लेसिसला दोषी ठरवले आणि दंड म्हणून त्याच्या संपूर्ण सामन्याचे मानधन आकारले.

चेंडू कुरतडणे ही तर फसवेगिरीच

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो. अलीकडे खेळाडूंना पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यामध्ये झटपट यश हवेहवेसे असते. मग त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अवलंब करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची टवाळकी करणे, खिल्ली उडविणे, अपशब्द उच्चारत त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे आदी विविध तंत्राचा उपयोग करणे हे तर सर्रास दिसू लागले आहे. चेंडू कुरतडण्याचा प्रकार हा खूप जुना असला तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याबाबत बेशिस्तपणाचा कळस गाठल्यामुळेच तो प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू चंदू बोर्डे, कीर्ती आझाद, सुरेंद्र भावे व हृषीकेश कानिटकर यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले कृत्य अखिलाडूवृत्तीचे व खेळास लांछनास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

विजयासाठी अयोग्य मार्ग – चंदू बोर्डे

चेंडू कुरतडण्याच्या प्रकाराचा शिल्पकार म्हणून पाकिस्तानचा सर्फराझ नवाझ याच्याकडे पाहिले जाते. त्याच्या इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूस या सहकाऱ्यांनीही त्याचाच कित्ता गिरवीत चेंडू कुरतडण्याचे प्रकार सुरू केले. घाम किंवा थुंकी लावून चेंडूची एक बाजू जड केली जाते व त्याचा फायदा रिव्हर्स स्विंग करण्यासाठी होतो. अलीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले हे कृत्य अतिशय अखिलाडूवृत्तीचे आहे. त्यांनी तर खरकागद व अन्य साहित्याचा उपयोग त्यासाठी केला. साऱ्या जगाने त्यांचे हे कृत्य पाहिले. ही केवळ प्रतिस्पर्धी संघाची नव्हे तर खेळाचीही फसवणूक आहे. अशा वृत्तीमुळे या खेळाडूंबाबत व खेळाबाबतही सामान्य प्रेक्षकांमध्ये कटूता निर्माण होते. असे कृत्य रोखण्यासाठी अधिकाधिक कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू एरवीही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्याबाबत वाकबगार मानले जातात. त्यांच्या या वृत्तीत आता चेंडू कुरतडण्याच्या प्रकाराने भर घातली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर केलेली कारवाई खूपच कमी आहे. त्यांना सहानुभूती दाखविणे अयोग्य होईल. त्यांच्यावर तहहयात बंदीचीच कारवाई केली पाहिजे तरच त्यांचे अन्य सहकारी यापुढे असे प्रकार करण्याबाबत धजावणार नाहीत.

रिव्हर्स स्विंगला अन्यही पर्याय आहेत – सुरेंद्र भावे

अलीकडे रिव्हर्स स्विंग तंत्राद्वारे गडी बाद करण्याचा अनेक द्रुतगती गोलंदाज प्रयत्न करीत असतात. चेंडूचा आकार थोडासा बदलविणे किंवा त्याची एक बाजू जड करणे असे तंत्र त्यासाठी उपयोगात आणले जाते. चेंडूची जी बाजू जड होते, त्या बाजूवर भर दिला की चेंडू रिव्हर्स स्विंग होतो. नैसर्गिक शैलीचा उपयोग केला तरीही रिव्हर्स स्विंग होऊ शकतो. दुर्दैवाने त्या तंत्राचा सराव न करता अलीकडे चेंडू कुरतडण्यावर भर दिला जात आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना कळणार नाही याची काळजी न घेता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बेशिस्त वर्तन करीत खेळाच्या प्रतिष्ठेस तडा दिला आहे. केवळ रिव्हर्स स्विंगवर सामने जिंकता येत नाहीत. आपण अशा फसव्या तंत्राचा किती उपयोग करावा यालाही काही मर्यादा घातल्या पाहिजेत. विजय मिळविण्यासाठी आक्रमक तंत्राचा उपयोग करता येतो. मात्र प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना येनकेन प्रकारे मानसिक त्रास देणे हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शोभत नाही. त्यांचे खेळाडू खिलाडूवृत्तीत कमी पडले असे निश्चितपणे सांगता येईल. पश्चात्ताप व्यक्त केला किंवा प्रसारमाध्यमांसमोर रडू आले तरी असे अपराध कधीही विसरले जाणार नाहीत. केवळ त्यांची नव्हे तर देशाचीही नाचक्की झाली आहे. क्रिकेटमधील सम्राटपद भूषविणाऱ्या ऑस्ट्रेलियाची तीनचार बेशिस्त खेळाडूंमुळे प्रतिमा ढासळली गेली आहे.

बेशिस्त खेळाडूंवर तहहयात बंदी पाहिजे – कीर्ती आझाद

आमच्या वेळी फारशा सुविधा व सवलती नव्हत्या. नवीन तंत्रज्ञान किंवा अत्याधुनिक साधने उपलब्ध नव्हती. तरीही कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्या वेळी रिव्हर्स स्विंग प्रकार आम्हाला माहीत नव्हता. आमच्या वेळी कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल असे भेदक गोलंदाज आमच्याकडे होते. अचूक दिशा व टप्पा ठेवला की गोलंदाजीत यश मिळविता येते हे आम्हाला शिकविण्यात आले होते. त्या तंत्रावर भर देत आम्ही भारतास अनेक विजय मिळवून दिले. आता स्पर्धात्मक क्रिकेट वाढल्यामुळे झटपट यश मिळविण्याकडे खेळाडूंचा कल असतो. त्यामुळेच बेशिस्त वर्तन करण्याबाबत खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत. प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांच्या संघातील खेळाडूंची जाणूनबुजून टिंगलटवाळकी करणे, त्यांचा अवमान होईल अशी टीका करणे अशा विविध तंत्रांद्वारे मानसिक खच्चीकरणाबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडू व प्रशिक्षक माहीर आहेत. चेंडू कुरतडण्यामुळे त्यांचे खरे रूप लोकांसमोर उघड झाले आहे. केवळ एक वर्ष बंदी घालून अशा कृत्यांवर पांघरुण घालता येत नाही. त्यांच्यावर तहहयात बंदी घातली गेली तरच अन्य युवा खेळाडू असे कृत्य करण्याचे टाळतील व निकोप स्पर्धा होईल. त्याचप्रमाणे नवोदित किंवा युवा खेळाडू विजय मिळविण्यासाठी कोणताही  झटपट मार्ग स्वीकारणार नाहीत. यशाचे शिखर गाठण्यासाठी व यशस्वी करीअर करण्यासाठी ते प्रामाणिकपणे कष्ट करतील.

असे कृत्य खेळास मारकच – हृषीकेश कानिटकर

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले कृत्य खरोखरीच क्रिकेटची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये हुकमत गाजविणाऱ्या या संघाकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते. त्यांचे हे कृत्य क्रिकेटच्या नीतिमूल्यांना तडा देणारे आहे. त्यातही डेव्हिड वॉर्नर, स्टिव्हन स्मिथ अशा आदर्श खेळाडूंकडून अपेक्षित नव्हते. युवा खेळाडूंसाठी हे खेळाडू नेहमीच आदर्श खेळाडू मानले जात असत. मात्र त्यांच्याकडून झालेल्या बेशिस्त वर्तनामुळे त्यांनी युवा खेळाडूंचा विश्वास गमावला आहे. अर्थात झालेल्या कृत्याबद्दल त्यांनी माफीनामा व्यक्तकेला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे नियमानुसार या खेळाडूंवर कारवाई सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांना आयपीएल स्पर्धेतूनही डच्चू दिला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे. साहजिकच असे कृत्य पुन्हा करण्यास ते उद्युक्त होणार नाहीत. त्याचप्रमाणे अन्य खेळाडूही असा मार्ग निवडणार नाही. आता या गोष्टी पुन:पुन्हा उगाळत बसण्याऐवजी भविष्याचा विचार अन्य क्रिकेटपटूंनी केला पाहिजे. रिव्हर्स स्विंग हे एकमेव विजय मिळविण्याचे अस्त्र नसते. अन्य शैलीचा उपयोग करीत विजय मिळविता येतो हे खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे.
शब्दांकन : मिलिंद ढमढेरे
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com